Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

14 July 2018

अलौकिक स्वामीकला

करुणाब्रह्म

नमस्कार !!
आज आषाढ शुद्ध द्वितीया, 'श्रीपाद जयंती'चे महापर्व आहे ! भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०४ वी जयंती आहे.
प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी मंगळवार दि.२३ जून १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदा लागल्यावर, रात्री साडे अकराच्या सुमारास गरुडेश्वर येथे देहत्याग केला. त्यांनी पूर्वीच प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांना नृसिंहवाडी मुक्कामी 'कुलोद्धारक पुत्र होईल', असा आशीर्वाद देऊन ठेवला होता. त्याचवेळी "काही अडचण भासल्यास श्रीचरणांचे मनोभावे स्मरण करावे", असेही सूचक उद्गार श्रीस्वामींनी काढले होते. त्याचा प्रत्यय प.पू.मातु:श्रींना लवकरच आला. २३ जूनच्या संध्याकाळी मातु:श्रींना प्रचंड प्रसववेदना होऊ लागल्या. काहीकेल्या त्या वेदना शमेनात. शेवटी रात्री त्यांनी कळवळून प.प.श्री.स्वामीमहाराजांची प्रार्थना केली. त्याबरोबर भक्तकरुणाकर श्रीस्वामी महाराज पुण्यातील त्यांच्या घरात सदेह प्रकट झाले व म्हणाले, "बाळ, घाबरू नकोस. या वेदना आता शमतील. आम्ही थोड्याच वेळात देह ठेवतो आहोत. परवा सकाळी तुला आमच्याच अंशाने पुत्र होईल, त्याचे नाव 'श्रीपाद' ठेवावे. तुझे कल्याण असो", असे म्हणून आशीर्वादाची मुद्रा करून श्रीस्वामी महाराज अदृश्य झाले. त्यावेळी इकडे गरुडेश्वरला खरेतर त्यांनी निरवानिरवीचे बोलून डोळे मिटून घेतलेले होते. तेवढ्यात पुन्हा डोळे उघडले. तेव्हा समोर बसलेल्या शिष्योत्तम श्री.शंकरकाका देशमुख आजेगावकर यांनी विचारले असता, "भक्तकार्यार्थ जाऊन आलो", असे स्वामी महाराज उत्तरले व त्यांनी देहत्यागाची लीला केली. प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी गुरुवार दि.२५ जून १९१४ रोजी सकाळी ९.२९ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रावर प्रसूत झाल्या व श्रीपादांचा जन्म झाला. नेमके अगदी त्याचवेळी, साडेनऊ वाजता गरुडेश्वरी स्वामींचा पुण्यपावन देह नर्मदेत विसर्जित केला गेला. तिकडे स्वामीकुडी नर्मदामैयाच्या कुशीत विसावली तर इकडे स्वामीकला पार्वतीमातेच्या कुशीतून पुनश्च अवतरली; भक्तवत्सल श्रीस्वामी महाराजांचे भक्तोद्धाराचे कार्य अक्षुण्ण ठेवण्यासाठी !
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे साक्षात् श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजच होते; याचा आजवर अनेक भाग्यवान भक्तांनी अनुभव घेतलेला आहे. कांचीपीठाधीश्वर परमाचार्य जगद्गुरु श्रीमत् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज प.पू.श्री.मामांना 'प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज' असे संबोधूनच त्यांच्याशी संवाद करीत असत. श्री.रंगावधूत महाराजांचे शिष्योत्तम असलेल्या कोसंब्याच्या प.पू.पंडितजी कुलकर्णी महाराजांना प.पू.श्री.मामांच्या ठायी नेहमीच प.प.श्री.स्वामी महाराजांचे दर्शन होत असे. पू.मामांच्या जागी प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराजांचे दर्शन लाभलेले काही भाग्यवान भक्त आजही हयात आहेत. अशा या अलौकिक श्रीदत्तात्रेयस्वरूपाच्या, श्रीपादरायांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सादर साष्टांग दंडवत !
आपल्या सद्गुरूंचे अलौकिकत्व अतिशय भावगर्भ शब्दांत मांडताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज आणि सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पूर्ण कृपा लाभलेले प.पू.श्री.श्री.द. उपाख्य मामासाहेब देशपांडे हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर विलक्षण व्यक्तिमत्त्व होय. श्रीदत्त संप्रदाय, श्रीनाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदायांचे अध्वर्यू तसेच वैदिक प्राचीन शक्तिपात योगविद्येचे महान आचार्य म्हणून ते विश्वविख्यात आहेत. संतसाहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग आणि कल्पनातीत अपूर्व असे चिंतन सर्वश्रुतच आहे. संतवाड्मयावरील त्यांचे रसाळ निरूपण भल्याभल्यांना अंतर्मुख व्हायला लावणारे, थक्क करून सोडणारे आणि भगवत्सेवेची अवीट गोडी हृदयात निर्माण करविणारे आहे.
प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे आणि प.पू.मातु:श्री सौ.पार्वतीदेवी देशपांडे या परमार्थातील थोर अशा मात्या पित्यांच्या पोटी जन्माला आलेले प.पू.श्री.मामा दैवीगुणसंपदा आणि प्रेममाधुर्याचे झळाळते मेरुशिखरच होते. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन त्यांनी केलेली थोर राष्ट्रसेवा आणि त्यानंतर लोकसेवा, लोकोद्धारासाठी वेचलेले उर्वरित आयुष्यातील क्षण अन् क्षण जवळून पाहू गेलो तरी माथा त्यांच्या चरणी आदराने, कृतज्ञतेने लवतो. बुडतिया जनांचा आत्यंतिक कळवळा असलेली ही महान विभूती जगावेगळी असूनही जगातच रमली; जगाच्या कल्याणातच भगवत्पूजा बघून अविश्रांत कष्टत गेली; अनेकांच्या अंधकारमय आयुष्यात प्रेमदीपच उजळीत राहिली.
प.पू.मातु:श्री पार्वतीबाई देशपांडे आणि प.पू.योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज; या आपल्या समर्थ सद्गुरुद्वयींकडून मिळालेला परमार्थाचा अतिदिव्य आणि तेजस्वी वारसा जोपासत त्यांनी अनेक जीवांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. जगभर विखुरलेल्या त्यांच्या हजारो साधकांच्या हृदयात त्यांच्या विभूतिमत्वाची, दैवीसंपदेची, अवतारित्वाची कोरली गेलेली सुमधुर स्मृतिचित्रे त्यांच्या सत्कीर्तीची उज्ज्वल पताका झळकवीत, त्यांची नित्य यशोगीतेच गुणगुणत आहेत."
आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श भक्त, आदर्श लोकशिक्षक व आदर्श सद्गुरु असे आदर्शांचेही परमादर्श असणारे प.पू.श्री.मामांचे समग्र चरित्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहे. तुम्हां-आम्हां परमार्थसाधकांनी ते चरित्र सदैव डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी असेच आहे.
लवकरच आपण प.पू.श्री.मामांच्या चरित्र व वाङ्मयाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी तसेच प्रचार व प्रसार कार्यासाठी एक नवीन संकेतस्थळ सुरू करीत आहोत. या स्थळावर प.पू.श्री.मामांशी संबंधित सर्व माहिती, त्यांच्या वाङ्मयावरील अभ्यासकांचे चिंतन, पू.मामांची बोधवचने, त्यांच्या स्मृतिकथा व बोधप्रसंग, प.पू.मामांची विविध छायाचित्रे असे भरपूर साहित्य सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. भविष्यात सर्वांना या संकेतस्थळाचा सातत्याने अधिकाधिक उपयोग करता येईल.
प.पू.श्री.मामांच्या ठायी फार मनोहर असे गुरुतत्त्व प्रकटलेले होते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे अतिशय अद्भुत असे करुणामय स्वरूप म्हणजेच प.पू.श्री.मामा !! याच संदर्भातला एक जगावेगळा अनुभव सोबतच्या लिंकवरील लेखात मांडलेला आहे. प.पू.श्री.मामा भगवान सद्गुरु श्री माउलींना मोठ्या प्रेमादराने 'करुणाब्रह्म' म्हणत असत. सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने प.पू.श्री.मामाही अंतर्बाह्य करुणाब्रह्मच होऊन ठाकलेले होते. त्याचाच भावगहिरा प्रत्यय प्रस्तुत लेखातील, प.पू.श्री.शिरीषदादांनी स्वत: अनुभवलेल्या गोष्टीतून आपल्याला येतो. म्हणूनच, आजच्या पुण्यदिनी प.पू.श्री.मामांच्या श्रीचरणीं या लेखाच्या वाचनाद्वारे आपण भावपुष्पांजली समर्पूया व त्यांच्याच सप्रेम स्मरणात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर

Read More

11 July 2018

चालते-बोलते विद्यापीठ


संत हे चालते बोलते विद्यापीठच असतात. त्यांच्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून आपल्यासारख्या सामान्य जनांना सतत बोधामृत मिळत असते. जो साधक डोळसपणे संतांच्या उपदेशाचे व लीलांचे अनुसंधान ठेवून त्यातून लाभलेल्या अशा अद्भुत बोधकणांचा आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वापर करतो, तो निश्चितच सुखी व समाधानी आयुष्य जगतो. त्याचा प्रपंचही त्यामुळे नकळतच परमार्थमय होऊन जातो. यासाठीच परमार्थमार्गात या संतबोधाला विशेष माहात्म दिलेले दिसून येते. 'संतसंगती' हा परमार्थ-प्रवासाचा कणाच आहे असे म्हटले जाते, ते वावगे नाही.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे तर आदर्श लोकशिक्षकच होते. अत्यंत शास्त्रपूत आणि विशुद्ध अशी जीवनशैली अंगीकारून त्यांनी सद्धर्माचा परमादर्श लोकांसमोर ठेवला. आजच्याही काळात फारसे कष्ट न होता आवश्यक असे शास्त्राचरण नक्की करता येते, याचा उत्तम वस्तुपाठच त्यांनी आपल्या स्वत:च्या वर्तनातून जगासमोर ठेवलेला आहे. अशाप्रकारे उभी हयात त्यांनी साधकांचे सर्वांगीण कल्याण करण्यात वेचली. परमार्थपूरक जीवनशैली कशी असावी? हे नीट समजून घेण्यासाठी प.पू.श्री.मामांच्या जीवनचरित्राचा अभ्यास जरूर करावा.
प.पू.श्री.मामांच्या दिनक्रमातील त्यांची एक अगदी छोटीशीच; पण आपणही दररोज सहज पालन करू शकू, अशी उत्तम सवय श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या ब्रह्मानंद ओवरी ग्रंथात सांगितलेली आहे.
"जेवण झाल्यावर प.पू.श्री.मामा आचमन करून खाली येत. खाली उतरल्यावर, देवांना नमस्कार करून त्यांच्या खांबापुढील आसनावर (आता ज्या ठिकाणी प.पू.श्री.मामांचा मोठा फोटो ठेवलेला आहे तेथे ) बसत. "भोजनोत्तर देवांना नमस्कार एवढ्याकरिता की, दोन वेळेला जे काही चार घास आपल्या पोटात जातात, ते देवांच्या कृपेमुळेच जातात !" असा खुलासा प.पू.श्री.दादांनी माझ्याजवळ एकदा केला होता. जेवण झाल्यावर देवांना नमस्कार करण्याची प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचीही जुनीच सवय आहे, हेही मी पाहिले आहे."
पाहा, अगदी छोटीशीच गोष्ट; पण जर ही सवय आपण स्वत:ला लावून घेऊन निष्ठेने सांभाळली तर किती समाधान देईल ना? आठवणीने नमस्कार तर फक्त करायचाय जेवल्यावर. त्यामुळे ही इतकी साधी व सोपी सवय लावून घ्यायला फारशी कठीणही ठरणार नाही.
श्रीभगवंतांचे 'कृतज्ञ' हे एक नाम आहे. कारण ते भगवंतही भक्तांच्या प्रेमाच्या बदल्यात कृतज्ञतेने आपल्या भक्तांचा सदैव सांभाळ करतात. म्हणूनच, त्या भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्तकरुणाकर श्रीभगवंतांप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यांच्या ऋणातच राहण्यासारखे दुसरे सुख नाही या जगात !
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
http://sadgurubodh.blogspot.in
https://www.facebook.com/sadgurubodh/


Read More

5 July 2018

अनुकरणीय श्रीगुरुभक्तीचे प्रसन्न दर्शन

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा अमृतमहोत्सव सन १९८८-८९ मध्ये भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. त्यांचा प्रथम सत्कार पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संपन्न झाला. त्या महोत्सवाच्या काही हृद्य आठवणी प.पू.श्री.मामांचे मानसपुत्र श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या      'ब्रह्मानंद ओवरी' या ग्रंथात सांगितल्या आहेत. अतिशय भावपूर्ण आणि मनोहर हकिकतींनी सजलेला हा ग्रंथ सर्व सद्गुरुभक्तांसाठी अवश्यमेव वाचनीय व मननीय आहे. उदाहरण महणून त्यातली ही छोटीशीच हकिकत पाहा किती विचार करण्यासारखी व अनुकरणीय आहे.
महोत्सवाची आठवण सांगताना श्री.पानसे एका ठिकाणी लिहितात, "सत्कारासाठी व्यासपीठावर चढताना, प.पू.सद्गुरु श्री.मामांनी व्यासपीठाला दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार केला. नंतर केव्हातरी प.पू.श्री.मामांना मी त्यासंबंधी विचारले; तेव्हा ते म्हणाले, "अरे, त्याच व्यासपीठावर काही वर्षांपूर्वी प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता !"
वास्तविक पाहता ते नाट्यगृह होते आणि त्याचे व्यासपीठ हे काही आदराचे स्थान नाही. परंतु आपल्या श्रीगुरूंचा पावन पदस्पर्श ज्या व्यासपीठाला झालेला आहे, ते त्या स्पर्शाने पुण्यपावनच झालेले आहे; शिष्य म्हणून आपल्यासाठी ते सदैव वंदनीयच आहे; अशीच प.पू.श्री.मामांची दृढ मनोधारणा होती. हृदयी वसणा-या त्या स्वाभाविक गुरुप्रेमानेच त्यांचे हात आपसूक जोडले गेले. किती दृढ आणि अलौकिक गुरुभक्ती आहे पाहा ! तुम्हां आम्हां साधकांसाठी प.पू.श्री.मामांनी फार मोठा आदर्शच येथे स्वत: आचरण करून घालून दिलेला आहे.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. 



Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates