Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १६

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

४. अर्थप्राप्तीसाठी मंत्र

विस्तारः स्थावरस्थाणु: प्रमाणं बीजमव्ययम् ।
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥५९॥

विस्तारः - सकल भुवनांचा विस्तार ज्यामध्ये आहे असा
स्थावरस्थाणुः - स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा
प्रमाणम् - ज्ञानरूप असल्याने स्वयंप्रमाणरूपी
बीजमव्ययम् - संसाराचे एकमेव अविनाशी कारण
अर्थः -  सुखस्वरूप असल्याने सर्वजण ज्याची प्रार्थना करतात, तो
अनर्थः - कृतकृत्य असल्याने प्रयोजनरहित
महाकोशः - अन्नमय इत्यादी महाकोशांनी झाकलेला
महाभोग: - आनंदरूप श्रेष्ठ भोजन घेणारा
महाधनः - ज्याचे भोगाचे साधनस्वरूप महान धन आहे, असा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

30 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् -१५

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
३. सर्वरोगनाशाकरिता मंत्र*
अमृतांशूद्भवो भानु: शशबिन्दु: सुरेश्वर: I
औषधं जगत: सेतु: सत्यधर्मपराक्रम: II४४II
अमृतांशूद्भव: - चंद्र ज्याच्या पासून उत्पन्न झाला, तो
भानु: - प्रकाशमान
शशबिन्दु: - चंद्राप्रमाणे प्राणिमात्रांचे पोषण करणारा
सुरेश्वर: - देवाधिदेव
औषधं: - संसाररोगावरचे औषध
जगत: सेतु: - भवसागर पार करण्याकरता सेतुरूप
सत्यधर्मपराक्रम: - धर्म आदी गुण व ज्याचा पराक्रम सत्य आहे, तो
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून दररोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

29 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १४

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
२. कार्यसिद्धी होण्याकरिता मंत्र*
भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनोऽनल: I*
कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु: II४५II*
भूतभव्यभवन्नाथ:* - त्रैकालिक सर्व प्राण्यांचा स्वामी
पवन: - वायुरूप
पावन: - चालक
अनल: - अनंत
कामहा - भक्तांच्या विषयवासना नष्ट करणारा
कामकृत् - भक्तांच्या कामना पूर्ण करणारा
कान्त: - अत्यंत रूपवान
काम: - पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला
कामप्रद: - भक्तांच्या कामना सर्वस्वी पूर्ण करणारा
प्रभु: - सर्वोत्कृष्ट.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

28 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १३


'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' हा भक्तश्रेष्ठ श्री भीष्माचार्यांनी रचलेला अत्यंत अद्भुत असा एक मालामंत्र आहे. शिवाय यातील प्रत्येक श्लोक हाही स्वतंत्र मंत्र आहे. या विविध मंत्रांचे असंख्य अनुभूत प्रयोगही जुन्या जाणत्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहेत. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' ग्रंथामध्ये त्यांच्या श्रीगुरुपरंपरेने आलेले अतिशय प्रभावी असे यातील एकवीस मंत्रांचे प्रयोग दिलेले आहेत. हे सर्व स्वानुभूत सिद्ध मंत्रप्रयोग आहेत. आजवर इतरत्र कुठेच यांचा उल्लेखही आलेला नाही. कोणीही श्रद्धेने यांचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतो. आजपासून आपण त्यातील काही मंत्रप्रयोग पाहू या.
१. इच्छापूर्ती होण्याकरिता मंत्र
असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: I
सिद्धार्थ: सिद्धसंकल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: II४०II
अर्थ :-
असंख्येय: - ज्याच्यात नाम, रूप इत्यादी भेद नाहीत, असा;
अप्रमेयात्मा - ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही, असा;
विशिष्ट: - सर्वोत्कृष्ट;
शिष्टकृत् - शासन करणारा;
शुचि: - परम पवित्र;
सिद्धार्थ: - ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत, असा
सिद्धसंकल्प: - सत्यसंकल्प असलेला;
सिद्धिदः - कर्माचे योग्य फल देणारा;
सिद्धिसाधन: - सिद्धींचा दाता.
या मंत्राचा आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईपर्यंत, शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

27 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १२


श्रीभगवंतांना त्यांचे भक्त अत्यंत प्रिय असतात. म्हणून ते त्यांच्या भक्तांना काही कमी पडू देत नाहीत. त्यांचा योगक्षेम तेच चालवतात. त्यांच्या भक्तांनी त्यांचे स्मरण करण्याचाच अवकाश; ते धावून त्यांचे सर्व काही करतात. भक्तांनी त्यांचे नाव घ्यायला जिभेला कष्ट द्यावेत किंवा त्यांना पाचारण्यासाठी तेवढा वेळ घालवावा एवढाही त्यांना धीर नसतो. त्यांचे नुसते स्मरण केले तरी ते भक्ताला त्याचे इच्छित द्यायला समर्थ असतात.
श्रीदत्त संप्रदायामध्ये भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंनाही 'स्मर्तृगामी' म्हणतात. सद्गुरुतत्त्व हेच स्मर्तृगामी असते. त्यांचे स्मरण झाल्याबरोबर ते त्याच क्षणी येतात, त्यासाठी त्यांना आळवत बसावे लागत नाही. त्यांना 'स्मरणमात्रसंतुष्टाय ।' म्हणजे स्मरणाने संतुष्ट होणारे आहेत, असेच म्हटले जाते. याचे कारण एकच, त्यांचा कनवाळुपणा, त्यांचा कृपाळुपणा. निष्कपट अशी लाभावीण प्रीती करणेच केवळ त्यांना माहीत आहे.
व्यवहारामध्ये मात्र लाभाशिवाय प्रीती होत नसते. अगदी सख्खी आई जरी असली तरी ती आपल्या मुलावर लाभाशिवाय प्रेम करीत नाही. हा आपल्याला पुढे सांभाळेल, याची आशा असतेच तिला. जेव्हा तिला कळते की, सुनेच्या नादाने मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे, तेव्हा तिचे ते प्रेम नकळत कमी होतेच. जिथे आईच्या प्रेमाची ही कथा, तिथे बाकीच्या नात्यांचा तर विचारच करायला नको. म्हणूनच, व्यवहारात प्रेम कुठपर्यंत? तर, लाभ असेपर्यंतच ! लाभाशिवाय प्रेम व्यवहारात दिसत नाही. पण सद्गुरु आणि भगवंत मात्र वेगळे असतात, कारण ते कुठल्याही लाभाशिवाय, स्वार्थाशिवायच सर्वांवर प्रेम करीत असतात !
एखाद्या भक्ताने, "धावा, देवा, सद्गुरुराया ! तुमच्याशिवाय मला कोणी त्राता आहे?" असे ख-या कळवळ्याने म्हणायचाच अवकाश; की ते धावत येतात आणि त्या भक्ताला सर्वप्रकारे सांभाळतात. पण त्यासाठी तो भक्तही तेवढा अनन्यशरणागत असायला हवा.
अशी शरणागती येण्यासाठी आपणच प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र नक्कीच लाभदायक ठरणारे आहे. या स्तोत्राच्या नित्यपठणाने श्रीभगवंतांविषयी अशी अनन्यप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. या स्तोत्राच्या उपासनेेने त्यांचे प्रेम प्राप्त होते; जे अत्यंत दुर्मिळ मानले गेले आहे. हे श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र सिद्ध झाले असता, केवळ स्मरणानेही ते भक्ताला जन्मबंधनातून, संसारबंधनातून सोडवते. सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त करते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

26 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ११

दिव्य अशा श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य आजवर असंख्य संत-महात्म्यांनी कथन केलेले आहे. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या पुस्तकात श्रीसंत तुकाराम महाराजांच्या चरित्रातील एक सुंदर प्रसंग कथन केला आहे. ही कथा फारशी प्रचलित नसल्याने नवीनच वाटेल. आज या कथेद्वारे आपण श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य जाणून घेऊ या.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या चरित्रात एक बहारीची कथा आलेली आहे. ते नेहमी म्हणत की, “श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणजे भवरोगाचा नाश करण्याचे शस्त्र आहे; आणि कलीवर मात करण्यासाठीच आम्हांला श्रीभगवंतांनी ते दिलेले आहे !”
श्री तुकाराम महाराजांची ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ वर अत्यंत प्रीती होती. ज्यावेळी त्यांच्या लेकीचे लग्न ठरले, त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. म्हणून त्यांनी नवऱ्या मुलाला सांगितले की; “मी तुम्हांला लौकिक असा हुंडा काही देऊ शकणार नाही. पण स्वेच्छेने, आनंदाने जो काही हुंडा देईन त्याने तुमचे जसे कल्याण होईल तसे जगात दुसरे कोणीही करू शकणार नाही. हे मान्य का ?” त्यावर नवरदेव म्हणाला; “ठीक आहे, मान्य आहे !”
श्रीमहाराजांनी मग लग्न लागल्यानंतर त्याच्या हातात स्वहस्ताक्षरातील ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ची पोथी दिली. तो ‘हुंडा’ जावयाच्या हाती देताना ते म्हणाले; “हा घ्या हुंडा. याचे जर नियमाने पारायण केलेत, तर तुमचे कोटकल्याण होईल !” आणि त्यांच्या जावयानेही पुढे खरेच ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ची पारायणे करून स्वतःचे कल्याण साधून घेतले.
पू.दादांनी सांगितलेली ही मार्मिक कथा नक्कीच विचार करण्यासारखी आहे. आपल्याकडेही अधिक महिन्यात काही ना काही वाण देण्याची प्रथा आहे. अनारसे, बत्तासे अशा नाशिवंत पदार्थांचे वाण देण्यापेक्षा, देणा-याचे व घेणा-याचेही कोटकल्याण करणारे असे विष्णुसहस्रनामासारखेच अलौकिक वाण आपणही दिले-घेतले तर? आपल्या व आपल्या संपर्कातील सर्वांच्या शाश्वत कल्याणाचाच आपण विचार करायला हवा आणि सतत त्यासाठीच मन:पूर्वक प्रयत्नशील राहायला हवे ! म्हणजे मग मोठ्या भाग्याने लाभलेल्या या मनुष्यजन्माचे सार्थक झाल्यासारखे ठरेल.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919*)


Read More

25 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १०


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्राची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही. किंबहुना एवढी आवर्तने झालीत म्हणूनच हे स्तोत्र असे अलौकिक प्रभावी ठरलेले आहे.
आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वत: अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकिकती वाचायला मिळतात. पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी त्यांच्या *'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य'* या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत. त्यातील काही आपण मुद्दाम पाहूया.
शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्रीसंत साईबाबांच्या समोर 'अध्यात्म रामायण’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांची पारायणे करीत असे. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता, बाबांनी त्याच्या दप्तरातील ‘विष्णुसहस्रनामा’ची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त शामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की, “एकदा माझे प्राण कासावीस झाले. त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पारायण केले; आणि मला अलभ्य लाभ झाला; प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे दर्शन झाले ! म्हणून तूही रोज हे वाचीत जा. किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल !” या प्रसंगावरून, श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांचीही केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती, हे कळून येते.
श्रीसंत दासगणू महाराजांच्या चरित्रातही ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनीही या स्तोत्राची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त, बाधामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज देखील त्यांचा या स्तोत्राच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असत, श्री.मानवतकर महाराजांच्या घरी घडलेला. तो प्रसंग मोठा असल्याने पू.दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा. त्याच्या शेवटी पू.श्री.गुळवणी महाराजांनी या स्तोत्राचे सांगितलेले माहात्म्य मात्र येथे आवर्जून देत आहे. श्री महाराज म्हणत, "श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या श्रवण-पठण-चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांतून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दांंतून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे !"
योगिराज श्री.गुळवणी महाराज आणि योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु-शिष्य नित्यनेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत. म्हणूनच या अधिक महिन्याच्या निमित्ताने आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायचा किंवा ऐकायचा तरी नियम करू या आणि श्रीभगवंतांच्या दिव्य कृपेची साक्षात् अनुभूती घेऊ या !!
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

24 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ९


विष्णुतत्त्व हे जगताचे परिपालन करणारे तत्त्व आहे. म्हणूनच या सहस्रनाम स्तोत्रातील अधिकांश नामांमध्ये श्रीभगवंतांच्या संरक्षणाची, छत्राची भावना सामावलेली आहे. त्यामुळे या स्तोत्राच्या पाठाने आपण त्यांच्या छत्राखाली आहोत, त्यांच्या आधिपत्याखाली आहोत असा सुखद अनुभव साधकाला येतो.
हे मोठे विलक्षण स्तोत्र आहे. जो साधक मंत्रदेवता श्रीभगवंतांना शरण जाऊन या श्रीविष्णुसहस्रनाम मंत्राचे आवर्तन करतो, नित्यनेमाने वाचन करतो, अनुष्ठान करतो त्याचे भगवंत पुत्रवत् पालन करतात. त्याची त्यांना अत्यंत काळजी असते.
या स्तोत्राचे असे अद्भुत सामर्थ्य आहे की, कुठल्याही लौकिक कामासाठी का होईना; कुठल्याही निमित्ताने का होईना; या स्तोत्राचा मनःपूर्वक जप केला असता, त्या कार्याची पूर्तता झाल्याशिवाय राहात नाही. पारमार्थिकांसाठी तर हे स्तोत्र सर्वोत्कृष्ट फलदाते आहे. श्रीभगवंतांना लौकिकातले काही न मागता, केवळ त्यांची कृपा व्हावी, कृपादृष्टी असावी या भावनेने जर एखाद्याने याचा पाठ केला, तर त्याचा परमार्थ सर्वांगांनी सुफलित होतो.
एरव्ही आपण आपल्या परीने परमार्थ करतच असतो. त्यात आपल्याच प्रारब्धाने अनंत अडचणीही येत असतात. आपले प्रारब्ध परमार्थाला कधी आडवे येईल हे सांगता येत नसते. कधी आपल्याच रडणाऱ्या लहान मुलाच्या रूपाने ते आडवे येते; तर कधी दूधवाल्याच्या रूपाने; कधी निद्रेच्या, आळसाच्या रूपाने आणि कधी पाहुण्यांच्या रूपाने ! पण या प्रकारच्या सर्व प्रारब्धदोषांवर मात करण्याचे अप्रतिहत सामर्थ्य ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’त आहे.
योगसाधनेमध्ये शास्त्रांनी अंतरायही सांगितलेले असतात. ज्यायोगे आपण श्रीभगवंतांशी जोडले जातो ती साधना, तो योग. त्यामध्ये अंतराय म्हणजे अडचणी ह्या प्रारब्धामुळेच येत असतात. शास्त्रांनी त्याकरिता मार्मिक असा निर्णय दिला आहे की, “या सगळ्या अडचणी दूर होण्याचे एकच साधन आहे; सद्गुरुस्मरण करा, त्यांना शरण जा !” ‘सद्गुरुस्मरणा’सारखेच माहात्म्य ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’चेही आहे. म्हणूनच परमार्थामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींवरचा रामबाण उपाय म्हणजे ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र’ !
(संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)

Read More

23 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ८

‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या आवर्तनाने ‘नामस्मरण’ तर घडतेच; शिवाय ते नाममंत्रजपाचे शास्त्रोक्त फळ देणारेही ठरते. केवळ ‘शुचिर्भूतता’ एवढाच नियम या स्तोत्राच्या निष्काम-पाठाकरिता, आवर्तनाकरिता पुरेसा असतो. या स्तोत्राची लौकिक फलप्रचिती येण्याकरिता अथवा याच्या मंत्रमयतेची विशिष्ट अनुभूती घेण्याकरिता मात्र त्या त्या विशिष्ट विधानांचे मंत्रशास्त्राप्रमाणे काटेकोर अनुसरण करावे लागते.
नामस्मरणात ‘श्रीभगवंतांचे नाम घेणे’ आणि ‘श्रीभगवंतांचे रूप स्मरणे’ अशी दोन्ही उपासना-अंगे अंतर्भूत होतात. म्हणूनच ‘नामस्मरण’ म्हणजे ‘नाम+स्मरण’ अशी फोड प.पू.सद्गुरु श्री.मामा नेहमी करीत. प्रेम हा नामसाधनेचा पाया असल्याने; आणि ते भगवत्कृपेने, सद्गुरुकृपेनेच साधकाच्या अंतःकरणात आपोआप स्फुरणारे असल्याने; ‘सद्गुरुप्रदत्त शक्तियुक्त नामदीक्षा’ हीच साधकाला परमार्थाच्या मंदिरात प्रवेश करवून देणारी ठरते. अशा ‘सबीज’ नामस्मरणानेच परमार्थातील सर्वोत्कृष्ट स्थिती हळूहळू प्राप्त करून घेता येते.
नुसते नाम घेणे आणि कृपेसहित, शक्तिसहित आलेले नाम घेणे यात महदंतर असते. जेव्हा नुसतेच नाम घेतले जाते, तेव्हा त्या नामामधली शक्ती झाकलेली, सुप्त असते. पण सद्गुरूंच्या आज्ञेने नाम घेतले, त्यांनी दिल्यानंतर ते शक्तियुक्त नाम घेतले, तर त्यातली शक्ती देखील क्रियाशील होते व ती आपला अनुभव द्यायला सुरुवात करते.
नाम हे जरी एकच असते; पण त्यामध्ये ज्या प्रकारच्या शक्तीची जागृती झाली असेल त्याप्रमाणे ते नाम तसे तसे फळ देत असते. जर सद्गुरुसंकल्पाप्रमाणे त्या नामामधली आत्मप्राप्ती करवून देणारी शक्ती जागृत झालेली असेल, तरच ते नाम ‘आत्मप्राप्ती’ही करवून देते. कार्यशक्तीच्या भिन्नत्वामुळे एकाच नामाचे भिन्न भिन्न अनुभव येत असतात.
'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'त उपासकाच्या अंत:करणात आस्तिक्यभावना आणि श्रद्धा निर्माण करण्याचे जबरदस्त सामर्थ्य आहे. नित्यनेमाने त्याचे पाठ केले असता, उपासकाच्या वृत्तींमध्ये आमूलाग्रबदल घडत जातो. त्याची वृत्ती आपोआप परमार्थानुकूल होत जाते. म्हणूनच; दररोज श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणावे, असे श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांपासून आजवरचे सर्व संत सांगत आले आहेत. या स्तोत्राची साधना साधकाला ऐहिक-पारमार्थिक असा उभयविध लाभ करवून देणारी आहे !
(संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 
02024356919)

Read More

22 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ७

'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'तील 'अच्युतअनन्त आणि गोविन्द' ही तीन नामे सर्व प्रकारचे रोग नष्ट करणारी म्हणून प्रख्यातच आहेत. प्रत्यक्ष भगवान श्रीधन्वंतरींनीच या संबंधात असे म्हटले आहे की;
अच्युतानन्तगोविन्दनामोच्चारणभेषजात् ।
नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम् ॥
"अच्युत, अनन्त आणि गोविन्द या नामांच्या उच्चारणरूपी औषधाने सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. हे मी सत्य, सत्यच सांगत आहे !"
'पद्मपुराणा'च्या उत्तरखण्डातील दोनशे बत्तिसाव्या अध्यायात, याच संदर्भात भगवान श्रीशिवांचे अशाच अर्थाचे अभिवचन येते. भगवती पार्वतीमातेच्या विचारण्यावरून ते अगोदर मत्स्य, कूर्म आदी अवतारांचा सविस्तर वृत्तांत सांगतात; आणि तदनंतर समुद्रमंथनाचा प्रसंग कथन करतात. त्या प्रसंगी प्रकट झालेले भयंकर कालकूट विष त्यांनी श्रीभगवंतांच्या याच तीन नामांच्या जप-प्रभावाने पचवले होते, असे ते सांगतात. ते त्याचवेळी पुढे असेही सांगतात की; "अच्युत, अनन्त आणि गोविन्द ही श्रीहरींची तीन ( विशिष्ट सामर्थ्यशाली ) नामे आहेत. जो कुणी एकाग्र चित्ताने यांच्या आदी 'प्रणव' व अंती 'नमः' लावून भक्तिपूर्वक जप करतो, त्याला विष, रोग आणि अग्नीपासून मृत्यूचे भय राहत नाही. जो या तीन नामरूपी महामंत्रांचा एकाग्रतापूर्वक जप करतो, त्याला काल आणि मृत्यूचेही भय उरत नाही; मग इतर गोष्टींमुळे निर्माण होणारे भय तर सोडाच !" (पद्म.पु.उत्तर.२३२.१९-२१)
भगवान श्रीशिवांच्या कथनाप्रमाणे 'ॐ अच्युताय नमः, ॐ अनन्ताय नमः, ॐ गोविन्दाय नमः असे ते तीन नाममंत्र असून, याच विशिष्ट क्रमाने त्यांचा जप करावयाचा असतो.
'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'तील प्रत्येक नामाला चतुर्थी प्रत्यय लावून, आरंभी 'ॐ' व शेवटी 'नमः' म्हटल्याने त्यांचे नाममंत्र तयार होतात. सगळ्या हजार नामांचा या प्रकारे मंत्रस्वरूपात उच्चार करीत, भगवान श्रीविष्णूंच्या मूर्तीवर अथवा यंत्रावर तुलसीपत्रे वाहत गेल्यास, हजार यज्ञ केल्याचे श्रेय मिळते असे महात्मे सांगतात.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


Read More

21 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ६

भगवान श्रीमहाविष्णूंच्या विविध लीलांचे संदर्भ सांगणारी, त्यांच्या अलौकिक गुणांचे वर्णन करणारी किंवा माहात्म्य सांगणारी एक हजार नामे एकत्र करून श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र रचलेले आहे. ही सर्वच नामे मूळचीच सिद्ध असली तरी यातील काही नामे अधिक प्रसिद्ध आहेत.
भगवान श्रीविष्णूंची बारा रूपे, बारा नामे मंत्रशास्त्रात विशेष प्रसिद्ध आहेत.
(१) केशव - लांब केस असलेले,
(२) नारायण - शेषशायी,
(३) माधव - मायापती, रमापती,
(४) गोविन्द - पृथ्वीचे रक्षक,
(५) विष्णु - सर्वव्यापक,
(६) जनार्दन - भक्तरक्षक,
(७) उपेन्द्र - इन्द्राचे बंधू,
(८) हरि - दुःख, दारिद्र्य, पाप आदि हरण करणारे,
(९) वासुदेव - अंतर्यामी,
(१०) कृष्ण - आकृष्ट करणारे,
(११) राम - रमणकर्ता,
(१२) नृसिंह - नर व सिंह उभयरूपी.
मंत्रशास्त्रातील भगवान श्रीविष्णूंचे असंख्य मंत्र मुख्यत्वे या बारा नामांवरच आधारलेले दिसतात. संध्या-वंदनाच्या वेळीही श्रीविष्णूंची अशीच निवडक चोवीस नामे विशिष्ट क्रमाने उच्चारण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यायोगे संध्या-वंदन करणाऱ्या साधकाच्या पापांचा, विघ्नांचा आणि दुःखांचा नाश होत असतो.
वास्तुदोष निवारण होण्यासाठी प.पू.श्री.शिरीषदादा एक अद्भुत प्रयोग सांगतात. देवांपुढे समई लावून 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'चे रोज तीन पाठ याप्रमाणे आठवडाभर पाठ करावेत. याची सुरुवात 'बुधवारी'च करावी. आश्चर्यकारक अनुभव येतो. बाहेरचा, बाधेचा त्रास असल्यास अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ या स्तोत्राचे पाठ ऐकवावेत. त्रास दूर होतो. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या नित्य पठणाने शरीरातील नाना व्याधी दूर होऊन एक प्रकारचे दैवी संरक्षक कवच साधकाभोवती निर्माण होत असते.
संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

20 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ५


या अतीव प्रभावी अशा 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'च्या फलश्रुतीत, या स्तोत्राच्या श्रवणपठणाची वेगवेगळी फले सांगितलेली आहेत. 'अशुभ टळणे, विजयी होणे, धर्मप्राप्ती होणे, अर्थप्राप्ती होणे, संतती लाभणे, यश लाभणे, मोठेपणा मिळणे, निर्भयता प्राप्त होणे, आरोग्याचा लाभ होणे, संकटनाश होणे'; इत्यादी लौकिक फले; आणि 'पापनाश होऊन ब्रह्मप्राप्ती होणे' हे अलौकिक फल; यांचे वर्णन त्यात येते. पण तेच जर साधकांकरिता थोडक्यात सांगायचे झाले तर, 'प्रेमाने घेतलेले नाम हे अंतःकरणातल्या प्रापंचिक वासना जाळून काढते आणि अंतःकरणात हळूहळू पूर्ण वैराग्य निर्माण करते;' असे सांगता येईल.
श्रीभगवन्नामांचे हे अजब सामर्थ्य जाणूनच पितामह भीष्माचार्य संकेताने सुचवितात की; भवरोगासाठी श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे रामबाण, जालीम औषध आहे. पण हे केवळ एखादे सुट्टे औषध नाही; तर तेे औषधांचे संपूर्ण दुकानच आहे. म्हणूनच मनुष्याच्या कुठल्या दुःखावर त्या दुकानातले नेमके कुठले औषध द्यावे, ह्याचा विचार जाणत्यांना पृच्छा करूनच समजून घेतला पाहिजे; आणि नेमके तेच औषध रुग्णाने शास्त्रोक्त रितीने घेतले पाहिजे.
श्री भीष्माचार्यांनी या स्तोत्राच्या रूपाने भवरोगाचे जालीम, रामबाण औषधच साधकांच्या हाती ठेवलेले आहे. ज्या औषधाने भवरोगासारखी महाव्याधी नाश पावते, त्या औषधाने; नव्हे त्या औषधाच्या अंशानेही; लौकिक रोग लीलया नष्ट होतात यात नवल ते काय ?
येथवर श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य थोडक्यात आपण जाणून घेतले आहे. आता पुढील लेखापासून प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी सांगितलेले श्रीविष्णुसहस्रनामातील विविध श्लोकमंत्र व त्यांचे उपयोग आपण एकेक करून पाहूया.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

19 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ४


भगवान श्रीमहाविष्णूंची पूर्वीपासूनच प्रचलित असलेली काही सुप्रसिद्ध व काही अप्रसिद्ध अशी आणि अनेक महात्म्यांच्या तपश्चर्येने सिद्ध झालेली एक हजार नावे मोठ्या खुबीने एकत्र गुंफून श्री भीष्मांनी हे पुण्यपावन स्तोत्र रचले. या स्तोत्रातील अनेक नामे समान अर्थांची वाटली किंवा पुनरुक्त वाटली तरी, त्यांमध्ये सूक्ष्म असे अर्थांचे भेद आहेतच. काही वेळा विशिष्ट मंत्रसामर्थ्य प्रकट करविण्याकरिता श्री भीष्मांनी नामक्रमात मुद्दामच एखादे पुनरुक्त नाम घातलेले दिसते.
'नामाचे माहात्म्य' हे श्रुति-स्मृति-पुराणोक्त असल्याने सर्वच संप्रदायांना निर्विवादपणे मान्य आहे. या बाबत कुणाचेच मतभेद नाहीत. एवढेच नव्हे तर, कुठल्याही मांगलिक कार्यातील त्रुटी भगवन्नामस्मरणानेच पूर्ण होत असते. म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक कर्माच्या शेवटी विष्णवे नम:। असे त्रिवार म्हणायची पद्धत आहे. कर्माच्या शेवटी तीन वेळा घेतलेेल्या विष्णुनामामुळे, केलेल्या कर्मात कळत किंवा नकळत राहिलेल्या त्रुटी, झालेले दोष पूर्ण होतात व ते कर्म सांग संपूर्ण होते, सुफलदायी ठरते.
भगवन्नाम हे तीन प्रकारचे संस्कार साधकांवर करीत असते. एक म्हणजे ते त्याचे जीवनदोष, स्वभावदोष दूर करते; 'दोषापनयन' करते. दुसरे म्हणजे ते साधकाच्या ठायी सद्गुणांची वृद्धी करविते; 'गुणाधान' करते; आणि तिसरे म्हणजे परमार्थाकरिता त्याच्या ठिकाणी जे कमी असते त्याची पूर्तता करविते; 'हीनांगपूर्ती' करते. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या पठणाने या तिन्ही गोष्टी आपल्याबाबतीत आपोआपच घडून येतात. म्हणूनच या स्तोत्राच्या नित्यपठणाचा आजवरच्या सर्वच्या सर्व भक्तिसंप्रदायातील संतांनी व महात्म्यांनी वारंवार उपदेश केलेला दिसून येतो.
या अद्भुत स्तोत्राची सर्वात विलक्षण गोष्ट अशी की, श्री भीष्मांनी युधिष्ठिरांना श्रीविष्णुसहस्रनामाचा उपदेशही श्रीभगवंतांच्या समोरच केला. श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत, श्रीभगवंतांकडे बघत केलेला हा उपदेश असल्याने, याचे प्रामाण्य व माहात्म्यही फार मोठे आहे. असे अन्य कोणत्याच स्तोत्राच्या बाबतीत घडलेले नाही. यासाठीच श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र निर्विवादपणे सर्वत्र फार महत्त्वाचे मानून मनोभावे म्हटले जाते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

18 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ३


भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने धर्मराजाने भीष्मपितामहांना विविध प्रश्न विचारून ज्ञान मिळवले. सर्व दृष्टींनी पवित्र करणारे असे सारे धर्मज्ञान ऐकल्यानंतर, युधिष्ठिरांनी पुढे होऊन पितामह भीष्माचार्यांना पुन्हा असा प्रश्न केला की, "आपल्या मताने परम धर्म कुठला ?" त्याच वेळी ते आणखीही एक प्रश्न विचारतात की, "कशाचा जप केला असता प्राणिमात्रांची जन्म-मरणांच्या बंधनापासून सुटका होते ? या संसाराच्या पाशातून सुटका होते ?" याशिवाय; "सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले ?", "सर्वांचा आश्रय कोण ?", "कुणाची स्तुती करावी ?"; आणि "कुणाची पूजा करावी ?" असे आणखी चार; म्हणजे एकूण सहा प्रश्न; युधिष्ठिर पितामह भीष्मांना विचारतात. त्यावर उत्तर म्हणूनच श्री भीष्माचार्यांनी त्यांना हे 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' सांगितलेले आहे.
हे स्तोत्र जरी महाभारत काळापासून प्रचलित झाले असले, तरी त्यातली नामेही त्याच काळातली आहेत असे नाही. श्रीभगवंतांची ही नामे अनादिकालापासून प्रचलित आहेत. त्या नामांवर नाना कल्पांमध्ये ऋषींनी तप केलेले आहे. केवळ श्री भीष्माचार्यांनी ही नामे एकत्र करून सांगितली म्हणून ती मंत्ररूप झालीत असे नव्हे, तर ते त्या नामांचे अंगभूत सामर्थ्यच आहे. ऋषींनी आपल्या तपाने ते सामर्थ्य प्रकट करविले; तर श्री भीष्मांनी मंत्रशास्त्रानुसार त्यांचे विशिष्ट गुण जाणून, त्यांना शास्त्रीय पद्धतीने आणि खुबीदारपणे काव्यरूप देत एकत्र गुंफले.
यातले प्रत्येक नाम श्रीभगवंतांचे कुठले ना कुठले तरी वैशिष्ट्य सांगणारेच आहे. कारण श्रीभगवंतांचे गुणही त्यांच्याप्रमाणेच अनंत आहेत. श्रीभगवंतांचे कुठलेही नाम त्यांचे गुण, त्यांच्या विभूती, त्यांचे अवतार, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे ऐश्वर्य इत्यादींचा महिमा सांगणारे, रहस्य सांगणारे असते. भीष्माचार्यांनी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून, मंत्रशास्त्राचे अनेक नियम पाळून त्यातून विशिष्ट, प्रभावी स्तोत्ररचना करीत ही सहस्र नामे एकत्र गुंफलेली आहेत. म्हणूनच या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राला अनन्यसाधारण माहात्म्य लाभलेले आहे.
(संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

17 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २


श्रीमन्महाभारताच्या अनुशासनपर्वातील 'दानधर्मपर्व' नामक उपपर्वात येणा-या एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायालाच 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' नावाने ओळखले जाते. यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रस्तुत स्तोत्र हे सहस्रनाम आहे, म्हणजे यात भगवान श्रीविष्णूंची एक हजार नावे गुंफलेली आहेत. शिवाय ती अशा मार्मिक पद्धतीने रचलेली आहेत की, त्या श्लोकपदांच्या योगेही एक सबंध स्वतंत्र मंत्र तयार होतो. म्हणूनच यातला प्रत्येक श्लोक हा एक दिव्य-मंत्र आहे; आणि संपूर्ण स्तोत्र देखील एक माला-मंत्र आहे.
भगवान श्रीविष्णू हे करुणासागर, भक्तवत्सल असल्याने त्याचप्रमाणे तेच विश्वाचे सूत्र व निमित्त असल्याने आणि भक्तांच्या पातकांचा नाश करणारे असल्याने, त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या स्मरणाने कल्मषांचा, पापांचा नाश होत असल्याने तोच मोक्षप्राप्तीचा सुलभ, सुगम उपायही आहे. ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’चेही हेच उद्दिष्ट आहे. ‘श्रीविष्णूसहस्रनाम स्तोत्र’ हे उपासनेच्या प्रांतामध्ये एक अत्यंत दिव्य आणि प्रभावी स्तोत्र म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच ते मंत्रसाधनेच्या प्रांतात एक ‘दिव्य मंत्र’ म्हणूनही सुविख्यात आहे.
या पावन स्तोत्राचे अवतरण ज्या प्रसंगाने झाले, तो प्रसंगही मोठा विलक्षण आहे. पितामह भीष्म शरशय्येवर पडलेले असून, उत्तरायणाची वाट पाहात आहेत. ते इच्छामरणी असल्याने त्यांनी देहत्याग केलेला नाही. अशावेळी श्रीभगवंतांनी श्री युधिष्ठिरांना सांगितले की, "युधिष्ठिरा, या भीष्मांसारखा शास्त्रज्ञाता, धर्मज्ञ पुरुष दुसरा होणार नाही. ते अष्टवसूंपैकी एकाचे अवतार आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे सगळे ज्ञान लोप पावेल. म्हणून आत्ताच त्यांना शरण जाऊन, त्यांच्याकडून धर्मासंबंधी जेवढे ज्ञान प्राप्त करून घेता येईल, तेवढे करून घ्यावे !" देवांच्या आज्ञेने धर्मराजाने भीष्मांना प्रार्थना केली. त्याच प्रसंगीच्या संवादामध्ये, श्री भीष्माचार्यांनी हे स्तोत्र कथन केलेले आहे. म्हणूनच हे स्तोत्र सर्व वैष्णव भक्तिसंप्रदायांमध्ये अत्यंत पूजनीय, प्रभावी व महत्त्वपूर्ण मानले जाते. या स्तोत्राची आणखी काही अलौकिक वैशिष्ट्ये उद्याच्या लेखात पाहू.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

16 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १


आजपासून विलंबीनाम संवत्सरातील अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. अधिकमासालाच मलमास असे म्हणतात. भगवान श्रीमहाविष्णूंनी या मलमासाला आशीर्वाद दिले की, "जे भक्त या महिन्यात माझे मनोभावे स्मरण करतील, माझी ज्याप्रकारे शक्य होईल त्याप्रकारे भक्ती करतील, माझ्या प्रीत्यर्थ दान-धर्म करतील, त्यांना मी त्याचे अक्षय फल प्रदान करीन, त्यांच्यावर भरभरून कृपा करीन." पुराणपुरुषोत्तम भगवान श्रीमहाविष्णूंच्या अशा वरदानामुळेच अधिक महिना " पुरुषोत्तम मास " म्हटला जातो. म्हणून आपणही या पावन महिन्यात जास्तीतजास्त भगवन्नाम घेऊ या, यथाशक्य उपासना, पूजा-अर्चना, दानधर्म करून श्रीभगवंतांची अमोघ कृपा संपादन करू या. अधिकस्य अधिकं फलम् । या न्यायाने त्याचे आपल्यालाही अधिकाधिक फल प्राप्त होईल. 

श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्त्व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांचा श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य या नावाचा एक अतिशय सुंदर व महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथात श्रीविष्णुसहस्रनामातील श्रीभगवंतांच्या पहिल्या तीन नामांवरील दोन प्रवचने प्रसिद्ध झालेली आहेत. तसेच श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या सहस्रनाम भाष्यातील निवडक भाग, पूर्ण सहस्रनाम व त्याचा अर्थ आणि तुलसीअर्चनासाठी सहस्रनामावली देखील छापलेली आहे. एकप्रकारे विष्णुसहस्रनामाचा हा अत्यंत उपयुक्त असा देखणा संदर्भग्रंथच ठरलेला आहे. 
या ग्रंथात पू.दादांनी महान प्रभावी अशा श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य, अद्भुत चमत्कार व सत्यघटना सांगून फार नेमकेपणाने प्रतिपादित केलेले आहे. अतिशय वाचनीय व संग्रही ठेवावाच असा हा ग्रंथराज उपासकांसाठी अनेक अंगांनी विशेष ठरतो.
या ग्रंथात पू.दादांनी त्यांच्या गुरुपरंपरेने आलेले सहस्रनामातील श्लोकमंत्रांचे विविध आजार व अडचणींवरचे अद्भुत मंत्रप्रयोगही दिलेले आहेत. हे मंत्रप्रयोग यापूर्वी कधीच कुठेही प्रकाशित झालेले नाहीत. या महासिद्ध मंत्रांची ( आवश्यक ते साधे सोपे नियम पाळून ) उपासना करून कोणीही भाविक स्त्री-पुरुष त्यांचे अद्भुत अनुभव स्वत: घेऊ शकतात. आजवर हजारो भक्तांना या स्तोत्राच्या लक्षावधी अनुभूती आलेल्या आहेत व पुढेही येतीलच. 
या पुण्यपावन अधिक महिन्याच्या निमित्ताने, पू.दादांनी सांगितलेल्या त्या अलौकिक मंत्रांची दररोज एकेक करून माहिती घेऊ या. कृपया ही मौलिक माहिती अधिकाधिक भाविक भक्तांपर्यंत पोहोचवून पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हरिसेवा साधावी ही सप्रेम प्रार्थना ! 
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates