27 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १२


श्रीभगवंतांना त्यांचे भक्त अत्यंत प्रिय असतात. म्हणून ते त्यांच्या भक्तांना काही कमी पडू देत नाहीत. त्यांचा योगक्षेम तेच चालवतात. त्यांच्या भक्तांनी त्यांचे स्मरण करण्याचाच अवकाश; ते धावून त्यांचे सर्व काही करतात. भक्तांनी त्यांचे नाव घ्यायला जिभेला कष्ट द्यावेत किंवा त्यांना पाचारण्यासाठी तेवढा वेळ घालवावा एवढाही त्यांना धीर नसतो. त्यांचे नुसते स्मरण केले तरी ते भक्ताला त्याचे इच्छित द्यायला समर्थ असतात.
श्रीदत्त संप्रदायामध्ये भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंनाही 'स्मर्तृगामी' म्हणतात. सद्गुरुतत्त्व हेच स्मर्तृगामी असते. त्यांचे स्मरण झाल्याबरोबर ते त्याच क्षणी येतात, त्यासाठी त्यांना आळवत बसावे लागत नाही. त्यांना 'स्मरणमात्रसंतुष्टाय ।' म्हणजे स्मरणाने संतुष्ट होणारे आहेत, असेच म्हटले जाते. याचे कारण एकच, त्यांचा कनवाळुपणा, त्यांचा कृपाळुपणा. निष्कपट अशी लाभावीण प्रीती करणेच केवळ त्यांना माहीत आहे.
व्यवहारामध्ये मात्र लाभाशिवाय प्रीती होत नसते. अगदी सख्खी आई जरी असली तरी ती आपल्या मुलावर लाभाशिवाय प्रेम करीत नाही. हा आपल्याला पुढे सांभाळेल, याची आशा असतेच तिला. जेव्हा तिला कळते की, सुनेच्या नादाने मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे, तेव्हा तिचे ते प्रेम नकळत कमी होतेच. जिथे आईच्या प्रेमाची ही कथा, तिथे बाकीच्या नात्यांचा तर विचारच करायला नको. म्हणूनच, व्यवहारात प्रेम कुठपर्यंत? तर, लाभ असेपर्यंतच ! लाभाशिवाय प्रेम व्यवहारात दिसत नाही. पण सद्गुरु आणि भगवंत मात्र वेगळे असतात, कारण ते कुठल्याही लाभाशिवाय, स्वार्थाशिवायच सर्वांवर प्रेम करीत असतात !
एखाद्या भक्ताने, "धावा, देवा, सद्गुरुराया ! तुमच्याशिवाय मला कोणी त्राता आहे?" असे ख-या कळवळ्याने म्हणायचाच अवकाश; की ते धावत येतात आणि त्या भक्ताला सर्वप्रकारे सांभाळतात. पण त्यासाठी तो भक्तही तेवढा अनन्यशरणागत असायला हवा.
अशी शरणागती येण्यासाठी आपणच प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र नक्कीच लाभदायक ठरणारे आहे. या स्तोत्राच्या नित्यपठणाने श्रीभगवंतांविषयी अशी अनन्यप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. या स्तोत्राच्या उपासनेेने त्यांचे प्रेम प्राप्त होते; जे अत्यंत दुर्मिळ मानले गेले आहे. हे श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र सिद्ध झाले असता, केवळ स्मरणानेही ते भक्ताला जन्मबंधनातून, संसारबंधनातून सोडवते. सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त करते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates