17 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २


श्रीमन्महाभारताच्या अनुशासनपर्वातील 'दानधर्मपर्व' नामक उपपर्वात येणा-या एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायालाच 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' नावाने ओळखले जाते. यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रस्तुत स्तोत्र हे सहस्रनाम आहे, म्हणजे यात भगवान श्रीविष्णूंची एक हजार नावे गुंफलेली आहेत. शिवाय ती अशा मार्मिक पद्धतीने रचलेली आहेत की, त्या श्लोकपदांच्या योगेही एक सबंध स्वतंत्र मंत्र तयार होतो. म्हणूनच यातला प्रत्येक श्लोक हा एक दिव्य-मंत्र आहे; आणि संपूर्ण स्तोत्र देखील एक माला-मंत्र आहे.
भगवान श्रीविष्णू हे करुणासागर, भक्तवत्सल असल्याने त्याचप्रमाणे तेच विश्वाचे सूत्र व निमित्त असल्याने आणि भक्तांच्या पातकांचा नाश करणारे असल्याने, त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या स्मरणाने कल्मषांचा, पापांचा नाश होत असल्याने तोच मोक्षप्राप्तीचा सुलभ, सुगम उपायही आहे. ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’चेही हेच उद्दिष्ट आहे. ‘श्रीविष्णूसहस्रनाम स्तोत्र’ हे उपासनेच्या प्रांतामध्ये एक अत्यंत दिव्य आणि प्रभावी स्तोत्र म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच ते मंत्रसाधनेच्या प्रांतात एक ‘दिव्य मंत्र’ म्हणूनही सुविख्यात आहे.
या पावन स्तोत्राचे अवतरण ज्या प्रसंगाने झाले, तो प्रसंगही मोठा विलक्षण आहे. पितामह भीष्म शरशय्येवर पडलेले असून, उत्तरायणाची वाट पाहात आहेत. ते इच्छामरणी असल्याने त्यांनी देहत्याग केलेला नाही. अशावेळी श्रीभगवंतांनी श्री युधिष्ठिरांना सांगितले की, "युधिष्ठिरा, या भीष्मांसारखा शास्त्रज्ञाता, धर्मज्ञ पुरुष दुसरा होणार नाही. ते अष्टवसूंपैकी एकाचे अवतार आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे सगळे ज्ञान लोप पावेल. म्हणून आत्ताच त्यांना शरण जाऊन, त्यांच्याकडून धर्मासंबंधी जेवढे ज्ञान प्राप्त करून घेता येईल, तेवढे करून घ्यावे !" देवांच्या आज्ञेने धर्मराजाने भीष्मांना प्रार्थना केली. त्याच प्रसंगीच्या संवादामध्ये, श्री भीष्माचार्यांनी हे स्तोत्र कथन केलेले आहे. म्हणूनच हे स्तोत्र सर्व वैष्णव भक्तिसंप्रदायांमध्ये अत्यंत पूजनीय, प्रभावी व महत्त्वपूर्ण मानले जाते. या स्तोत्राची आणखी काही अलौकिक वैशिष्ट्ये उद्याच्या लेखात पाहू.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates