Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

3 December 2017

** *वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्* **

भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत. जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू. म्हणूनच त्यांना ' जगद्गुरु ' म्हणतात. आज मार्गशीर्ष पौर्णिमा हे भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचे पावन पर्व आहे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराचे रहस्य सांगताना प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *" श्रीदत्तात्रेय अवतार ' हा चिरंजीव का आहे? तर, ' अज्ञान ' नावाचा राक्षस मारल्याशिवाय श्रीदत्तगुरूंना जाता येणार नाही; व अज्ञान हे अनंत काळापर्यंत राहणार. म्हणून हा अवतार चिरंजीव आहे. "*
अज्ञान नष्ट करणे हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. या अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून मायेच्या कचाट्यात सापडून दु:ख भोगत असतो. दु:खी कष्टी जीवांचा कळवळा येऊन श्रीभगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने प्रकट होतात व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्याना आत्मबोध करतात. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही परंपरा आजही अक्षुण्ण चालूच आहे.
श्रीभगवंतांचे अवतार ज्या कार्यासाठी होतात, ते कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जातात. पण श्रीदत्तप्रभूंच्या अवताराचे तसे नाही. जोवर माया आहे तोवर अज्ञान आहेच व तोपर्यंत श्रीदत्तप्रभूंचे कार्य पूर्ण झालेले नसल्याने ते कार्यरत राहणारच. म्हणूनच प.पू.श्री.मामा श्रीदत्तप्रभूंना *' चिरंजीव अवतार '* म्हणतात. आज याच चिरंजीव अवताराचा प्रकटदिन होय !
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाची काही विलक्षण वैशिष्ट्ये आहेत. श्रीदत्तप्रभू हे भगवान ब्रह्मा, विष्णू व महेशांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांच्या सहा हातांमध्ये तिघांची प्रत्येकी दोन आयुधे मिळून सहा आयुधे आहेत. त्यांच्या हातांचे व त्यातील शस्त्रांचे मार्मिक रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत. हातातील माळ - जपासाठी, डमरू - व्याकरण आदी शास्त्रे शिकवण्यासाठी, शंख - ज्ञान देण्यासाठी. "
श्रीदत्तप्रभूंचे तीन हात भक्तांसाठी आहेत तर तीन हात अभक्तांसाठी, शत्रूंसाठी आहेत. भक्तांसाठी असलेल्या उजवीकडील तीन हातांपैकी, सर्वात खालच्या हातात त्यांनी ब्रह्मदेवांचे आयुध असणारी जपाची 'माळ' धारण केलेली आहे. आपल्या भक्तांना सतत नामस्मरण करण्याचा त्याद्वारे श्रीदत्तप्रभू बोध करतात.
मधल्या हातात 'डमरू' हे शिवांचे आयुध आहे. त्याचा वापर व्याकरणादी शास्त्रे शिकवण्यासाठी होतो. व्याकरण शास्त्राची मूळ सूत्रे भगवान शिवांनी डमरूच्या नादातूनच निर्माण केलेली आहेत.
सर्वात वरच्या हातात भगवान विष्णूंचे 'शंख' हे आयुध आहे. या शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात. ध्रुवबाळाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श करून श्रीभगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात व श्री ज्ञानेश्वरीत आहे.
या तिन्ही हातांचा व त्यातील आयुधांचा, जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू आपल्या शरणागत शिष्यांवर कृपाप्रसाद करण्यासाठीच उपयोग करतात. 
जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे, षड्दर्शनांचे प्रतीक आहेत. कपिलमुनींचे सांख्य, कणादांचे वैशेषिक, पतंजलींचे योग, न्याय, मीमांसा व वेदान्त ही सहा दर्शने अथवा शास्त्रे आहेत. साक्षात् परब्रह्म भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु असल्याने ही सर्व शास्त्रे जणू त्यांच्या पावन देहाचे अवयवच आहेत.
या सहा हातांपैकी, उजवीकडील तीन हात हे भक्तांसाठी अाहेत. उजवी बाजू आपल्याकडे पवित्र मानली जाते. तसे भक्तांना देवांकडे प्रथम मान आहे, म्हणून त्यांना उजवी बाजू दिलेली आहे. तर डावीकडील तीन हात हे अभक्तांसाठी, दुष्टांसााठी आहेत. या तिन्ही हातांतील शस्त्रे ही दुष्टांना शासन करण्यासाठी आहेत. यांचे रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे डावीकडील तीन हात अभक्तांसाठी, दुष्टांसाठी आहेत. कमंडलू - पाणी मारून वैरी नाशासाठी, त्रिशूळ - दूर असलेल्‍या शत्रूला मारण्यासाठी, चक्र - फारच दूरच्या दुष्ट शक्तींना मारण्यासाठी."
श्रीदत्तप्रभूंनी डावीकडील सर्वात खालच्या हातात ब्रह्मदेवांचे 'कमंडलू' हे आयुध धारण केलेले आहे. यातील पाणी मारून ते धर्माचे व सज्जनांचे तसेच भक्तांचे  वैर करणारे, त्यांना अकारण त्रास देणारे शत्रू मारून टाकतात. मधल्या हातात त्यांनी भगवान शिवांचे 'त्रिशूल' हे आयुध धारण केलेले आहे. हे त्रिशूल फेकून दूरचे शत्रू ते नष्ट करतात. सर्वात वरच्या हातात त्यांनी भगवान श्रीविष्णूंचे 'चक्र' हे आयुध धारण केलेले आहे. फारच दूरच्या दुष्ट शक्तींचा नि:पात करण्यासाठी त्या चक्राचा ते उपयोग करतात.
भगवान श्रीदत्तप्रभू हे भक्तवत्सल भक्ताभिमानी व दुष्टनिर्दालन करणारे आहेत.
श्रीदत्तप्रभूंच्या ब्रीदांचे द्योतक असणा-या त्यांच्या या सहा हातांचा व त्यांतील आयुधांचा हा विलक्षण गूढार्थ, आजवर पहिल्यांदाच, प.पू.श्री.मामांनीच सर्वांना समजेल असा शब्दांमध्ये प्रकट केलेला आहे. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे. या रहस्याचा अभ्यास करण्याने आपल्याला श्रीदत्तप्रभूंच्या अवतारामधील अज्ञात असणारा विलक्षण भाग नीट समजून येईल. आजच्या श्रीदत्तात्रेय जयंतीच्या पावन पर्वावर या प.पू.श्री.मामांच्या या मार्मिक बोधाचे चिंतन करून आपणही भगवान श्रीदत्तप्रभूंच्या श्रीचरणी ही स्मरणांजली सादर समर्पूया व धन्य होऊया !!
( छायाचित्र : योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी स्वत: रेखाटलेले भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचे मनोहारी षड्भुज रूप ! )
( https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २९ सप्टेंबर २०१७

भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हाती संतजनीं ॥ " यावर मिश्किल पण फार मार्मिक टिप्पणी करताना पू.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " संतजनांनी ' माझ्या हाती भक्ती द्यावी ' याचा अर्थ काय? भक्ती काय हातात द्यायची वस्तू आहे? तो काय लाडू वगैरे आहे? तर तसे नाही. याचा गूढ अर्थ ' कानात उपदेश करून शक्ती द्यावी ' असा आहे. भक्ती म्हणजेच प्रेममुद्रा. हे जे प्रेम आहे, ते अमृतस्वरूप होण्याचे आहे. श्रीगुरूंकडून शक्ती जागृत झाल्यावर साधकाने प्रेमाने साधना केल्यावर तो अमृतस्वरूप होतो, तृप्त होतो ! "
शिष्याची तीव्र तळमळ पाहून, श्रीगुरु त्याच्या कानात एका शब्दाचा उच्चार करतात. म्हणजेच त्याला शक्तियुक्त नाम, परंपरेने आलेले सिद्धनाम देतात. शिष्य त्या नामाचा उच्चार, जसा श्रीगुरूंनी करायला सांगितलाय तसाच पुन्हा पुन्हा करू लागला की, हळूहळू त्याचा वासनाक्षय होतो व त्याला भक्तीची प्राप्ती होते. असा थोडा का होईना, पण वासनाक्षय झाल्याने श्रीभगवंतांविषयी प्रेम वाटू लागते व मनाला त्याची गोडी लागली की तीच भक्ती; श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या नऊ रूपांनी प्रकट होऊन हळूहळू त्या साधकाचा पूर्ण वासनाक्षय करते. इंद्रियांना व मनाला भगवद्भक्तीची अशी नवविध गोडी लागल्यावर, विषयांचे जे ध्यान मनास असते ते संपुष्टात येते. तो याच सर्व प्रकारांनी श्रीभगवंतांबरोबरच आपल्या श्रीगुरूंचीही भक्ती करू लागतो. मग त्या भक्तीच्या आवेशामुळे त्याचे अज्ञान व वासना जळून खाक होतात. सतत श्रीभगवंतांच्या लीलांचे चिंतन करण्याने, त्याचे मन व शरीरही त्या लीलांचे अनुकरण करू लागते. त्यामुळे मग तो सर्व बंधनांमधून मुक्त होतो व भगवद्स्वरूपच होऊन ठाकतो !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा - २८ सप्टेंबर २०१७

भक्ती हा शब्द खूपच प्रचलित असला तरी त्याचा खरा अर्थ फारच थोडे जाणतात. आपण जी काही करतो ती 'भक्ती' नसून 'उपासना' आहे. भक्ती 'करण्याची' गोष्टच नाही, ती तर 'कृपेने होण्याची' गोष्ट आहे ! शास्त्रांनी व संतांनी यावर सुरेख लिहून ठेवलेले आहे. सर्वांचे याबाबत एकमत आहे की, भक्ती ही प्राप्त व्हावी लागते आणि जोवर 'आम्ही भक्ती करतो' ही भावना मनात आहे, तोवर ती कधीच प्राप्त होत नसते.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आदिशक्तीची ही अद्भुत लीला फार सुंदर शब्दांत आपल्या ' अनादि निर्गुण प्रकटली भवानी ' या ग्रंथात सांगतात. आदिशक्ती भगवती कुंडलिनी श्रीगुरुकृपेने जागृत झाली की, प्रथम ती आपल्या मोहावर प्रहार करते. मोहाबरोबर सगळेच दोष जायला लागून चित्ताची हळू हळू शुद्धी होते. पण मग ते रिकामे झालेले चित्त भरायला नको का पुन्हा? म्हणून भगवती शक्ती त्या शुद्ध होत असलेल्या चित्तात निखळ भगवद्प्रेमाचा एक एक बिंदू ठेवत जाते; हेच तिचे भक्ती प्रदान करणे होय ! 
अशी ही भक्ती जेव्हा श्रीगुरूंच्या कृपेने लाभते, तेव्हाच आपला खरा परमार्थ प्रवास सुरू होतो. भक्ती हेच शक्तीचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. भगवान श्री माउलींनी भक्ती आणि शक्ती एकच असल्याचे उच्चरवाने सांगितलेले आहे. म्हणूनच नाथ संप्रदायात या दीक्षेला ' प्रेममुद्रा ' असे सार्थ नामाभिधान आहे. ही प्रेममुद्रा प्राप्त झाली की ती भक्ती नऊ प्रकारांनी आपल्या चित्तात प्रकट होते, हेच त्या आदिशक्तीचे खरे 'नवरात्र' होय. म्हणूनच श्रीगुरूंकडून जोवर ती शक्ती प्राप्त होत नाही, तोवर नवरात्रही यथार्थपणे साजरे होऊ शकत नाही !
ही प्रेममुद्रा प्राप्त होण्याची प्रक्रियाही पू.मामा छान समजावून सांगतात, ती आपण उद्या पाहू.
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा - २७ सप्टेंबर २०१७

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा स्वजनांविषयीचा मोेह जाण्यासाठीच श्रीगीतेचा पावन उपदेश केला. कोणत्या ना कोणत्या रूपात मोह आपल्या प्रत्येकाच्या मनात असतोच. काम, क्रोध, लोभ, अहंकार व मत्सर हे पाच रिपू काही काळच प्रभाव दाखवतात, नंतर शांत होतात. पण मोह मात्र सतत जागताच असतो, कारण तोच अज्ञानाचे मूर्तिमंत रूप आहे; आणि पूर्ण ज्ञान होईपर्यंत अज्ञान राहणारच ना ! म्हणूनच श्रीगुरुकृपेने ही ज्ञानशक्ती श्रीजगदंबा प्रकटली की आधी याचेच निर्दाळण करते. तिच्या त्या शुद्धीच्या प्रक्रियेत मग बाकीचेही रिपू आपोआप नष्ट होतात.
महिषासुरवधाचा फार मार्मिक संदर्भ प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. त्यांच्या सूक्ष्म चिंतनाचा तो अद्भुत परिपाकच म्हणायला हवा. सप्तशतीमधील कथेचा अचूक व स्वानुभवपूर्ण विचार मांडताना ते म्हणतात, महिषासुराने रेड्याचे मायिक रूप घेऊन युद्ध सुरू केले. भगवतीने त्या रेड्याचे मुंडके उडवले व त्याबरोबर त्या रेड्याच्या रूपातला असुर मात्र तिला शरण आला. हेच भगवान श्री माउली ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातही सांगतात. प्राणशक्ती चामुंडा देवीपुढे, संकल्परूप मेंढा मारून तिला मनोरूप महिषाचे मुंडके बळी दिले. म्हणजे मनाच्या मोहादी विकारांची, संकल्प-विकल्पांची निवृत्ती झाली. मनोरूप महिषाचे मर्दन झाल्यामुळे, कसलाही आधारच राहिला नाही म्हणून मग मोहरूपी असुर देवीला शरण आला. हेच श्रीभगवतीचे मुख्य कार्य आहे. पण ती एवढ्यावरच थांबत नाही बरे. यापुढेच तर खरी गंमत आहे !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )




Read More

26 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २६ सप्टेंबर २०१७

॥ अमृतबोध ॥
जागर आदिशक्तीचा 
२६ सप्टेंबर २०१७
आपण शरण जाऊन मागितलेल्या जोगव्याने परमकनवाळू श्रीसद्गुरूंना दया आली व त्यांनी आपल्यावर कृपा केली. आपल्या ठायी असणारी अनादि निर्गुण भगवती जगदंबा जागृत करून दिली. आपण ख-या अर्थाने आता ' सनाथ ' झालेलो आहोत ! पण ही जगदंबा कुंडलिनी शक्ती कोणत्या कार्यासाठी प्रकट झालेली आहे? हे पण समजून घ्यायला हवे.
आदिशक्ती भगवती जगदंबा महिषासुर राक्षसाला मारण्यासाठीच अवतरलेली होती. हा महिषासुर वेगवेगळी मायावी रूपे घेऊन लढत होता. त्यामुळेच त्याचा पाडाव करणे सोपे नव्हते व बाकी कुणाला ते जमणेही शक्य नव्हते. म्हणून तिथे प्रत्यक्ष आदिशक्तीलाच प्रकट व्हावे लागले. आपल्याही मनात असाच एक महान राक्षस राहतो, त्याला म्हणतात ' मोह ' ! त्याचा वध करण्याची दुस-या कोणाचीही ताकद नाही. मोह म्हणजे जे जसे आहे ते तसे न दिसणे. अंधारामुळे पडलेल्या दोरीच्या जागी साप भासतो व मनात भय उत्पन्न करतो. तसा अज्ञानाचे बळच असणारा हा मोह, दिसणारे सर्वकाही वेगळेच भासवून आपल्याला नाही नाही त्यात गुंतवून ठेवतो. मग कधी तो पुत्रप्रेमाचे रूप घेईल नाहीतर पत्नीप्रेमाचे. धनसंपत्तीच्या पाठी वेड्यासारखा लावेल नाहीतर प्रसिद्धी व कीर्तीच्या. तो कोणते रूप घेऊन आपल्याला भुलवेल सांगता येत नाही. याचा नाश झाल्याशिवाय कधीच खरा आनंद लाभत नाही. म्हणून आपल्या लाडक्या लेकराला शाश्वत आनंद देण्यासाठी, ही मायमाउली भगवती शक्ती जागृत झाल्याबरोबर पहिल्यांदा त्याच्या मनात घट्ट बसलेल्या मोहरूप महिषासुराचा वध करते. तेच तिचे प्रमुख अवतारकार्य आहे !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )



Read More

25 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा- २५ सप्टेंबर २०१७

देवीच्या नवरात्रात जोगवा मागण्याची प्रथा आहे. जसा नवस केलेला असेल त्याप्रमाणे किंवा जी काय रूढी असेल त्यानुसार ओला किंवा कोरडा जोगवा मागतात. मात्र हा जोगवा पाचच घरी मागायचा असतो. घरोघरी मागितल्यास ती भीक होईल. जोगवा म्हणजे नुसती भिक्षा किंवा माधुकरी नव्हे. त्याला खोल अर्थ आहे.
ज्याला आपले शाश्वत कल्याण व्हावे असे वाटते, त्याने श्रीसद्गुरूंना शरण जाऊन त्यांना शक्तिजागृतीरूपी जोगवा मागायचा असतो. पण हा मागण्याचा अधिकार कोणाला? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे स्पष्ट करतात की, श्रद्धेने व भक्तियुक्त अंत:करणाने, प्रेमाने नित्य साधना करणारा असा तो भक्त हवा. तोच खरोखर जोगवा मागू शकतो. अशा भक्ताने श्रीगुरूंजवळ आईचा जोगवा म्हणून काय याचना करायची? तर, " माझ्या शरीरात सुप्त असलेली भगवती शक्ती जागृत करून द्या. त्यासंबंधी ज्ञान व युक्ती द्या. मला साधनापथ दाखवा ! "
असा जोगवा मागितल्यावर श्रीगुरु कृपावंत होऊन त्या भक्ताला प्रेममुद्रा प्रदान करतात आणि मगच त्याचा परमार्थ ख-या अर्थाने सुरू होतो. जागृत झालेली कृपाशक्ती मग त्याच्या पंच महाभूतांची आटणी करते. त्या भक्ताचे सर्व दोष हळूहळू काढून टाकून, त्याचे प्राण, इंद्रिये व पांचभौतिक शरीर यांची आटणी म्हणजेच शुद्धी करते !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा २४ सप्टेंबर २०१७


चराचर विश्व निर्माण करणारी व ते सर्व व्यापून असलेली भगवती शक्ती, श्रीसद्गुरूंच्या कृपेने साधकाच्या ठायी जागृत होते. जागृत होते म्हणजे काय होते? हे प्रथम समजून घ्यायला हवे.
प्रत्येक जीव हा परब्रह्माचाच अंश आहे. पण हे तो जाणतच नाही म्हणून स्वत:ला त्या परब्रह्माहून वेगळा मानतो. हे सर्व घडते त्या परब्रह्माच्याच मायाशक्तीमुळे. मायेमुळे भ्रांती निर्माण होते व आपल्याच जवळ असलेले आपल्याला दिसत नाही.
भगवती आदिशक्ती जशी माया म्हणून बाहेर कार्य करते, तशीच ती कुंडलिनी रूपाने प्रत्येक जीवातही विराजमान असते. पण ती सुप्त असते. सुप्त म्हणजे जोपर्यंत श्रीसद्गुरु तिला जागृत करत नाहीत, तोपर्यंत ती माया बनून त्या जीवाचा प्रपंच करीत असते. श्रीगुरुकृपा झाली की मग ती प्रपंच करायचा सोडून परमार्थ करायला सुरुवात करते. म्हणजेच मायारूप टाकून कुंडलिनीशक्ती रूपाने कार्य करू लागते. हेच शक्तीचे जागरण होय.
आपल्या हृदयातच शिव व शक्ती असतात. श्रीमारुतीरायांनी आपले हृदय फाडून तेथील राम-सीता सर्वांना दाखवले होते. म्हणजे ते तेथे असतातच, पण त्यांना आपले आपण कधीच पाहू शकत नाही. ते पाहण्यासाठी श्रीभगवंतांनी सद्गुरु रूपाने आपल्यावर कृपा करून आपल्याला आधी ' प्रेममुद्रा ' द्यावी लागते.
प्रेममुद्रा हा नाथ व दत्त संप्रदायांचा विशेष पारिभाषिक शब्द असून त्याचा ' भक्तीची दीक्षा ' असा अगदी अचूक अर्थ प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करीत असत. ही प्रेममुद्रा दिल्याशिवाय आणि श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दाखविल्याशिवाय, आपल्याच हृदयात असणारे हे शिवशक्तीरूप आद्यतत्त्व कोणीही कधीच पाहू शकत नाही. हे आनंदस्वरूप पाहता यावे, सप्रेम अनुभवता यावे म्हणूनच नवरात्री महोत्सवात आपण श्रीसद्गुरूंकडे ' आईचा जोगवा ' मागायचा असतो !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 September 2017

॥ अमृतबोध ॥जागर आदिशक्तीचा - २३ सप्टेंबर २०१७

एकदा देव दानवांचे मोठे युद्ध झाले. त्यात परब्रह्माच्या कृपेने देव विजयी झाले. पण देवतांना वाटले की हा आमचाच विजय आहे. ब्रह्माने देवांचा अहंकार जाणला व ते विचित्र यक्ष रूप घेऊन त्यांच्या समोर प्रकटले. देवांना काही ते रूप ओळखता आले नाही. म्हणून त्यांनी अग्निदेवांना ते रूप जाणण्यासाठी पाठवले. समोर आलेल्या अग्नीला तू कोण म्हणून ब्रह्माने विचारले. अग्नी म्हणाला, मी अग्नी आहे. पृथ्वीवर जे जे काही आहे ते सर्व मी जाळून टाकू शकतो, म्हणून मला 'जातवेद' असेही म्हणतात. ब्रह्माने तेथे पडलेली काडी उचलली व ती जाळून दाखवायला सांगितली. सर्व शक्ती वापरूनही ती काडी काही अग्नी जाळू शकला नाही. तो खजील होऊन परत आला. हीच गत वायूचीही झाली. तो सुद्धा ती काडी उडवून लावू शकला नाही व तो यक्ष कोण हेही ओळखू शकला नाही. मग इंद्र त्या यक्षाला जाणायला गेला. त्याक्षणी  तो यक्ष अदृश्य झाला व त्या जागी अतिशय शोभायमान व सोन्यासारखी लखलखीत स्त्री  दिसू लागली. तो यक्ष कोण होता, हे इंद्राने विचारल्यावर तिने उत्तर दिले की, " तो यक्ष म्हणजेच ब्रह्म होय. त्याच्या प्रभावानेच तुम्ही विजयी झालेला आहात, हे विसरू नका ! " ती सुवर्णकांती असणारी आदिशक्ती जगदंबा म्हणजेच उमा हैमवती होय. तिनेच पुढे इंद्रादी देवतांना ब्रह्मज्ञानोपदेश दिला. हीच भगवती उमा, मानव शरीरात कुंडलिनी रूपात पण सुप्त असते. ती श्रीसद्गुरूंच्या कृपेनेच जागृत होते आणि नंतर गुरूपदिष्ट मार्गाने साधना केल्यावर त्या साधकाला ब्रह्मानुभूती प्रदान करते; असे प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज स्पष्ट करतात. स्वत:च्या बळावर देवताही ब्रह्म जाणू शकत नाहीत. ते जाणण्यासाठी सद्गुरुरूपाने कृपा होऊन शक्ती जागृत व्हावीच लागते !
या भगवती आदिशक्तीलाच ' देवी ' म्हणतात. 'दीव्यति इति देवी ।' दिव् म्हणजे प्रकाशणे. ती स्वत:च्याच प्रकाशाने नित्य प्रकाशत असते, म्हणून तिला देवी म्हणतात. दिव् धातूचा आणखी एक अर्थ आहे खेळणे. ही जगज्जननी आदिजगदंबा, स्वत:च निर्माण केलेल्या अनंतकोटी ब्रह्मांडांमधील अगणित घडामोडींच्या रूपाने सतत क्रीडा करीत असते; या भगवतीचीच लीला सर्वत्र चालू असते, म्हणूनही तिला ' देवी ' असे संबोधले जाते !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 September 2017

॥ अमृतबोध ॥जागर आदिशक्तीचा - २२ सप्टेंबर २०१७

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज भगवती आदिशक्ती जगदंबेच्या अवतरणाची लीलाकथा सांगत आहेत. परमात्मा आधी एकटाच होता. त्याला त्या एकटेपणाचा कंटाळा आला व त्यामुळे " आपण बहुत व्हावे " असा त्याच्या मनात संकल्प उठला. त्याबरोबर त्याच्यापासून त्याची शक्ती बाहेर पडली व तिने आपल्यामधूनच सा-या विश्वाची उत्पत्ती केली. भगवतीच्या एकमेवाद्वितीय निर्गुण निराकार शक्तीतूनच अनंत, सगुण साकार स्वरूपाचा आविर्भाव झाला. सर्व देव-देवतांच्या रूपाने तीच नटलेली आहे. एवढेच नाही तर, विश्वातील पदार्थमात्र तिचेच स्वरूप आहेत. ती सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म व विराटापेक्षाही विराट आहे. तीच सर्व जगाचा एकमेव आधार आहे !
एखाद्या दोरीमध्ये मणी ओवावेत त्याप्रमाणे तिने हे यच्चयावत् सर्व विश्व आपल्यातच गोवून ठेवलेले आहे. म्हणून "ऊयते इति उमा" या विग्रहानुसार, त्या आदिशक्तीला उपनिषदांमध्ये ' उमा ' असे संबोधले जाते. हीच भगवती उमा इंद्रादी देवतांचा अभिमान नष्ट करून, त्यांना ब्रह्मविद्येचा उपदेश करण्यासाठी लखलखीत सोन्यासारख्या अत्यंत तेजस्वी रूपात प्रकटल्याची सुंदर कथा केनोपनिषदात आलेली आहे.
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा- २१ सप्टेंबर २०१७

॥ अमृतबोध ॥
जागर आदिशक्तीचा
पहिली माळ
२१ सप्टेंबर २०१७
आजपासून आदिशक्ती भगवती श्रीजगदंबा मातेचा नवरात्रोत्सव! प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे भगवती आदिशक्तीचे निस्सीम उपासक होते. त्यांच्या सखोल, स्वतंत्र व मूलगामी चिंतनातून प्रकटलेले आदिशक्तीचे चिन्मय स्वरूप-वैभव, " जागर आदिशक्तीचा " मधून या नवरात्रोत्सवात आपण दररोज सप्रेम अनुभवणार आहोत. या अवीट गोडीच्या महाप्रसादासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण !!
श्रीभगवंत अनादि आहेत. त्यांना जन्म नाही की त्यांचा कोणी निर्माताही नाही. तसेच ते निर्गुणही आहेत, कारण सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांचे त्यांच्याठायी किंचितही अस्तित्व नाही. त्यांच्यापासून निर्माण झालेली व त्यांच्याच स्वरूपात स्थित असलेली त्यांची अभिन्ना आदिशक्ती देखील त्यांच्याच सारखी अनादि निर्गुण आहे !
माणूस काळा असो की गोरा, त्याची सावली मात्र काळीच पडते. एखाद्या मातीच्या भांड्याची सावली काळी पडते पण काचेच्या भांड्याची? काचेच्या भांड्यातून पडणारा छायारूप प्रकाश हा तेज:पुंज असतो. स्फटिकाची सावली प्रकाशमयच असते. तसे परम तेजस्वी परमात्म्याची छाया असणारी आदिशक्ती भगवती देखील तशीच अपार तेज:पुंज असते.
त्या अनादि निर्गुण प्रकटलेल्या श्रीभवानीच्या सप्रेम स्मरणात, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या स्वानुभूत चिंतनातून बहरलेला हा ' जागर आदिशक्तीचा ', शारदीय नवरात्राच्या प्रथम दिनी सादर आस्वादून आपण श्रीजगदंबेचा उदोकार करूया !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

30 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९३॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, *"रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥हरि.९.२॥"*
या चरणाच्या विवरणात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज नामस्मरणाच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा व फारसा कुठेही न आलेला एक मौलिक सिद्धांत स्पष्ट करून सांगतात.
पू.मामा म्हणतात, "असा नियम आहे की, मूळ *'ॐ तत् सत्'* हे तत्त्व आहे, अगर मूळ मंत्र आहे. माउलींनी त्याचेच स्वरूप असणारा *'रामकृष्ण हरि'* हा भागवतधर्माचा महामंत्र म्हणून ठरवला. कारण मूळ मंत्रातील 'राम' हेच अक्षर ॐकारस्वरूप आहे. हेच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनीही आपल्या वाणी व काव्यातून सिद्ध केलेले आहे. दुसरे अक्षर 'तत्' हे कृष्णस्वरूप आहे व तिसरे अक्षर 'सत्' हे हरिस्वरूप आहे.
हेच त्रयोदशाक्षरी मंत्रातही आहे. 'श्रीराम' हे ॐकारस्वरूप, 'जयराम' हे तत्कारस्वरूप व 'जय जय राम' हे सत्कारस्वरूप आहे; हे प्रत्यक्ष मारुतीरायांनी सर्वांना पटवून दिल्याचे पुराणांतरी प्रसिद्ध आहे.
यावरून *'रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥'* याची संगती प.पू.मामा लावतात, ती आपण उद्या सविस्तर पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९२ ॥*

श्रीराम व श्रीकृष्ण हे भिन्न नाहीत. ते एकाच श्रीविष्णूंचे अवतार असून, कार्य पूर्ण झाले की पुन्हा त्या विष्णूंप्रतच जातात. हेच माउली अभंगाच्या दुस-या चरणात सांगतात की,
*"उपजोनि करंटा नेणें अद्वय वाटा ।*
*रामकृष्णीं पैठा कैैसेनि होय ॥हरि.९.२॥"*
याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, प्राणिमात्र या जगात जन्मास येतो; म्हणजेच उपजतो. परंतु त्यास जर आल्याची वाट माहीत नसेल, तर अशा प्राण्याला माउली 'करंटा' म्हणतात.
व्यवहारात करंटा कोणास म्हणतात? तर ज्याला द्रव्य मिळवण्याची अक्कल नाही व जर चुकून बापाची इस्टेट हाती आली, तर ती व्यसनांपायी उधळपट्टी करून ज्यास दारिद्र्य येते, त्याला 'करंटा' असे म्हणतात.
म्हणूनच म्हण पडली आहे की, *प्रपंचात वित्त व परमार्थात चित्त चांगले स्थिर पाहिजे.* कारण वित्ताने प्रपंच उत्तम करून जगात वाहवा मिळते व चित्ताने हे सर्व विष्णुमय आहे, असे चिंतन झाल्यावर परमार्थात श्रेष्ठ अवस्था प्राप्त होते. असे झाले तरच तो 'ज्ञानी' म्हटला जातो व हे नाही झाले तर तो 'करंटा' ठरतो. *कारण अद्वैताची वाट सापडल्याशिवाय, विष्णू हे सर्वव्यापी तत्त्व आहे हे कळणार नाही.* आणि असे झाले तर की काय होईल? तेच माउली कडव्याच्या उत्तरार्धातून सांगतात. ते आपण उद्या पाहू. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९१ ॥*

हरिपाठाच्या नवव्या अभंगात सद्गुरु श्री माउली म्हणतात की, सर्वव्यापी तत्त्वाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप व्यर्थ होय. तसेच एकदेशीय जपज्ञान किंवा माहात्म्यज्ञान हेही व्यर्थच म्हणायला हवे. असा अर्थ कशावरून काढला? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात माउली स्वत:च तसे सूचित करतात की, *"रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.१॥"*
राम हा अलग, कृष्ण हा अलग व पंढरीचा पांडुरंग हा अलग; असे मानणारे वादविवाद करत बसतात. त्यांना तो खुशाल घालू द्यावा, आपण मात्र समजावे की, सर्व विष्णूंचेच अवतार अाहेत.
कारण साधकाच्या ठिकाणी हे माहात्म्यज्ञान कधीच एकदेशी नसावे. सर्वव्यापक तत्त्व एकच आहे ना, त्याशिवाय सर्वव्यापी कसे ठरणार ते? म्हणून आपण हा भेद कधीच बाळगू नये, असा पू.मामा आपल्याला मन:पूर्वक उपदेश करतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १९० ॥*

भगवान श्री वामनांनी, "तिसरे पाऊल कुठे ठेवू?" असे विचारल्यावर, बली राजाने आपले मस्तक झुकवले व त्यावर पाऊल ठेवायची विनंती केली. कारण बली हा ज्ञानीभक्त होता. मी देह नसून देही आहे, हे तो यथार्थ जाणत होता. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून देह बनलेला आहे; तर त्या देहात नांदणारा, त्या देहातील देही जो जीव, तो तर ब्रह्माचाच अंश असल्याने तो कधीच त्या देहात विलीन होऊ शकत नाही. तेव्हा भगवंतांनी सबंध सृष्टी जरी व्यापली तरी ती केवळ पांचभौतिक असल्याने ते देह व्यापतील. पण ते हा बलीरूप जीव नाही व्यापणार. म्हणूनच मग त्या बलीने वामनरूपी विराट पुरुषापुढे शिर झुकवले व "ठेवा माझ्या मस्तकावर पाय !" असे जाणीवपूर्वक सांगितले.
जगाच्या पांचभौतिक तत्त्वांशी देहाचा संबंध आहे; परंतु जीवाचा संबंध ब्रह्माशी आहे. कारण "जीवो ब्रह्मैव नापर: ।" असा सिद्धांतच आहे. अशा या सर्वव्यापी तत्त्वाचे अर्थात् विष्णुरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय केलेला जप हा व्यर्थ समजावा लागेल.
सद्गुरु श्री माउलींच्या *"विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।"* या चरणाचा असा अभिनव गूढार्थ प.पू.श्री.मामा सविस्तर समजावून सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 June 2017

॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की, "विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।" याचा गूढार्थ सांगण्यासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीभगवंतांच्या श्री वामन अवताराचे उदाहरण घेतात.
बटू वामन बलीच्या यज्ञाच्या ठिकाणी आले. त्यांनी बलीकडे तीन पावले जमीन मागितली. ती मिळताच, एका पावलात सप्त स्वर्ग व्यापले,  दुस-या पावलात सप्त पाताळ व्यापल्यावर, 'तिसरे पाऊल कोठे ठेवू?' म्हणून विचारले.
बलीराजा पण काही कमी कमी नव्हता. भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचा परम भगवद्भक्त असा नातूच होता तो. त्याला माहीत होते की, प्रत्येक मानवाच्या देहात जीवरूपाने देवच असतात. असे ज्याला कळते, तोच खरा मानव होय. परंतु भ्रमाने मनुष्य 'मी म्हणजे देह' असे म्हणतो. पण बलीचे तसे नव्हते. त्याला हे ज्ञान असल्यामुळेच त्याने भगवंतांच्या प्रशनाचे सुयोग्य उत्तर दिले. त्याने भगवान वामनांना आपल्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवायला सांगितले.
प.पू.श्री.मामा बलीच्या या कृतीमागील कारणही फार सुंदर समजावून सांगतात. ते आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

25 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८८ ॥*

*प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज जयंती  !!*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठातील नवव्या अभंगाची प्रस्तावना करताना म्हणतात, "सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा मोठा गोड अभंग आहे. तसे पाहिले तर, सर्वच अभंग एकापेक्षा एक असे वरचढ अाहेत. परंतु असे असले तरी, प्रत्येक अभंगाचे काही ना काही तरी वैशिष्ट्य आहेच. त्यांपैकी या अभंगाचे वैशिष्ट्य फार मोलाचे आहे. ते काय व कसे आहे? तेच आपण आता माउलींच्या कृपेने पाहणार आहोत.
या अभंगाच्या पहिल्या चरणात माउली म्हणतात, *"विष्णुवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाही ज्याचें ॥हरि.९.६॥"*
विष्णू शब्दाचा अर्थ प्रथम समजायला हवा. 'विष्णू' या शब्दाचा अर्थच 'व्यापून राहणारा, सर्वव्यापी' असा असल्यामुळे, तो सर्वांना व्यापून दशांगुळे उरला असे श्रुती सांगते.
आपल्याकडे जे पुराणांमधून वर्णिलेले दशावतार आहेत, ते विष्णूंनीच घेतलेले आहेत. यात एक लक्षात ठेवायला हवे की, इकडे अवतारकार्य चालू असताना, तिकडे क्षीरसागरात शेषशायी भगवान श्रीविष्णू नाहीत; असे कधी होत नसते."
पू.मामांचे हे सांगणे आपण उद्या एका अवताराचे उदाहरण घेऊन समजून घेऊया.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १८७ ॥*

हरिपाठाच्या नवव्या अभंगाचा उर्वरित सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीसद्गुरूंच्या उपदेशावाचून ज्ञान होणार नाही; आणि त्या ज्ञानाशिवाय द्वैतभ्रांती जाणार नाही. अपरोक्ष ज्ञानानुभव होण्यासाठी ईश्वराच्या सगुण-स्वरूपाचे नित्य ध्यान जडले पाहिजे. तसेच मी-तू पणाची सर्व भाषा संपून, अखंड नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे; असे श्री ज्ञानेश्वर महाराज येथे स्पष्ट सांगतात. "
मी (जीव) आणि परमात्मा यात असणारा भेद ज्ञानाशिवाय नष्ट होत नसतो व हे ज्ञान सद्गुरुकृपेवाचून कधीच होत नाही. आपल्या चित्ताला आधी ईश्वराच्या सगुण साकार रूपाचे अखंड ध्यान जडले पाहिजे. तसेच सतत नामस्मरणही घडले पाहिजे. त्यामुळे मी-तू पणाची अर्थात् द्वैताची भावनाच नष्ट होते; आणि त्यातूनच मग  अपरोक्षानुभूती प्रकट होत असते. असा अनुभूतीचा क्रम सद्गुरु श्री माउली या अभंगातून सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 June 2017

॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या नवव्या अभंगात दुर्दैवी अभक्तांविषयी खेद व्यक्त करतात.
या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "कितीही ज्ञानी असला तरी, महाविष्णू श्रीहरींच्या रामकृष्णादी सगुण अवतारांच्या लीला गाण्यात आणि त्यांचे नामस्मरण करण्यात ज्यांचे मन रंगले नाही, त्यांचे ते सर्व ज्ञान व्यर्थ आहे. सगुण उपासनेेने अद्वैत-ज्ञानसिद्धी करून घेण्याचा हा मार्ग ज्याला पटला नाही, तो जन्माला  येऊन कमनशिबाचाच म्हटला पाहिजे. कारण अशाने त्याला भगवत्प्राप्ती कशी होणार?"
ज्याला हरिभक्तीची ओढ नाही, तो कितीही मोठा ज्ञानी असला तरी त्याचे ते ज्ञान शाश्वत आनंदासाठी काहीही फायद्याचे ठरत नाही. म्हणूनच ते सर्व ज्ञान व्यर्थच म्हटले पाहिजे. सगुण श्रीहरींच्या लीला गाणे व त्यांचे नामस्मरण करणे, हे अद्वैतज्ञान प्राप्त होण्याचे मार्ग आहेत. हेच त्या दुर्दैवी जीवाला पटत नाहीत, म्हणून एकप्रकारे तो कमनशिबीच ठरतो. कारण एवढा दुर्लभ असा नरजन्मच तो व्यर्थ गमावतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

22 June 2017

॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७

सर्वत्र दुर्लभ असणारे नाम खरेतर सुलभ असल्याचा अनुभव कसा येतो, हे सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीगुरूंची सेवा करून, त्यांच्याकडून ते शक्तियुक्त, दुर्लभ नाम मिळते. मग प्रेमाने, श्रद्धेने व आदराने साधना झाल्यावर, तेच नाम किती सुलभ आहे याचा अनुभव येतो. इतकेच नाही तर ते घ्यावेही लागत नाही, पुढे पुढे तर त्याचे नुसते श्रवण करूनही तृप्ती लाभते. म्हणूनच माउली म्हणतात की, "येथ मोक्ष असे आयता । श्रवणाचिमाजि ॥ज्ञाने.४.४२.२२४॥" 
यासाठीच संतसंगतीने व त्यांच्या कृपेने, त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागले असता; सहजच 'श्रीहरी आकलन होतो', असे श्री माउलींचे सांगणे आहे !
प्रेमाने, श्रद्धेने व आदराने साधना घडली की मगच नामाची सुलभता अनुभवाला येते, असे पू.मामा म्हणतात. त्याचा आपण गांभीर्याने विचार करूनच साधना करायला हवी.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates