Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 December 2016

॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥

भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य-पावन हरिपाठाच्या  प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेल्या विवरणाचे  आपण चिंतन करीत आहोत. गेले पंधरा दिवस पाहात असलेल्या पहिल्या अभंगाचा सारांश आजच्या अमृतबोधातून जाणून घेऊया.
श्री माउलींनी त्यांच्या सर्व वाङ्मयाचे सार म्हणून 'हरिपाठ' या लघु प्रकरण-ग्रंथाची रचना केलेली आहे. हे माउलींच्या अभंगांचे नुसते संकलन नाही, हा अठ्ठावीस अभंगांचा त्यांचा स्वतंत्र ग्रंथच आहे. श्रीगुरुकृपेसह लाभलेल्या दिव्यनामाच्या साधनेचे सर्वांगीण चिंतन माउलींनी यात प्रकट केलेले आहे. म्हणूनच वरवर वाटतो तेवढा हा ग्रंथ सोपा मुळीच नाही. हे अत्यंत प्रभावी असे पूर्णपणे गुरुगम्य रहस्यच आहे.
वासनामय संसाराच्या जंजाळातून सुटण्याची ज्याला खरोखरीच तळमळ आहे, त्याने आधी प्रेमाने 'हरि हरि' म्हणावे. हाच नामस्मरणाचा उपाय वेदव्यासांनीही सांगून ठेवलेला आहे. या नामस्मरणाने पुण्याई वाढते, वेदशास्त्रांचा अभ्यास करण्याची, परमार्थ करण्याची सद्बुद्धी निर्माण होते व त्यायोगाने परंपरेने आलेल्या आत्मज्ञानी महात्म्यांशी गाठ पडून त्यांची कृपा लाभते. श्रीगुरूंच्या त्या पावन कृपानुग्रहाने साधना सुरू होऊन, सुयोग्य प्रयत्न घडू लागतात व जीव मुक्तीच्या दिशेने अग्रेसर होतो. सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे अनुसंधान करता करता आतूनच प्राणांचे स्थिरीकरण होऊ लागते. प्राण स्थिर व्हायला लागले की मनही स्थिर होते व तेथेच द्वारिकेचे राणेही पांडवाघरी येतात. तेव्हाच योगाचेही सार भेटते, केवलकुंभकाचा अनुभव लाभून जीव धन्य होतो. हे सर्व केवळ श्रीगुरुकृपेनेच घडते, म्हणून त्या कृपेला परमार्थात फार महत्त्व आहे !
यासाठी आपण फक्त ' हरि मुखे म्हणा ...।' हेच सूत्र पक्के लक्षात ठेवायचे आहे. "विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ।" हेच आपले परमकर्तव्य व्हायला हवे. म्हणून श्री माउली या सर्वाचे सार सांगतात की, प्रेमाने व भक्तीने श्रीगुरूपदिष्ट नाम घ्यावे, म्हणजे पुढचे सगळे काही आपोआप घडून येईल.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

30 December 2016

॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥

भगवान श्री माउली हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या चरणात, 'व्यासांचिये खुणे' असा उल्लेख करतात. सामान्यपणे त्याचा नेमका संदर्भ लावता येत नाही. पण पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्याचा फार सुंदर अर्थ सांगत असत.
पू.मामांनी त्यांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवींना याबद्दल विचारले. त्या म्हणाल्या, " जसे दो-यात फुले 
ओवली की हार तयार होतो,दोरा एकच असला तरी, फुले ओवायची कशी? ते नीट माहीत हवे. तसे या अभंगातील पहिले तीन चरण ही फुले असून चौथा चरण हा दोरा आहे. तेच मुख्य सूत्र आहे अभंगाचे."
परमात्म्यापासून ज्या श्रुती उत्पन्न झाल्या आहेत, त्यांचा अर्थ प्रथम वेदव्यासांना आकलन झाला. म्हणून माउली देखील, 'तैसा व्यासाचा मागोवा घेत ।' असे म्हणतात. ज्याप्रमाणे न्यायाधीश कायद्यानुसार निर्णय देतो, तेथे त्याला स्वातंत्र्य नाही; तसेच संत, ऋषिमुनी कोणीही शास्त्रांच्या चाकोरीबाहेर जाऊ शकत नाहीत. म्हणून 'व्यासांच्या खुणा' जाणून घ्याव्याच लागतात. व्यासांच्या खुणा म्हणजेच वेदशास्त्रांचे मत. साधनेच्या प्रवासात शास्त्रांचे सांगणे प्रत्यक्ष अनुभवाला येते. तेथेच आत्मप्रचितीचा शास्त्रप्रचिती व गुरुप्रचितीशी मेळ बसला पाहिजे. त्यासाठी वेदशास्त्रांचा अभ्यास व्हावाच लागतो. म्हणूनच माउली येथे व्यासांच्या खुणांचा उल्लेख करतात.
श्री माउली हरिपाठातून श्रीगुरुप्रदत्त नामसाधनेचे मर्म स्पष्ट करीत आहेत. प्राणजय साधून देणारे नाम हेच खरे नाम; हे वेदही हात वर करून सांगतात, असे माउली म्हणतात. प्राणांचे स्थैर्य म्हणजेच मनाचे स्थैर्य, हाच केवलकुंभक. ज्याप्रमाणे एक रुपया बँकेत ठेवला तरी तो शिलकीतच पडतो; व असे वरचेवर पडत गेले की शिल्लक वाढते. त्याप्रमाणे हरघडीस केवल कुंभक क्षणभर जरी होत गेला, तरी शेवटी तोच केवल अखंड रूपात जाईल व सायुज्यमुक्ती होईल ! याचीच सर्व प्रक्रिया भगवान श्री माउली पहिल्या अभंगातून सूत्ररूपाने स्पष्ट करतात. पू.मामांनी जे सविस्तर सांगितलेले आहे, त्याचा आपण उद्या थोडक्यात सारांश पाहून या अभंगाचा विचार पूर्ण करूया.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 December 2016

॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥

भगवान श्री माउलींच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगावरील प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे रहस्योद्घाटक असे अप्रतिम विवरण आपण पाहात आहोत. इंद्रियदेवता प्राणांच्या घरी जाण्याची प्रक्रिया पू.मामा सविस्तर सांगत आहेत.
कळसूत्री बाहुलीला काळ्या दो-याचे एक टोक बांधून दुसरे टोक कळसूत्री चालक आपल्या हातात ठेवतो; त्याप्रमाणे प्राणांच्या एका टोकास इंद्रियांच्या देवता कायमच बांधलेल्या असतात. जेव्हा हे प्राण आवरले जाऊन हृदयात प्रविष्ट होतात, तेव्हा त्यांच्यासोबत देवताही तेथेच येतात. त्यावेळी द्वारे म्हणजे इंद्रिये मोकळी होतात.
जीवाला दशमद्वारात जाण्यासाठी शरीरातील इंद्रियांच्या नऊ चौक्या पार कराव्या लागतात. प्रत्येक चौकीवर त्याच्या मालकाचा म्हणजेच देवतेचा पहारा असतो. प्राणांबरोबर जेव्हा हे इंद्रियांचे राणेही हृदयात जातात, तेव्हा सर्व चौक्या मोकळ्या होतात व तेथून ये-जा करण्यास कसलाच मज्जाव राहात नाही. मग जीवास दशमद्वार मोकळे होते.
प्राणांवरच शरीराचा सर्व कारभार अवलंबून असतो. प्राण चालला तर मन चालते, मनाबरोबर इंद्रियदेवता व इंद्रियेही चालतात. जेव्हा प्राण स्थिर होतात, तेव्हा बाकीचेही सर्व स्थिर होते. यालाच 'केवलकुंभक' म्हणतात. हा दशमद्वारापाशीच घडून येत असतो. म्हणूनच पू.मामा सांगतात, " इंद्रियांचे राणे पंचप्राणांच्या योगाने हृदयात प्रविष्ट झाले की केवलता प्राप्त होते. जेवढी केवलता वाढते, तेवढी मुक्ती पदरात पडते. " हा केवलकुंभक आपण 'करायची' गोष्टच नाही, हा श्रीगुरुकृपेने आपोअाप होत असतो.
हरिपाठाच्या पहिल्याच अभंगातून सद्गुरु श्री माउली एवढा प्रचंड गूढार्थ सूत्ररूपाने सांगतात. पू.मामांचे आपल्यावरील हे मोठेच उपकार आहेत की, त्यांनी तो गहन अर्थ आपल्याला सोपा करून समजावून सांगितला. अन्यथा तो अर्थ कधीच आपल्या लक्षात आला नसता.
गेले तेरा दिवस आपण या पहिल्या अभंगाचाच विचार करतो आहोत. उद्याही त्यातीलच अजून काही संदर्भ आपण पाहूया.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 December 2016

॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥

नऊ द्वारांच्या शरीररूपी द्वारिकेतील इंद्रियदेवता म्हणजेच त्या द्वारिकेचे राणे होत. हे राणे 'पांडवां घरी' येतात म्हणजे काय? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचा सुरेख खुलासा करतात. ते म्हणतात की, 'द्वारिकेचे राणे'चा खुलासा झाल्यावर मी आमच्या आईला, "मग पांडव म्हणजे काय?" विचारले. ती म्हणाली, " पांडव म्हणजे पंचप्राण. एक उदाहरण सांगते. पतंगाला मांज्याचे एक टोक बांधलेले असते, दुसरे टोक रिळाला बांधलेले असते व ते  पतंग उडवणा-याच्या हातात असते. त्याच्या मनाला वाटेल तसा तो पतंग उडतो. तसे, इंद्रियांच्या देवतांना प्राणरूपी दो-याने आवरले जाते. पतंग म्हणजे देवता, प्राण म्हणजे मांजा. या देवतांना 'पांडवां घरी' म्हणजे हृदयात आणले जाते. यालाच 'प्रत्याहार' म्हणतात. या देवता हृदयातील ईश्वराजवळ येऊन शांत होतात व त्याचवेळी विषय देखील संपतात."
ऐतरेय उपनिषदात सांगितलेले आहे की, सर्व देवता मानवी शरीरात आपापल्या जागी बसल्यावर, 'आपण कोठे बसायचे?' असा विचार करून परमात्मा दशमद्वारात विराजमान झाले. या दशमद्वारात जाण्याचा जीवाचा आटापिटा असतो.
प्राणरूपी मांजा ज्या ठिकाणी स्थिर होतो, ते ठिकाण म्हणजे भ्रूमध्य, आज्ञाचक्र होय. त्याठिकाणी विषयांचे मालक असणा-या मनाला प्राण आणून ठेवतो. भ्रूमध्य हेच 'देवाचे द्वार' होय. या ठिकाणी मन स्थिर झाल्यावर आपोआपच चारी मुक्ती साधल्या जातात.
इंद्रियांच्या देवतांचे प्राणांच्या घरी जाणे कसे होते? याविषयी पू.मामा आणखी महत्त्वाचा खुलासा करतात, तो आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 December 2016

॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥

श्री माउलींच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचे प्रचलित शेवटचे चरण, "ज्ञानदेव म्हणे व्यासांचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरी ॥" असे आहे. पण यातली महत्त्वाची चूक पू.मामा दाखवून देतात. काव्याच्या नियमाप्रमाणे, शेवटच्या कडव्यात प्रथम 'ज्ञानदेव म्हणे' असे आल्यावर, पुढे 'णे'च दोनदा आला पाहिजे. या उचित नियमानुसार शेवटचे चरण, "ज्ञानदेव म्हणे, व्यासांचिये खुणे । द्वारिकेचे राणें, पांडवां घरी ॥" असेच म्हणायला हवे. हाच पाठ या गूढ रूपकात्मक अभंगाचा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यकही आहे. प.पू. मामासाहेब देशपांडे महाराज याचा फार बहारीचा अर्थ सांगत असत.
द्वारकेचा राणा कोण? भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेचे राणे नव्हते. यदुवंशाचा राजा होता उग्रसेन. तो पांडवांच्या घरी जात नसे. तो युद्धात तटस्थ होता. मग माउली 'द्वारकेचे राणे' मधून काय सांगत आहेत? अनेकवचन का वापरतात? पांडवांच्या घरी कोण गेले? या सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सहजासहजी मिळत नाहीत. पू.मामा मात्र या कोड्याचा सुंदर उलगडा करत असत.
"द्वारिका म्हणजे प्रवेश करण्याची द्वारे. द्वारे कशाची? तर देहाची. त्यांचे राणे म्हणजेच देहद्वारांच्या इंद्रचंद्रादी देवता." आपल्या देहालाही नऊ द्वारे आहेत. गीतेत देव म्हणतात, 'नवद्वारे पुरे देही ।' या प्रत्येक द्वाराचा एक एक राणा आहे. ती द्वारे म्हणजे इंद्रिये व या प्रत्येक इंद्रियास एक देवता आहे. उदा. वाक् इंद्रियाची देवता अग्नी, चक्षू म्हणजे डोळे यांची देवता सूर्य इ. 'द्वारिकेचे राणे' मधून माउली भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख करीत नाहीत.
येथे पुन्हा एक प्रश्न येतो. पंच कर्मेंद्रिये व पंच ज्ञानेंद्रिये अशी दहा असताना द्वारे नऊच कशी? याचेही उत्तर पू.मामा देतात.
चरण, हस्त, गुद व उपस्थ ही चार कर्मेंद्रिये व यांचे चार मालक. तसेच श्रोत्र, नेत्र, त्वचा व घ्राण ही चार ज्ञानेंद्रिये व त्यांचे चार राणे. आता रसना हे ज्ञानेंद्रिय व वाक् हे कर्मेंद्रिय राहिले. पण या दोघांचे इंद्रिय एकच आहे, ते म्हणजे जीभ. एकच खोली मधे पडदा लावून दोन जण ती जशी वापरतात, तसे ह्या एकाच जिभेचे राणे दोन आहेत. म्हणून दहा राणे असूनही द्वारे म्हणजे इंद्रिये नऊच आहेत आपल्या शरीररूपी द्वारिकेला.
माउली म्हणतात, हे राणे पांडवांच्या घरी जातात. म्हणजे काय होते? शिवाय शास्त्रांनी दशमद्वार पण सांगून ठेवलेले आहे. मग ते कोणते? तसेच व्यासांची खूण कोणती? या सर्वांचा विलक्षण गूढार्थ पू.मामा सांगत असत, तो आपण उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 December 2016

॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥

काल आपण चार देहांच्या चार वाणींमधून झालेल्या नामजपाचा सखोल विचार केला. त्याच संदर्भात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आणखी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतात, ते आता पाहू.
सद्गुरु श्री माउलींनी ' हरि मुखें म्हणा.. ' मधून वैखरीने होणारा नामजप सांगितलेला नाही. ते सांगतात तो जप कोणत्या मुखाने करायचा अाहे? हे आधी लक्षात घ्यायला हवे.
नाम तर कोणीही घेऊ शकतो, त्याला कसलेही बंधन नाही. पण कबीर महाराज सांगतात की, " रामनाम सब कोई कहे, ठग ठाकूर और चोर । जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरै, वह नाम है कुछ और ॥क.दो.१०३॥" रामनाम तर चोर, ठक आणि चांगला माणूस असे कोणीही घेऊ शकतो. पण ज्या नामामुळे ध्रुव प्रल्हादादी भक्त तरून गेले ते हे नव्हे. ते नाम काहीतरी वेगळेच आहे. या नामांचा वेगळेपणा अगदी अचूक शब्दांत सांगताना पू.मामा म्हणतात, " आपण मनाने जे घेतो ते नुसते 'नाम' आणि परंपरेने आलेले व श्रीगुरूंनी कृपापूर्वक दिलेले ते 'दिव्यनाम'. हे दिव्यनामच सर्वश्रेष्ठ होय ! "
समजा एखाद्याला सदिच्छा झाली म्हणून किंवा मनाला भावले म्हणून त्याने श्रीभगवंतांचे कोणतेही नाम जपायला सुरुवात केली, तर ते नुसतेच 'नाम' होय. पण आपल्या पूर्वपुण्याईमुळे, परंपरेने आलेल्या जाणत्या-दावित्या श्रीगुरूंनी जर कृपापूर्वक त्यांच्या परंपरेने आलेले नाम दिले, तर तेच 'दिव्यनाम' म्हटले जाते. हे दिव्यनामच सर्वश्रेष्ठ असते व त्याच्याच अनुसंधानाने श्रीभगवंतांची प्राप्ती होत असते.
श्रीभगवंत परेच्याही पलीकडे राहतात. ही परा वाणी श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने बोलू शकते, पण ती त्यांना ओळखू शकत नाही. तिच्या पलीकडे जाण्यासाठी, परंपरेने आलेल्या आत्मानुभवी श्रीगुरूंनी कृपापूर्वक दिव्यनामच आपल्याला प्रदान करावे लागते. नुसते हे नाम मिळूनही चालत नाही, तर त्या नामाचे श्रीगुरूंनी जसे सांगितले आहे तसेच अनुसंधानही सतत व्हावे लागते आपल्याकडून. नंतरच मग दिव्य अनुभूती लाभते.
यासाठीचा क्रमच श्री माउली या पहिल्या अभंगातून सांगतात, " सतत 'हरि हरि' म्हणावे. म्हणजे आपल्याला आवडेल ते श्रीभगवंतांचे एखादे नाम प्रेमाने जपावे. त्यायोगे पुण्य तयार होईल. त्या पुण्याईच्या जोरावर वेदशास्त्रांचे अर्थ जाणता येतील. शिवाय त्यात जे सांगितले आहे त्याप्रमाणे ऐकण्याची, वागण्याची बुद्धी होईल. त्या पूर्वपुण्याईच्या बळावरच श्रीगुरूंची कृपा होऊन दिव्यनाम मिळेल. त्यांच्याच कृपेने व आपल्या शुभ प्रयत्नांनी, त्या नामाचा संसारात राहूनही सतत जप घडेल, वेदशास्त्रांवर श्रद्धा दृढ होईल व त्यातील व्यासांच्या खुणा जाणल्या जाऊन त्या अनुरोधाने भगवत्प्राप्ती होईल ! "
'व्यासांचिये खुणे'चा व 'द्वारिकेचे राणे'चा पू.मामांनी सांगितलेला विलक्षण गूढार्थ उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 December 2016

॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥

भगवान सद्गुरु श्री माउली 'हरि मुखें म्हणा... ।' असा उपदेश करतात. माउली खरेतर अवघी एकच ओळ इथे सांगतात, पण त्यामागे आभाळाएवढा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो. तो जाणायला त्यांची कृपाच हवी. त्यांची अपरंपार कृपा असल्यामुळेच, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज माउलींचे हृद्गत नेमकेपणे व्यक्त करीत असत. हरिपाठावरील त्यांचे हे गूढार्थपरिप्लुत विवेचन वाचले की हे बरोबर पटते. पू.मामांनी सांगितलेले हरिपाठाचे अनेक विशेष संदर्भ आजवर इतर कोणीच सांगितलेले नाहीत. त्यांपैकीच एक फार महत्त्वाचा व अनवट भाग आजच्या बोधातून आपण अभ्यासणार आहोत.
स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण असे जीवाचे चार देह असतात. या चार देहांच्या चार वाणी देखील असतात. वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा या अनुक्रमे त्यांच्या वाणी होत. या प्रत्येक वाणीद्वारे होणा-या नामस्मरणाचे भिन्न भिन्न फळ शास्त्रांनी सांगून ठेवलेले आहे, पण ते रहस्य फारसे प्रचलित नाही. 'हरि मुखें म्हणा'च्या निमित्ताने पू.मामा त्यावर प्रकाश टाकतात. ही अतिशय विलक्षण माहिती पहिल्यांदा त्यांनीच सर्वजनसुलभ केलेली आहे.
स्थूलदेहाच्या 'वैखरी' वाणीने जे नाम घेतले जाते ते पापक्षय करते. पूर्वी आपण केलेले पाप त्याने हळूहळू भस्म होते. या वाणीत नाम 'घ्यावे' लागते, आपोआप होत नाही. माउलींना 'हरिमुखे म्हणा' मधून हे वैखरीतले नाम अभिप्रेत नाही. कारण हे मोक्षप्राप्तीला उपयोगी ठरत नाही, तर केवळ पाप नष्ट करते.
सूक्ष्मदेहाच्या 'मध्यमा' वाणीचे दोन प्रकार आहेत. यात नाम घेता पण येते व आपोआपही होते. मध्यमेतील नामजपाने पुण्याचा साठा तयार होते. म्हणूनच,  'पुण्याची गणना कोण करी ।' मधून माउली याच मध्यमा नामजपाचा संदर्भ देतात. पण हेही नाम जन्ममृत्यूचा फेरा चुकवू शकत नाही. यासाठीच संत सांगतात की, मध्यमेने आधी नाम घ्यावे व हळूहळू आपोआप कसे होईल? हे पाहावे. म्हणजे नामाचा सतत 'आठव' कसा होईल? ते पाहावे. आठव म्हणजेच स्मरण.
नामाचा असा सतत आठव होऊ लागला की, नाम कारणदेहाच्या 'पश्यंती' वाणीने होऊ लागते. ही वाणी दर्शनासाठी सुप्रसिद्ध आहे. या वाणीतून नाम होऊ लागले की श्रीभगवंत सगुणरूपात पुढे उभे राहतात. श्री तुकाराम महाराज यासाठीच म्हणतात, ' नाम उच्चारितां कंठीं । पुढें उभा जगजेठी ।' मध्यमेत नाम होऊ लागले की पश्यंती आपोअापच प्रकट होत असते.
सगुण दर्शनानंतर तेच नाम महाकारणदेहाच्या 'परा' वाणीतून होऊ लागते व त्यानंतरच श्रीभगवंतांच्या निर्गुण स्वरूपाची अनुभूती येते. अशी अनुभूती येणे फार महत्त्वाचे मानले जाते.
या सगळ्या अनुभूती येण्यासाठी आधी श्रीगुरुकृपा व्हावीच लागते. केवळ आपल्या प्रयत्नांनी या क्रमाने कोणीच जाऊ शकत नाही. तरीही येथे शेवट झाला, असे मात्र म्हणता येत नाही, कारण या परेच्याही पलीकडे श्रीभगवंत असतात. तिथे कसे जायचे व त्यासाठी काय करायचे? याचेही पू.मामा स्वानुभूत विवेचन करतात, ते उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 December 2016

॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥

पुण्यात्मक वासना व पापात्मक वासना समूळ गेल्याशिवाय मुक्तिलाभ होत नाही. पण या वासना जाणार कशा? याचे उत्तर श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या तिस-या चरणात देतात. " असोनि संसारी, जिव्हे वेगु करीं । वेदशास्त्र उभारी, बाह्या सदा ॥३॥ " वेदशास्त्रे देखील हात वर करून सांगतात की, जिव्हेने सतत, निरलसपणे हरिनाम घ्या म्हणजे संसाराच्या जंजाळातून तुम्ही मुक्त व्हाल.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या चरणाचा सखोल विचार मांडतात. ते म्हणतात, " या ' जिव्हे वेगु करीं ' पंक्तीचा स्थूल अर्थ पुष्कळ लोक असा करतात की, जिव्हेने भराभर, वेगाने नाम घ्यावे. पण हे पूर्णत: चूक आहे. असे जर वेगाने नाम घेतले तर पित्ताचा प्रकोप होतो आणि देव मिळायचा बाजूलाच राहून चिंता मात्र वाढते. म्हणून वेगु याचा अर्थ त्वरेने, सातत्याने घ्यावे, असाच माउलींना अभिप्रेत आहे. नाम अखंड घ्यावे; परंतु ते शांतपणे, -हस्व व दीर्घ उच्चाराचे भान ठेवून घ्यावे. "
पू.मामा यासाठी सुंदर उदाहरणही देतात. " आता 'श्रीराम' हे नाम घ्या. यात श्री दीर्घ आहे. परंतु मनुष्य वेगाने बोलू लागला तर श्री दीर्घ न येता श्रियाळ मधल्यासारखा -हस्व येतो. त्यामुळे भरपूर नाम घेऊनही त्या नामाची दाद श्रीभगवंतांपुढे पोहोचू शकत नाही. श्रद्धाविरहित, आदरविरहित, -हस्वदीर्घ-विरहित व देवतास्मरण-विरहित नाम वाया जाते, हे लक्षात घेऊनच आपण नामस्मरण केले पाहिजे. हे सांगण्याकरिताच माउली येथे वेदांचा व शास्त्रांचा संदर्भ मुद्दाम घेतात. "
आपल्याकडे नाम+स्मरण असे दोन शब्द एकत्र केलेले आहेत. त्याचा विचार करणे गरजेचे आहे. नाम ज्या देवतेचे आहे, त्या देवतेचे स्मरण; व त्या नामाच्या -हस्व-दीर्घांचे भान म्हणजेही त्याचे स्मरण. पुन्हा या स्मरणाचा आदरही असावा लागतो. तरच ते नाम फळते. श्री माउलींना 'जिव्हे वेगु करीं ।' मधून या सर्व गोष्टी अभिप्रेत आहेत.
असे जेव्हा प्रेमाने नामस्मरण आपल्याकडून होईल, तेव्हाच संसाराच्या जंजाळातून म्हणजे वासनांच्या कचाट्यातून आपली कायमची सुटका होईल ! म्हणूनच माउली हरिपाठातून आपल्याला बोध करतात की, 'हरिमुखे म्हणा' व 'जिव्हे वेगु करीं'. या चरणांचे पू.मामांनी सांगितलेले अजून काही महत्त्वाचे व पूर्णत: नवीन संदर्भ उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 December 2016

॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥

पाप आणि पुण्याच्या विविध प्रमाणांतील मिश्रणानुसार जीवाला जन्म लाभतात. पाप व पुण्याच्या वासनांच्या सारख्या प्रमाणातील मिश्रणाने मनुष्य जन्म मिळतो. नुसत्या पुण्यात्मक वासनांमुळे देवलोकात जन्म होतो, तर पापात्मक वासनांनी कृमीकीटकांच्या पापयोनीत जन्म होतो. मनुष्य जन्माचा सर्वात मोठा फायदा हाच की, या एकाच जन्मात मुक्तिलाभ होऊन श्रीभगवंतांची प्राप्ती होते. बाकी कोणत्याही योनीत होत नाही. पापपुण्याच्या या वासना साधनेने संपून जातात व मनुष्यजन्मातच मग मुक्तिलाभ होतो.
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पहिल्या अभंगात हेच सांगतात. त्यासंदर्भात प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " पाप व पुण्याच्या मिश्रणातून मनुष्यजन्म लाभतो. ते पाप-पुण्य संपल्यावरच एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा चार मुक्ती लाभतात. "
या चार मुक्तींच्या स्पष्टीकरणासाठी पू.मामांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी देशपांडे एक नेहमीच्या जीवनातलेच पण चपखल उदाहरण देत असत. एक मनुष्य आपल्या मुलीकरता कुलशीलाला साजेसे स्थळ पाहात होता. त्यावेळी त्याच्या मित्राने एक स्थळ सुचवले. त्यांचा ठावठिकाणा कळला, म्हणजे 'सलोकता' प्राप्त झाली. तो मनुष्य चौकशी करून त्या स्थळाच्या गावाला गेला; म्हणजे समीप गेला, म्हणून 'समीपता' साधली.
एकंदरीत परिस्थिती पाहून, विचारविनिमय झाला व मुलगी दाखवायला नेली. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत पडले. लगेच वाङ्निश्चय करूनच ते परतले. याचा अर्थ 'सरूपता' झाली. पुढे विवाह होऊन मुलगी सासरी गेली व त्या घराण्याशी समरस झाली, म्हणजेच 'सायुज्यमुक्ती'चा लाभ झाला.
ज्याप्रमाणे लग्न झाल्यावर त्या मनुष्याचे स्थळ शोधणे संपले, त्याप्रमाणे 'देवाचिये द्वारी' उभे राहिल्यावर एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा या मुक्तींचा क्रमाने लाभ होतो ! पण हे 'देवाचे द्वार' मात्र सद्गुरूंकडूनच जाणून घ्यावे लागते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates