प. पू. सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी पुण्यतिथी !
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री व सद्गुरु, प.पू.पार्वतीदेवी देशपांडे यांची आज पंच्चाहत्तरावी पुण्यतिथी ! प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री या साक्षात् श्रीस्वामीतनया होत्या. परमार्थ सोप्या शब्दांत सांगण्यात त्यांचा विलक्षण हातखंडा होता. त्यांनीच अगदी घरगुती उदाहरणे देऊन पू. मामांना अध्यात्माची गहन तत्त्वे उकलून सांगितली. पुढे पू. मामांनीही प्रवचनसेवांमधून तीच सहज सोपी पद्धत अवलंबिल्याचे स्पष्ट दिसते.
एकदा पू.मामांनी मातु:श्रींना विचारले, " आई, माउली पायाळू कोणाला म्हणतात? त्याचा अर्थ नेमका काय? " त्यावर मातु:श्री म्हणाल्या, " आपण मायाळू कोणाला म्हणतो? ज्याच्या हृदयात माया असते त्याला आपण मायाळू म्हणतो. तसेच, ज्याच्या हृदयात श्रीसद्गुरूंचे पाय अखंड विराजमान असतात, त्याला 'पायाळू' म्हणतात. माउलींना हाच अर्थ अभिप्रेत आहे. "
किती सुरेख अर्थ सांगितलाय पाहा मातु:श्रींनी! त्यांच्या हृदयात श्री माउलींच्या कृपेचा प्राजक्त प्रसन्न बहरून अविरत पुष्पवर्षाव करीत असे. त्यांच्या त्या बोध-प्राजक्ताचे अनेक अलौकिक सुगंधी अनुकार पू. मामांनी आपल्या वाङ्मयातून जनसामान्यांपर्यंत प्रेमाने पोहोचवले. पू.मामांच्या बोलण्यात वारंवार, " आमची आई म्हणायची ....." असा प्रेमादराचा उल्लेख येत असे. त्या परम अद्भुत अधिकारसंपन्न मातु:श्री पार्वतीदेवींच्या श्रीचरणीं अमृतमहोत्सवी पुण्यतिथी निमित्त सादर दंडवत !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment