शुभ दीपावली !!
श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'चे यथार्थ स्वरूप सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " ' विठ्ठल मात्रा ' म्हणजेच दीक्षा. ज्याला ती मात्रा घेऊन मोक्षरूपी गुण अनुभवायचा आहे, त्याने साधनेची पथ्ये पाळायलाच हवीत. " श्रीगुरूंनी कृपावंत होऊन परंपरेने आलेले कृपाधन शिष्याला बहाल करणे, म्हणजेच ' विठ्ठल मात्रा ' देणे आहे. हेच भवरोगावरील सर्वात रामबाण औषध आहे !
जसे औषध घेऊन पथ्य पाळले नाही तर रोग समूळ जात नाही. पुन्हा योग्य परिस्थिती आली की तो डोके वर काढतो. पण तेच जर औषध नीट घेतले, पथ्यही पाळले व आवश्यक विश्रांतीही घेतली तर त्या रोगाचा पूर्ण निरास होतो. तसे भवरोगासारखा जुनाट व किचकट रोग कधीच सहजासहजी जात नाही. त्यासाठी श्रीगुरूंनी सांगितलेली साधनेची सर्व पथ्ये मनापासून प्रेमाने पाळली तरच गुण येतो. अशी श्रीगुरुकृपा झाल्यावर आपल्याकडून पथ्ये पाळली जाऊन साधना नेमाने व प्रेमाने होणे, हीच ख-या दीपावलीची सुरुवात आहे. साधनेने आपल्या अंत:करणाातील दोष श्रीभगवंत स्वत: नष्ट करतात, म्हणजेच आपल्या ठिकाणच्या नरकासुराचा वध करतात व त्याने बंदिवासात ठेवलेल्या सोळा हजार एकशे राण्यांचा, अर्थात् आपल्या विविध वृत्तींचा अंगीकार करून त्यांचे पाणिग्रहण करतात. त्या सर्व वृत्ती मग प्रपंचाचा ध्यास सोडून हरिध्यासात मग्न होतात. हाच बोध-दीपोत्सव संतांना अभिप्रेत आहे व तोच प. पू. श्री. मामा या 'विठ्ठल मात्रे'तून आपल्याला सांगत आहेत.
'अमृतबोध'च्या सर्व वाचकांना दीपावली महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
शुभ दीपावलि !
ReplyDelete