24 October 2016

॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६

भगवान श्री ज्ञानेश्वर माउली, सखा कसा असावा? हे सांगताना म्हणतात की, " जो आघवियाची भूमिका । सवे चाले ॥ " जो आपल्या प्रत्येक बाबतीत, सुख-दु:ख, हालअपेष्टा, समाधान, आनंद अशा प्रत्येक परिस्थितीत कायम आपल्या सोबतच असतो, तो सखा, खरा मित्र होय. आपल्या आयुष्यात त्याचा आधार नि:संशय फार महत्त्वाचा व हिताचाच असतो.
काल आपण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेले शत्रू पाहिले. आता त्याच युद्धात आपल्याला प्रचंड साह्य करून विजय मिळवून देणारे चार मित्र ते सांगतात. धर्म, वैराग्य, ज्ञान व भक्ती; हेच ते साधकाचे सखे होत.
महात्म्यांनी सांगून ठेवलेले आचरणाचे, कसे वागावे व कसे वागू नये? याचे नियम म्हणजे ' धर्म ' होय. हे नियम प्रेमाने पाळणे आपल्या चित्तशुद्धीसाठी व पर्यायाने शाश्वत कल्याणासाठी अत्यंत आवश्यकच असते. विषयवासनांच्या आहारी न जाता, प्राप्त परिस्थितीत शांत राहून निष्ठेने साधना करण्यास सतत प्रेरित करणारी वृत्ती म्हणजे ' वैराग्य ' होय. जेवढे हे वैराग्य दृढ होईल तेवढे आपले साधनेतले सुख वाढत असते. आपण जी साधना करतो आहोत, तिच्या तात्त्विक तसेच उपासनेच्या बाजूंचे आपल्याला पूर्ण ' ज्ञान ' असणे फार आवश्यक असते. हे ज्ञान सद्गुरुपरंपरेच्या व संतांच्या वाङ्मयातून मिळते. चित्तात प्रकटणारा हा बोधदीप आपला खूप मोठा मित्र असतो. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे भक्ती. आपल्या श्रीगुरूंवरची व श्रीभगवंतांवरची आपल्या अंत:करणात वसणारी निष्कपट व शुद्ध प्रेमभक्ती हा साधकाचा सर्वात महत्त्वाचा सखा असतो. ही भक्तीच सर्वसुखाचे आगर असणारे श्रीभगवंत आपलेसे करून देत असते.
प. पू. श्री. मामांनी सांगितलेले साधकाचे हे चार मित्र आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक व प्रेमाने जपले पाहिजेत, त्यांच्याशी मैत्री वाढवलीच पाहिजे, इतके महत्त्वाचे आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates