Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०४ ॥*

सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले, भगवान श्री माउलींच्या हरिपाठातील *"साधुबोध जाला तो नुरोनिया ठेला ।"* या सहाव्या अभंगाचे विवरण आपण पाहात आहोत. "साधू कोणाला म्हणावे?" याचे पू.मामा सखोल विवेचन करीत आहेत. साधुत्वाच्या कसोट्या ते मुद्दामच एवढ्या विस्ताराने सांगत आहेत; कारण अशा साधूंनी केलेला बोधच परमार्थात महत्त्वाचा मानलेला आहे.
श्रीभगवंतांना आपल्या या भक्तांचे, साधूंचे किती प्रेम असते, हे आपण पाहिले. त्या भक्तांच्या चरणमुद्रेला, वत्सलांच्छनालाही ते केवढ्या अभिमानाने आपल्या हृदयावर वागवतात. त्यांचे प्रेमच असे अपूर्व आणि मनोहर असते!
या वत्सलांच्छनाचे महत्त्व श्रीसंत एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतात फार छान सांगितले आहे. ते म्हणतात, देवांना हे लांच्छन इतके प्रिय आहे की, वैकुंठात देवांशी सरूपता मुक्ती लाभलेले भाग्यवान जीव व श्रीभगवंत यांच्यातला फरक ओळखण्याचे ते व्यवच्छेदक लक्षणच मानले जाते. देवांशी सरूपता झाली की त्या जीवाला  त्यांच्यासारखेच चतुर्भुज रूप लाभते, पण वत्सलांच्छन मात्र मिळत नाही. ते केवळ श्रीभगवंतांचेच दिव्य शरीरलक्षण आहे. आपल्या भक्तांवर देवांचे इतके अनन्यसाधारण प्रेम असते, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध होते; आणि अशाच अनन्यभक्तांनाच खरे साधू म्हटले जाते. याच साधूंना देव स्वत: वंदन करतात, त्यांची सेवा करायला मिळाल्याने सुखी होतात आणि त्यांचेच अद्भुत प्रेम सतत अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येत असतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

29 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०३ ॥*

भृगू ऋषींची ही कथा नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. कारण सद्गुरु श्री माउलींनी याचा दोन-तीन वेळा संदर्भ घेतलेला आहे. शिवाय 'महर्षींमध्ये मी भृगू आहे', असे स्वत: श्रीभगवंत विभूतियोगात सांगतात. श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात वत्सलांच्छनाच्या प्रसंगाचे फार सुंदर वर्णन केलेले आहे. त्यातून भगवंतांच्या भक्तवात्सल्याचे अनोखे पदर ते उलगडून दाखवीत आहेत. म्हणून विषय थोडा वाढला तरी आपण तेवढा भाग पाहूनच पुढे जाऊया.
ब्रह्म जाणलेल्या पुण्यपूज्य ब्राह्मणांचे माहात्म्य श्रीभगवंत सांगत आहेत. त्यात ते वत्सलांच्छनाचा उल्लेख करून म्हणतात, "अरे अर्जुना, क्रोधाविष्ट झालेल्या महर्षी भृगूंना समोर पाहून मी तत्काळ माझ्या छातीवरील भगवती लक्ष्मीला बाजूला केले, माझा लाडका कौस्तुभमणी काढून हातात घेतला व माझ्या छातीचा खळगा त्यांच्यासमोर केला. कारण त्यानिमित्ताने त्यांचे पावन चरणरज मला प्राप्त होणार होते. त्या लाभासाठी मीच आसुसलेलो होतो.
अशा पुण्यपूज्य महात्म्यांचे चरणरज माझ्याही भाग्यसमुद्राला सदैव भरती आणतात. ते माझे परमभाग्य सतत टिकून राहावे, त्याचे जतन व्हावे म्हणून मी निरंतर प्रयत्नशील असतो. त्या संतांच्या चरणरजांसमोर माझी लाडकी लक्ष्मी व कौस्तुभमणीही महत्त्वाचे नाहीत माझ्यासाठी. म्हणूनच भृगूंनी मारलेल्या त्या टाचेचा वण व त्यांचे चरणरज मी आजही माझे परमभाग्य म्हणून अत्यंत अभिमानाने व प्रेमाने हृदयावर वागवितो आहे !"
एरवी लांच्छन म्हणजे डाग, जो व्यवहारात कायम आपल्याला व पाहणा-यालाही खुपतो, पण इथे भगवंतांना या लांच्छनाचा यथार्थ अभिमान आहे. किती वेगळे आहे ना श्रीभगवंतांचे भक्तप्रेम? असे निखळ प्रेम केवळ तेच करू जाणे !
वत्सलांच्छनाच्या त्या प्रसंगाचे इतके भावस्पर्शी व जणू समोर प्रसंग साकारतोच आहे एवढे नेमके वर्णन इतरत्र कुठेही वाचायला मिळणार नाही. कारण माउली साक्षात् भगवंतच असल्याने, पूर्वी आपण स्वत: अनुभवलेलेच इथे सांगत आहेत. याद्वारे श्रीभगवंतांचे आपल्या भक्तांवरील परमप्रेम पुन्हा पुन्हा ते तुमच्या आमच्यासमोर ठेवीत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन ते प्रेम मिळवणासाठी तरी आपण अनन्यभक्तीची कास धरावी, हाच त्यांचा त्यामागचा विशुद्ध कळवळा आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०२ ॥*

श्रीभगवंत भक्तश्रेष्ठ अर्जुनाला सांगतात की, "अरे, आमच्याशी एकरूप होऊन सुद्धा आमची भक्ती करणा-या या अनन्य भक्तांवर आमचे एवढे प्रेम का असते माहीत आहे का? कारण ते सर्व सद्गुणांची खाणच असतात. इतका मोठा अधिकार असूनही ते पाण्याप्रमाणे निम्नप्रवाही बनून सर्वकाळी नम्रता राखून असतात. म्हणूनच आम्ही त्या भक्तांना वंदन करतो, डोक्यावर घेतो आणि प्रसंगी त्यांचे लत्ताप्रहारही सोसतो."
येथे सद्गुरु श्री माउली, श्रीभगवंत आपल्या छातीवर अभिमानाने वागवितात, त्या 'वत्सलांच्छना'च्या गोष्टीचा संदर्भ देत आहेत. ही कथा श्रीभगवंतांच्या अद्भुत भक्तवात्सल्याचे प्रसन्न प्रतीक आहे! 
एकदा भृगू ऋषींना मोठा यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कोणत्या श्रेष्ठ देवांना द्यावा? हे ठरविण्यासाठी ते आधी स्वर्गात गेले. तेथे इंद्रदेव अप्सरांचे नृत्य पाहण्यात मग्न होते. त्यांनी भृगूंकडे लक्षही दिले नाही. आपल्या यज्ञासाठी इंद्र काही योग्य देव नाही, असे पाहून भृगू सत्यलोकात भगवान ब्रह्मदेवांकडे गेले. तेही आपल्या सृष्टीनिर्मितीत मग्न होते. तिथून ते कैलासलोकात भगवान शिवांकडे गेले. तेव्हा भोलेबाबा पार्वतीमातेबरोबर सुखसंवाद करीत बसलेले. त्यामुळे त्यांची भृगूंशी भेटच झाली नाही.
एवढ्या सगळ्या विचित्र अनुभवांनी चिडलेले भृगू शेवटची संधी म्हणून वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेले. तेथे क्षीरसागरात देवाधिदेव शेषशय्येवर पहुडले होते व लक्ष्मीमाता त्यांचे पाय दाबत बसलेल्या. आपल्या यज्ञासाठी यातले कोणीच सुयोग्य नाही, असा विचार करून; व विष्णूंनी आपला काहीच आदरसत्कार केला नाही हे पाहून रागावलेल्या भृगूंनी झोपलेल्या देवांच्या छातीवर उजव्या बाजूला पायाच्या टाचेने प्रहार केला. दिसायला सारखेच असले तरी, लाथ मारणे व टाच मारणे यात सूक्ष्म फरक आहे. लाथ मारल्याने अपमान होतो, तर टाच मारल्याने कोप व्यक्त होतो, समोरच्याचा धिक्कार केला जातो. हा संदर्भ जाणूनच श्री माउली स्पष्टपणे *"तयाची टांच धरूं हृदयी आम्ही ॥"* असे म्हणतात.
छातीवर आघात झाल्याने योगनिद्रेतून भगवंत जागे झाले. सर्व परिस्थिती त्यांच्या एका क्षणात लक्षात आली. त्यांनी रागावलेल्या भृगूंकडे पाहून मोठ्या प्रेमाने विचारले, "मुनिवर, अहंकाराने व साधूंचा अनादर केल्याने कठीण झालेल्या माझ्या छातीमुळे आपल्या टाचेला काही दुखापत तर झाली नाही ना?" लौकिक दृष्टीने भृगूंनी देवांचा अपराधच केलेला होता. तरीही देवांचे हे विनम्रतेचे मधुर बोल ऐकून भृगूंचा राग शांत झाला व त्यांनी विष्णूंनाच तो अग्रपूजेचा मान दिला.
आपल्या लाडक्या वत्साच्या, भक्ताच्या या वेगळ्या प्रेमाची खूण म्हणून श्रीभगवंत आपल्या हृदयावर 'वत्सलांच्छन' ( वत्साच्या टाचेची खूण ) मोठ्या प्रेमादराने व अभिमानाने आजही वागवतात. याच कथेचा संदर्भ श्री माउली वरील ओवीत देतात. त्यातून ते श्रीभगवंत आपल्या भक्तांना किती प्रेमाने वागवतात व मान देतात हेच दाखवून देत आहेत. आई जशी आपल्या पोटच्या गोळ्याचे सर्व अपराध मनात कसलाही किंतू न आणता सहन करते, तिला त्याचे कसलेही वागणे कधीच त्रासदायक होत नाही; तसेच श्रीभगवंतही आपल्या भक्तांच्या बाबतीत वागतात. त्यांच्या त्या अलौकिक प्रेमभावाचे वत्सलांच्छन हे द्योतकच आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०१ ॥*

श्रीभगवंतांचे आपल्या भक्तांवर निरतिशय प्रेम आहे. ते आपल्या अनन्यभक्तांना, आत्मरूपी रममाण झालेल्या साधूंना अक्षरश: मस्तकावर धारण करतात. हे ते स्वमुखानेच आपल्या लाडक्या भक्तरायाला, धनुर्धर अर्जुनाला सांगत आहेत. कालच आपण भगवान शिवशंकरांचे हे भक्तप्रेम पाहिले. आज श्रीभगवंतांचे पाहूया. भगवान श्रीकृष्ण नुसतेच असे म्हणत नाहीत, तर पंढरीला प्रकटलेल्या महायोगपीठाधिपती भगवान श्रीपांडुरंगांच्या रूपात प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी आपले हे म्हणणे खरेही करून दाखवलेले आहे.
पंढरीला श्रीपांडुरंगांची कोणी स्थापना केलेली नाही, ते स्वयमेव तिथे प्रकटलेले आहेत. म्हणूनच प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्यांच्या बद्दलचे एक प्रमाण आवर्जून सांगत असत की, "पंढरीला भगवंत कसे आलेले आहेत? तर, *'नाही घडविला नाही बसविला ।'* असे." ते स्वत:च तिथे साकारलेले आहेत. बरे, साकारताना फार विलक्षण रूप घेऊन साकारलेले आहेत. सद्गुरु श्री माउली सांगतात, *"मूर्ती चोविसांवेगळा ।"* पांडुरंग हे रूप श्रीमद् भागवतात सांगितलेल्या महाविष्णूंच्या चोवीस अवतारांपेक्षा आगळे-वेगळे व अलौकिक आहे आणि त्यांचे 'विठ्ठल' हे नामही सुप्रसिद्ध सहस्रनामांपेक्षा वेगळेच आहे.
या रूपात त्यांनी आपल्या लाडक्या भक्तश्रेष्ठाला मस्तकी धारण केलेले आहे. माउली त्याचे सुरेख कारण सांगतात की, *"रूप पाहतां तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु । महिमा वर्णिता महेशु । जेणें मस्तकीं वंदिला ॥"* भगवान श्रीमहेश या वेदादिकांनाही अगोचर असणा-या विठ्ठलरूपाचे महिमान प्रेमभराने गाऊ लागले; त्यावर प्रसन्न होऊन पांडुरंगांनी त्यांनाच प्रेमावेगाने मस्तकावर उचलून घेतले, त्यांना शिरसावंद्य मानले. यासाठीच पंढरपूरला श्रीविठ्ठलमूर्तीच्या मस्तकावरील उंच टोपीसारखा जो भाग दिसतो, ते खरेतर शिवलिंग अाहे. समर्थ रामदास स्वामी देखील मनाच्या श्लोकात तेच सांगतात, *"विठोनें शिरीं वाहिला देवराणा ।"*
पंढरपूरला श्रीभगवंत केवळ आपल्या अनन्यभक्तांचे प्रेम सर्वार्थाने आस्वादण्यासाठीच तर प्रकटलेले आहेत. त्याचे द्योतक म्हणूनच त्यांनी भक्तश्रेष्ठ शिवशंकरांना मस्तकावर धारण केलेले आहे. श्रीभगवंत सत्यसंध आहेत; म्हणून ते जे बोलतात तेच करूनही दाखवतात आणि जे करतात तेच ते बोलून दाखवतात !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०० ॥*

कालच्या 'अमृतबोध'मध्ये उल्लेख केलेल्या, भगवान श्रीसदाशिवांच्या विशेष संदर्भाचा आज आपण विचार करणार आहोत. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे शब्दयोजनेतले एकमेवाद्वितीयत्व यातून स्पष्ट दिसून येते.
माउली श्रीभगवंतांच्या मुखाने सांगतात की, "या थोर भक्तांचे चरणतीर्थ अवघे त्रैलोक्य मस्तकी धारण करते. आपल्या भक्तांना कसा आदर द्यावा त्याचे धडे भगवान सदाशिवांकडूनच घ्यावेत. त्यांची स्तुती केली तर पर्यायाने आमचीच स्तुती केल्यासारखे होते, तेव्हा तो विषय आम्ही सोडून देतो." वरवर पाहता या तीन वाक्यांमधील परस्परसंबंध कळत नाही. किंबहुना यात काही संबंध नसावाच, असेही वाटते. पण; हे सद्गुरु श्री माउलींचे शब्द आहेत, हे आपण विसरता कामा नये.
भगवान श्रीमहाविष्णूंच्या श्रीचरणांचे भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूतील पवित्र जलाने पूजन केले. त्यातून जे  चरणतीर्थ प्रवाहित झाले, तीच त्रिभुवनपावनी सुरसरी भगवती श्रीगंगा होय. म्हणून गंगेला 'हरिपदी' किंवा 'विष्णुपदी' देखील म्हणतात. भगवान शिव हे श्रेष्ठ विष्णुभक्त आहेत. आपल्या आराध्याचे चरणतीर्थ म्हणून त्या गंगेला भगवान श्रीशिवांनी सन्मानपूर्वक मस्तकावर धारण केलेले आहे. पण त्याचवेळी भगवान विष्णू हे श्रेष्ठ शिवभक्तही आहेत. त्यामुळे शिवांनी जरी आराध्य म्हणून विष्णुतीर्थ मस्तकी धारण केलेले दिसत असले; तरी दुस-या भूमिकेने पाहिले तर त्यानी आपल्या अनन्यभक्तालाच जणू त्यातून श्रेष्ठत्व प्रदान केलेले नाही का? इथेही साक्षात् श्रीकृष्ण परमात्मा सांगतातच ना, आम्ही आमच्या भक्तांना मस्तकावर धारण करतो. शिवाय श्रीहरींचे चरणतीर्थ असणा-या गंगेला त्रिभुवनातील तुमच्या आमच्यासारखे सर्व जीव सन्मानाने व वंदनपूर्वक मस्तकावर धारण करतातच.
सद्गुरु श्री माउलींनी एवढे सर्व संदर्भ या दोन-तीन ओव्यांमधून किती चपखलपणे व मोजक्या, नेमक्या शब्दांत व्यक्त केले आहेत पाहा. त्यांचे हे विवेचन-कौशल्य वादातीत अलौकिक व एकमेवाद्वितीयच म्हणायला हवे !
भक्तांचे (भगवान विष्णूंचे) चरणतीर्थ (गंगा) सर्व त्रैलोक्य मस्तकावर धारण करते. आपल्या भक्तांना (विष्णूंना) कसा आदर द्यावा, याचे धडे सदाशिवांकडून घ्यावेत (म्हणजे आपल्या भक्तांचे चरणतीर्थही शिवशंकर मस्तकावर धारण करतात; असा आदर द्यायचा असतो). आता जर शिवांची स्तुती केली तर पर्यायाने भगवान विष्णूंचीही स्तुती आपोआपच होणार. कारण; दोघेही एकमेकांचे अनन्यभक्त आहेत. दोघांचा अन्योन्य गुरुशिष्य-संबंध आहे. एवढा सर्व विषय माउलींनी अवघ्या या दोन-तीन ओव्यांमधून किती सुरेख पद्धतीने मांडलेला आहे पाहा. अद्भुत भाषाप्रभुत्व म्हणतात ते हेच !! म्हणूनच श्री तुकोबाराय सद्गुरु श्री माउलींची स्तुती करताना स्पष्ट सांगतात की,
*ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ।*
*म्हणती 'ज्ञानदेव' तुम्हां ऐसे ॥*
*तुका म्हणे नेणो युक्तीचिये खोली ।*
*म्हणूनि ठेविली पायी डोई ॥*
गेले शंभर दिवस आपण सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या कृपेने व त्यांनी केलेल्या श्रीहरिपाठाच्या अभंगांच्या अप्रतिम विवेचनाच्या साहाय्याने, 'अमृतबोध'च्या माध्यमातून नित्यनियमाने श्री माउलींच्या पायी डोई ठेवीत आहोत व यापुढेही रोजच ठेवणार आहोत. आपल्याले नि:संशय शाश्वत कल्याण करणा-या या बोधामृतपान-भाग्याचा, केवळ काही काळासाठी अमर करणारे ते अमृत पिणा-या स्वर्गीय देवादिकांनाही नक्कीच हेवा वाटत असेल, यात अजिबात शंका नाही ! आपणही हे माउलीकृपेचे पसाय असणारे देवदुर्लभ परमभाग्य सादर अनुभवावे, आस्वादावे हेच भले !!
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 March 2017

॥ अमृतबोध ॥ २५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९९ ॥

॥ अमृतबोध ॥
२५ मार्च २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - ९९ ॥
आपल्या भक्तांची स्तुती करून धालेपणाने श्रीभगवंत धन्योद्गार काढीत अर्जुनाला प्रेमभराने सांगतात की, "अरे अर्जुना, मी माझ्या अनन्य भक्तांना अक्षरश: मस्तकावर धारण करतो. ज्याला माझ्या भक्तीविषयी खरी तळमळ असते, तो माझा अत्यंत प्रिय असतोच. अशा उत्तम भक्तापुढे मस्तक नम्र करणे यात नवल काहीच नाही रे, पण सर्व त्रैलोक्यच त्या भक्ताच्या चरणतीर्थालाही वंदन करते, हे लक्षात ठेव.
प्रेमळ भक्ताचा आदर कसा करावा? हे जर तुला शिकायचे असेल तर त्याचे धडे भगवान श्रीसदाशिवांकडूनच घ्यायला हवेत. श्रीशंकरांचे वर्णन करणे म्हणजे पर्यायाने आमचीच स्तुती केल्यासारखे आहे, म्हणून ते सोडून देऊया. पण तुला स्पष्ट सांगतो, मी या भक्तांनाच मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करीत असतो. अशा अनन्यभक्ताला तू माझ्याहूनही श्रेष्ठच समज !"
सद्गुरु श्री माउलींच्या शेवटच्या भगवान सदाशिवांच्या विशेष संदर्भाचा उद्या आपण सविस्तर विचार करूया. माउलींनी अगदी बहार केलेली आहे त्यातून.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )


Read More

24 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ९८ ॥*

हरिरंगी रंगलेल्या साधूंचे गुणवर्णन करणे हे श्रीभगवंतांचे लाडके काम आहे. साधूंची जगावेगळी स्थिती सांगताना ते म्हणतात, "आकाशावर जसा कसलाच रंग चढत नाही, त्याप्रमाणे कोणी निंदो किंवा कोणी वंदो, साधूंना त्याने काहीच फरक पडत नाही. ते त्या बाबतीत पूर्ण उदासीन असतात.
साधू सदैव उन्मनी अवस्थाच भोगीत असल्याने आपोआपच मौनी झालेले असतात. खरे अथवा खोटे, काहीच ते बोलत नाहीत. पाऊस पडला काय अन् न पडला काय, समुद्राला ते सारखेच असते. तसे साधूंना काही मिळेल त्यात संतोष असतो व काही मिळाले नाही तरी त्याचा विषाद नसतो.
वायू जसा सर्वकाळ सर्वत्र वाहात असतो, त्याला एक असे घर नाही. तसे हे साधूही कोणाचाच आश्रय करत नाहीत. त्यांनी एकमात्र तो परमात्माच धरून ठेवलेला असतो. त्यामुळे त्या परमात्म्यासारखेच हे साधूही विश्वरूपच झालेले असतात. सगळे विश्व हेच त्यांचे घर बनलेले असते आणि अशा विलक्षण संतांवर माझे निरतिशय प्रेम असते !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ९७ ॥*

श्रीसंत एकनाथ महाराज साधूंचे श्रेष्ठत्व सांगतात की, देवांचा अवतार झाला तर दासांना सुख होते, पण दैत्यांना मात्र भय निर्माण होते. पण संतांचे तसे नसते. संतांच्या आगमनाने भक्तांना जसे सुख लाभते तसेच सुख दैत्यांनाही लाभते. दैत्य साधूंचा आदरसत्कारच करतात. हेच सद्गुरु श्री माउली देखील सांगतात की, "पाणी जसे तहान भागविण्यासाठी सर्व जीवांना हवेहवेसे असते, तसे हे साधू देखील अवघ्या त्रैलोक्याला हवेहवेसे वाटतात. त्यांच्या पावन संगतीची इच्छा सर्वजण नेहमीच करतात. पण त्याचवेळी हे साधू मात्र अंतर्बाह्य विषयांची आसक्ती सोडून, आपले चित्त कोठेही गुंतू न देता, एकाकी बनून आपले आपल्याशीच रममाण होऊन राहिलेले असतात. त्यांना आपल्या प्रसिद्धीशी, लोकांच्या हवेहवेसे वाटण्याशी काहीही घेणे-देणे नसते. ते सदैव आपल्याच आनंदात विचरण करीत असतात."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ मार्च २०१७* _*श्रीपाद नवमी - पू.मामांची २७ वी पुण्यतिथी*_ *॥ हरिपाठ मंजिरी - ९६ ॥*

मान आणि अपमान या दोन्ही गोष्टींचा आपल्यावर प्रचंड परिणाम होत असतो. मान मिळाल्यास आनंद तर अपमान झाल्यास कोणालाही दु:खच होते. कारण आपला अहंकार त्यामध्ये असतो. साधूंच्या ठायी तो अहंकारच शिल्लक नसल्याने, त्यांना ना मान दिल्याने सुख होते ना अपमान केल्याने दु:ख होते. दोन्ही बाबतीत ते अथांग जलाशयासारखे शांतच असतात. जसे हे मनाच्या मानापमानांचे, तसेच शरीराच्या शीतोष्ण जाणिवांचेही असते. साधूंना त्यांचेही काहीच वाटत नाही. मेरू पर्वत जसा कितीही सोसाट्याचा वारा आला तरी निष्कंप असतो, तसे हे महात्मे मनाच्या व शरीराच्या जाणिवांच्या बाबतीत निष्कंपच असतात.
चंद्राचे चांदणे जसे राजाला आल्हाददायक असते तसेच रंकालाही असते. तसे हे साधुमहात्मे सर्वांना समान सुख प्रदान करतात. त्यांच्याठायी कसलाही भेदभाव नसतो.
मान-अपमान, शीत-उष्ण व सुख-दु:ख या सर्व द्वंद्वांच्या बाबतीतली निस्तरंग समता हे साधूंचे विशेष भूषण आहे; असे परमात्मा भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने सांगतात.
*आज श्रीपाद नवमी ! पू.मामांची सत्ताविसावी पुण्यतिथी.* प.पू.सद्गुरु.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे या समत्वाचे, साधुत्वाचे परमादर्श होते. ते हिमालयातील बर्फाच्या थंडगार पाण्यात उभे राहून तासन् तास गायत्रीचा जप करीत असत असत. तेवढ्याच शांतपणे वारीच्या वाटेवर दुपारच्या टळटळीत उन्हात अभंगही गात असत. मानापमानांची तर त्यांच्या लेखी किंमत शून्य होती. श्रीभगवंत येथे ज्यांचे भरभरून कौतुक करीत आहेत, त्या आत्मरंगी रंगलेल्या साधूंचे प.पू.श्री.मामा हे शिरोमणीच होते. म्हणूनच, साक्षात् श्रीभगवंत सदैव त्यांच्यासोबत असत. आज प.पू.मामांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या शुभद वरद श्रीचरणीं अनंतकोटी दंडवत !!
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२१ मार्च २०१७* *_प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज पुण्यतिथी (तारखेने)_* *॥ हरिपाठ मंजिरी - ९५ ॥*

घरात लावलेला दिवा असे म्हणतो का, मी फक्त घरातल्याच लोकांना उजेड देणार? त्या दिव्याला घरचा आणि परका असा भेदच नसतो. वृक्ष कधी लावणा-यालाच सावली देणार आणि तोडणा-याला नाही देणार म्हणतो का? तो दोघांनाही सारखीच छाया देतो. ऊस देखील लावणी करून पाणी घालणा-याला व चरखात घालून गाळणा-याला सारखीच गोडी देतो; तसे हे आत्मदर्शी साधू कोणाच्याही बाबतीत शत्रू-मित्र असा भेदभाव करीत नाहीत. ते सर्वांवर समानच कृपा करतात. अशी देवदुर्लभ समभावना हेच साधूंचे मुख्य वैशिष्ट्य अाहे, असे साक्षात् जगज्जीवन परमानंदकंद भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने सांगतात.
आपल्यावर जीवघेणा विषप्रयोग करणा-यावरही अनाक्रोश क्षमा करून, त्याच्यावर प्रारब्धाने आलेल्या बिकट परिस्थितीत, त्याला एका शब्दानेही न दुखवता त्याचा सर्व योगक्षेम शेवटपर्यंत वाहणारे *प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे या सर्व साधूलक्षणांचे मूर्तिमंत आदर्शच होते.* साधू झाल्याशिवाय साधुत्व कळत नाही, असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. म्हणूनच, अशा साधूंनी अर्थात् प.पू.मामांनी केलेले हरिपाठाचे, त्यातील साधूलक्षणांचे हे स्वानुभूत विवरण आपण गेले तीन महिने सलग पाहात आहोत. आज त्यांची तारखेने सत्ताविसावी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांच्या पावन श्रीचरणीं दंडवत घालून आपण करुणाकृपा भाकूया!
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates