8 April 2016

चरित्रसुधा - १


( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
भूमिका :-
मूळच्या एकमात्र निर्गुण-निराकार परमात्म्याला सगुण-साकार होऊन आपल्याच आनंदलीलेचा रसास्वाद घेण्याची इच्छा झाली. त्याच्या त्या संकल्पातूनच त्याच्याशी अभिन्न असणारी त्याची शक्ती निर्माण झाली. त्या शक्तीनेच मग या चराचराची निर्मिती केली. ज्याप्रमाणे एखादा कोळी आपल्यापासूनच धागा निर्माण करून जाळे विणतो त्याप्रमाणे परब्रह्मस्वरूप असणाऱ्या शक्तीने स्वतःपासूनच अवघ्या जगाची निर्मिती केली.
जसे ते सर्वशक्तिमान परमतत्त्व, विविध अवतारांच्या माध्यमातून साकार होते तसेच विविध संत-सत्पुरुषांच्या रूपानेही प्रकटते. शिव - शक्ती - सद्गुरु अशी ही एकरूप स्वरूपत्रयी आहे. भगवंतांचे चालते-बोलते, परमकरुणामय स्वरूप म्हणजे संत-सद्गुरु ! निर्गुण निराकार भगवंत हे मूळ अधिष्ठान, त्यावर त्यांच्याच मायेचा हा सर्व पसारा आणि त्याच पसा-यातून अडकलेल्या जीवांना हात देऊन बाहेर काढणारी त्यांचीच करुणामूर्ती म्हणजे ' सद्गुरु ' ! अकारण कृपाळू, ममताळू, कनवाळू गुरुमाउली हाच साधकांचा आणि सिध्दांचाही परमार्थपथावरील एकमात्र चिरंतन आधार असतो. याच आधाराच्या साहाय्याने, सुरीच्या धारेवरून चालण्यासारखा अत्यंत अवघड असा हा परमार्थपथ साधक सहजतेने पार करून जातात.
हे ' सद्गुरुतत्त्व ' अखंड असते. मायेच्या प्रभावाने निर्माण झालेले अज्ञान नष्ट करणे हे या तत्त्वाचे कार्य असल्याने, जोवर अज्ञानाचा शेवटचा कण पृथ्वीवर आहे तोवर सद्गुरुतत्त्व देखील या ना त्या रूपाने कार्यरत असतेच. म्हणूनच श्रीसद्गुरुतत्त्वाचे साकार रूप असणा-या भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंना चिरंतन, नित्य अवतार म्हणतात. त्यांचा हा अवतार अखंड, अद्भुत आणि विलक्षण आहे !
भगवान श्रीदत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा एकत्रित अवतार आहेत, हे सर्वजण जाणतातच. श्रीमद्भागवत महापुराणामध्ये भगवान श्रीमहाविष्णूंचे एकूण चोवीस अवतार सांगितलेले आहेत. या चोवीस अवतारांपैकी, अत्रि-अनसूयासुत श्रीदत्तात्रेय हा एक अवतार सांगितलेला आहे. त्यामुळे श्रीदत्तसंप्रदाय हाही मुळात भागवत संप्रदायच आहे.
भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या अंशापासून अखंडितपणे महात्मे निर्माण होत असतात. या महात्म्यांची अवतार-परंपराही अक्षुण्णच राहते. हीच श्रीगुरुपरंपरा होय. कलियुगात आजवर या परंपरेत श्रीदत्तात्रेयप्रभूंचे पाच प्रमुख अवतार झाले. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज - भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज - राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज - सकलमताचार्य सद्गुरु श्रीमाणिकप्रभू महाराज आणि पंचम दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराज हे ते पाच पूर्णावतार होत. श्रीमत् टेंब्येस्वामींनाच श्री थोरले महाराज असे आदराने संबोधले जाते. त्यांचे दिव्य चरित्र अक्षरशः वेड लावणारे आहे. त्यांनीच प्रथमतः श्रीदत्तसंप्रदायाच्या विविध उपासनांना व तत्त्वविचाराला शब्दांच्या माध्यमातून ग्रंथांमध्ये बंदिस्त करून ठेवले. प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांचे हे अखिल मानवजातीवरील कधीच न फिटणारे महान ऋण आहे. त्यांचे समग्र चरित्र व कार्य हे महासागरासारखे अथांग, खोल आणि हिमालयासारखे प्रचंड, अत्युच्च आहे !
प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज म्हणजे, तपःपूत, शास्त्रनिष्ठ आचरणाचा परमादर्श, अतीव भाविक भक्तहृदयाचा प्रकट आविष्कार, ज्ञानसूर्याचा स्निग्ध, तेजस्वी ब्रह्मप्रकाश, दया-कारुण्याचा उसळता, खळाळता अथांग महासागर, वैराग्य - अमानित्व - अहिंसा - अपरिग्रह इत्यादी दैवी गुणसंपदेची कधीच न संपणारी खाण, श्रीदत्त संप्रदायातील महिमोत्तुंग हिमालय, किती आणि काय लिहिणार? आपल्या क्षुद्र लेखणीला फारच मर्यादा पडतात !!
प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांनी आपल्या ६१ वर्षांच्या अद्भुत-रम्य आयुष्यात अखंडपणे भ्रमंती करून श्रीदत्तसंप्रदायाचा प्रचार-प्रसार केला; त्याची घडी नीट बसविली. त्यांनी आयुष्यभर केलेल्या भ्रमंतीचा आपण नुसता विचार जरी केला तरी आपल्याला गरगरायला लागते. त्यांचे सारे जीवनचरित्र अत्यंत विलक्षण आहे !
प.प.श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी आषाढ शुद्ध प्रतिपदा, २३ जून १९१४ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास नर्मदाकिनारी श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे आपल्या नश्वर देहाचा त्याग केला आणि पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे, २५ जून १९१४ रोजी सकाळी ९.२९ मिनिटांनी पुण्यात प. पू. मातुःश्री पार्वतीदेवी व प. पू. श्री. दत्तोपंत देशपांडे या सत्शील, साधुतुल्य दांपत्याच्या पोटी प. पू. श्री. मामांच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला ! प. पू. श्री. मामांच्या जन्माची कथा फारच विलक्षण आहे. ती आपण पुढे सविस्तर पाहूच.
पूर्वपीठिका :-
छत्रपती शिवरायांच्या नंतरच्या काळात स्वराज्याचे मल्हारबा देशपांडे नावाचे एक निष्ठावंत व शूर सरदार होते. त्यांची एक वंशपरंपरा पुढे भोर जवळील नसरापूरला येऊन स्थायिक झाली. त्यांतील राघो निळो देशपांडे या तलवार बहाद्दरांपर्यंत सरदारकी होती. त्यांचे चिरंजीव प. पू. श्री. दत्तोपंत देशपांडे मात्र नसरापूरचे कुलकर्णपण करीत असत. पूर्वीच्या मर्दुमकीसाठी जवळपास अठराशे एकरांची मुबलक शेतीवाडी देशपांडे घराण्याला मिळालेली होती. या दत्तोपंतांचा जन्म १८६६ सालचा. पू. श्री. दत्तोपंत अतीव शांत स्वभावाचे, सरळमार्गी आणि भाविक गृहस्थ होते. त्यांना भोरचे पू. दत्तंभट महाराज, गोंदवल्याचे श्री ब्रह्मचैतन्य महाराज, केडगावचे पू. नारायण महाराज, नाशिकचे पू. गजानन महाराज गुप्ते, पू. निरंजन रघुनाथ, पू. कैवल्याश्रम स्वामी इत्यादी अनेक साधु-सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद व सख्य लाभले होते. ते सद्गुरु प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे प्रत्यक्ष अनुगृहीत होते.
पू. श्री. दत्तोपंतांचा विवाह त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी, अक्कलकोट संस्थानातील वाकनीस पू. श्री. नारायण भट्ट सोनटक्के यांच्या द्वितीय अपत्य प.पू. बाई यांच्याशी झाला. या बाईंचा जन्म १८७५ सालचा. त्या काळात साक्षात् परब्रह्म श्रीस्वामीसमर्थ रूपाने अक्कलकोटात अद्भुत लीला करीत होते. पू. नारायणभट हे श्रीस्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त व पूर्ण कृपांकितही होते. एवढेच नाही तर खास मर्जीतले होते. त्यांची कन्या म्हणून राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांनी लहानग्या बाईला स्वतःच्या मांडीवर घेऊन " ही अामची पोर आहे " असे म्हणून तिच्यावर आपले कृपाछत्र कायमचे घातले होते. बाईला तिच्या वडिलांकडून, श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या आज्ञेने परंपरेचा अतिदिव्य शक्तिपात अनुग्रह लाभलेला होता. त्या कृपेने तिने तत्क्षणी समाधीचा अनुभवही घेतलेला होता. परमभाग्यवान बाईचे त्या बालवयातले पारमार्थिक अनुभव मात्र आभाळाएवढे मोठे होते ! लहानगी बाई वयाच्या नवव्या वर्षी, सौ. पार्वती होऊन देशपांडे घराण्यात प्रवेशली. पू. दत्तोपंत व पू. बाईंचा हरिमय प्रपंच सुखाने सुरू झाला. (क्रमश: )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates