12 April 2016

चरित्रसुधा - ४




( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
काळरात्रीच्या गर्भगृहात :-
देशपांडे कुटुंबात सर्वकाही छान चालू होते. पू. मामांचा धाकटा भाऊ यशवंतही मोठा होऊ लागला होता. नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर दत्तूअण्णा जरा गंभीरच असत. ते आपल्याच आनंदात रममाण होऊन बसलेले असत. त्यांना आता पैलतीराची ओढ लागलेली होती. ६ मे १९२८ रोजी पू. दत्तूअण्णांनी श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने योगमार्गाने देह ठेवला. दत्तूअण्णांचे दिवसपाणी झाल्याबरोबर सीताराम काकांनी मातुःश्री व मामांना संपत्तीतून बेदखल करीत नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढले. याही प्रसंगी मातुःश्रींची कमालीची शांतता अबाधित राहिली. पू. पार्वतीबाईंचे बंधू पू. नरहरीमामा त्यांना पुण्याला घेऊन आले. मंडई जवळच्या रानडे वाड्यात खोली भाड्याने घेऊन मामा राहू लागले. इतक्या भयंकर परिस्थितीतही, देव व सद्गुरूंच्या कृपेने, त्यांच्याच स्मरणात पराकोटीची शांती बाळगून अखंड कार्यरत असणा-या आपल्या मातुःश्रींच्या वर्तन व विचारांचा फार मोठा संस्कार पू. मामांच्या अंतःकरणावर कायमचा कोरून ठेवला गेला होता.
श्री. दत्तूअण्णांच्या अकाली निधनाने परिस्थिती एकदम बदलून गेली. मामांचे थोरले बंधू गोविंदराव यांची वृत्ती आधीपासूनच अलिप्त होती. या सर्व गोंधळात त्यांची पत्नी राधा प्रसूत झाली आणि राधाचे वडील अचानक निवर्तले. नातू आजोबांच्या मुळावर आला म्हणून ओल्या बाळंतिणीला त्यांनी देशपांड्यांकडे पाठवून दिले. राधाने या सर्व घटनांचा इतका धसका बसला की तिने अंथरुण धरले आणि त्यातून ती सावरलीच नाही. लहान पोर शंभूला मागे ठेवून राधा गेली. गोविंदरावांनी घर सोडले व ते संन्यास घेण्यासाठी निघून गेले.
पू. श्री. दत्तूअण्णांनी मामांचे पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल मध्ये नाव घातलेले होते. शिक्षण सुरू झाले नाही तोच अण्णा गेले. त्यामुळे मामांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या भरण-पोषणाची जबाबदारी इतक्या लहान वयात अंगीकारावी लागली. वर्तमानपत्रे वाटणे, साबण-तेल इ. विकणे, शिकवण्या घेणे असे उपक्रम सुरू झाले. पुढे एका छापखान्यात लहानशी नोकरी लागली. पण संकटे कधी एकटी येत नाहीत. त्या छापखान्यात प. पू. श्री. मामांना शिशाचे खिळे वापरताना लेड पॉयझनिंग झाले. ४२ दिवस मातुःश्रींनी त्यांना पूर्णपणे दुधावर ठेवले होते आणि आपल्या वैद्यकीय कौशल्यावर त्यातून सुखरूप बाहेर काढले.
त्यासुमारास स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती. भैरवनाथ तालमीचे क्रमांक दोनचे कुस्तीपटू असणारे देशाभिमानी पू. मामा या चळवळीत सहभागी झाले. असहकार, चले जाव, स्वदेशी, सविनय कायदेभंग इत्यादी सर्व चळवळींमध्ये पू. मामा पुढाकाराने कार्यरत होते. १९३० साली एका मोर्च्याचे नेतृत्व करीत असताना प. पू. श्री. मामांनी पुण्याच्या बुधवार चौकात, हॅमंड नावाच्या अधिका-याने मारलेली गोळी उंच उडी मारून सहज चुकविली होती. त्यावेळच्या केसरी आदी वृत्तपत्रांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
घरची परिस्थिती ओढाताणीची असूनही प. पू. श्री. मामांचा सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरपूर सहभाग असे. प. पू. श्री. मामा हे अतिशय उत्तम नट आणि दिग्दर्शक होते. कथेचे मर्म अचूक जाणून ते नटांना मार्गदर्शन करीत. त्यांनी त्यावेळी दिग्दर्शित केलेली १८ नाटके रंगभूमीवर गाजलेली होती. त्यावेळचे प्रसिद्ध नट त्यांच्या नाटकांमधून कामे करीत. बालगंधर्वांशी देखील पू. मामांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अनेक नाटकांचे मुहूर्त पू. मामांनीच काढून दिलेले होते.
पू. मातुःश्री पार्वतीदेवींचे मामांच्या जडणघडणीकडे बारीक लक्ष होतेच. ते सामाजिक कार्यात मग्न असले तरी रोजचे साधन, नित्यनेम व्यवस्थित आणि वाढत्या प्रमाणात होत आहे ना, याकडे मातुःश्री लक्ष देत. मूळचाच अधिकार अलौकिक असल्याने प. पू. श्री. मामांचे आध्यात्मिक अनुभवही फार उत्तम दर्जाचे होते.
विविध छोट्या मोठ्या नोक-या करीत करीत शेवटी प. पू. श्री. मामा खडकीच्या अॅम्युनेशन फॅक्टरीत कामाला लागले. त्यावेळी त्यांना मातुःश्रींनी ज्ञानेश्वरीची गोडी लावलेली होती. त्यांनी कसून अभ्यासाला सुरूवात केली. फॅक्टरीत जाता-येता सायकलच्या हँडलला लावलेल्या पॅडवर लिहिलेल्या श्रीज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे त्यांचे चिंतन चालू असे. वर्षभरात त्यांचे असे चिंतनाचे एक पारायण पूर्ण होई. मातु:श्रींनी त्यांना सांगून ठेवले होते की, पुढे तुला माउलींचे दर्शन होईल आणि त्यानंतर भविष्याची (ज्योतिषाची) स्फूर्ती मावळून ज्ञानेश्वरीचे गूढ अर्थ उलगडू लागतील. तरुणपणीच पू. मामा चेहरा पाहताच माणसाची अचूक पत्रिका मांडण्यापर्यंत ज्योतिषात तरबेज झालेले होते. मातुःश्रींनी त्यांना जेवढ्या जेवढ्या विद्या दिल्या, त्या सर्वांचे नीती-नियमही समजावून सांगितलेले होते. ज्योतिष व औषधांच्या बदल्यात कोणाकडूनही कसलाही मोबदला घ्यायचा नाही, हा मातु:श्रींचा कडक दंडक ते तंतोतंत पाळत असत. शास्त्रशुद्ध आचरण, निरपेक्ष वृत्ती, भगवद् भक्ती आणि भगवत्प्रसाद, तपाने शुद्ध झालेली बुद्धी-वाणी या सर्वांमुळे प. पू. श्री. मामा, वैद्यकी, ज्योतिष, मंत्रशास्त्र, इत्यादी सर्व विद्यांमध्ये अल्पकाळातच अद्भुत अधिकारसंपन्न झालेेले होते. पू. पार्वतीबाईंनी कृपापूर्वक दिलेल्या नाममंत्राच्या जपाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांना भगवान श्रीपांडुरंगांचा सगुण साक्षात्कारही झालेला होता. त्याचवर्षी भाऊबीजेच्या दिवशी पंढरपूरला ते पहिल्यांदा दर्शनाला गेले तेव्हा अगदी आधी झालेल्या सगुण दर्शनासारखेच दर्शन त्यांना लाभले. त्यानंतर मातु:श्रींच्या आज्ञेने त्यांनी पंढरीच्या आषाढी वारीला जायला सुरुवात केली व आजन्म तो नियम पाळला.
मातुःश्रींकडून कृपानुग्रह :-
उत्तम गुरु हे शिष्याचा अधिकार जोखूनच कृपा करीत असतात. प. पू. श्री. मामांच्या बाबतीत मातुःश्रींनी अजिबात हयगय केलेली नव्हती. त्यांनी अत्यंत निगुतीने, पूर्ण विचारपूर्वक पू. मामारूपी हि-याला अद्भुत पैलू पाडलेले होते. दासबोध, एकनाथी भागवत यांचा क्रमाने अभ्यास पूर्ण होऊन आता ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास चालू झालेला होता.
प. पू. श्री. मामांची पारमार्थिक तयारी पाहून, श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने, मार्गशीर्ष शु. सप्तमी, दि. २६ नोव्हेंबर १९४१ रोजी पहाटे प. पू. मामांना श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेने आलेला दिव्य शक्तिपात अनुग्रह केला व त्याचवेळी परंपरेचे उत्तराधिकारही प्रदान केले. बारा वर्षे तीव्र साधना करण्याची आज्ञाही त्यावेळी केली होती. अनुग्रहानंतर जवळ जवळ ५ तास प. पू. श्री. मामा प्रगाढ समाधी अवस्थेत होते. समाधीतून उठल्यावर त्यांनी मातुःश्रींच्या श्रीचरणांवर दंडवत घातला. जन्मदाती आईच प्रत्यक्ष मोक्षप्रदाती गुरु असण्याचा दुर्मिळ आणि विशेष योग पू. मामांच्या बाबतीत घडला. प. पू. श्री. मामा देखील आजन्म आपल्या सद्गुरुमातेच्या अनुसंधानात, सेवाऋणातच राहिले.
अनुग्रहानंतर मातुःश्रींनी पू. मामांना सांगितले, " सख्या, तू जरी आता शक्तिसंपन्न झालेला असलास तरी ही परंपरा चालविण्यासाठी मंत्रही हवा. हा मंत्र मी देऊ शकत नाही. बरोबर बारा वर्षांनी याप्रकारचा अनुभव तुला एका थोर सत्पुरुषांकडून पुन्हा प्राप्त होईल. तेच तुझे मंत्रगुरु असतील. " प. पू. श्री. मामांना मातुःश्रींच्या या भाकिताची प्रचिती पुढे आली.
प. पू. श्री. मामा हे स्वानुभवानेच विश्वास ठेवणारे होते. मातुःश्रींनी देखील प्रत्येकवेळी त्यांना सर्व गोष्टी स्वानुभवानेच पटवून दिल्या. प्रत्येक प्रक्रिया, अध्यात्माचे सिद्धांत त्यांनी मामांना अनुभव देऊन पटवून दिले. ज्या दिवशी त्यांनी मामांना अनुग्रह केला त्याच रात्री त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. ही लीला अत्यंत अद्भुतच होती.
२६ नोव्हेंबर १९४१ च्या रात्री मातुःश्रींनी मामांना जवळ बोलावले आणि सांगितले, " सख्या, भगवंतांनी गीतेच्या आठव्या अध्यायात योगी देह कसा ठेवतात ते सांगितले आहे, मी ते तुला प्रत्यक्ष दाखवते, पाहा. " असे म्हणून त्या आसनावर बसल्या व आपल्या श्रीसद्गुरुनाथांचे स्मरण करून, ऊर्ध्व लावून त्यांनी आपले प्राण विलीन केले; आपल्या लाडक्या मुलाच्या देखत ! माउली म्हणतात तसा, घंटेचा नाद घंटेतच विलीन व्हावा, तशा मातु:श्री परब्रह्मामध्ये विलीन झाल्या. मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी झालेला हा देहत्यागाचा अपूर्व सोहळा प. पू. श्री. मामा आश्चर्याने पाहत होते. थोड्या वेळाने त्यांना लक्षात आले की, " आपली आई गेली. " आयुष्यभर प्रचंड संकटांना धीरोदात्तपणे सामोरी गेलेली, प्रत्येक प्राप्त परिस्थितीत, " जशी हरीची इच्छा ", म्हणत आपले अनुसंधान, साधन अखंड ठेवणारी, अत्यंत प्रेमळ, दयाळू तरीही कणखर व खंबीर अशी, आपला परमादर्श असणारी आपली आई, आपली सद्गुरु आता लौकिक अर्थाने आपल्याला कायमची सोडून गेली, याचे पू. मामांना अतीव दुःख झाले. पू. दत्तूअण्णांच्या देहत्यागानंतर आपल्या आयुष्याची शेवटची बारा वर्षे मातुःश्रींनी क्षणभर देखील जमिनीला पाठ लावली नव्हती. त्या रात्रीसुद्धा अखंड ध्यानाला बसलेल्या असत किंवा नामस्मरणात फे-या मारत असत. प. पू. श्री. मामांनीच त्यांनी देह ठेवल्यानंतर बारा वर्षांनी त्यांची पाठ जमिनीला टेकवली. आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजून लोकांच्या उपयोगी पडलेल्या या थोर विभूतीची अंत्ययात्रा ज्या ज्या मार्गाने गेली तो सर्व मार्ग अलौकिक चंदन सुगंधाने भरून गेला. शिवाय त्यांची चिता पेटल्यावर ओंकारेश्वरचे श्मशानही दिव्य चंदनगंधाने भरून गेले. पू. मातु:श्री पार्वतीदेवींच्या अद्भुत आध्यात्मिक अधिकाराची याहून मोठी खूण काय असणार?
प. पू. मातुःश्री पार्वतीदेवींना राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी स्वमुखाने " माझी पोर " म्हणून कृपाप्रसाद केलेला होता, यातच त्यांचा जगावेगळा अधिकार दिसून येतो. त्यांच्या विविध पैलूंवर लिहायचे म्हटले तर ग्रंथच्या ग्रंथ तयार होतील इतके त्यांचे विभूतिमत्व अगाध आहे. पू. पार्वतीबाईंनी आपले सर्वस्व ओतून पू. मामांना घडवले, हे खरेतर तुम्हां आम्हां सर्वांवर त्यांनी फार मोठे उपकारच करून ठेवलेले आहेत. त्यांच्या श्रीचरणीं दंडवत घालून त्यांची कृपा भाकणे, हे आपल्या पारमार्थिक प्रगतीसाठी फारच उपयुक्त असल्याने, तेच आता आपण मनोभावे करूया. त्यांचे काही विशेष प्रसंग उद्याच्या भागात आपण आवर्जून पाहणार आहोत. ( क्रमश: )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates