10 April 2016

चरित्रसुधा - ३



( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांचा वरदपिंड म्हणून श्रीपादकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. विशेषतः मातुःश्री पार्वतीदेवी आणि पू. दत्तूअण्णा खूपच आनंदी आणि समाधानी झाले होते. त्यांनी काळजीपूर्वक या पावन प्रसादाचे संगोपन करण्यास सुरुवात केली.
पू. मामा तीन वर्षांचे असताना पुन्हा त्यांचे बि-हाड पुण्यातून नसरापूरला हलले. श्रीपादचे शिक्षण नसरापुरात सुरू झाले. पाढे, परवचा, मूळाक्षरे तर त्याने घरीच आत्मसात केली होती. पू. मातु:श्री पार्वतीदेवी व पू. दत्तूअण्णा वेळोवेळी लहानग्या श्रीपादला समजेल-उमजेल अशा पद्धतीने परमार्थाचे, सदाचाराचे धडे देतच होते. श्रीपाद जात्याच अत्यंत हुशार आणि तीव्र आकलन क्षमतेचा असल्याने त्यानेही भराभर सर्व गोष्टी आत्मसात केल्या. आपल्या साधुतुल्य आई-वडिलांच्या दैनंदिन वर्तनाचेही फार महत्त्वाचे संस्कार श्रीपादच्या तरल अंतःकरणावर होत होतेच.
श्रीपाद पाच-सहा वर्षांचा असताना आपल्या बहिणीच्या, अनसूयेच्या सासरी बेळगांवला तिच्या मंगळागौरीसाठी गेलेला होता. अनसूयाताईंचे दीर दत्तोपंत हे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकरांचे अनुगृहीत होते. श्रीपादचा देवाधर्माचा ओढा पाहून दत्तोपंतांनी त्याला आपल्या देवघरात, जेथे पंत महाराज आले की नेहमी बसत, तेथेच ध्यानाला बसविले. त्याचे लगेच ध्यान लागले व थोड्या वेळाने श्रीपादच्या नेत्रांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. ध्यान आटोपल्यावर दत्तोपंतांनी त्याला विचारले असता, त्याने श्रीपंतमहाराजांचे हुबेहूब वर्णन करून सांगितले. त्याला त्यांचे साक्षात् दर्शन झाले होते. योगायोगाने तो दिवस श्रावण वद्य पंचमीचा, प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांच्या जयंतीचाच होता ! श्रीपादच्या ठिकाणी अशा अलौकिक अनुभूती बालपणापासूनच आपोआप प्रकट होत असत.
एकदा बनेश्वरजवळ खेळता खेळता श्रीपाद वाट चुकला आणि जंगलात हरवला. देवांच्या कृपेने एका साधूने त्याला आपल्या बरोबर ठेवून घेतले, खायला दिले व पहाटे घरी आणून सोडले. ते साधू हे बनेश्वरच्या स्थापनेपासून तेथे असणारे बुवासाहेबच होते. वडिलांबरोबर भोरचे पू. श्री. दत्तंभट महाराज, केडगांवचे पू. नारायण महाराज, नाशिकचे पू. गजानन महाराज गुप्ते, पू. कैवल्याश्रमस्वामी महाराज इत्यादी अनेक सत्पुरुषांचे दर्शन-सहवास व आशीर्वाद श्रीपादला लहानपणीच लाभला होता.
पू. मातुःश्री पार्वतीदेवींना ज्योतिषाचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच लोक पत्रिका दाखवून अडी अडचणींबाबत विचारायला येत. श्रीपादला उपजत वाचासिद्धी आहे, हे त्यांनी अनेकवेळा पाहिले होते. त्यामुळे त्या काही प्रसंगी श्रीपादला उत्तरे विचारीत आणि तो जसे सांगे तसेच पुढे घडत असे.
मौलिक संस्कार :-
आपले व्यक्तिमत्व हे आपल्यावर लहानपणी झालेल्या घरच्या संस्कारांवरच अवलंबून असते. उदरी आलेल्या श्रीदत्तप्रसादावर उत्तम संस्कार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे व कठीण कार्य मातुःश्री पार्वतीदेवींनी लीलया पार पाडले; इतके की ' हा मामा आईचा केला ' असे माउलींच्या, ' पार्थ द्रोणाचा केला । ' च्या धर्तीवर म्हणता येईल !
श्रीपाद बालपणापासूनच अतिशय चौकस, हुशार व प्रत्येक गोष्ट तर्काच्या घासपट्टीवर घासून पाहिल्याशिवाय स्वीकारत नसे. त्यांला एखादी गोष्ट समजावून सांगणे तसे अवघडच काम होते. पण मातुःश्रींनी हे फार उत्तमरितीने संपन्न केले. प. पू. श्री. मामांना त्यांनी ज्या पद्धतीने वाढविले, त्या पद्धतीचा अभ्यास करून बालसंगोपन विषयात आदर्शवत् म्हणून ती पद्धत मांडता येईल, इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
प. पू. श्री. मामांच्या वडिलांना पानावर बसून पदार्थांविषयी काहीही तक्रारवजा बोललेले आवडत नसे. एकदा दत्तूअण्णा व मामा जेवायला बसले. भाजीत मीठच नव्हते. अण्णांनी मामांना खूण करून तसेच जेवायला सांगितले. पू. मातुःश्री जेवायला बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की भाजी अळणी आहे. त्यांनी मामांना विचारले, "अरे सख्या, भजीत मीठच नाही हे सांगितले नाहीस रे." त्यावर मामा म्हणाले, "अगं अण्णांनी मुकाट्याने जेव म्हणून खुणावले. तुला उगीच वाईट वाटले असते ना, म्हणून आम्ही काही बोललो नाही." इतका समंजसपणे त्यांचा संसार चालू होता ! पू. दत्तूअण्णा व पू. सौ. पार्वतीबाई हे दोन देह पण मन एक, अशा प्रकारचे दांपत्य होते. पू. दत्तूअण्णा व पू. मातुःश्री पार्वतीदेवी दोघेही शिस्त आणि टापटिपीला पक्के होते. अण्णा बरोबर सातच्या ठोक्याला पूजेला बसत. त्याआधी घरातले सगळे आवरून पार्वतीबाईंनी त्यांची पूजेची सर्व तयारी करून ठेवलेली असे. अण्णांना ताज्या दळलेल्या पीठाच्या भाक-या आवडत म्हणून पार्वतीबाई दररोज ताजी ज्वारी दळत असत. दत्तूअण्णांच्या मनात जो पदार्थ येई, तोच नेमका त्यादिवशी पानात असे. इतके एकरूपत्व झालेले होते दोघांचे. संपूर्ण आयुष्यात त्या दोघांचे एकदाही भांडण झाले नाही की वादविवाद झाला नाही. पू. मामा म्हणत की, आमच्या घरात कधीच कोणाचाही आवाज चढलेला आम्ही ऐकलाच नाही. असे दैवी कुटुंब खरोखरीच फार दुर्मिळ आहे.
प. पू. श्री. मामांना साबण्या (गोड्या शेवेसारखी मिठाई) खूप आवडत असत. एकदा साबण्यांसाठी त्यांनी आईकडे हट्ट केला. अण्णांना विचारून सांगते असे मातुःश्री म्हणाल्या. पण अण्णा आपल्याच तंद्रीत होते. म्हणून मातुःश्रींनी एक ढब्बू पैसा त्यांच्या कोटाच्या खिशातून काढून दिला. मामा खूष होऊन साबण्या आणायला मित्रमंडळींबरोबर गेले. दत्तूअण्णा कामासाठी बाहेर पडले आणि मग बाजारपेठेत एका दुकानाच्या पायरीवर बसले होते. त्यांनी पोरांच्या घोळक्यात श्रीपादला पाहिले. त्याच्या हातात सर्वात जास्त साबण्या होत्या.
श्रीपादला जवळ बोलावून त्यांनी विचारले, " काय रे, कोठून आणल्यास साबण्या? " बिचारा श्रीपाद घाबरून गप्पच बसला. त्याने आईच्या परभारे हा उद्योग केलेला दिसतोय, असे वाटून दत्तूअण्णांनी मामांच्या श्रीमुखात भडकावली. पू. मामा घरी आले आणि आईला म्हणाले, " आजपासून पुन्हा कधीच साबण्यांना हात लावणार नाही. " दत्तूअण्णा घरी आल्यावर त्यांना सर्व वृत्तांत समजला. त्यांना खूप वाईट वाटले पोराला उगीचच मारल्याचे. त्यांनी गड्याला पाठवून टोपलीभर साबण्या मागवल्या. पण श्रीपादने चुकूनही त्यांना हात लावला नाही. दत्तूअण्णा मातुःश्रींना म्हणाले, " बाई, पोराने साबण्यांना हात देखील लावला नाही. त्याला घ्यायला सांगावे. " पार्वतीबाई म्हणाल्या, " आपण वाईट वाटू घेऊ नये. अत्यंत आवडती गोष्ट सुटायची असेल तर हेच योग्य आहे. ती कधीतरी सुटायलाच हवी ना? " अशा जबाबदार व विलक्षण मायबापांच्या सुयोग्य संस्कारात मामा लहानाचे मोठे होत होते.
प. पू. श्री. मामा हे अत्यंत तल्लख बुद्धीचे, सूक्ष्म निरीक्षण असलेले होते. आपल्या आई-वडिलांच्या शांत-समाधानी स्वभावाचा, भगवत्प्रवण वृत्तीचा, शास्त्रशुद्ध व निर्मळ वर्तनाचा त्यांच्यावर लहानपणीपासूनच संस्कार झाला. संसारातल्या कुठल्याच प्रसंगांनी दत्तूअण्णा व पार्वतीबाईंचे भगवंतांशी असलेले अनुसंधान कधीच सुटले नाही. याचा लहानग्या श्रीपादच्या कोवळ्या मनावर खोल रुजलेला संस्कार पुढे त्यांच्याही आयुष्यात प्रकटलेला दिसून येतो.
पार्वतीबाईंना लिहायला येत नसे पण जुजबी वाचता येत असे. त्या रोज ज्ञानेश्वरी वाचत, शेजार-पाजारच्या बाया-बापड्यांना दुपारच्यावेळी घरगुती उदाहरणे देऊन, सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी समजावून देखील सांगत. आपली आई ज्ञानेश्वरी वाचताना रोज का रडते? हा प्रश्न नेहमीच मामांना सतावत असे. एकदा त्यांनी आईला तसे विचारले. त्यावर मातुःश्रींनी श्रीज्ञानेश्वरीच्या पानावर बोट ठेवले. श्रीपादला तेथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत, असे जिवंत दृश्य दिसले. या प्रसंगाने मामांना आपल्या आईचा अद्भुत अधिकारही समजून आला.
वयाच्या आठव्या वर्षी पू. मामांची मुंज झाली. पू. दत्तूअण्णांनी त्यांना प. प. श्री. टेंब्येस्वामींच्याकडून मिळालेल्या अतिदिव्य चतुष्पदा गायत्रीचा कृपापूर्वक अनुग्रह केला. त्यानंतर लगेचच अण्णांनी मामांना हिमालय यात्रेला नेले. पुढे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी दत्तूअण्णाबरोबर मामांनी अनवाणी नर्मदा परिक्रमादेखील केली होती. या दोन्ही यात्रांमध्ये त्यांना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकानेक दिव्य दर्शनेही झाली. त्यातील चिरंजीव अश्वत्थामा, भगवती नर्मदामैया यांच्या दर्शनाची हकिकत पू. मामा आवर्जून सांगत असत. अण्णांनी मामांना त्यांच्या आयुष्यात पुढे घडणा-या अनेक घटना देखील सांगून ठेवल्या होत्या. त्यावेळच्या या दोन्ही अत्यंत अवघड यात्रांना लहानग्या श्रीपादला नेण्यासाठी मातुःश्री पार्वतीदेवींनी काहीच आडकाठी केली नाही.
मातुःश्री पार्वतीबाई विनामोबदला वैद्यकी देखील करीत. एकदा नसरापूर जवळच्या नायगांव मधील एका लहान मुलाला घेऊन लोक आले. तो अत्यवस्थच होता. पू. मामांना मातुःश्रींनी एक औषध आणायला तातडीने पाठविले. परंतु कोणत्याही दुकानात ते औषध मिळाले नाही. मातुःश्रींनी सद्गुरुस्मरण करून अंगारा दिला. पोराला लावला आणि आईच्या दुधातून चाटवायला सांगितला. थोड्या वेळाने मातुःश्रींनी मामांना पुन्हा तेच औषध आणायला पाठविले. आश्चर्य म्हणजे तेच औषध सगळीकडे त्यावेळी मिळाले. ते घेऊन मातुःश्रींनी त्या लहान मुलासाठी औषध तयार करून पाठविले. त्यावर मामांनी विचारले, " आई, काल तर अंगारा दिला मग आता औषध का दिलेस? " मातुःश्रींनी फार मार्मिक उत्तर दिले. त्या म्हणाल्या, " सख्या, काल औषध मिळाले नाही म्हणून देवांवर जडभार घातला, त्या अंगा-याने पोर बरेही झाले. पण आता औषध मिळाल्यावर मात्र देवांना उगीचच कशाला त्रास द्यायचा? " पू. मामांना या प्रसंगातून आयुष्यभरासाठी मोठाच बोध मिळाला.
अशा दररोज घडणा-या विविध मार्मिक प्रसंगांमधून प. पू. श्री. मामांचे प्रगल्भ, दिव्य-पावन व्यक्तिमत्व खुलत, बहरत गेले. जोडीने मातुःश्रींनी सदाचाराचे, ज्योतिष व औषधी विद्यांचे धडे दिले ते वेगळेच. पू. मामांचे अत्यंत श्रेष्ठ, परमार्थमार्गाला ललामभूत ठरणारे थोर विभूतिमत्व अशाप्रकारे दत्तूअण्णा व मातुःश्री पार्वतीबाईंच्या अथक परिश्रमांतून साकारलेले होते.
 ( क्रमश: )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates