Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 August 2016

॥ अमृतबोध ॥ ३१ ऑगस्ट २०१६

३१ ऑगस्ट २०१६
जो आपली साधना हेच कर्तव्य मानून मनापासून करतो तो साधक. साधनेच्या सातत्यामुळेच तर त्याला साधक म्हणतात. साधनामार्गातील मार्मिक रहस्य सांगून हमखास यशाचा मोलाचा बोध करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, जो श्रीसद्गुरूंनी दिलेल्या साधनेशी अनन्य होतो, त्यालाच परमार्थातील अतिशय महत्त्वाची सिद्धी मानलेली अनन्यता साधते. अनन्यता साधली की त्यातूनच खरी भक्ती प्राप्त होत असते. म्हणून आपल्या साधनेविषयी कसलेही विकल्प, शंका, संशय न घेता, प्रेमाने व नेमाने साधना करावी, त्यात इतर कोणाच्याही मदतीची, सहकार्याची, सोबतीची इच्छा न धरता, सद्गुरुशरणागतीपूर्वक निष्ठेने व आदराने, फळाचा विचारही न करता, साधना करीत राहावी, म्हणजे यश लाभतेच !
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

30 August 2016

॥ अमृतबोध ॥ ३० ऑगस्ट २०१६

३० ऑगस्ट २०१६
सर्वसामान्य माणूस आपल्याच कर्माने जरी दु:ख आले तरी रडत बसतो आणि भगवंतांची आठवण काढून त्या परिस्थितीसाठी त्यांनाच दोष देतो. उलट सुख झाले की ज्यांच्या कृपेने ते सुख लाभले त्या श्रीभगवंतांना सोयिस्करपणे विसरतो व स्वत:च्या अहंकारालाच कुरवाळत बसतो. ही जगराहाटी जाणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज ख-या साधकाची अप्रतिम व्याख्या करताना म्हणतात की, जो दु:ख आल्यावर त्यात भगवंतांचे स्मरण हमखास होणार म्हणून त्या दु:खाला श्रीभगवंतांची कृपाच मानतो आणि सुखाची स्थिती आल्यावरही त्याच प्रेमाने श्रीभगवंतांचे स्मरण, चिंतन करायला जो चुकत नाही; तोच खरा साधक होय. हा आदर्श बोध आपण सर्वांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवूनच वागायला हवे, म्हणजे ते उत्तम साधकत्व आपल्याही अंगी बाणेल.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

29 August 2016

॥ अमृतबोध ॥२९ ऑगस्ट २०१६

२९ ऑगस्ट २०१६
घाई गडबड, धसमुसळेपणा हा प्रपंचाचा गुण तर शांतपणा, स्थैर्य हा परमार्थाचा गुण आहे. शारीरिक व मानसिक या दोन्ही प्रकारचे स्थैर्य परमार्थासाठी अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात की, कोणतेही शुभकार्य उत्तम पद्धतीने संपन्न होण्यासाठी त्यात आपल्या शारीरिक व मानसिक शुद्धतेची नितांत आवश्यकता असते. ती येण्यासाठी जपजाप्यादी कृत्ये अत्यंत शांतचित्तानेच करावीत. घाई, गडबड, चिडचिड करून केलेला जप, पूजा, उपासना  फलदायी ठरत नाहीत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

28 August 2016

॥ अमृतबोध ॥ २८ ऑगस्ट २०१६

२८ ऑगस्ट २०१६
श्रीभगवंतांच्या कृपेने संतांची(सद्गुरूंची) प्राप्ती आणि मग त्यांच्या कृपेने भगवंतांची प्राप्ती; असाच भक्तिशास्त्रातला क्रम आहे. खरे संत दुर्मिळ असले तरी प्राप्त होणे अशक्य नक्कीच नाही. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, जसा तेजस्वी हिरा दुर्मिळ असला तरी मिळू शकतो, तसे हे खरे संतही प्राप्त होतात, फक्त त्यासाठी आधी श्रीभगवंतांना आपली दया आली.  पाहिजे. पण संत लाभले, त्यांची कृपाही लाभली तरी, त्यांच्या आज्ञेचे मनापासून पालन करून साधना मात्र आपल्यालाच निष्ठेने करावी लागते, तरच खरा आनंद मिळतो; हेही प. पू. श्री. मामा आवर्जून सांगतात.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

27 August 2016

॥ अमृतबोध ॥ २७ ऑगस्ट २०१६

२७ ऑगस्ट २०१६
साधुसंत हे निरपेक्ष हितकारक असतात, त्यामुळे आपणही निरपेक्षपणेच त्यांना शरण जायचे असते. त्यांच्याविषयी नितांत श्रद्धा व आदरयुक्त विश्वास असला की, आपल्यावर त्यांना कृपा करण्यासाठी तेवढे पुरेसे असते. पण तेच जर अश्रद्धा व अविश्वास ठेवूनच आपण त्यांच्या दारी गेलो, तर त्या दोषांमुळे संतांचा जो लाभ आपल्याला व्हायला पाहिजे तो न होता उलट आपला पूर्ण तोटा होतो, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज स्पष्ट सांगून ठेवतात. साधूंकडे जाताना म्हणूनच हे दोन सद्गुण आपण अंगी बाणवलेच पाहिजेत, म्हणजे मग अत्यंत कमी कष्टांत आपले शाश्वत कल्याण होते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

26 August 2016

॥ अमृतबोध ॥ २६ ऑगस्ट २०१६

२६ ऑगस्ट २०१६
प्रार्थना हा भक्त हृदयाचा सहज आविष्कार आहे. प्रार्थनेत कामनेचा गढूळपणा नसतो की याचनेची अगतिकता नसते. तो तर प्रेमळ व स्वाभाविक अनुकार आहे भक्तीचा ! म्हणूनच श्रीभगवंतांना मनापासून केलेली प्रार्थना, कशीही असली तरी आवडतेच. " नये जरी तुज मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे । नाही तयेवीण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ " असे संत तुकाराम महाराज पण म्हणतात. म्हणूनच प्रार्थना करण्यासाठी केवळ बालकासारखे निष्पाप मन असले की श्रीभगवंतांना कृपा करण्यास तेवढे पुरेसे होते, असा स्वानुभव प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगून आपल्याला हुरूप आणीत आहेत. बाळाचे बोबडे बोल ऐकून आईला पान्हा फुटला नाही, असे झाले आहे का कधीतरी?
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

25 August 2016

॥ अमृतबोध ॥ २५ ऑगस्ट २०१६

२५ ऑगस्ट २०१६
॥ श्रीजन्माष्टमी ॥
श्रीभगवंतांचा आणि साधूसंतांचा अवतार हा जगाच्या शाश्वत कल्याणासाठीच असला तरी त्यांच्या कार्यात किंचित फरक असतो. तो फरक नेमकेपणे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. श्रीभगवंत जन्मल्याबरोबर आपल्या लोकोद्धाराच्या कार्याला सुरुवात करतात, म्हणून श्रीभगवंतांची जयंतीच मोठ्या प्रमाणावर साजरी होते. तर संतांचे महत्त्व त्यांनी देह ठेवल्यावरच लोकांच्या लक्षात येत असते, ते देहात असताना फारच थोडे लोक त्यांचे ऐकतात, त्यांना मानतात. संतांचे कार्य त्यांच्या देहत्यागापासूनच ख-या अर्थाने सुरू होत असल्याने संतांची पुण्यतिथी करायची पद्धत भक्तिसंप्रदायात रूढ झालेली आहे.
आज परिपूर्ण परब्रह्म भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचा व त्यांचे अभिन्न परिपूर्णतम अवतार भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींचा जन्मदिवस. या एकरूप एकरस परब्रह्मचरणीं अनंतानंत दंडवत प्रणाम  !!!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

24 August 2016

॥ अमृतबोध ॥ २४ ऑगस्ट २०१६

२४ ऑगस्ट २०१६
श्रीगुरुचरित्रात सरस्वती गंगाधर वारंवार " आपुली जोडी भोगावी । " असे म्हणतात. आपणच जोडलेले बरे-वाईट कर्म आपण भोगत असतो, त्यात कोणाही इतरांचा काहीही संबंध नाही. या अर्थाने आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे हाच महत्त्वाचा सिद्धांत येथे पुन्हा अधोरेखित करीत आहेत. आपले कर्मच सुख-दु:खांच्या रूपाने सतत समोर येत असते, हे जाणून आपण इतर कोणाचाही द्वेष न करता, सर्व काळी चांगलेच वागावे, म्हणजे पुढे उत्तम आयुष्य लाभते, हाच त्याचा गर्भितार्थ आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

23 August 2016

॥ अमृतबोध ॥ २३ ऑगस्ट २०१६

२३ ऑगस्ट २०१६
आज तारखेने श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांची ७४१ वी जयंती !
प्रपंच मूळचाचि नासका । असे समर्थ श्रीरामदास स्वामी स्पष्ट म्हणतात. पण तो कितीही त्रासदायक असला तरी आम्ही मात्र रोज रोज तेच ते करून त्याची सवय लावून घेतल्याने, तो आम्हांला गोडच लागतो. माउली म्हणतात की, सर्पविषाच्या बाधेने जसा गोड पदार्थ कडू लागतो व कडू पदार्थ गोड, तसा विषय-विषाच्या योगाने आम्हांला कडू प्रपंच गोड लागतो व गोड परमार्थ कडू. हेच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगत आहेत. प्रपंचाच्या अतिअभ्यासाने अतिशय कडू असणारा प्रपंच आम्ही मात्र गोड मानून भोगत आहोत, किती हा दैवदुर्विलास?
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

22 August 2016

॥ अमृतबोध ॥ २२ ऑगस्ट २०१६

२२ ऑगस्ट २०१६
प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये)  स्वामी महाराज जयंती !
देव ते संत देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा ॥ असे श्रीतुकाराम महाराज म्हणतात. श्रीभगवंत आणि त्यांचेच अभिन्न स्वरूप असणारे साधुसंत; दोघेही जगाच्या कल्याणासाठीच सतत झटत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, श्रीभगवंतांचे हृदय म्हणजे संत होत, तर संतांच्या हृदयात अनंत, अपार असे श्रीभगवंत समग्र व्यापून राहिलेले असतात. हृदय हे प्रेमाचे स्थान आहे, म्हणूनच संतांचे व श्रीभगवंतांचे परमप्रेमाने झालेले एकरूपत्व प. पू. श्री. मामा यातून सांगत आहेत. अशाच परिपूर्ण श्रीदत्तस्वरूप, श्रीदत्तहृदय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये)  स्वामी महाराजांची आज १६२ वी जयंती. त्यांच्या श्रीचरणारविंदी सादर साष्टांग दंडवत !!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

21 August 2016

॥ अमृतबोध ॥ २१ ऑगस्ट २०१६

२१ ऑगस्ट २०१६
वृद्धत्व हा खरेतर शापच आहे. पण तो कोणीही टाळू शकत नाही. म्हणून संत सांगतात की, वृद्धपण येण्यापूर्वीच, जे जे योग्य ते ते सर्वकाही तरुणपणीच साधून घ्यावे. वृद्धपणीचा एक महत्त्वाचा भाग सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, ज्याचा आधार जन्मभर मानलेला असतो, ते शरीर देखील वृद्धपणी भारभूत होऊन जाते. मग त्याच्या बळावर आणखी काय कार्य होऊ शकणार? यासाठी जो काही परमार्थप्रयत्न करायचा आहे, तो तरुणपणी, सर्व साधने हाती असतानाच करून धन्यता मिळवली पाहिजेे. " आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिये ॥"
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

20 August 2016

॥ अमृतबोध ॥ २० ऑगस्ट २०१६

२० ऑगस्ट २०१६
आपल्या बुद्धीचे कार्य हे फार विलक्षण असते. ती योग्य-अयोग्य निर्णय करून आपल्याला हिताचेच वागायला प्रवृृत्त करीत असते. तिच्या या सामर्थ्यालाच ' विवेक ' म्हणतात. हा विवेक ज्याचा सखा होतो, तोच सर्व बाजूंनी समाधानी होत असतो. पण हा विवेक योग्यवेळी सुचणे हे मात्र संतांच्या, सद्गुरूंच्या कृपेचेच फलित आहे; ते आपल्या बुद्धीचे काम नव्हे. " विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण । गर्भासी भूषण बुद्धिचिया ॥ ", असे पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या एका  अभंगात म्हणतात. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज स्पष्ट सांगतात की, विवेक हा केवळ साधुसंतांच्या, सद्गुरूंच्या सहवासात त्यांच्या कृपेनेच प्राप्त होत असतो, म्हणून आपण त्यांची संगत कधीही सोडता कामा नये.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

19 August 2016

॥ अमृतबोध ॥ १९ ऑगस्ट २०१६

१९ ऑगस्ट २०१६
श्रीज्ञानेश्वर माउली संशयाला घोर महापाप म्हणतात. हा संशय प्रपंच आणि परमार्थात सर्व बाजूंनी आपले वाटोळेच करीत असतो. म्हणूनच श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला उपदेश करतात की, गुरु, देव, धर्म व ज्यांनी आपल्यावर काही उपकार केलेले आहेत, यांच्या विषयी थोडाही संशय बाळगला तर त्यातून आपला विनाशच होतो. यासाठी  संशयराक्षस प्रयत्नपूर्वक समूळ नष्टच केला पाहिजे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

18 August 2016

॥ अमृतबोध ॥ १८ ऑगस्ट २०१६

१८ ऑगस्ट २०१६
जगाच्या सुखासाठी संत निरपेक्षपणे झटत असतात. त्यांना श्रीभगवंतांच्या कृपेने मागचे-पुढचे सर्व काही स्पष्ट दिसत असल्याने, शरण येतील त्या सर्वांना ते सुयोग्य मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच आपल्या सर्वांगीण हिताचा विचार करून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज, संतांची खरी आराधना कोणती? याचा उपदेश आजच्या अमृतबोधातून आपल्याला करीत आहेत. ही आराधना प्रेमाने साधली तर त्यात आपले शाश्वत  कल्याणच आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

17 August 2016

॥ अमृतबोध ॥ १७ ऑगस्ट २०१६

१७ ऑगस्ट २०१६
आपली बुद्धी आपल्या दैवानुसारच तयार होत असते. त्यामुळे जे कर्म भोगाला येते त्याला अनुकूल अशीच आपोआप बुद्धी होत असते. येथे प्रत्येक जीव परतंत्र आहे, त्याला निर्णयक्षमता नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, एकदा का प्रारब्धानुसार दुर्दशेचा फेरा भोगाला आला की, मनुष्याला आपले नेमके कोठे व काय चुकते आहे, हेच अजिबात कळेनासे होते. तो मग अगतिकपणे, त्या कर्मानुसार होणा-या बुद्धीला अनुसरूनच वागतो. यात व्यक्ती म्हणून खरेतर कोणाचाच दोष नसतो. हाच भाग पाहून संत कधीही कोणाचा द्वेष करत नाहीत व आपल्यालाही तसेच विवेकाने वागण्याचा उपदेश करतात.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

16 August 2016

॥ अमृतबोध ॥ १६ ऑगस्ट २०१६

१६ ऑगस्ट २०१६
शारीरिक व मानसिक असे दोन प्रकारचे दु:ख असते. शारीरिक दु:ख योग्य औषधोपचाराने व पथ्याने जाते. पण मानसिक दु:ख हे अधिक व्यापक असल्याने व आपण त्याला फार कवटाळून बसत असल्याने तेवढे सहजपणे जात नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, त्यासाठी संतांची संगतीच व्हावी लागते. संतांच्या वाङ्मयाचे वाचन-चिंतन, त्यांच्या बोधाचे मनन, त्यांच्या स्थानांवर सेवा, श्रीसद्गुरूंनी दिलेले नामस्मरण व संतांच्या दिव्य चरित्राचे चिंतन व त्यावर समविचारी साधकांबरोबर बोधप्रद चर्चा; अशा विविध प्रकारांनी संतसंगती साधली जाते. या सत्संगतीने मनात विवेक निर्माण होतो व तो सर्वबाजूंनी आपल्याला सांभाळून पुढे नेतो. या विवेकाच्या बळावरच दु:खाची तीव्रता कमी होत असते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

15 August 2016

॥ अमृतबोध ॥ १५ ऑगस्ट २०१६

१५ ऑगस्ट २०१६
आपले हे जग सुख-दु:खांची खाणच आहे. सुखानंतर दु:ख रहाटगाडग्याप्रमाणे चालूच असते. पण आपण त्यात जास्त गुंतून पडतो, सतत त्याचाच विचार करतो म्हणून आपल्याला जास्त त्रास होतो. आपल्याला सुखाचा माज असतो जो सुखानंतर येणारे दु:ख अधिक वेदनादायक करतो आणि दु:खात आपण इतके मग्न झालेलो असतो की पुढे आलेले सुख आपण उपभोगेपर्यंत संपून जाते. वर्तमानात जगणेच आपण विसरलेलो आहोत. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दु:खाची तीव्रता कशी कमी करावी हे सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, दु:ख देणा-या गोष्टीचे सारखे सारखे चिंतन न करणे, ती गोष्ट तत्काळ तिथेच सोडून देऊन पुढे जाणे, हेच ते दु:ख कमी करण्याचे रामबाण औषध आहे आणि हाच विचार विवेकाने अंगी बाणवला तरच शाश्वत समाधान लाभेल.
७०व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !  हे स्वातंत्र्य मिळवून देणा-या सर्व सेनानींना, हुतात्म्यांना सादर अभिवादन !! स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, ती आमची मोठी जबाबदारी आहे ; याचे भान आम्हांला सतत असावे, हीच थोर स्वातंत्र्यसेनानी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक कळकळीची प्रार्थना !!!!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

14 August 2016

॥ अमृतबोध ॥ १४ ऑगस्ट २०१६

१४ ऑगस्ट २०१६
" दुस-याचे कुसळ दिसते पण आपले मुसळ दिसत नाही ", अशी आपल्याकडे म्हण आहे. ती अत्यंत खरी आहे. हाच आपला स्वभाव सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपण इतरांचे दोष काढण्यात पटाईत असतो, पण तेच दोष आपल्याही ठिकाणी आहेत, याकडे आपण सोयिस्कररित्या दुर्लक्ष करतो. आणि जर चुकून-माकून आपल्याला ते दोष जाणवलेच, तरी त्यांना समजून घेऊन गांभीर्याने आपण विचारच करीत नाही. ज्याला दोष घालवावेसे वाटतात त्याने गांभीर्याने विचार करून त्याप्रमाणे आपल्या वर्तनात बदल करायलाच हवा.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

13 August 2016

॥ अमृतबोध ॥ १३ ऑगस्ट २०१६

१३ ऑगस्ट २०१६
भगवान श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " येती निंदकापाशी । अशेष पापे ॥ " आपण नेहमीच्या स्वभावाने, सवयीने किंवा परिस्थितीची गरज म्हणून का होईना पण एखाद्याची निंदा केली की, आपले पुण्य त्याला जाते व त्याचे पाप आपल्याला लागते. म्हणून याबाबतीत साधकांनी खूप जपायला हवे स्वत:ला. जो तो आपापल्या कर्मांप्रमाणे परतंत्रपणे वागत असतो, म्हणूनच आपण चुकूनही कोणाची निंदा करू नये, असेच सर्व संत सांगतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज तर याही पुढे जाऊन आपल्याला मोलाचे सांगत आहेत की, निंदा सोडा, दुस-यांच्या पापाचा नुसता विचार करणे हेही एकप्रकारचे पापच असून त्यापासून कटाक्षाने आपण दूर राहिले पाहिजे. नाहीतर आपली साधना हकनाकच वाया जाते. हळूहळू श्रीगुरुकृपेने आपले अंत:करण नामामध्ये व हरिप्रेमामध्ये गुंग होऊ लागले की, हे सर्व दोष आपोआपच सुटत जातात, पण आपण स्वत:हून काळजीपूर्वक प्रयत्न केले तर हे लवकर साध्य होते. म्हणूनच या अमृतबोधाचे वारंवार मनन करायला हवे !
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

12 August 2016

॥ अमृतबोध ॥ १२ ऑगस्ट २०१६

१२ ऑगस्ट २०१६
सध्याचे जग हे जाहिरातीचे जग आहे. येथे कसलीही जाहिरात खपते, भले मग ती गोष्ट खोटी का असेना ! पण अध्यात्म किंवा भक्ती हे अंतरंग साधनेचे विषय आहेत. त्यात दिखावूपणा चालत नाही. सध्या कणभराची भक्ती मणभराच्या जाहिरातीसोबतच करण्याची पद्धत रूढ होत आहे. यावर नापसंती व्यक्त करीत साधकांना मोलाचा इशारा देताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, मृगनाभीतून मिळणा-या अत्यंत दुर्मिळ अशा कस्तुरीची डबी उघडी राहिली की ती उडून जाते, तिचा सुगंध नष्ट होतो, त्याचप्रमाणे जाहिरात झाली की भक्तीत अहंकार येतो व ती भक्ती नासून जाते. ज्याला श्रीभगवंतांची प्राप्ती व्हावी असे मनापासून वाटते त्याने आपली भक्ती प्रयत्नपूर्वक गुप्तच राखली पाहिजे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

11 August 2016

॥ अमृतबोध ॥ ११ ऑगस्ट २०१६

११ ऑगस्ट २०१६
सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या मिश्रणाने आपले अंत:करण बनलेले असते. त्यातला सत्त्वगुण  हा श्रेष्ठ मानला जातो. आपल्या कर्मांमुळे सामान्यपणे तो दुर्मिळ असतो व कमी काळ टिकतो. सत्त्वगुण वाढावा म्हणून सर्व संत मार्गदर्शन करीत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणूनच म्हणतात की, निरपेक्ष व चांगल्या कर्मांनी सत्त्वगुण वाढतो, म्हणून नेहमी चांगलेच वागावे. तशीच बुद्धी व्हावी यासाठी चांगला व शुद्ध आहार आणि विचार देखील सांभाळावा. चांगल्या लोकांची संगत व भोवतालचे चांगले वातावरणही सत्त्वगुणात वाढ करते. सत्त्वगुणामुळे समाधान बाणते व परमार्थही सोपा होतो. हे सर्व योग्यप्रकारे घडण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात श्रीभगवंतांचे स्मरण मात्र सतत ठेवायचा मनापासून प्रयत्न करायला हवा.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

10 August 2016

॥ अमृतबोध ॥ १० ऑगस्ट २०१६

१० ऑगस्ट २०१६
आपल्याला श्रीभगवंतांची प्राप्ती व्हावी, असे ज्याला मनापासून वाटते व जो त्यासाठी निर्धाराने प्रयत्नशील अाहे, अशा साधकाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज, साधनेत प्रचंड यश देणारी पंचसूत्री येथे सांगत अाहेत. प्रत्येक साधकाने या बोधाचे अक्षरश: दररोज मनन करावे, इतके याचे महत्त्व आहे.
आपण करीत असलेल्या साधनेची ओढ, त्यावरील निर्मळ व स्वार्थरहित प्रेम, ज्यांनी साधना दिली त्या श्रीगुरूंवरील अतूट श्रद्धा, साधनेतील अखंडितपणा, साध्याच्या प्राप्तीसाठी जो काही वेळ लागेल तो न थकता सहन करण्याचे व कोणत्याही परिस्थितीत साधना न चुकता करण्यासाठीचे धैर्य व श्रीगुरूंच्या संप्रदायाची तत्त्वे जाणून त्यानुसारच केलेले वर्तन; ही साधकाला हमखास प्रगतीपथावर नेणारी पाच साधना-सूत्रे आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

9 August 2016

॥ अमृतबोध ॥ ९ ऑगस्ट २०१६

९ ऑगस्ट २०१६
या जगात सुख-दु:खांचा अनुभव सर्वांना सतत येतच असतो. सुखाने आनंद तर दु:खाने विषाद निर्माण होतो. सामान्यपणे आपण सुखाने वाहावत जातो तर दु:खाने खचून जातो. या दोन्ही गोष्टी तोट्याच्याच आहेत. पण कोणीही या टाळू शकत नाही. संतच फक्त यांच्या पलीकडे गेलेेले असल्याने, सुख-दु:खांच्या विषयी आपल्याला यथार्थ मार्गदर्शन करतात. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, श्रीभगवंत हे अखंड सुखस्वरूपच आहेत, ही  निष्ठा पक्की झाली की, आपली दु:खे सहन करण्याची क्षमता दृढावते. ही वाढावी म्हणून आपण श्रीभगवंतांवरचे आपले प्रेम व निष्ठा सतत कशी वृद्धिंगत होईल, याचाच पाठपुरावा करावा. या प्रेमादरापोटीच दु:खे ही दु:खे वाटेनाशीच होतात आणि मग आपला आनंद कशानेही, कोणत्याही परिस्थितीत गढूळ होत नाही. हा परमार्थाचा, भक्तीचा फार मोठा लाभ आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

8 August 2016

॥ अमृतबोध ॥ ८ ऑगस्ट २०१६

८ ऑगस्ट २०१६
आपण कोणासाठी काय करतो? तर ज्याच्यावर आपले प्रेम आहे, त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. परमार्थात हीच भावना श्रीभगवंतांसाठी असावी लागते. " आपल्याला परमआराध्य श्रीभगवंतांसाठी काहीतरी करायचे आहे ", ही शुद्ध परमार्थाचे लक्षण असणारी अात्यंतिक निष्ठा केवळ श्रीसद्गुरुंनी कृपा केल्यावरच ख-या अर्थाने प्रकट होत असते, असे स्वानुभूत मत प.  पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे मांडत आहेत. आपली ही निष्ठा पक्की झाली की श्रीभगवंतही त्याच प्रेमाने आपल्याशी वागतात.
याच अर्थाने श्रीसंत कबीर महाराज आपल्या एका पदात फार सुरेख म्हणतात की, " श्रीसद्गुरुंनी आपल्याला ' आपले ' म्हटल्याशिवाय श्रीभगवंत स्वप्नात देखील येत नाहीत !"
बिन सतगुरु आपणो नही होई ।
प्रीतम सपणां नही आवै ॥
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

7 August 2016

॥ अमृतबोध ॥७ ऑगस्ट २०१६

७ ऑगस्ट २०१६
प्रत्येक जीव मूळचा परब्रह्माचाच अंश आहे. म्हणजे तो ज्ञानमय, आनंदमयच आहे, पण त्यावरील वासनांच्या आवरणामुळे त्याला आपले आनंदस्वरूप जाणवतच नाही. तो उगीचच स्वत:ला कर्माचा कर्ता मानून सुखदु:खांच्या सागरात गटांगळ्या खात बसतो. श्रीभगवंत जेव्हा त्याला श्रीसद्गुरुरूपाने अनुग्रह करून दिव्यनाम देतात, तेव्हा त्या साधनेद्वारे त्या जीवावरील हे वासनांचे आवरण जळून जाते व त्याला आपल्या हृदयातच असणा-या परमात्म्याचे साक्षात् दर्शन होते; असे श्रीगुरुप्रदत्त नामसाधनेचे माहात्म्य प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

6 August 2016

॥ अमृतबोध ॥ ६ ऑगस्ट २०१६

६ ऑगस्ट २०१६
ज्यांना आपले शाश्वत कल्याण व्हावे असे मनापासून वाटते, त्या साधकांनी काय करावे, काय करू नये; याचे सुंदर मार्गदर्शन अनुभवी संतांनी वेळोवेळी करून ठेवलेले आहे. असाच एक प्रेमाचा सल्ला देताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपला शक्य तेवढा वेळ मानसिक नामस्मरणातच घालवावा. वाचन फार केल्याने मनाचा गोंधळ उडू शकतो, म्हणून मोजकेच वाचावे, पण नाम मात्र भरपूर घ्यावे. एकदा या नामाची गोडी लागली की आपला परमार्थ निर्विघ्नपणे पूर्णत्वास जातो. मग ते नामच आपल्याला सर्व बाजूंनी सांभाळून ध्येयापर्यंत नेतेच.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

5 August 2016

॥ अमृतबोध ॥ ५ ऑगस्ट २०१६

५ ऑगस्ट २०१६
परमार्थ हा पूर्णपणे श्रीगुरुकृपेचा विलास असतो. परमार्थाची सुरुवातच श्रीगुरुंच्या कृपेने होते. तोवर चालू असलेली आपली उपासना चूक नसली तरी ती अंधारात चाचपडण्यासारखीच असते. जेव्हा आपल्या उपासनेने श्रीभगवंतांना दया येते तेव्हा मग ते श्रीगुरुरूपाने आपल्यावर कृपा करून आपल्याला नाम देतात. योग्य गुरुपरंपरेने आलेल्या, आत्मज्ञानी श्रीगुरुंकडून मिळालेल्या नामाला ' दिव्य नाम ' म्हणतात. या नामासोबत श्रीगुरुंचा आपल्या परमकल्याणाचा संकल्प कार्यरत असल्याने ते नाम अलौकिक असते व तेच आपला परमार्थ सर्वार्थाने सांभाळून आपल्याला श्रीभगवंतांपर्यंत नेऊन पोचवते. यासाठी अशा अद्भुत नामालाच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे ' परमगुरु ' म्हणून गौरवत आहेत. जोवर हे दिव्यनाम प्राप्त होत नाही, तोवर जशी जमेल तशी पण प्रेमाने व नेमाने यथाशक्य उपासना करीत राहावी, असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. योग्य वेळी श्रीभगवंत कृपा करतातच. 
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

4 August 2016

॥ अमृतबोध ॥ ४ ऑगस्ट २०१६

४ ऑगस्ट २०१६
नामस्मरण ही विशेष प्रक्रिया आहे. याविषयी संतांनी फार छान मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज नामस्मरणाची प्रधान अंगे सांगताना म्हणतात की, नाम हे त्याच्या -हस्वदीर्घ उच्चारांनुसारच म्हटले गेले पाहिजे. शिवाय ते नाम परंपरेने आलेल्या श्रीगुरुंच्या मुखातून लाभलेले हवे. ज्यांच्याकडून नाम मिळाले त्या श्रीगुरुंप्रति आणि ज्यांचे नाम आहे त्या श्रीभगवंतांप्रति अंत:करणात अपार श्रद्धा आणि आदर हवा. नाम घेताना त्यांचे प्रेमाने स्मरणही व्हायला हवे. या गोष्टी जर साधल्या नाहीत तर घेतलेले ते नाम परमार्थाच्या दृष्टीने फळत नाही. म्हणून या गोष्टी कटाक्षाने पाळून नामाची अलौकिक अनुभूती घ्यावी, असे प. पू. श्री. मामा आपल्याला कळवळ्याने सांगत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

3 August 2016

॥ अमृतबोध ॥ ३ ऑगस्ट २०१६

३ ऑगस्ट २०१६
श्रीभगवंतांच्या दोन विग्रहांचे संत वर्णन करतात. एक त्यांची स्थूल मूर्ती व दुसरी त्यांच्या नामातून तयार होणारी " अक्षरमूर्ती " होय. या दोन्हींमधला मार्मिक भेद सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की,  मंदिरातील मूर्ती आपण थोडा वेळ पाहतो, पण नामातून तयार होणा-या मूर्तीचा आपल्याला सतत सहवास लाभू शकतो. म्हणून श्रीभगवंतांच्या अक्षरमूर्तीला अर्थात् त्यांच्या नामालाच संतांनी जास्त महत्त्व दिलेले आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

2 August 2016

॥ अमृतबोध ॥ २ ऑगस्ट २०१६

२ ऑगस्ट २०१६
श्रीभगवंतांचे नाम हे अत्यंत अद्भुत असते. ते कसेही घेतले तरी फायदाच होतो. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे ॥ हे आपण कायम ऐकत आलो आहोत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज नामाचे श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात की, साधकाने एकाग्रचित्ताने जप केला तर लाभ होतोच, पण व्यग्र चित्ताने म्हणजे मनात दुसरे विचार चालू असतानाही केलेल्या नामजपाचा लाभच होतो, ते वाया जात नाही. म्हणून येता जाता, काम करताना मनातल्या मनात जप करायचीच सवय आपण लावून घेतली पाहिजे. 
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

1 August 2016

॥ अमृतबोध ॥ १ ऑगस्ट २०१६

१ ऑगस्ट २०१६
श्रीभगवंतांचे नाम हे त्यांच्यासारखेच अलौकिक सामर्थ्यसंपन्न असते. त्याच्या सतत केलेल्या जपाने जिव्हेबरोबर मनही शुद्ध होत जाते. मन सुधारले की जीवनही सुधारते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज नामाच्या परीणामकारतेचे माहात्म्य सांगताना म्हणतात की, एखाद्याने साधी शिवी दिली तरी समोरच्याच्या मनावर परीणाम होतो, मग असे सामर्थ्ययुक्त नाम घेतल्यावर का होणार नाही? म्हणून इतर कामे करताना देखील सतत मनातल्या मनात नाम घ्यायची सवय आपण प्रयत्नपूर्वक स्वत:ला लावलीच पाहिजे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates