10 April 2016

चरित्रसुधा - २

( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
सौ. पार्वती आपल्या अत्यंत हुशार व कर्तबगार सासूबाई, जानकीबाईंच्या हाताखाली हळूहळू तयार होऊ लागली. जानकीबाईंनाही आपली ही धाकटी सून अतिशय आवडली होतीच. आपल्या पतीच्या पश्चात जानकीबाईंनी अत्यंत धीराने सर्व व्यवहार सांभाळले होते. त्या अतिशय दूरदर्शी व सात्त्विक स्वभावाच्या होत्या. त्यांचे वैद्यकीय ज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे होते. अडलेली बाळंतीण सुखरूप सोडवण्यात त्यांचा नसरापुरच्या पंचक्रोशीत कोणीही हात धरणारे नव्हते. त्यांनीच आपल्या वडिलांकडून आलेल्या ज्योतिष आणि वैद्यकी या विद्या पूर्ण मापाने आपल्या धाकट्या सुनेला बहाल केल्या. जानकीबाईंच्या तालमीत लवकरच सौ. पार्वतीबाई सर्व कामांमध्ये निष्णात झाल्या.
जानकीबाई अत्यंत चतुर होत्या. आपला थोरला मुलगा सीताराम, जरी चुलत्यांनाच दत्तक गेलेला असला तरी, त्याचा आपल्या संपत्तीवर डोळा आहे, हे जाणून त्यांनी त्याचवेळी दोन्ही मुलांच्या वेगवेगळ्या चुली केल्या, घराच्या वाटण्याही केल्या, पण दुर्दैवाने कागदोपत्री नाव सीतारामचेच राहून गेले. या वाटण्या केल्या त्यावेळी एकदा जानकीबाईंनी सौ. पार्वतीला विचारले की, " बाळ, या सर्व संपत्तीतील तुला काय हवे ते माग. " त्यावर निरागसपणे पार्वतीबाई उत्तरल्या, " देव्हा-यातला मारुती द्याल का मला? " पायल्यांनी दागदागिने, जडजवाहिर होते देशपांड्यांच्या घरात, पण ते काहीच न मागता पार्वतीबाईंनी मारुतीरायांची मूर्ती मागितली. जात्याच हुशार असणा-या जानकीबाई सुनेचे हे निर्मळ अंत:करण पाहून किती सुखावल्या असतील? त्यांनी मग स्वत:च संपत्तीची दोन्ही मुलांमध्ये वाटणी करून दिली. पण मायेचे, प्रेमाचे आणि आशीर्वादांचे माप भरभरून या धाकट्या सुनेच्याच पदरी रिते केले. या भाग्यवान सुनेने आपल्या सासुबाईंचा विश्वास सार्थ ठरवला. जानकीबाईंना शेवटी दुर्धर रोगाने ग्रासले. त्यांचा कोठाच फुटला. अंथरुणातच सर्व व्हायला लागले. थोरली सून धुसफुस करी, पण सौ. पार्वतीबाईंनी कधीच कसलाही त्रास न मानता त्यांची सर्व सेवा प्रेमाने व न कंटाळता केली. जाताना जानकीबाईंनी पार्वतीबाईंना, तुझ्यावर पूर्ण सद्गुरुकृपा होईल, असा आशीर्वाद दिला. सौ. पार्वतीबाईंना भरून पावल्याचे समाधान झाले.
प. पू. श्री. मामांचे वडील, पू. दत्तोपंतही अत्यंत सरळमार्गी, श्रद्धावान आणि पारमार्थिक अधिकारी होते. त्यांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांकडून अनुग्रह लाभलेला होता. ते शाडूच्या अप्रतिम मूर्ती बनवीत आणि त्यांची साग्रसंगीत पूजा करून मिरवणुकीने विसर्जन करीत. त्या मूर्तीतील देव त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत असत. अनेक साधूसंत देशपांडे कुटुंबाचे प्रेमाचे आदरातिथ्य घेण्यासाठी नेहमी येत. दत्तूअण्णा त्यांच्याकडून अनेक विद्या शिकलेले होते. तेही वैद्यकीत व ज्योतिषशास्त्रात निष्णात होते. घरची शेती-वाडी, कुलकर्णपण, गाई-गुरे, आला-गेला, सण-उत्सव आणि दैनंदिन उपासना, साधना यांमध्ये पू. दत्तूअण्णा व पू. मातु:श्री पार्वतीदेवी निरंतर कार्यरत असत. या दोघांचाही पूर्ण कल पारमार्थिक असल्याने, त्यांचा संसार त्यांना कधीच बाधक ठरला नाही. उलट दोघांचा परमार्थच त्यातूनही फुली-फळी बहरला. या हरिरंगी रंगलेल्या दांपत्याचे काही प्रसंग फार बोलके व मार्गदर्शक आहेत, ते आपण यथाक्रम पाहूच.
दत्तप्रसाद उदरी आला :-
पू. दत्तुअण्णा व पू. पार्वतीदेवी यांचा संसार सुरू झाला. त्यांना पहिली मुलगी झाली पण ती अल्पायुषी ठरली. दुसरा मुलगा झाला, त्याचे नाव गोविंद ठेवले. त्यानंतर पुन्हा मुलगाच झाला, नाव ठेवले रघुनाथ. रघुनाथानंतरची तिन्ही मुले होऊन लगेचच गेली. त्यानंतर १९०६ साली एक मुलगी झाली, नाव ठेवले अनसूया. तिच्या नंतरची दोन मुले पुन्हा निवर्तली. या अपत्यमरणाच्या साखळीने उभयता खूपच व्यथित झाले. शेवटी १९१२ सालामधील नित्याच्या नरसोबावाडीच्या पौर्णिमा-वारीला देवांसमोर गा-हाणे मांडले. श्रीदत्तप्रभूंनी, ' प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांच्या भेटीस जावे ', असा आदेश दिला.
प. प. श्री. टेंब्येस्वामीमहाराज त्यावेळी वाडीलाच होते. त्यांच्या दर्शनाला जाताच, ते स्वतःहून म्हणाले, " काही काळजी करू नका. आता अपत्य टिकेल व दीर्घायुषी होईल. तो होणारा मुलगा साक्षात्कारी, कुलोद्धारक होईल. काही अडचण वाटल्यास देवांची प्रार्थना करावी. " अशा प्रकारे अमोघ आशीर्वादांच्या आनंदसरोवरात न्हाऊन हे सात्त्विक साधुतुल्य दांपत्य घरी परतले. त्याच सुमारास पू. दत्तुअण्णांनी आपले बि-हाड नसरापूर येथून पुण्याला कसबा पेठेत सुदुम्ब्रेकरांच्या वाड्यात हलवले. पुढे श्रीकृपेने सौ. पार्वतीदेवींना गर्भ राहिला व उत्तमोत्तम डोहाळे होऊ लागले. ती दिव्य गर्भलक्षणे पाहून दोघेही मनोमन सुखावले.
मंगळवार दि. २३ जून १९१४ रोजी सौ. पार्वतीदेवींना असह्य प्रसूतिवेदना होऊ लागल्या. त्या जीवघेण्या परिस्थितीत त्यांनी प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांचा कळवळून धावा केला. त्याबरोबर प. प. श्री. थोरले महाराज त्यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रकटले व आशीर्वाद देत म्हणाले, " बाळ, काळजी करू नकोस. या वेदना आता थांबतील. गुरुवारी सकाळी आमच्याच पूर्णांशांनी पुत्र जन्माला येईल. त्याचे नाव ' श्रीपाद ' ठेवा. " असे म्हणून स्वामीमहाराज अंतर्धान पावले. त्या प्रसूतिवेदनाही आपोआप थांबल्या.
इकडे नर्मदाकिनारी गरुडेश्वरला प. प. श्री. टेंब्येस्वामींनी आपली देहत्यागाची तयारी केली होती. ज्येष्ठ अमावास्या संपून आषाढ शुद्ध प्रतिपदा लागल्याबरोबर, मंगळवारी २३ जून १९१४ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. तत्पूर्वी जवळपास तासभर आधी आसनावर बसून त्यांनी सर्वांना शेवटचा बोध केला व सर्वांचा निरोप घेतला. डोळे मिटून घेतले पण थोड्याच वेळात पुन्हा डोळे उघडले. त्यावेळी त्यांचे एक शिष्य श्री. शंकरकाका आजेगांवकरांनी, असे का केले? हे विचारल्यावर श्रीस्वामी महाराज सूचकपणे उत्तरले, " भक्तकार्यार्थ जाऊन आलो. " नेमके इकडे पुण्यात पू. पार्वतीबाईंसमोर प्रत्यक्ष प्रकटून त्यांनी त्याचवेळी आशीर्वाद दिलेला होता. म्हणूनच त्यानुसार गुरुवारी २५ जून १९१४ रोजी सकाळी ९.२९ मिनिटांनी प. पू. श्री. मामांचा जन्म झाला. आश्चर्य म्हणजे, पू. मामांच्या जन्माची वेळ व प. प. श्री. टेंब्ये स्वामींचा पावन देह नर्मदेत विसर्जित करण्याची वेळ अगदी तंतोतंत जुळते. म्हणूनच प. पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या " श्रीगुरुसाहस्री " या पू. मामांच्या चरित्रावरील पोथीत म्हणतात,
जे वेळा नर्मदाजली ।
स्वामीकुडी विसावली ।
तेचिवेळा जन्मा आली ।
स्वामीकला ॥३.३६॥
ज्यावेळी इकडे स्वामीकुडी नर्मदेत विसर्जित झाली, त्याचवेळी तिकडे स्वामीकला पुन्हा प्रकट झाली. श्रीदत्तब्रह्म कार्यासाठी अजून एकदा अवतीर्ण झाले. या नित्य अवताराने फक्त आपली काया बदलली, तत्त्व तेच फक्त रूप भिन्न धारण केले. एका अलौकिक अशा नव्या पर्वाचा पुन्हा श्रीगणेशा झाला. युगायुगी निजभक्त रक्षणासाठी येणारे परब्रह्मतत्त्व एक देह सोडून लगेच दुसरा घेऊन आले. भक्तांच्या प्रेमाचा मोह देवांनाही आवरत नाही, त्यांनाही भक्तांशिवाय क्षणभर करमत नाही, हेच परत एकदा भगवंतांनी दाखवून दिले. ( क्रमश: )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates