चराचर विश्व निर्माण करणारी व ते सर्व व्यापून असलेली भगवती शक्ती, श्रीसद्गुरूंच्या कृपेने साधकाच्या ठायी जागृत होते. जागृत होते म्हणजे काय होते? हे प्रथम समजून घ्यायला हवे.
प्रत्येक जीव हा परब्रह्माचाच अंश आहे. पण हे तो जाणतच नाही म्हणून स्वत:ला त्या परब्रह्माहून वेगळा मानतो. हे सर्व घडते त्या परब्रह्माच्याच मायाशक्तीमुळे. मायेमुळे भ्रांती निर्माण होते व आपल्याच जवळ असलेले आपल्याला दिसत नाही.
भगवती आदिशक्ती जशी माया म्हणून बाहेर कार्य करते, तशीच ती कुंडलिनी रूपाने प्रत्येक जीवातही विराजमान असते. पण ती सुप्त असते. सुप्त म्हणजे जोपर्यंत श्रीसद्गुरु तिला जागृत करत नाहीत, तोपर्यंत ती माया बनून त्या जीवाचा प्रपंच करीत असते. श्रीगुरुकृपा झाली की मग ती प्रपंच करायचा सोडून परमार्थ करायला सुरुवात करते. म्हणजेच मायारूप टाकून कुंडलिनीशक्ती रूपाने कार्य करू लागते. हेच शक्तीचे जागरण होय.
आपल्या हृदयातच शिव व शक्ती असतात. श्रीमारुतीरायांनी आपले हृदय फाडून तेथील राम-सीता सर्वांना दाखवले होते. म्हणजे ते तेथे असतातच, पण त्यांना आपले आपण कधीच पाहू शकत नाही. ते पाहण्यासाठी श्रीभगवंतांनी सद्गुरु रूपाने आपल्यावर कृपा करून आपल्याला आधी ' प्रेममुद्रा ' द्यावी लागते.
प्रेममुद्रा हा नाथ व दत्त संप्रदायांचा विशेष पारिभाषिक शब्द असून त्याचा ' भक्तीची दीक्षा ' असा अगदी अचूक अर्थ प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करीत असत. ही प्रेममुद्रा दिल्याशिवाय आणि श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दाखविल्याशिवाय, आपल्याच हृदयात असणारे हे शिवशक्तीरूप आद्यतत्त्व कोणीही कधीच पाहू शकत नाही. हे आनंदस्वरूप पाहता यावे, सप्रेम अनुभवता यावे म्हणूनच नवरात्री महोत्सवात आपण श्रीसद्गुरूंकडे ' आईचा जोगवा ' मागायचा असतो !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment