भजनाचा गूढ अर्थ :
राधा गवळण करिते मंथन ।
अविरत हरिचे मनात चिंतन ॥
श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा उल्लेख नाही. पण 'गोविन्ददामोदर स्तोत्रा'त असे म्हटले आहे की;
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।
हे नाथ नारायण वासुदेव ॥ (गो.स्तो.७०)
यातील पहिला चरण पाहा; 'श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।' म्हणजे काय? 'श्री' नाम शक्ती. लहानपणात बाळसे धरणारी जी शक्ती, तिला 'श्री' म्हणावे. पुढे मोठेपणी हीच शरीरातील 'श्री' 'कृष्ण' असते, ती विजेसारखी वक्र असते. मग ही श्रीकृष्ण-विद्युत समजा प्रकट झाली; तर काय करेल ? तर 'गोविंद' करेल. 'गो' नाम इंद्रिये, त्यांचे ती विंदाण करील, म्हणजे वासना जाळील. 'श्रीकृष्ण गोविंद हरे' म्हणजे दुःख हरण करील आणि सुख देईल.
आता काय राहिले ? तर, 'मुरारे ।'. याचे काय तंत्र आहे ? एका माणसाने आपल्या बायकोला मोठे मोठे आवळे आणून दिले. तिने लगेच चोचणी घेऊन ते चोचवले आणि पाकात टाकले. इकडे ऑफिसमध्ये त्या बाप्याचे आणि साहेबाचे कडाक्याचे भांडण झाले, त्याचे पित्त उठले, म्हणून डोके धरून तो घरी आला. त्या सुगरणीने काय केले ? तर दुपारी घातलेला 'मोरावळा' त्याला आणून दिला. तेव्हा तो म्हणाला; "अगं; ह्याने काय होणार ? ती मागच्या वर्षीची मुरलेल्या आवळ्यांची बरणी आण !” 'मुरारे' म्हणजे काय ते आले का ध्यानात ? “हे भक्तांनो, हे साधकांनो, अरे परमार्थात मुरा ! म्हणजे साधना करा !"
आता, 'राधा' म्हणजे काय ? तर 'र- आधा'. 'आधारद्रुमाच्या बुडीं । (ज्ञाने. ६.१२.१९३)' , हीच राधा. म्हणून बसताना ते जाणून बसायचे. पहिले आसन राधा, मग कृष्णशक्ती, मग प्राणायाम. आधी आसन, मग प्राणायाम. 'वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥ ज्ञाने.९.१४.२१३ ॥' ; यंत्र चालू करून दिले की, गाडी चालते झुक् झुक्. आपण फक्त बसायचे; शक्ती स्वतःच कार्य करते. या ठिकाणी हेच सांगितलेले आहे. पण असे मंथन मनामध्ये व्हायला पाहिजे.
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)
www.sadgurubodh.blogspot.com
0 comments:
Post a Comment