साधना 'निष्कामतेने' करायची असते :
साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाही. उलट पहाटे झोपमोड करून उठायचे, 'गुरुर्ब्रह्मा ...' म्हणायचे आणि साधनेला बसायचे, त्यात काय सांगितले आहे हरी जाणे. या प्रक्रियेत फायदेशीर काय आहे ? चहा, कॉफी वगैरे काही मिळणार आहे का ? काही नाही. मग कशाला सांगितले आहे कोणास ठाऊक ? म्हणजे हे 'निष्काम' आहे. हे निष्काम साधन आहे आणि शिवाय 'कैवल्यरसे वोगरलीं ।'.
'वोगरणे' म्हणजे वाढणे. जो आपली साधना अशी नियमाने व प्रेमाने करतो, त्या माणसाला ही भगवती शक्ती काय पाहिजे ते देते. त्याला काय द्यायचे ? हे तिला आपोआप कळते. म्हणून माउलींनी, अठराव्या अध्यायात एक सुंदर ओवी घातलेली आहे;
जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाकल्पतरो ।
स्वसंविद्रुमबीज प्ररो - । हणावनी ॥ज्ञाने. १८.०.१०॥
"हे भगवंता; मला कल्पना करता येत नाही आणि आपण कल्पतरू आहात. तेव्हा मला काय पाहिजे तेही आपणच जाणता !"
मी काय करतो ? तर फक्त सेवा ! म्हणजे साधना. मला काही कळत नाही, मी फक्त बैठक करतो. अशा भावाने जे करणे, त्यालाच 'निष्कामता' असे म्हणतात. निष्कामता म्हणजे पगाराचे आलेले पैसे वाटणे असा अर्थ नाही. किंवा निष्काम सेवा म्हणजे महिनाभर काम केले पण पगारच घेतला नाही, असेही नव्हे. निष्कामता म्हणजे, श्रीभगवंतांजवळ जाताना फक्त शुद्ध-प्रेमाने आणि निरिच्छपणे जाणे !
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)
0 comments:
Post a Comment