साधनाच महत्त्वाची :-
आपल्या मनाला दूर करण्याचे जे साधन आहे; तिचेच नाव 'शक्ती'. अशी ही शक्ती श्रीसद्गुरुकरुणेने माणसाला मिळते. पण त्याने साधनाच केली नाही तर ? सर्व सामान आणून दिले. बटाटेवडे करायची सर्व तयारी आहे. घरातली बाई दहा वेळा म्हणाली; 'बटाटेवडे करीन !" म्हणून नवरा खूश; पोरेही खूश. पण प्रत्यक्षात जेव्हा पानावर बसली, तेव्हा बटाटेवडे नाहीत ! बाईची काय लहर फिरली कोणास ठाऊक ! मग ती पोरे लागली ओरडायला. बाई म्हणाली; "मी बोलले नव्हते का दहा वेळा ? बटाटेवडे करीन म्हणून !" पण केवळ दहा वेळा म्हटले म्हणजे वडे तयार होतात का ? त्याकरिता पीठ भिजवले पाहिजे. चूल पेटवून तेल टाकून कढई तापवली पाहिजे. मग बटाटेवडे तळले पाहिजेत. नुसते दहा वेळा म्हटल्याने वडे तयार होत नाहीत. तशीच परमार्थप्राप्तीकरिता साधना देखील केलीच पाहिजे.
गुरुकृपा झाली ।
इमारत फळा आली ॥ स.सं.ब.३१.१ ॥
श्रीगुरुकृपा झाली म्हणजे काय झाले ? तर फक्त प्लॉट मिळाला. अजून वरची इमारत बांधायचीच आहे. शक्ती मिळाल्यावर काय होते ? तर फक्त भूमी तयार होते. भूमिपूजन फक्त झाले आहे. आता वरची इमारत तुम्हीच बांधावयाची आहे. मग त्याकरिता राबणे आले.
अनुभवी कोण ? असा जो नित्यनियमाने, प्रेमाने साधना करणारा साधक आहे तो. आणि तोच साधक, साधना करता करता सिद्ध होतो. असा जो सिद्ध आहे, तो कुठे असतो ? तर याच देहात असतो. पण त्याला 'विदेही' असे म्हणावे. म्हणून त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल, तर आपली साधना ही आपण नियमितपणे आणि प्रेमाने केलीच पाहिजे !
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)
0 comments:
Post a Comment