शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' :
ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत एकनाथ महाराजांनी असे म्हटले आहे की;
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणीं ॥१॥
भक्तांच्या म्हणजेच साधकांच्या त्रिविध तापांची झाडणी करून, श्रीभवानी त्यांना निर्वाणपद प्राप्त करून देत असते.
आता हा भक्त कसा हवा ? तर श्रीगुरूंनी कृपा करून शक्ती जागृत केल्यानंतर, अभ्यासाची युक्ती व ज्ञान दिल्यानंतर, त्या भगवती शक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहून श्रद्धेने व भक्तियुक्त अंतःकरणाने, प्रेमाने नित्य साधना करणारा असा तो भक्त हवा. मग असा जो भक्त असेल, तोच खरोखर जोगवा मागू शकतो.
ऐसा (आईचा) जोगवा जोगवा मागेन । (२)
हा भक्त श्रीगुरूंजवळ अशी याचना करतो की "माझ्या शरीरात सुप्त असलेली भगवती शक्ती जागृत करून द्या. त्यासंबंधी ज्ञान व त्याची युक्ती द्या. मला साधनापथ दाखवा !"
'जोगवा' म्हणजे 'भिक्षा किंवा माधुकरी' नव्हे. 'जोगवा' याचा खोल अर्थ नीटपणे समजून घ्यायला हवा.
आपण भारतीय अनेक सण, उत्सव साजरे करतो. पण नवरात्र महोत्सव प्रत्येक घरी जेवढ्या पवित्रतेने, आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो, तेवढा इतर कुठलाच उत्सव साजरा होत नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर गणेशोत्सवाचे घेऊ या. हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो खरा; पण त्याचा मूळ उद्देश, त्याचे मर्म जाणून किती लोक तो साजरा करतात ? त्यात पवित्रता पाळली जाते का ?
हो जो मूळ उत्सव आहे, तो गौरी-गणपतींचा. एखादी माउली आपल्या मुलाला स्वतःच्या माहेरी पाठवते व नंतर स्वतः येऊन त्यास घेऊन जाते. तद्वतच चतुर्थीस गणपती येतात, सप्तमीस गौरी येतात, अष्टमीस जेवतात व नवमीला म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरी-गणपती विसर्जित होतात. हा सण साजरा करण्याचा हा खरा धर्म होय. हीच या उत्सवाची खरी प्रथा आहे. म्हणूनच याला 'गौरी गणपती' हे नामाभिधान प्राप्त झाले. आता मंडळी त्यातही सोय, गैरसोय बघतात. म्हणून मग कोणाचा दीड, कोणाचा पाच, कोणाचा सात, कोणाचा नऊ व कोणाचा दहा दिवसांचा गणपती असतो. परंतु नवरात्र हे नऊ म्हणजे नऊ रात्रीचेच असते व तसेच असावे लागते. त्यात सोय बघता येत नाही. म्हणूनच त्यात आजपर्यंत काही बदल झालेला नाही.
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अनादि निर्गुण प्रकटली भवानी' या ग्रंथामधून संकलित.
संकलक - श्री रोहन ऊपळेकर)
www.sadgurubodh.blogspot.com
0 comments:
Post a Comment