संतवचनांच्या शांतस्निग्ध प्रकाशाने आपल्या चित्तातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि त्या अमृतमय बोधप्रकाशाने आपले अंत:करण उजळून निघते. उत्तरोत्तर त्या ज्ञानप्रकाशाचे प्रेमादरपूर्वक अनुसरण केल्यास आपले संपूर्ण आयुष्यच उजळून निघते.
आज गुरुपुष्य-अमृतसिद्धियोग आणि दीप अमावास्या. त्यानिमित्त विलक्षण ऋतंभरा-प्रज्ञेचे महान आचार्य आणि संतवाङ्मयाचे रसज्ञ जाणकार प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वाङ्मयातील अमृतोपम बोध-दीपांचा 'श्रीपादवचनसुधा' हा नवीन उपक्रम आजपासून सुरू करीत आहोत. प्रत्येक गुरुवारी ही बोधमय 'श्रीपादवचनसुधा' आपल्याला प्राप्त होईल. आपण सर्वांनी ह्या मार्मिक बोधवचनांचे मनन-चिंतन करून स्वहित साधावे ही प्रार्थना !
'ह्या करुणापूर्ण शब्ददीपांच्या तेजस्वी प्रकाशाने तुम्हां-आम्हां सर्वांचा साधनापथ उजळून निघो, अमृतमय होवो' याच मन:पूर्वक शुभेच्छा !!
श्रीपादवचनसुधा - १
साधनेने उणेपणा जातो :
नियमित केलेल्या साधनेने जसे शरीरातील उणेपण निघून जाते, तसाच मनातील उणेपणाही कमी होत जातो.
आम्ही काय करतो ? तर पुण्य जमवितो आणि पाप भोगतो. संतांना सुद्धा दुःखे वाट्याला येतात. आम्हांला काहीजण विचारतात की, “जे लोक खून-बिन करतात, त्यांचे काय होते ?” तर त्यांचा पुण्यक्षय होतो. तेच पुढे महारोगी होतात. संत-महात्मेही पाप व पुण्य घेऊनच जन्माला येतात; पण ते आनंदाने दुःख सोसतात व समाधानाने नवीन पुण्यसंचय करतात. त्यामुळे त्यांचे या जन्मीचे पुण्यकर्म व मागील जन्मीचे पुण्यकर्म असे एकवटून येते व ते मोठे होतात.
पण अशा मिळालेल्या मोठेपणाचा जर कोणी दुरुपयोग केला आणि तशी दुर्बुद्धी झाली, तर मग मात्र खेटे बसतात. साधना मिळालेल्या माणसाला, नियमाने आणि प्रेमाने साधना करणाऱ्या माणसाला मात्र सहसा तशी बुद्धी होतच नाही. कारण 'सदा संतांपाशीं जावें । (स्तो.सं.२५८.१)', या उक्तीप्रमाणे, खऱ्या संत-सद्गुरूंपाशी गेल्याने काय होते ? तर परब्रह्म साक्षात्काराला तो साधक योग्य होतो व देव त्याला दर्शन देतात !
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)