॥ अमृतबोध ॥
संशय हा अज्ञानाचा खास मित्र आहे; आणि अज्ञानी ही आपली खरी ओळख आहे. म्हणून हा संशय आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. व्यवहारात काहीवेळा संशय हा खबरदारीचा एक भाग म्हणून उपयोगी पडेल, पण परमार्थात मात्र तो आपले पूर्ण वाटोळेच करतो. भगवंत गीतेत स्पष्ट म्हणतात की, " संशयात्मा विनश्यति । " संशय जिथे असतो तिथे नाश होतोच.
साधनेला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा श्रीगुरुकृपा झालेली असली तरी आपले दोषही खूप असतात. साधनेने हळू हळू ते सर्व दोष नष्ट होतात हे अगदी सत्य असले तरी सुरुवातीच्या काळात हा संशय फार त्रास देतोच. ह्या दोषाच्या तावडीतून भले भले सुटलेले नाहीत, मग आपल्या सारख्या सामान्य साधकांची काय परिस्थिती होत असेल?
देव खरंच आहे का? इथून सुरुवात होऊन, आपल्याला सद्गुरूंनी नक्की अनुग्रह दिलाय ना? का ते विसरले आपल्याला? आपल्यावर नक्की त्यांचे कृपाछत्र आहे ना? अशा हजार रूपांनी हा संशय आपले मन ढवळून काढतो. या संशयाच्या तावडीत एखादा सापडला की कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीसारखी अवस्था होऊन जाते. जेवढी सुटण्याची धडपड जास्त करेल, तेवढा तो अधिकच गुंतत जातो
पण परम कनवाळू महात्म्यांनी यावरही सुंदर उपाय सांगून ठेवलेले आहेत. परम पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज या संशय राक्षसाचा हमखास नाश करण्याचा अचूक उपाय या बोधातून सांगत आहेत. साधकाची आपल्या श्रीसद्गुरूंप्रति श्रद्धा जितकी दृढ असेल तितका हा संशय लवकर नष्ट होतो. " श्रीसद्गुरु हे अत्यंत कनवाळू असून माझा सर्वतोपरि तेच सांभाळ करीत आहेत, मी त्यांच्या आज्ञेचे जसेच्या तसे पालन करून प्रेमाने साधनाच केली पाहिजे ", अशी आपली दृढ श्रद्धा असेल तर हा संशय आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही. श्रीगुरुचरणीं जो अनन्य भावाने शरण जाऊन नेमाने साधना करतो तो परमार्थमार्गात नि:संशय यशस्वी होतोच !!
( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.)
0 comments:
Post a Comment