॥ अमृतबोध ॥
संतांना श्रीभगवंतांच्या कृपेने वस्तुस्थितीचे नेमके ज्ञान झालेले असते. त्या स्वानुभवाच्या जोरावर संत अगदी मोजके व अर्थपूर्ण बोलतात. त्यांचे सांगणे म्हणूनच ' काळ्या दगडावरील पांढ-या रेघे'सारखे पूर्णसत्य असते.
पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज येथे महत्त्वाचा बोध करताना मन व चित्तातील फरक किती सहज सांगतात पाहा.
अग्नीच्या संपर्कात आलेली प्रत्येक गोष्ट अग्नीच्या दाहामुळे वितळते. तसे प्रपंचरूपी अग्नीच्या संपर्कात आलेले मनही पातळ होऊन आणखी सैरावैरा धावू लागते. तेच मन जेव्हा देवघरात ठेवले जाते, तेव्हा तेथील भगवंतांच्या स्थिर अधिष्ठानाच्या बळाने ते आपली संकल्प-विकल्पांची सततची सवय सोडून स्थिर होते. त्यावेळी त्याच मनाला चित्त म्हणतात.
जर आपले मन सतत घरातच राहिले तर त्याला नक्की ध्यान लागते, पण ते पत्नीचे. म्हणजे त्यातून पुन्हा प्रपंचातच राहतो आपण.
यावर अगदी नेमका उपाय सांगताना प. पू. मामा म्हणतात की, प्रपंच सतत बदलणारा असल्याने तो चंचल मनाने करावा. पण परमार्थ हा स्थिरतेकडे नेणारा असल्यामुळे काही प्रमाणात स्थिर झालेल्या चित्ताने परमार्थ करावा. अशी सावधता जर आपण बाळगली तर ते मन, नि:संशय, निर्विचार, निर्विकार आणि नि:संग होऊन परमपदापर्यंत आपोआप पोचते. म्हणून आपण प्रपंचात राहिलो तरी चालेल, पण प्रपंचाला आपल्या आत जाण्यापासून हरप्रकारे रोखले पाहिजे.
( कृपया ही पोस्ट व इमेज फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. )
0 comments:
Post a Comment