25 August 2022
श्रीपादवचनसुधा - ५
22 August 2022
श्रीपादवचनसुधा - ४
11 August 2022
श्रीपादवचनसुधा - ३
साधना 'निष्कामतेने' करायची असते :
साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाही. उलट पहाटे झोपमोड करून उठायचे, 'गुरुर्ब्रह्मा ...' म्हणायचे आणि साधनेला बसायचे, त्यात काय सांगितले आहे हरी जाणे. या प्रक्रियेत फायदेशीर काय आहे ? चहा, कॉफी वगैरे काही मिळणार आहे का ? काही नाही. मग कशाला सांगितले आहे कोणास ठाऊक ? म्हणजे हे 'निष्काम' आहे. हे निष्काम साधन आहे आणि शिवाय 'कैवल्यरसे वोगरलीं ।'.
'वोगरणे' म्हणजे वाढणे. जो आपली साधना अशी नियमाने व प्रेमाने करतो, त्या माणसाला ही भगवती शक्ती काय पाहिजे ते देते. त्याला काय द्यायचे ? हे तिला आपोआप कळते. म्हणून माउलींनी, अठराव्या अध्यायात एक सुंदर ओवी घातलेली आहे;
जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाकल्पतरो ।
स्वसंविद्रुमबीज प्ररो - । हणावनी ॥ज्ञाने. १८.०.१०॥
"हे भगवंता; मला कल्पना करता येत नाही आणि आपण कल्पतरू आहात. तेव्हा मला काय पाहिजे तेही आपणच जाणता !"
मी काय करतो ? तर फक्त सेवा ! म्हणजे साधना. मला काही कळत नाही, मी फक्त बैठक करतो. अशा भावाने जे करणे, त्यालाच 'निष्कामता' असे म्हणतात. निष्कामता म्हणजे पगाराचे आलेले पैसे वाटणे असा अर्थ नाही. किंवा निष्काम सेवा म्हणजे महिनाभर काम केले पण पगारच घेतला नाही, असेही नव्हे. निष्कामता म्हणजे, श्रीभगवंतांजवळ जाताना फक्त शुद्ध-प्रेमाने आणि निरिच्छपणे जाणे !
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)
4 August 2022
श्रीपादवचनसुधा - २
साधनाच महत्त्वाची :-
आपल्या मनाला दूर करण्याचे जे साधन आहे; तिचेच नाव 'शक्ती'. अशी ही शक्ती श्रीसद्गुरुकरुणेने माणसाला मिळते. पण त्याने साधनाच केली नाही तर ? सर्व सामान आणून दिले. बटाटेवडे करायची सर्व तयारी आहे. घरातली बाई दहा वेळा म्हणाली; 'बटाटेवडे करीन !" म्हणून नवरा खूश; पोरेही खूश. पण प्रत्यक्षात जेव्हा पानावर बसली, तेव्हा बटाटेवडे नाहीत ! बाईची काय लहर फिरली कोणास ठाऊक ! मग ती पोरे लागली ओरडायला. बाई म्हणाली; "मी बोलले नव्हते का दहा वेळा ? बटाटेवडे करीन म्हणून !" पण केवळ दहा वेळा म्हटले म्हणजे वडे तयार होतात का ? त्याकरिता पीठ भिजवले पाहिजे. चूल पेटवून तेल टाकून कढई तापवली पाहिजे. मग बटाटेवडे तळले पाहिजेत. नुसते दहा वेळा म्हटल्याने वडे तयार होत नाहीत. तशीच परमार्थप्राप्तीकरिता साधना देखील केलीच पाहिजे.
गुरुकृपा झाली ।
इमारत फळा आली ॥ स.सं.ब.३१.१ ॥
श्रीगुरुकृपा झाली म्हणजे काय झाले ? तर फक्त प्लॉट मिळाला. अजून वरची इमारत बांधायचीच आहे. शक्ती मिळाल्यावर काय होते ? तर फक्त भूमी तयार होते. भूमिपूजन फक्त झाले आहे. आता वरची इमारत तुम्हीच बांधावयाची आहे. मग त्याकरिता राबणे आले.
अनुभवी कोण ? असा जो नित्यनियमाने, प्रेमाने साधना करणारा साधक आहे तो. आणि तोच साधक, साधना करता करता सिद्ध होतो. असा जो सिद्ध आहे, तो कुठे असतो ? तर याच देहात असतो. पण त्याला 'विदेही' असे म्हणावे. म्हणून त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल, तर आपली साधना ही आपण नियमितपणे आणि प्रेमाने केलीच पाहिजे !
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)
28 July 2022
श्रीपादवचनसुधा - १
संतवचनांच्या शांतस्निग्ध प्रकाशाने आपल्या चित्तातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि त्या अमृतमय बोधप्रकाशाने आपले अंत:करण उजळून निघते. उत्तरोत्तर त्या ज्ञानप्रकाशाचे प्रेमादरपूर्वक अनुसरण केल्यास आपले संपूर्ण आयुष्यच उजळून निघते.
आज गुरुपुष्य-अमृतसिद्धियोग आणि दीप अमावास्या. त्यानिमित्त विलक्षण ऋतंभरा-प्रज्ञेचे महान आचार्य आणि संतवाङ्मयाचे रसज्ञ जाणकार प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वाङ्मयातील अमृतोपम बोध-दीपांचा 'श्रीपादवचनसुधा' हा नवीन उपक्रम आजपासून सुरू करीत आहोत. प्रत्येक गुरुवारी ही बोधमय 'श्रीपादवचनसुधा' आपल्याला प्राप्त होईल. आपण सर्वांनी ह्या मार्मिक बोधवचनांचे मनन-चिंतन करून स्वहित साधावे ही प्रार्थना !
'ह्या करुणापूर्ण शब्ददीपांच्या तेजस्वी प्रकाशाने तुम्हां-आम्हां सर्वांचा साधनापथ उजळून निघो, अमृतमय होवो' याच मन:पूर्वक शुभेच्छा !!
श्रीपादवचनसुधा - १
साधनेने उणेपणा जातो :
नियमित केलेल्या साधनेने जसे शरीरातील उणेपण निघून जाते, तसाच मनातील उणेपणाही कमी होत जातो.
आम्ही काय करतो ? तर पुण्य जमवितो आणि पाप भोगतो. संतांना सुद्धा दुःखे वाट्याला येतात. आम्हांला काहीजण विचारतात की, “जे लोक खून-बिन करतात, त्यांचे काय होते ?” तर त्यांचा पुण्यक्षय होतो. तेच पुढे महारोगी होतात. संत-महात्मेही पाप व पुण्य घेऊनच जन्माला येतात; पण ते आनंदाने दुःख सोसतात व समाधानाने नवीन पुण्यसंचय करतात. त्यामुळे त्यांचे या जन्मीचे पुण्यकर्म व मागील जन्मीचे पुण्यकर्म असे एकवटून येते व ते मोठे होतात.
पण अशा मिळालेल्या मोठेपणाचा जर कोणी दुरुपयोग केला आणि तशी दुर्बुद्धी झाली, तर मग मात्र खेटे बसतात. साधना मिळालेल्या माणसाला, नियमाने आणि प्रेमाने साधना करणाऱ्या माणसाला मात्र सहसा तशी बुद्धी होतच नाही. कारण 'सदा संतांपाशीं जावें । (स्तो.सं.२५८.१)', या उक्तीप्रमाणे, खऱ्या संत-सद्गुरूंपाशी गेल्याने काय होते ? तर परब्रह्म साक्षात्काराला तो साधक योग्य होतो व देव त्याला दर्शन देतात !
- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.
(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...