‘‘आई, श्रीज्ञानेश्वर माउली ‘पायाळू’ हा शब्द वापरतात. ‘पायाळू’चा नेमका अर्थ काय गं?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, सांग बरे आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते, तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच पायाळू.’’ असा माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणार्या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू. पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्वविख्यात सत्पुरुष, प.पू. श्री श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, १५ मार्च २०१५ रोजी पू. श्री मामांची २५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या अलौकिक प्रतिभासंपन्न ज्ञानेश्वरी अभ्यासकाच्या कार्याचा हा अल्प परिचय.
मामासाहेब हे भगवान श्रीज्ञानेश्वरी माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली’ हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. माउलींच्या वाङ्मयाच्या शब्दन् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते माउलींच्या ओव्यांचे चिंतन करू शकत असत. इतकी ज्ञानेश्वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता.
मामांनी आजन्म पंढरीची वारी केली. संपूर्ण हयातीत लाखो प्रवचनांच्या माध्यमातून माउलींचा ज्ञानसंदेश जनमानसात वितरित केला. १९७३ साली इंग्लंडमधील त्यांच्या प्रवचनांनी भारावून जाऊन अनेक परदेशी व्यक्तींनीदेखील ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. संतविचारांच्या आधारे उपासनेला सुरुवात केली.
मामा हे तरुणपणी उत्तम नाट्य दिग्दर्शक व नाट्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी माउलींच्या जीवनावर लिहिलेले ‘चैतन्य चक्रवर्ती’ हे चार अंकी संगीत नाटक अतिशय बहारीचे आहे. त्यांच्या संहितेवरूनच दोन वर्षांपूर्वी ‘ज्ञानोबा माझा’ हे संगीत नाटक रंगभूमीवर आले व हिंदुस्थानभर गाजले होते.
माऊलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, विलक्षण, रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व भक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. पू. मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टीदेखील माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. माउलींना नेमके काय म्हणायचे आहे? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणार्या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील पू. मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार’ म्हणून एकमुखाने गौरविले आहे. आचार्य अत्रे पू. मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शन घेत असत.
मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘श्रीवामनराज प्रकाशन’ नावाने एक संस्था स्थापन करून माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस सव्वा दोनशे पुस्तके प्रकाशित करून अल्पदरात विक्री करणारी ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पू. मामांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे.
या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी-योगाचे औचित्य साधून ज्ञानेश्वरीच्या या अलौकिक आणि अपूर्व भाष्यकारास, प.पू. श्री. मामा देशपांडे महाराजांस ही सप्रेम शब्दांजली अर्पण असो! त्यांनी लावलेली ही ज्ञानज्योत आपण सर्वांनी अनुसरून हा अभ्यास-वसा जोपासणे, वाढवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज व प. पू. श्री. मामांचे अत्यंत दृढ प्रेमनाते होते. प. पू. मामा प. पू. काकांना गुरुस्थानीच मानत असत. आषाढी वारीतील फलटण मुक्कामात व इतरही वेळी प. पू. मामा प. पू. काकांकडे येत असत. दोघांची ज्ञानेश्वरी या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर सखोल चर्चा होत असे. प. पू. काकांनी एकदा प. पू. मामांच्या मनातील गोष्ट जाणून न विचारताच त्यांना अडलेल्या काही ओव्यांचे मार्गदर्शन आपणहून केले होते. प. पू. मामा नेहमीच प. पू. काकांविषयी अतीव प्रेमादराने बोलत असत. या दोन थोर ज्ञानेश्वरी-भक्तांची प्रत्येक भेट अवर्णनीयच होत असे.
आज प. पू. मामांच्या पंचविसाव्या पुण्यदिनी त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक साष्टांग नमस्कार !!
0 comments:
Post a Comment