॥ अमृतबोध ॥
॥ हरिपाठ मंजिरी - १९८ ॥
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" श्रीगुरूंच्या कृपेशिवाय द्वैताची झाडणी होणार नाही. पण त्यासाठी ते श्रीगुरु आधी पूर्ण अनुभवी असावे लागतात.
गुरु अनुभवी नसतील तर काय गंमत होते ? ह्यासाठी प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री प.पू.पार्वतीदेवी एक मजेदार गोष्ट सांगत असत.
एकदा एका मनुष्याला काही दोषाने एका वस्तूच्या जागी दोन दोन वस्तू दिसू लागल्या. तेव्हा तो एका नेत्रतज्ज्ञाकडे गेला व आपल्याला काय होते आहे ते सांगू लागला. तेव्हा तो नेत्रतज्ज्ञ त्याला म्हणाला, "एवढ्या साध्या गोष्टीसाठी तुम्हा तिघे कशाला आलात ?" कारण त्या वैद्यालाच एका वस्तूच्या तीन वस्तू दिसत असत !
आता विचार करा, अशा तीन वस्तू दिसणाऱ्या वैद्याकडून ज्याला इलाज करून घ्यायचा आहे, त्याची योग्य चिकित्सा होईल का कधी ? म्हणूनच श्री माउली म्हणतात की, "गुरुविणें ज्ञान ।" श्रीगुरु असे हवेत की ज्यांची नुसती दृष्टीच अद्वैती नसून, अनुभूतीही तीच आहे. त्यांना शरण गेल्यास साधकालाही तीच दृष्टी लाभेल.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment