॥ अमृतबोध ॥
२ जुलै
॥ हरिपाठ मंजिरी - १९६ ॥
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, "रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥" या चरणाची सुरेख संगती लावताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "राम किंवा कृष्ण हे दोनही विष्णू या सर्वव्यापी तत्त्वातून आलेले असल्यामुळे त्यांच्यात अभेद आहे. पण ते न जाणता एकाने म्हणावे कृष्ण हाच मोठा व तोही बाळकृष्णच ; तर दुसऱ्याने म्हणावे रवी हातात घेतलेला कृष्णच मोठा. तिसऱ्याने अजून तिसरेच म्हणावे. हे काही खरे नाही.
भगवद् पूज्यपाद श्रीमद् आद्य शंकराचार्य महाराज श्रीशंकरांच्या मंदिरात गेले तर तदाकार होतील यात शंका नाही. कारण त्यांचा अवतारच त्यासाठी. परंतु तेच श्रीअन्नपूर्णेच्या मंदिरात गेले तरी लगेच तदाकार होऊन, "अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।" असे म्हणतात. पंढरीला गेले की विष्णूंच्या पंढरीनाथ या अवताराला पाहून "महायोगपीठे तटे भीमरथ्या ।" म्हणून तितक्याच प्रेमाने वंदन करतात. कारण त्यांना तेथे ब्रह्मस्वरूपाचाच अनुभव येतो, वेगळेपणा जाणवतच नाही. म्हणजे असा एकत्वाचा अनुभव ज्याला येईल तोच धन्य, तोच खरा ज्ञानी होय !
हे सोडून ज्याला एकदेशीय ज्ञान होते, त्याला ते अद्वैत तत्त्व, (राम व कृष्ण किंवा सर्व देवदेवता हे मुळात एकाच परब्रह्माची रूपे आहेत हे, ) "कैसेनि पैठें होय ?" म्हणजे कसे आत्मसात् होईल ? असे श्री माउली या चरणात विचारतात.
आता हे 'अद्वैत' समजण्यासाठी, म्हणजेच 'द्वैताची झाडणी' होण्यासाठी काय करायला हवे ? हे श्री माउली अभंगांच्या तिसऱ्या चरणात सांगतात, ते आपण उद्या जाणून घेऊ या.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
0 comments:
Post a Comment