सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" यातील 'द्वैताची झाडणी'चा मार्मिक अर्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागेल. जसे सोनाराची भट्टी झाडली की तेथे सोन्याचांदीचे कण दिसू लागतात किंवा आरशावरची धूळ झाडली की आपलाच चेहरा उत्तम दिसू लागतो. त्याप्रमाणे द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागते.
भ्रमामुळे एकाचे दोन दिसते. तो डोळ्यांतील दोष वैद्याकडून काढून घेतला म्हणजे, जरी डोळे दोन असले तरी दिसते एकच. दोन टिपऱ्या असल्या तरी नाद एकच निघतो त्यांतून. किंवा पाय दोन असले तरी चाल एकच असते. तसेच द्वैत झाडल्यावर हे अद्वैत स्पष्ट दिसू लागते.
जसा डोळ्यांचा दोष अनुभवी वैद्य दूर करतो, तसाच हा द्वैताचा दोष केवळ अनुभवी श्रीसद्गुरूच दूर करतात. त्या सद्गुरूंची दृष्टीच नुसती अद्वैती नसते तर त्यांना तसाच अनुभवही असतो. अशा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने गेल्यास साधकालाही तीच दृष्टी प्राप्त होते. म्हणूनच श्री माउली पुढे "गुरुविणें ज्ञान" असे म्हणतात.
गुरु अनुभवी नसतील तर काय गंमत होते ? ह्यासाठी प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री प.पू.पार्वतीदेवी एक मजेदार गोष्ट सांगत असत. ती आपण पुढच्या भागात पाहू या.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment