Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

13 September 2018

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती !
भगवान श्रीदत्तप्रभू अपळराजांच्या घरी दर्शश्राद्धाच्या दिवशी, क्षण दिलेले ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा मागायला आले व अखंडसौभाग्यवती सुमतीमातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले. तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन, "जननी, काय हवे ते माग !" असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले. सुमतीमातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने, "स्वामी, हेच बोल सत्य करा !" असेच मागितले. भगवान श्रीदत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच आजच्या पावनदिनी, सूर्योदय समयी पीठापूरमध्ये, श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी अवतरित झाले. भविष्यपुराणात, "कलियुगात अवधूत होतील", असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच अाहे. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायातील नमनात "कलौ श्रीपादवल्लभ: ।" असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार असून त्यांचे वय कायमच सोळा वर्षांच्या किशोराएवढे असते. भगवान श्रीदत्तात्रेयांची कलियुगातील श्रीगुरुपरंपरा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते. भगवान श्री श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षड्भुज अशा मूळरूपात दर्शन झालेले आहे. आपल्या श्रीगुरूंच्या, प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या हृदयात झालेल्या त्याच दर्शनानुसार योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे सुंदर चित्र काढलेले आहे. तसेच एक भव्य तैलचित्र प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पुण्यातील 'माउली' आश्रमात आहे. त्याचाच फोटो या लेखासोबत शेयर केलेला आहे.
त्यांनी सोळाव्या वर्षी पीठापूरहून प्रयाण करून बदरिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले. तिथून भ्रमण करीत ते श्रीनृसिंहवाडी, गोकर्ण महाबळेश्वर, तिरुपती करून कृष्णा काठावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री आले. तेथे त्यांनी चौदा वर्षे राहून अनेक दिव्य लीला केल्या.
भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथील आपल्या दरबारात एके दिवशी, भक्तांवर परमकृपा करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम *"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।"* हा श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्र स्वमुखाने उपदेशिला. हा संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत प्रभावी आहे. पुढे प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तच्या चातुर्मास्यात, प्लेगपासून संरक्षण व्हावे म्हणून सात नाम सप्ताह करवून घेतले होते. त्यांपैकी एका सप्ताहात पुन्हा याच महामंत्राचा सर्वांना उपदेश करून " दिगंबरा..." महामंत्र सर्वत्र प्रचलित केला.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी श्रीगुरुद्वादशी तिथीला आपला देह कुरवपूर येथे कृष्णामाईत अदृश्य केला, पण त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे लक्षात घ्यावे. कारण हा श्रीदत्तप्रभूंचा "नित्य अवतार" आहे. अजूनही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य त्याच रूपातून चालू असून अनंत कालपर्यंत चालूच राहणार आहे.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला श्रीगुरुचरित्रात वर्णिलेल्या असून "श्रीपादचरित्रामृतम्" ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केलेले आहे. श्रीनृसिंहवाडी स्थानावर त्यांचेही वास्तव्य झालेले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव(जामोद) येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य झाले होते. आज त्याजागी श्रीपाद सेवा मंडळाने त्यांचे भव्य मंदिर उभारलेले आहे. त्या जागृत स्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची बालरूपातील श्रीमूर्ती असून, तेथूनही त्यांच्या अद्भुत लीला आजही सतत चालू असतात.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना कुरवपूर क्षेत्री, १९५४ सालच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन दिनी स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी बिल्वदलासह दिव्य पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. त्या सोन्यासारख्या दिसत असत, पण प्रत्यक्षात कशापासून बनलेल्या होत्या हे ज्ञात नाही. कारण ते श्रीभगवंतांच्या संकल्पानेच निर्माण झालेले साक्षात् आत्मलिंगच होते. त्या पादुका सदैव पू.मामांच्या सोबत असत. पू.मामांच्या देहत्यागानंतर त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. त्याबरोबर त्या जशा प्रकटल्या होत्या तशाच पुन्हा अदृश्य झाल्या. त्या दिव्य पादुकांच्या तीर्थाला अद्भुत सुगंध येत असे आणि त्या तीर्थाने असंख्य भक्तांचे रोग, पिशाचबाधा व अडचणी दूर होत असत. आजच्या पावन दिनी त्या पादुकांचे सर्वांना दर्शन व्हावे म्हणून या लेखासोबत त्यांचाही फोटो शेयर करीत आहे.
साजुक तुपातला शिरा, माठाची/राजगि-याची पालेभाजी व वांग्याची भाजी या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत. मनापासून आणि विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते. वस्तुत: आवड - नावड यांचा या श्रीपादरूप परमशुद्ध ब्रह्मचैतन्याशी काहीही संबंधच नसतो. भक्ताचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांच्या प्राप्तीचे एकमात्र साधन आहे !
आजच्या परम पावन दिनी, भगवान भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
विमला: कीर्तयो यस्य श्रीदत्तात्रेय एव स: ।
कलौ श्रीपादरूपेण जयति स्वेष्टकामधुक् ॥
"ज्यांची यश-कीर्ती अत्यंत उज्ज्वल आहे असे साक्षात् श्रीदत्तप्रभूच कलियुगामध्ये भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे अद्भुत असे श्रीपादरूप धारण करून निरंतर कार्य करीत आहेत !"
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


Read More

12 August 2018

मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी

आज श्रावण शुद्ध प्रतिपदा !
भारतीय पंचांगामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. हा संपूर्ण महिनाच अत्यंत पवित्र व हवाहवासा वाटणारा असतो. या काळात निसर्ग देखील मोहरून आलेला असतो. एकूणच चातुर्मासातील या पवित्र महिन्यात सर्वत्र अतिशय सुंदर वातावरण असते. याच काळात त्यामुळे व्रतवैकल्ये आवर्जून करावीत असे पूर्वीच्या श्रेष्ठांनी सांगून ठेवलेले आहे.
श्रावण महिन्याला आपल्याकडे का बरे एवढे पावित्र्य दिले गेले असावे? याचा विचार करता मला नेहमी असे वाटते की, आम्हां भारतीयांचे परमआराध्य व पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचा जन्ममास आहे, म्हणूनच तो आम्हांला अत्यंत प्रिय व पवित्र वाटतो.
एक विलक्षण योगायोग म्हणजे, या श्रीकृष्णजन्म-मासाच्या पहिल्याच दिवशी, त्या पूर्ण पुरुषोत्तमाच्या परमप्रिय भक्तश्रेष्ठ व साक्षात् भगवती श्रीराधाराणींच्याच प्रेमावतार, श्रीसंत मीराबाईंची जयंती असते !
श्री मीराबाई ह्या अलौकिक आणि अद्भुत विभूतिमत्त्व आहेत. त्यांच्या भक्तिविश्वाची व प्रगल्भ प्रेमभावाची किंचितशी कल्पनाही करणे, आपल्या मानवी बुद्धीच्या कक्षेच्या फार बाहेरचेच आहे. त्यांचे विलक्षण जीवनचरित्र, त्यांचे जगावेगळे बालपण, कर्तव्यपालन म्हणून नि:संगपणे त्यांनी केलेला संसार, कृष्णस्मरणात त्यांनी नि:संकोचपणे प्राशन केलेले विष व त्या विषाचा हरिकृपेने तत्काळ नष्ट झालेला प्रभाव, त्यानंतर सर्वसंग त्याग करून संपूर्ण भारतभर त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेला भक्तिप्रचार आणि त्यांचा अद्वितीय देहत्याग; सारेच कल्पनातीत आहे ! चमत्कारालाही विस्मय वाटावा असेच आहे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना एकदा एकाने प्रश्न विचारला, "मामा, श्रीसंत मीराबाईंना पण विष पाजले होते व सॉक्रेटिसलाही विषच पाजले गेले. मग दोघांत फरक काय?" प.पू.मामांनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक व पुरेसे बोलके आहे. ते म्हणाले, "अरे, विष पिऊन सॉक्रेटिस मेला, पण मीराबाई जिवंतच राहिल्या !" या एकाच वाक्यात पू.मामांनी श्रीसंत मीराबाईंचा अद्भुत अधिकार नेमकेपणे अधोरेखित केला आहे.
सच्च्या भक्तहृदयाचे अप्रतिम भावाविष्कार असणारे श्री मीराबाईंचे अभंग वाचताना आपल्याला अगदी भारावून जायला होते. त्यांचा तो उत्फुल्ल माधुर्यभाव, त्यांची अनन्य कृष्णप्रीती, त्यांची सडेतोड भक्तितत्त्व-मांडणी, स्वानुभूतीची अथांग खोली, सारे किती मोहक आणि विशेष आहे ना ! त्या साक्षात् भगवती श्रीराधाजीच असल्यामुळे त्यांच्या अद्भुत अधिकाराविषयी आपण काय भाष्य करू शकणार? साक्षात् श्रीकृष्णप्रेमच त्यांच्या रूपाने साकार झाले होते !! म्हणून आपण तेथे केवळ साष्टांग दंडवतच करू शकतो ! तेच आपले परमभाग्य !!
श्रीसंत मीराबाईंच्या अभंगांवर मराठीमध्ये फारशी पुस्तके नाहीत. थोडीबहुत जी काही आहेत ती चरित्रपरच आहे. त्यांच्या रचनांचे यथामूल चिंतन करून त्यातील विलक्षण भक्तिरहस्य कोणीच आजवर प्रकट केलेले नव्हते. अर्थात् ते सोपे कामच नाही. पण श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या "अभंग आस्वाद" या ग्रंथमालेच्या नवव्या भागाद्वारे, श्रीसंत मीराबाईंच्या निवडक पन्नास अभंगांवर अत्यंत सुरेख असे विवरण नुकतेच प्रकाशित करून ही उणीव नेटकेपणे भरून काढलेली आहे. या पन्नास अभंगांची निवड इतकी चपखल झालेली आहे की, त्यातून श्रीसंत मीराबाईंचे अलौकिक व अद्वितीय भावविश्व अतिभव्य आणि उदात्त रूपात आपल्या समोर उभे ठाकते. श्री मीराबाईंच्या अभंगांवरचा हा मराठीतला पहिलाच असा ग्रंथ आहे. अवघ्या चाळीस रुपयांच्या या बहुमोल पुस्तकातून, चाळीस वर्षे जरी नियमाने अभ्यास केला तरी दरवेळी नवनवीन अर्थच लाभतील यात शंका नाही. श्रीसंत मीराबाईंची शास्त्रपूत मांडणी, आपल्या पूर्वजन्मातील प्रसंगांचे स्पष्ट उल्लेख करणारी शब्दरचना, प्रेमभक्तीचे मार्मिक सिद्धांत व भक्तांसाठी सुबोध उपदेशामृत हे श्री मीराबाईंचे काही काव्यविशेष आहेत. ते प.पू.श्री.दादांनी या ग्रंथात जागोजागी अगदी अचूकपणे दाखवून दिलेले आहेत. वाचकांनी, सद्भक्तांनी व अभ्यासकांनी या ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा ही विनंती.
संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे यांचा "म्हाराँ रि गिरधर गोपाल" नावाचा संत मीराबाईंच्या त्याच अभंगावरील जबरदस्त विवरणग्रंथ सर्वांनी एकदातरी वाचावाच वाचावा. या चौदा प्रवचनांतून श्रीसंत मीराबाईंचे खरे, आभाळाएवढे व्यापक विभूतिमत्त्व आणि त्यांच्या नितांतमधुरा अंतरंग अनुभव स्थितीची खोली समजून येईल. भक्तिशास्त्रातले अदृष्टपूर्व सिद्धांत त्यात पू.दादांनी सविस्तर व संतचरित्रांतली आणि विशेषत: मीराबाईंच्या चरित्रातली उदाहरणे घेऊनच मांडलेले आहेत.  भक्तिप्रांतातले अत्यंत गुह्य म्हणून सांगितलेल्या आणि केवळ अनुभवगम्यच मानलेल्या भावरूपकात्मक अष्टदलकमलाचे सुरेख दर्शन पू.दादांनी या ग्रंथात करविलेले आहे. ही अपूर्व माहिती अन्यत्र कुठेच पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे हा ग्रंथराज अभ्यासक व प्रेमीभक्त अशा दोघांसाठीही अद्वितीय-अलौकिकच ठरतो.
श्रीसंत मीराबाईंच्याच जातकुळीची भावगहिरी कृष्णप्रचिती अंगांगी मिरवणा-या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी, श्रीसंत मीराबाईंच्या "फागुन के दिन चार रे ।" या पदावरील आपल्या विवरणग्रंथात, भक्तहृदयात साकारणारा हरिप्रेमरसाचा दैवी होलिकोत्सव, भक्तहृदयात साजरा होणारा भगवान श्रीरंगांचा अलौकिक रंगोत्सव इतका बहारदार मांडलाय की बस ! श्रीसंत मीराबाईंची सर्वांगसुंदर प्रेमानुभूतीच त्यातून पू.सौ.ताई स्वानुभवपूर्वक आपल्यासमोर ठेवतात. श्रीसंत मीराबाईंचे अद्वितीय-अलौकिक भावविश्व समजून घ्यायचे असेल, तर वर सांगितलेले तिन्ही ग्रंथराज अभ्यासणे नि:संशय आवश्यकच आहे, असे मला मनापासून वाटते. संत हे त्यांच्या वाङ्मयरूपाद्वारे अजरामर ठरलेले असतात. म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाचे वाचन, मनन व चिंतन हीच त्यांची अनोखी संस्मरणी असते, त्यांची ब्रह्मरसप्रदायिनी दिव्य संगतीच असते. या तिन्ही ग्रंथांच्या वाचनाने मी तरी प्रेमभक्तीची शाब्दिक का होईना, पण अतिशय भावमधुर अशी अनुभूती घेतलेली आहे व नेहमीच घेत असतो.
काही लोक जेव्हा या परमश्रेष्ठ विभूती विषयी ' ती मीरा ' अशा एकेरी उल्लेखाने बोलतात किंवा त्यांच्या चरित्राविषयी काही अनुदार उद्गार काढतात; तेव्हा खरंच त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते. श्री मीराबाईंसारख्या संतांचा परमादरपूर्वक उल्लेख करणे किंवा त्यांचे स्मरण होणे, हे आपल्या कैक जन्मांच्या पुण्याचे सुफलितच म्हणायला हवे. कोणत्याही संतांचा झोपेतही असा अनादराने उल्लेख होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच सतत काळजी घेतली पाहिजे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीसंत मीराबाईंच्या विषयी एक अप्रतिम दृष्टांत देत असत. ते म्हणत, "एखादा खूप प्रख्यात शिल्पकार असावा, त्याने जीव लावून आपली अजोड कलाकृती निर्माण करावी, की तशी पुन्हा होणार नाही; बघणा-यांना वाटावे की ही आपल्याच सुखासाठी केलेली आहे, म्हणून सगळ्यांनी आनंदाने ती शिल्पकृती पाहावी. आणि अशी अप्रतिम कलाकृती करणा-या शिल्पकाराला शोधायला जावे तो लक्षात यावे की शिल्प म्हणून स्वत: शिल्पकारच तेथे बसलेला आहे ! असे त्या मीराबाईंचे आयुष्य आहे. श्रीभगवंतांनी मीराबाईंच्या रूपाने अजोड कृती करून ठेवलेली आहे. त्यांच्या रूपाने अलौकिक लीलाच घडवलेली आहे !"
अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी महारासेश्वरी श्रीकृष्णप्रिया श्री श्री मीराबाईंच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत !
अभंग आस्वाद - भाग नववा मधील पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या अतिशय गोड काव्यमय  अर्पणपत्रिकेच्या रूपाने आपणही महाभगवती श्री मीराबाईंच्या चरणीं प्रेमपसायाची सादर प्रार्थना करू या.
चंद्र कृष्णप्रभू, मीरा चंद्रिका ।
आराधित प्रभू, मीरा राधिका ॥१॥
मीरा गिरिधर, अंगे अद्वय ।
अवीट सुखाचे, लीला आलय ॥२॥
मधुर रतीचे, ओघ अनादी ।
शरण अमृता, राखावे पदीं ॥३॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

वर उल्लेख केलेले ग्रंथ 30% सवलतीत मिळवण्यासाठी श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांच्या ©02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा. ]



Read More

14 July 2018

अलौकिक स्वामीकला

करुणाब्रह्म

नमस्कार !!
आज आषाढ शुद्ध द्वितीया, 'श्रीपाद जयंती'चे महापर्व आहे ! भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०४ वी जयंती आहे.
प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी मंगळवार दि.२३ जून १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदा लागल्यावर, रात्री साडे अकराच्या सुमारास गरुडेश्वर येथे देहत्याग केला. त्यांनी पूर्वीच प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांना नृसिंहवाडी मुक्कामी 'कुलोद्धारक पुत्र होईल', असा आशीर्वाद देऊन ठेवला होता. त्याचवेळी "काही अडचण भासल्यास श्रीचरणांचे मनोभावे स्मरण करावे", असेही सूचक उद्गार श्रीस्वामींनी काढले होते. त्याचा प्रत्यय प.पू.मातु:श्रींना लवकरच आला. २३ जूनच्या संध्याकाळी मातु:श्रींना प्रचंड प्रसववेदना होऊ लागल्या. काहीकेल्या त्या वेदना शमेनात. शेवटी रात्री त्यांनी कळवळून प.प.श्री.स्वामीमहाराजांची प्रार्थना केली. त्याबरोबर भक्तकरुणाकर श्रीस्वामी महाराज पुण्यातील त्यांच्या घरात सदेह प्रकट झाले व म्हणाले, "बाळ, घाबरू नकोस. या वेदना आता शमतील. आम्ही थोड्याच वेळात देह ठेवतो आहोत. परवा सकाळी तुला आमच्याच अंशाने पुत्र होईल, त्याचे नाव 'श्रीपाद' ठेवावे. तुझे कल्याण असो", असे म्हणून आशीर्वादाची मुद्रा करून श्रीस्वामी महाराज अदृश्य झाले. त्यावेळी इकडे गरुडेश्वरला खरेतर त्यांनी निरवानिरवीचे बोलून डोळे मिटून घेतलेले होते. तेवढ्यात पुन्हा डोळे उघडले. तेव्हा समोर बसलेल्या शिष्योत्तम श्री.शंकरकाका देशमुख आजेगावकर यांनी विचारले असता, "भक्तकार्यार्थ जाऊन आलो", असे स्वामी महाराज उत्तरले व त्यांनी देहत्यागाची लीला केली. प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी गुरुवार दि.२५ जून १९१४ रोजी सकाळी ९.२९ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रावर प्रसूत झाल्या व श्रीपादांचा जन्म झाला. नेमके अगदी त्याचवेळी, साडेनऊ वाजता गरुडेश्वरी स्वामींचा पुण्यपावन देह नर्मदेत विसर्जित केला गेला. तिकडे स्वामीकुडी नर्मदामैयाच्या कुशीत विसावली तर इकडे स्वामीकला पार्वतीमातेच्या कुशीतून पुनश्च अवतरली; भक्तवत्सल श्रीस्वामी महाराजांचे भक्तोद्धाराचे कार्य अक्षुण्ण ठेवण्यासाठी !
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे साक्षात् श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजच होते; याचा आजवर अनेक भाग्यवान भक्तांनी अनुभव घेतलेला आहे. कांचीपीठाधीश्वर परमाचार्य जगद्गुरु श्रीमत् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज प.पू.श्री.मामांना 'प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज' असे संबोधूनच त्यांच्याशी संवाद करीत असत. श्री.रंगावधूत महाराजांचे शिष्योत्तम असलेल्या कोसंब्याच्या प.पू.पंडितजी कुलकर्णी महाराजांना प.पू.श्री.मामांच्या ठायी नेहमीच प.प.श्री.स्वामी महाराजांचे दर्शन होत असे. पू.मामांच्या जागी प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराजांचे दर्शन लाभलेले काही भाग्यवान भक्त आजही हयात आहेत. अशा या अलौकिक श्रीदत्तात्रेयस्वरूपाच्या, श्रीपादरायांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सादर साष्टांग दंडवत !
आपल्या सद्गुरूंचे अलौकिकत्व अतिशय भावगर्भ शब्दांत मांडताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज आणि सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पूर्ण कृपा लाभलेले प.पू.श्री.श्री.द. उपाख्य मामासाहेब देशपांडे हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर विलक्षण व्यक्तिमत्त्व होय. श्रीदत्त संप्रदाय, श्रीनाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदायांचे अध्वर्यू तसेच वैदिक प्राचीन शक्तिपात योगविद्येचे महान आचार्य म्हणून ते विश्वविख्यात आहेत. संतसाहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग आणि कल्पनातीत अपूर्व असे चिंतन सर्वश्रुतच आहे. संतवाड्मयावरील त्यांचे रसाळ निरूपण भल्याभल्यांना अंतर्मुख व्हायला लावणारे, थक्क करून सोडणारे आणि भगवत्सेवेची अवीट गोडी हृदयात निर्माण करविणारे आहे.
प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे आणि प.पू.मातु:श्री सौ.पार्वतीदेवी देशपांडे या परमार्थातील थोर अशा मात्या पित्यांच्या पोटी जन्माला आलेले प.पू.श्री.मामा दैवीगुणसंपदा आणि प्रेममाधुर्याचे झळाळते मेरुशिखरच होते. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन त्यांनी केलेली थोर राष्ट्रसेवा आणि त्यानंतर लोकसेवा, लोकोद्धारासाठी वेचलेले उर्वरित आयुष्यातील क्षण अन् क्षण जवळून पाहू गेलो तरी माथा त्यांच्या चरणी आदराने, कृतज्ञतेने लवतो. बुडतिया जनांचा आत्यंतिक कळवळा असलेली ही महान विभूती जगावेगळी असूनही जगातच रमली; जगाच्या कल्याणातच भगवत्पूजा बघून अविश्रांत कष्टत गेली; अनेकांच्या अंधकारमय आयुष्यात प्रेमदीपच उजळीत राहिली.
प.पू.मातु:श्री पार्वतीबाई देशपांडे आणि प.पू.योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज; या आपल्या समर्थ सद्गुरुद्वयींकडून मिळालेला परमार्थाचा अतिदिव्य आणि तेजस्वी वारसा जोपासत त्यांनी अनेक जीवांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. जगभर विखुरलेल्या त्यांच्या हजारो साधकांच्या हृदयात त्यांच्या विभूतिमत्वाची, दैवीसंपदेची, अवतारित्वाची कोरली गेलेली सुमधुर स्मृतिचित्रे त्यांच्या सत्कीर्तीची उज्ज्वल पताका झळकवीत, त्यांची नित्य यशोगीतेच गुणगुणत आहेत."
आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श भक्त, आदर्श लोकशिक्षक व आदर्श सद्गुरु असे आदर्शांचेही परमादर्श असणारे प.पू.श्री.मामांचे समग्र चरित्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहे. तुम्हां-आम्हां परमार्थसाधकांनी ते चरित्र सदैव डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी असेच आहे.
लवकरच आपण प.पू.श्री.मामांच्या चरित्र व वाङ्मयाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी तसेच प्रचार व प्रसार कार्यासाठी एक नवीन संकेतस्थळ सुरू करीत आहोत. या स्थळावर प.पू.श्री.मामांशी संबंधित सर्व माहिती, त्यांच्या वाङ्मयावरील अभ्यासकांचे चिंतन, पू.मामांची बोधवचने, त्यांच्या स्मृतिकथा व बोधप्रसंग, प.पू.मामांची विविध छायाचित्रे असे भरपूर साहित्य सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. भविष्यात सर्वांना या संकेतस्थळाचा सातत्याने अधिकाधिक उपयोग करता येईल.
प.पू.श्री.मामांच्या ठायी फार मनोहर असे गुरुतत्त्व प्रकटलेले होते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे अतिशय अद्भुत असे करुणामय स्वरूप म्हणजेच प.पू.श्री.मामा !! याच संदर्भातला एक जगावेगळा अनुभव सोबतच्या लिंकवरील लेखात मांडलेला आहे. प.पू.श्री.मामा भगवान सद्गुरु श्री माउलींना मोठ्या प्रेमादराने 'करुणाब्रह्म' म्हणत असत. सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने प.पू.श्री.मामाही अंतर्बाह्य करुणाब्रह्मच होऊन ठाकलेले होते. त्याचाच भावगहिरा प्रत्यय प्रस्तुत लेखातील, प.पू.श्री.शिरीषदादांनी स्वत: अनुभवलेल्या गोष्टीतून आपल्याला येतो. म्हणूनच, आजच्या पुण्यदिनी प.पू.श्री.मामांच्या श्रीचरणीं या लेखाच्या वाचनाद्वारे आपण भावपुष्पांजली समर्पूया व त्यांच्याच सप्रेम स्मरणात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर

Read More

11 July 2018

चालते-बोलते विद्यापीठ


संत हे चालते बोलते विद्यापीठच असतात. त्यांच्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून आपल्यासारख्या सामान्य जनांना सतत बोधामृत मिळत असते. जो साधक डोळसपणे संतांच्या उपदेशाचे व लीलांचे अनुसंधान ठेवून त्यातून लाभलेल्या अशा अद्भुत बोधकणांचा आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वापर करतो, तो निश्चितच सुखी व समाधानी आयुष्य जगतो. त्याचा प्रपंचही त्यामुळे नकळतच परमार्थमय होऊन जातो. यासाठीच परमार्थमार्गात या संतबोधाला विशेष माहात्म दिलेले दिसून येते. 'संतसंगती' हा परमार्थ-प्रवासाचा कणाच आहे असे म्हटले जाते, ते वावगे नाही.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे तर आदर्श लोकशिक्षकच होते. अत्यंत शास्त्रपूत आणि विशुद्ध अशी जीवनशैली अंगीकारून त्यांनी सद्धर्माचा परमादर्श लोकांसमोर ठेवला. आजच्याही काळात फारसे कष्ट न होता आवश्यक असे शास्त्राचरण नक्की करता येते, याचा उत्तम वस्तुपाठच त्यांनी आपल्या स्वत:च्या वर्तनातून जगासमोर ठेवलेला आहे. अशाप्रकारे उभी हयात त्यांनी साधकांचे सर्वांगीण कल्याण करण्यात वेचली. परमार्थपूरक जीवनशैली कशी असावी? हे नीट समजून घेण्यासाठी प.पू.श्री.मामांच्या जीवनचरित्राचा अभ्यास जरूर करावा.
प.पू.श्री.मामांच्या दिनक्रमातील त्यांची एक अगदी छोटीशीच; पण आपणही दररोज सहज पालन करू शकू, अशी उत्तम सवय श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या ब्रह्मानंद ओवरी ग्रंथात सांगितलेली आहे.
"जेवण झाल्यावर प.पू.श्री.मामा आचमन करून खाली येत. खाली उतरल्यावर, देवांना नमस्कार करून त्यांच्या खांबापुढील आसनावर (आता ज्या ठिकाणी प.पू.श्री.मामांचा मोठा फोटो ठेवलेला आहे तेथे ) बसत. "भोजनोत्तर देवांना नमस्कार एवढ्याकरिता की, दोन वेळेला जे काही चार घास आपल्या पोटात जातात, ते देवांच्या कृपेमुळेच जातात !" असा खुलासा प.पू.श्री.दादांनी माझ्याजवळ एकदा केला होता. जेवण झाल्यावर देवांना नमस्कार करण्याची प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचीही जुनीच सवय आहे, हेही मी पाहिले आहे."
पाहा, अगदी छोटीशीच गोष्ट; पण जर ही सवय आपण स्वत:ला लावून घेऊन निष्ठेने सांभाळली तर किती समाधान देईल ना? आठवणीने नमस्कार तर फक्त करायचाय जेवल्यावर. त्यामुळे ही इतकी साधी व सोपी सवय लावून घ्यायला फारशी कठीणही ठरणार नाही.
श्रीभगवंतांचे 'कृतज्ञ' हे एक नाम आहे. कारण ते भगवंतही भक्तांच्या प्रेमाच्या बदल्यात कृतज्ञतेने आपल्या भक्तांचा सदैव सांभाळ करतात. म्हणूनच, त्या भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्तकरुणाकर श्रीभगवंतांप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यांच्या ऋणातच राहण्यासारखे दुसरे सुख नाही या जगात !
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
http://sadgurubodh.blogspot.in
https://www.facebook.com/sadgurubodh/


Read More

5 July 2018

अनुकरणीय श्रीगुरुभक्तीचे प्रसन्न दर्शन

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा अमृतमहोत्सव सन १९८८-८९ मध्ये भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. त्यांचा प्रथम सत्कार पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संपन्न झाला. त्या महोत्सवाच्या काही हृद्य आठवणी प.पू.श्री.मामांचे मानसपुत्र श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या      'ब्रह्मानंद ओवरी' या ग्रंथात सांगितल्या आहेत. अतिशय भावपूर्ण आणि मनोहर हकिकतींनी सजलेला हा ग्रंथ सर्व सद्गुरुभक्तांसाठी अवश्यमेव वाचनीय व मननीय आहे. उदाहरण महणून त्यातली ही छोटीशीच हकिकत पाहा किती विचार करण्यासारखी व अनुकरणीय आहे.
महोत्सवाची आठवण सांगताना श्री.पानसे एका ठिकाणी लिहितात, "सत्कारासाठी व्यासपीठावर चढताना, प.पू.सद्गुरु श्री.मामांनी व्यासपीठाला दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार केला. नंतर केव्हातरी प.पू.श्री.मामांना मी त्यासंबंधी विचारले; तेव्हा ते म्हणाले, "अरे, त्याच व्यासपीठावर काही वर्षांपूर्वी प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता !"
वास्तविक पाहता ते नाट्यगृह होते आणि त्याचे व्यासपीठ हे काही आदराचे स्थान नाही. परंतु आपल्या श्रीगुरूंचा पावन पदस्पर्श ज्या व्यासपीठाला झालेला आहे, ते त्या स्पर्शाने पुण्यपावनच झालेले आहे; शिष्य म्हणून आपल्यासाठी ते सदैव वंदनीयच आहे; अशीच प.पू.श्री.मामांची दृढ मनोधारणा होती. हृदयी वसणा-या त्या स्वाभाविक गुरुप्रेमानेच त्यांचे हात आपसूक जोडले गेले. किती दृढ आणि अलौकिक गुरुभक्ती आहे पाहा ! तुम्हां आम्हां साधकांसाठी प.पू.श्री.मामांनी फार मोठा आदर्शच येथे स्वत: आचरण करून घालून दिलेला आहे.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. 



Read More

28 June 2018

कहत कबीर सुनो भाई साधो

आज ज्येष्ठ पौर्णिमा !
आज थोर सत्पुरुष श्रीसंत कबीर महाराजांची जयंती व आळंदी येथील मागच्या पिढीतील अनन्य माउलीभक्त सत्पुरुष श्रीसंत मारुतीबुवा गुरव तसेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील थोर महासिद्ध श्रीसंत म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त या तिन्ही महात्म्यांच्या श्रीचरणीं दंडवत !
हिंदी संत जगतामध्ये श्रीसंत कबीर महाराजांचे नाव सर्वोपरि आहे. त्यांचे दोहे, साख्या, अभंग आजही अनेक भक्तांच्या नित्य पठणात आणि चिंतनात आहेत. त्यांचे वाङ्मय अतिशय सुंदर आणि खरोखरीच प्रचंड आहे. त्यांचे दोहे अत्यंत मार्मिक आणि मोजक्याच परंतु समर्पक शब्दांमध्ये अध्यात्माचे, परमार्थाचे स्वरूप सांगतात. श्रीसंत कबीर महाराजांची रसवंती अनेक विषयांमध्ये स्वच्छंद विहार करते आणि अनेक अर्थांच्या काव्य धुमाऱ्यांनी, कोंभांनी पैसावत साधक हृदयाचा ठाव घेते. त्यांची शब्दकळा काही न्यारीच आहे.
श्रीसंत तुकाराम महाराजांप्रमाणे श्री कबीर महाराज हेही परखड विचारांचे संत होते. परमार्थातील गैरसमजुती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, भोंदूगिरी, फसवणूक या सर्वांचा त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून खरपूस समाचार घेतलेला आहे.
तसेच श्रीसंत कबीर महाराजांचे सद्गुरु वर्णनपरह अनेक दोहे , साख्या आणि पदे उपलब्ध आहेत. अत्यंत भावभिजलेली अशी त्यांची मनोहर काव्यरचना आहे. सद्गुरूंसंबंधी बोलताना त्यांना राहवत नाही आणि ते फारच बहारीचे बोलून जातात. आपल्या एका सुप्रसिद्ध दोह्यात ते म्हणतात,
सब धरती कागज करू, लेखनी करू सब बनराय ।
सात समुंदकी मसी करू, गुरु गुन लिखा न जाय ।।
श्रीसंत कबीर महाराज म्हणतात की, साऱ्या पृथ्वीचा कागद केला, सर्व वृक्षांची लेखणी केली आणि सात समुद्रांची शाई केली तरी श्रीगुरूंचे गुण पूर्णपणे लिहिता येणार नाहीत.
श्री कबीर महाराज येथे अतिशयोक्ती करीत नाहीत, तर वस्तुस्थिती सांगतात. ' सद्गुरु ' हे असे अगाध तत्त्व आहे की ज्याचे समग्र आकलन होणे कधीही, कोणालाही शक्यच होणार नाही. सद्गुरूंचे गुण, माहात्म्य, अकारण दया, प्रेमळपणा, शिष्यवात्सल्य, अहैतुकी कृपा, थोरवी, श्रेष्ठपणा, ज्ञान, सर्वज्ञता या व अशा अनंत सद्गुणांची साधी यादी करणे देखील आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, तर त्यांचे वर्णन कोठून करणार ? हेच श्री कबीर महाराज या दोह्यातून सांगतात.
सद्गुरु श्री माउलींनी देखील ज्ञानेश्वरीत वेळोवेळा म्हटले आहे की, श्रीगुरूंचे माहात्म्य वर्णन करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. ज्याप्रमाणे कल्पतरूला फुलोरा आणणे, कापराला दुसऱ्याचा सुवास देणे, चंदनाला कशाचीही उटी देणे शक्य नाही; त्याचप्रमाणे,
तैसे श्रीगुरूचे महिमान ।
आकळिते के असे साधन ।
हे जाणोनिया नमन ।
निवांत केले ॥ ज्ञाने.१०.०.१३॥
श्रीगुरूंचे महिमान आकलन करून घेण्यासाठी साधनच अस्तित्वात नाही. म्हणून शांतपणे फक्त त्यांच्या श्रीचरणी मी नमन करतो. श्रीगुरूंचे गुण गाणे म्हणजे खऱ्या जातिवंत मोत्याला चमकण्यासाठी अभ्रकाचे पुट देणे किंवा शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा देण्याप्रमाणेच ठरेल. म्हणून या भानगडीत न पडता आपण आपले नमन करणेच श्रेयस्कर.
उगेयाचि माथा ठेविजे चरणी ।
हेचि भले ॥ ज्ञाने.१०.०.१५॥
अशाच आणखी एका सुंदर दोह्यात श्रीसंत कबीर महाराज शिष्य आणि गुरु यासंबंधी मत मांडतात. शिष्याने गुरूंना काय द्यायला हवे म्हणजे त्यांची कृपा होईल, हे श्रीमहाराज ह्या दोह्यातून फार सुंदर शब्दांत सांगतात.
पहिले दाता सिष भया, जिन तन मन अरपा सीस ।
पीछे दाता गुरु भये, जिन नाम दिया बकसीस ।।
श्रीमहाराज म्हणतात की; पहिल्यांदा शिष्य हा दाता असतो. तो सद्गुरूंना तन, मन आणि मस्तक अर्पण करतो. दुसऱ्यांदा सद्गुरु दाते असतात जे त्या शिष्याला 'नाम' बक्षीस देतात.
या दोह्यातून श्रीमहाराज शिष्याची लक्षणे सांगतात. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी श्रीगीतेच्या ४ थ्या अध्यायातील ' तद्विद्धि प्रणिपातेन ' या श्लोकावरील टीकेत अगदी अशाच अर्थांच्या ओव्या घातलेल्या आहेत. ते म्हणतात ; सद्गुरु हे ज्ञानाचे आश्रयस्थान असतात. त्यांची सर्वस्वाने सेवा केली तरच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल म्हणून;
तरी तनुमनजीवें ।
चरणांसी लागावें ।
आणि अगर्वता करावें ।
दास्य सकळ ॥ज्ञाने.४.३४.१६७॥
सर्वस्वाने, शरीर, मन आणि जीवाने, अहंकार समूळ टाकून देऊन या सद्गुरुरायांचे दास्य, सेवा करावी म्हणजे ते आपले सर्वस्व, आपला आत्मबोध आणि आनंद संपूर्णपणे आपल्याला देऊन टाकतात.
येथे श्रीसंत कबीर महाराज 'सीस' म्हणजे मस्तक असा उल्लेख करतात. त्याचा गर्भितार्थ 'अहंकार' असा आहे. तन, मन आणि अहंकार सर्वस्वाने त्यांच्या चरणी अर्पण केला की ते प्रसन्न होतात आणि परंपरेने आलेले पावन 'शक्तियुक्त नाम' बक्षीस म्हणून त्या जीवाला देतात. त्या परंपरेने आलेल्या सिद्ध नामाच्या अनुसंधानाने त्या शिष्याची अंतर्बाह्य शुद्धी होऊन, त्याच्या विशुद्ध झालेल्या चित्तात श्रीभगवंत पूर्णत्वाने प्रकट होतात व त्याचा परमार्थ सुफळ संपूर्ण होतो. ही नि:संशय श्रीगुरुकृपेचीच थोरवी आहे !
आजच्या पावन दिनी श्रीसंत कबीर महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
थोर वारकरी संत वै.विष्णुबुवा जोग महाराजांचे शिष्योत्तम, श्रीसंत मारुतीबुवा गुरव हे मोठे अधिकारी महात्मे होते. माउलींच्या सेवेकरी गुरव घराण्यातच जन्म झालेला असल्याने, त्यांना जन्मापासूनच माउलींच्या सेवेचे, प्रेमाचे बाळकडू मिळाले. तो वसा त्यांनी निष्ठेने सांभाळला, वाढवला आणि आजन्म श्री माउलींची प्राणपणाने सेवा केली. वै.जोग महाराजांच्या आज्ञेने, त्यांनी ज्ञानेश्वरीची १०८ दिवसांत १०८ पारायणे केली होती. त्यातील १०० पारायणे केवळ एकदा दूध पिऊन आणि शेवटची ८ पारायणे अजानवृक्षाची पडलेली पाने प्रसाद म्हणून खाऊन ! एवढी उपासना झाल्यानंतरच वै.जोग महाराजांनी त्यांना कीर्तन-प्रवचने करण्याची अनुमती दिली. पूर्वीच्या काळातील वारकरी धुरीणांची ही पद्धतच होती. आजच्यासारखी दोन चार कीर्तने प्रवचने पाठ करून केली जाणारी पोपटपंची त्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांच्यासाठी कीर्तन-प्रवचन हे श्रीभगवंतांच्या निखळ सेवेचे साधन होते. दुर्दैवाने आज तो लोकांचा पैसे व प्रसिद्धी कमवण्याचा धंदा होऊन बसलेला आहे, याचे मनस्वी वाईट वाटते.
वै.मारुतीबुवा हे परम निष्ठावान माउली भक्त आणि हाडाचे वारकरी होते. ते रात्री शेजारतीनंतर माउलींच्या समाधी मंदिरात वीणेचा पहारा करीत व पहाटे काकड्यापूर्वी स्नान आन्हिक करीत. मग देवदर्शन झाल्यावर, जेथे त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राहात, त्या वास्तूच्या उंब-यावर डोके ठेवून नमस्कार करीत. एकदा एकाने त्यांना विचारले की, "महाराज, येथे तर तुमचेच शिष्य राहतात, तुम्ही का नमस्कार करता त्या वास्तूला?" त्यावर बुवा उत्तरले, "अरे पुढे जाऊन या विद्यार्थ्यांमधून एखादा महात्मा होईल आणि माझ्या ज्ञानोबारायांची पूर्णकृपा संपादन करेल, त्याला मी आत्तापासूनच वंदन करतो !" केवढी विलक्षण माउलीनिष्ठा !!
वै.मारुतीबुवांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना वारीला जाऊ न देण्याचा निर्णय त्यांच्या घरच्यांनी घेतला. त्यांना हे सांगितल्यावर ते म्हणाले, "जन्मल्यापासून माझी वारी कधीच चुकली नाही, मी आत्ताही चुकवणार नाही." त्यांच्या चिरंजीवांनी पुन्हा एकदा सांगितले की, वारीला तुम्हाला सोडणारच नाही. त्यावर ते म्हणाले, "तुम्ही मला जाऊ देणार नसाल तर मग मी हा देहच सोडून कायमचा माउलींच्या चरणी जाईन, पण वारी न करता राहणार नाही." त्यांनी आपला शब्द खरा केला, वारीच्या आठ दिवस आधीच माउलींच्या स्मरणात आळंदीला त्यांनी आजच्या तिथीला आपल्या देहाचा त्याग केला !! धन्य ते मारुतीबुवा आणि धन्य त्यांची अनन्य माउलीनिष्ठा !! अशी संतमंडळी आता पुन्हा होणे नाही. त्यांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत !!
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ज्यांचे समाधिमंदिर आहे, ते थोर अवलिया सत्पुरुष श्रीसंत म्हादबा पाटील महाराजही विलक्षण अधिकाराचे महासिद्ध होते. वरकरणी रागीट वाटणारे, बालोन्मत्तवृत्तीने राहणारे पाटील महाराज आतून पूर्ण रंगलेले महात्मे होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा व त्यांचा विशेष प्रेमानुबंध होता. त्यांच्या लीलाही मनोहर आहेत. पू.मामांना ते साक्षात् श्रीदत्तप्रभूच मानून त्यांच्याशी फार प्रेमादराने वागत असत. पू.मामांचेही त्यांच्यावर निरतिशय प्रेम होते. प.पू.श्री.मामांच्या व त्यांच्या एकत्रित अशा अनेक लीला घडलेल्या आहेत. सांगलीला हरिपूर रोडवर  प.पू.श्री.मामांनी आपल्या सद्गुरूंच्या नावाने श्री गुळवणी महाराज प्रतिष्ठान स्थापन केलेले आहे. तेथे बांधकाम चालू असताना एकदा तेथील व्यवस्था पाहणा-या एका साधकांनी पू.मामांना पुण्यात फोन करून विचारले की, "मामा, आपल्याला प्रतिष्ठानच्या जागेत बोअर घ्यायचे आहे. कुठे घ्यावे म्हणजे भरपूर पाणी लागेल?" पू.मामा त्यावेळी पूजा करीत होते. त्यांनी निरोप दिला की, "कुठे बोअर घ्यावे हे पाटील महाराज सांगतील, त्याप्रमाणे करावे." हे साधक तेव्हा जयसिंगपूरला राहात असत. गंमत म्हणजे त्यांनी फोन ठेवून मागे वळून पाहतात तर, त्यांच्या घराच्या दारात पाटील महाराज येऊन दत्त म्हणून उभे राहिले होते. ते म्हणाले, "अरे, कशाला पू.मामांना त्रास देतोस, कुठेही घे बोअर, भरपूर पाणी लागेल, काळजी करू नकोस." पुढे खरोखरीच सोयीची जागा बघून तिथे बोअर घेतले गेले व त्याला प्रचंड पाणी लागले. पण दोन्ही महात्म्यांची ही लीला पाहा किती अद्भुत आहे. पू.मामा निरोप देतात काय, त्याक्षणी पाटील महाराज दारात येऊन काही न विचारताच प्रश्नाचे उत्तर देतात काय; सगळेच अतर्क्य आहे. पू.म्हादबा पाटील महाराजांच्या व पू.मामांच्या अशा असंख्य लीला आहेत.
पू.म्हादबा पाटील महाराजांनी देह ठेवला तेव्हा पू.मामांचे परगावी शिबीर चालू होते. तेथे त्यावेळी त्यांची प्रवचनसेवा चालू होती. मध्येच ते थोडे थांबले व त्यांनी समोरच्या श्रोत्यांना दु:खद बातमी सांगितली की, "आत्ताच आमच्या पू.म्हादबा पाटील महाराजांनी देहत्याग केला." हे सांगून झाल्यानंतर पू.मामांनी प्रवचनसेवा तेथेच पूर्ण केली. पू.मामांचा पू.पाटील महाराजांवर असा अतिशय प्रेमलोभ होता.
आज प.पू.श्री.म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराजांचे भव्य समाधिमंदिर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याही श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून स्मरणपूर्वक प्रार्थना करूया !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in )


Read More

25 June 2018

अलौकिक गुरुप्रेम


( आज २५ जून तारखेने प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची जयंती. त्यानिमित्त त्यांचे हे पुण्यस्मरण ! )
प.पू.श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांचे शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय उपाख्य मामासाहेब देशपांडे महाराज हे विसाव्या शतकातील विलक्षण अधिकारी महात्मे होते. पू.श्री.मामांच्या सर्वच चरित्रलीला तुम्हां आम्हां साधकांसाठी अतिशय बोधप्रद आणि निरंतर मार्गदर्शक आहेत.
प.पू.श्री.मामांच्याकडे त्यांचे एक परगावचे अनुगृहीत साधक दर्शनाला नेहमी येत असत. त्यांचे नाव 'वामन' होते आणि ते पेशाने शिक्षक होते. म्हणून प.पू.श्री.मामा त्यांना 'गुरुजी' असे संबोधत असत. ते एकदा प.पू.श्री.मामांना म्हणाले, "आपण मला 'वामन' अशी नावानेच मारीत जावे !" त्यावर प.पू.श्री.मामा त्यांना गंभीर होऊन म्हणाले, "असले काही तुम्ही मनात सुद्धा आणू नका. तुम्हांला जर नावाने व एकेरी संबोधले, तर माझ्या सद्गुरूंना नावाने व एकेरी संबोधल्याचे पातक माझ्या डोक्यावर बसेल !" असे म्हणत असताना देखील प.पू.श्री.मामांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचे ते विलक्षण सद्गुरुप्रेम पाहून त्या गुरुजींनाही गहिवरून आले.
प.पू.श्री.मामांच्या ठायी सद्गुरुप्रेम असे आत-बाहेर भरून राहिलेले होते. ते त्या नित्यनूतन गुरुप्रेमाचाच विविध प्रकारे सतत आस्वाद घेत असत.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
https://sadgurubodh.blogspot.com/)


Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates