28 June 2018

कहत कबीर सुनो भाई साधो

आज ज्येष्ठ पौर्णिमा !
आज थोर सत्पुरुष श्रीसंत कबीर महाराजांची जयंती व आळंदी येथील मागच्या पिढीतील अनन्य माउलीभक्त सत्पुरुष श्रीसंत मारुतीबुवा गुरव तसेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील थोर महासिद्ध श्रीसंत म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त या तिन्ही महात्म्यांच्या श्रीचरणीं दंडवत !
हिंदी संत जगतामध्ये श्रीसंत कबीर महाराजांचे नाव सर्वोपरि आहे. त्यांचे दोहे, साख्या, अभंग आजही अनेक भक्तांच्या नित्य पठणात आणि चिंतनात आहेत. त्यांचे वाङ्मय अतिशय सुंदर आणि खरोखरीच प्रचंड आहे. त्यांचे दोहे अत्यंत मार्मिक आणि मोजक्याच परंतु समर्पक शब्दांमध्ये अध्यात्माचे, परमार्थाचे स्वरूप सांगतात. श्रीसंत कबीर महाराजांची रसवंती अनेक विषयांमध्ये स्वच्छंद विहार करते आणि अनेक अर्थांच्या काव्य धुमाऱ्यांनी, कोंभांनी पैसावत साधक हृदयाचा ठाव घेते. त्यांची शब्दकळा काही न्यारीच आहे.
श्रीसंत तुकाराम महाराजांप्रमाणे श्री कबीर महाराज हेही परखड विचारांचे संत होते. परमार्थातील गैरसमजुती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, भोंदूगिरी, फसवणूक या सर्वांचा त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून खरपूस समाचार घेतलेला आहे.
तसेच श्रीसंत कबीर महाराजांचे सद्गुरु वर्णनपरह अनेक दोहे , साख्या आणि पदे उपलब्ध आहेत. अत्यंत भावभिजलेली अशी त्यांची मनोहर काव्यरचना आहे. सद्गुरूंसंबंधी बोलताना त्यांना राहवत नाही आणि ते फारच बहारीचे बोलून जातात. आपल्या एका सुप्रसिद्ध दोह्यात ते म्हणतात,
सब धरती कागज करू, लेखनी करू सब बनराय ।
सात समुंदकी मसी करू, गुरु गुन लिखा न जाय ।।
श्रीसंत कबीर महाराज म्हणतात की, साऱ्या पृथ्वीचा कागद केला, सर्व वृक्षांची लेखणी केली आणि सात समुद्रांची शाई केली तरी श्रीगुरूंचे गुण पूर्णपणे लिहिता येणार नाहीत.
श्री कबीर महाराज येथे अतिशयोक्ती करीत नाहीत, तर वस्तुस्थिती सांगतात. ' सद्गुरु ' हे असे अगाध तत्त्व आहे की ज्याचे समग्र आकलन होणे कधीही, कोणालाही शक्यच होणार नाही. सद्गुरूंचे गुण, माहात्म्य, अकारण दया, प्रेमळपणा, शिष्यवात्सल्य, अहैतुकी कृपा, थोरवी, श्रेष्ठपणा, ज्ञान, सर्वज्ञता या व अशा अनंत सद्गुणांची साधी यादी करणे देखील आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, तर त्यांचे वर्णन कोठून करणार ? हेच श्री कबीर महाराज या दोह्यातून सांगतात.
सद्गुरु श्री माउलींनी देखील ज्ञानेश्वरीत वेळोवेळा म्हटले आहे की, श्रीगुरूंचे माहात्म्य वर्णन करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. ज्याप्रमाणे कल्पतरूला फुलोरा आणणे, कापराला दुसऱ्याचा सुवास देणे, चंदनाला कशाचीही उटी देणे शक्य नाही; त्याचप्रमाणे,
तैसे श्रीगुरूचे महिमान ।
आकळिते के असे साधन ।
हे जाणोनिया नमन ।
निवांत केले ॥ ज्ञाने.१०.०.१३॥
श्रीगुरूंचे महिमान आकलन करून घेण्यासाठी साधनच अस्तित्वात नाही. म्हणून शांतपणे फक्त त्यांच्या श्रीचरणी मी नमन करतो. श्रीगुरूंचे गुण गाणे म्हणजे खऱ्या जातिवंत मोत्याला चमकण्यासाठी अभ्रकाचे पुट देणे किंवा शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा देण्याप्रमाणेच ठरेल. म्हणून या भानगडीत न पडता आपण आपले नमन करणेच श्रेयस्कर.
उगेयाचि माथा ठेविजे चरणी ।
हेचि भले ॥ ज्ञाने.१०.०.१५॥
अशाच आणखी एका सुंदर दोह्यात श्रीसंत कबीर महाराज शिष्य आणि गुरु यासंबंधी मत मांडतात. शिष्याने गुरूंना काय द्यायला हवे म्हणजे त्यांची कृपा होईल, हे श्रीमहाराज ह्या दोह्यातून फार सुंदर शब्दांत सांगतात.
पहिले दाता सिष भया, जिन तन मन अरपा सीस ।
पीछे दाता गुरु भये, जिन नाम दिया बकसीस ।।
श्रीमहाराज म्हणतात की; पहिल्यांदा शिष्य हा दाता असतो. तो सद्गुरूंना तन, मन आणि मस्तक अर्पण करतो. दुसऱ्यांदा सद्गुरु दाते असतात जे त्या शिष्याला 'नाम' बक्षीस देतात.
या दोह्यातून श्रीमहाराज शिष्याची लक्षणे सांगतात. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी श्रीगीतेच्या ४ थ्या अध्यायातील ' तद्विद्धि प्रणिपातेन ' या श्लोकावरील टीकेत अगदी अशाच अर्थांच्या ओव्या घातलेल्या आहेत. ते म्हणतात ; सद्गुरु हे ज्ञानाचे आश्रयस्थान असतात. त्यांची सर्वस्वाने सेवा केली तरच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल म्हणून;
तरी तनुमनजीवें ।
चरणांसी लागावें ।
आणि अगर्वता करावें ।
दास्य सकळ ॥ज्ञाने.४.३४.१६७॥
सर्वस्वाने, शरीर, मन आणि जीवाने, अहंकार समूळ टाकून देऊन या सद्गुरुरायांचे दास्य, सेवा करावी म्हणजे ते आपले सर्वस्व, आपला आत्मबोध आणि आनंद संपूर्णपणे आपल्याला देऊन टाकतात.
येथे श्रीसंत कबीर महाराज 'सीस' म्हणजे मस्तक असा उल्लेख करतात. त्याचा गर्भितार्थ 'अहंकार' असा आहे. तन, मन आणि अहंकार सर्वस्वाने त्यांच्या चरणी अर्पण केला की ते प्रसन्न होतात आणि परंपरेने आलेले पावन 'शक्तियुक्त नाम' बक्षीस म्हणून त्या जीवाला देतात. त्या परंपरेने आलेल्या सिद्ध नामाच्या अनुसंधानाने त्या शिष्याची अंतर्बाह्य शुद्धी होऊन, त्याच्या विशुद्ध झालेल्या चित्तात श्रीभगवंत पूर्णत्वाने प्रकट होतात व त्याचा परमार्थ सुफळ संपूर्ण होतो. ही नि:संशय श्रीगुरुकृपेचीच थोरवी आहे !
आजच्या पावन दिनी श्रीसंत कबीर महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
थोर वारकरी संत वै.विष्णुबुवा जोग महाराजांचे शिष्योत्तम, श्रीसंत मारुतीबुवा गुरव हे मोठे अधिकारी महात्मे होते. माउलींच्या सेवेकरी गुरव घराण्यातच जन्म झालेला असल्याने, त्यांना जन्मापासूनच माउलींच्या सेवेचे, प्रेमाचे बाळकडू मिळाले. तो वसा त्यांनी निष्ठेने सांभाळला, वाढवला आणि आजन्म श्री माउलींची प्राणपणाने सेवा केली. वै.जोग महाराजांच्या आज्ञेने, त्यांनी ज्ञानेश्वरीची १०८ दिवसांत १०८ पारायणे केली होती. त्यातील १०० पारायणे केवळ एकदा दूध पिऊन आणि शेवटची ८ पारायणे अजानवृक्षाची पडलेली पाने प्रसाद म्हणून खाऊन ! एवढी उपासना झाल्यानंतरच वै.जोग महाराजांनी त्यांना कीर्तन-प्रवचने करण्याची अनुमती दिली. पूर्वीच्या काळातील वारकरी धुरीणांची ही पद्धतच होती. आजच्यासारखी दोन चार कीर्तने प्रवचने पाठ करून केली जाणारी पोपटपंची त्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांच्यासाठी कीर्तन-प्रवचन हे श्रीभगवंतांच्या निखळ सेवेचे साधन होते. दुर्दैवाने आज तो लोकांचा पैसे व प्रसिद्धी कमवण्याचा धंदा होऊन बसलेला आहे, याचे मनस्वी वाईट वाटते.
वै.मारुतीबुवा हे परम निष्ठावान माउली भक्त आणि हाडाचे वारकरी होते. ते रात्री शेजारतीनंतर माउलींच्या समाधी मंदिरात वीणेचा पहारा करीत व पहाटे काकड्यापूर्वी स्नान आन्हिक करीत. मग देवदर्शन झाल्यावर, जेथे त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राहात, त्या वास्तूच्या उंब-यावर डोके ठेवून नमस्कार करीत. एकदा एकाने त्यांना विचारले की, "महाराज, येथे तर तुमचेच शिष्य राहतात, तुम्ही का नमस्कार करता त्या वास्तूला?" त्यावर बुवा उत्तरले, "अरे पुढे जाऊन या विद्यार्थ्यांमधून एखादा महात्मा होईल आणि माझ्या ज्ञानोबारायांची पूर्णकृपा संपादन करेल, त्याला मी आत्तापासूनच वंदन करतो !" केवढी विलक्षण माउलीनिष्ठा !!
वै.मारुतीबुवांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना वारीला जाऊ न देण्याचा निर्णय त्यांच्या घरच्यांनी घेतला. त्यांना हे सांगितल्यावर ते म्हणाले, "जन्मल्यापासून माझी वारी कधीच चुकली नाही, मी आत्ताही चुकवणार नाही." त्यांच्या चिरंजीवांनी पुन्हा एकदा सांगितले की, वारीला तुम्हाला सोडणारच नाही. त्यावर ते म्हणाले, "तुम्ही मला जाऊ देणार नसाल तर मग मी हा देहच सोडून कायमचा माउलींच्या चरणी जाईन, पण वारी न करता राहणार नाही." त्यांनी आपला शब्द खरा केला, वारीच्या आठ दिवस आधीच माउलींच्या स्मरणात आळंदीला त्यांनी आजच्या तिथीला आपल्या देहाचा त्याग केला !! धन्य ते मारुतीबुवा आणि धन्य त्यांची अनन्य माउलीनिष्ठा !! अशी संतमंडळी आता पुन्हा होणे नाही. त्यांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत !!
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ज्यांचे समाधिमंदिर आहे, ते थोर अवलिया सत्पुरुष श्रीसंत म्हादबा पाटील महाराजही विलक्षण अधिकाराचे महासिद्ध होते. वरकरणी रागीट वाटणारे, बालोन्मत्तवृत्तीने राहणारे पाटील महाराज आतून पूर्ण रंगलेले महात्मे होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा व त्यांचा विशेष प्रेमानुबंध होता. त्यांच्या लीलाही मनोहर आहेत. पू.मामांना ते साक्षात् श्रीदत्तप्रभूच मानून त्यांच्याशी फार प्रेमादराने वागत असत. पू.मामांचेही त्यांच्यावर निरतिशय प्रेम होते. प.पू.श्री.मामांच्या व त्यांच्या एकत्रित अशा अनेक लीला घडलेल्या आहेत. सांगलीला हरिपूर रोडवर  प.पू.श्री.मामांनी आपल्या सद्गुरूंच्या नावाने श्री गुळवणी महाराज प्रतिष्ठान स्थापन केलेले आहे. तेथे बांधकाम चालू असताना एकदा तेथील व्यवस्था पाहणा-या एका साधकांनी पू.मामांना पुण्यात फोन करून विचारले की, "मामा, आपल्याला प्रतिष्ठानच्या जागेत बोअर घ्यायचे आहे. कुठे घ्यावे म्हणजे भरपूर पाणी लागेल?" पू.मामा त्यावेळी पूजा करीत होते. त्यांनी निरोप दिला की, "कुठे बोअर घ्यावे हे पाटील महाराज सांगतील, त्याप्रमाणे करावे." हे साधक तेव्हा जयसिंगपूरला राहात असत. गंमत म्हणजे त्यांनी फोन ठेवून मागे वळून पाहतात तर, त्यांच्या घराच्या दारात पाटील महाराज येऊन दत्त म्हणून उभे राहिले होते. ते म्हणाले, "अरे, कशाला पू.मामांना त्रास देतोस, कुठेही घे बोअर, भरपूर पाणी लागेल, काळजी करू नकोस." पुढे खरोखरीच सोयीची जागा बघून तिथे बोअर घेतले गेले व त्याला प्रचंड पाणी लागले. पण दोन्ही महात्म्यांची ही लीला पाहा किती अद्भुत आहे. पू.मामा निरोप देतात काय, त्याक्षणी पाटील महाराज दारात येऊन काही न विचारताच प्रश्नाचे उत्तर देतात काय; सगळेच अतर्क्य आहे. पू.म्हादबा पाटील महाराजांच्या व पू.मामांच्या अशा असंख्य लीला आहेत.
पू.म्हादबा पाटील महाराजांनी देह ठेवला तेव्हा पू.मामांचे परगावी शिबीर चालू होते. तेथे त्यावेळी त्यांची प्रवचनसेवा चालू होती. मध्येच ते थोडे थांबले व त्यांनी समोरच्या श्रोत्यांना दु:खद बातमी सांगितली की, "आत्ताच आमच्या पू.म्हादबा पाटील महाराजांनी देहत्याग केला." हे सांगून झाल्यानंतर पू.मामांनी प्रवचनसेवा तेथेच पूर्ण केली. पू.मामांचा पू.पाटील महाराजांवर असा अतिशय प्रेमलोभ होता.
आज प.पू.श्री.म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराजांचे भव्य समाधिमंदिर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याही श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून स्मरणपूर्वक प्रार्थना करूया !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in )


1 comment:

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates