सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने आपण त्यांच्या दिव्य-पावन हरिपाठातील पाच अभंग पाहिले. आता महत्त्वाचा असा सहावा अभंग पाहूया.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या अभंगाचे महत्त्व सांगताना म्हणतात, "सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील सर्वच अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. परंतु ज्याप्रमाणे एका वर्गातील विद्यार्थांपैकी दोघांनी सारखे गुण मिळवले तरी, त्यांचा नेहमीचा अभ्यास पाहून, त्यांतील एकालाच क्रमांक द्यावा लागतो; तसे सर्व अभंग सारख्याच मोलाचे असले, तरी त्यातील जे दोन-तीन महत्त्वाचे अभंग आहेत, त्यांत या सहाव्या अभंगाचा क्रमांक वरचा आहे. कारण, परमेश्वराची ओळख होण्यासाठी ज्या सत्संगतीची जरुरी असते, ती या अभंगाचे मर्म आहे.
इतकेच काय; *'सर्वं खल्विदं ब्रह्म ।'* हा वेदान्ताचा अंतिम निर्णय देखील या अभंगाद्वारे सांगितला आहे; व तो ज्यांच्यामुळे अनुभवास येतो, ते साधू कसे असतात? तेही दाखविले आहे. म्हणूनच या अभंगाला श्रेष्ठता प्राप्त झालेली आहे !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
7 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८१ ॥*
6 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८० ॥*
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठातून साधकांना अत्यंत मौलिक उपदेश करतात. त्यांचे प्रत्येक शब्द हे अमृतासमान आहेत.
हरिपाठातील या पाचव्या अभंगाचे सार सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *"भक्ती अंगी बाणण्यासाठी श्रीगुरूंची कृपा संपादित करून, श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करणे अत्यावश्यक आहे; आणि हेच माउलींचे या अभंगातून आग्रहाचे सांगणे आहे!"*
सद्गुरु श्री माउलींनी या अभंगात वापरलेल्या 'गूज' या शब्दाचा सुरेख व अनवट अर्थ पू.मामांनी सांगितलेला आहे. ते गूज असल्यानेच गुरुकृपा लाभली. कारण; "भक्ती ही मुख्यत्वेकरून संतांच्या कृपेनेच लाभते", असे देवर्षी नारद आपल्या भक्तिसूत्रांमध्ये स्पष्ट सांगतात; आणि ती कृपा गूज असल्याशिवाय होत नसते. अशी दिव्य कृपा लाभल्यावरही, तितक्याच प्रेमाने, निष्ठेने व सातत्याने आपण साधना देखील करावी लागते; तरच सत्संगतीतला तरणोपाय पूर्णपणे हाती येतो. म्हणून भाग्याने लाभलेली साधना प्राणपणाने, दररोज चढत्या वाढत्या प्रमाणात करणे; हेच माउलींच्या वचनांचे सार असून ते आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणेच वागले पाहिजे.
(आजचा पू.मामांचा हा फोटो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पू.मामा अगदी माशाला लाजवेल इतके सुंदर पोहत असत. एकदा ते असे पोहत पोहत नर्मदामैयाच्या पात्रामधील एका खडकावर जाऊन बसले. तेव्हा तीरावरून काढलेल्या त्यांच्या या फोटोमध्ये, त्यांच्या उजव्या पायाच्या करंगळीतून पडणारी पाण्याची धार स्पष्ट दिसते आहे. त्या धारेमुळे नर्मदेच्या पाण्यात तयार झालेल्या फेसाळ बुडबुड्यांचा शुभ्र पांढरा गोलाकार तरंगही फोटोत अगदी स्पष्ट दिसतोय. *"तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि", अर्थात् संत आपल्या स्पर्शाने तीर्थांनाही तीर्थत्व प्रदान करतात, या नारदवचनाचे साक्षात् प्रमाण या अद्भुत छायाचित्रात पाहायला मिळते !* )
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
5 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *५ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७९ ॥*
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींना अभिप्रेत असलेल्या व साधुसंगतीतून लाभणा-या तरणोपायासाठी आदर्श म्हणून पू.पार्वतीदेवी श्रीगुरुचरित्रातील दीपक शिष्याची कथा सांगत असत. त्याच विवेचनाच्या ओघात पू.पार्वतीदेवी याच्या पूर्णपणे उलटे उदाहरणही आवर्जून देत असत. काय अनुसरावे? हे नीट कळण्यासाठी, चुकूनही काय अनुसरू नये? हेही माहीत असायला नको का?दीपकाच्या रूपाने निष्ठावंत व अनन्य शिष्योत्तम पाहिला; आता स्वार्थी व निरुपयोगी शिष्यही पाहूया.
एक गुरु व शिष्य होते. त्या गुरूंनी लाडू, पेढे बर्फी वगैरे दिली की तो शिष्य म्हणायचा, "महाराज, आपली आज्ञा कशी मोडू?" अाणि ते पदार्थ प्रसाद म्हणून तत्परतेने खाऊन टाकायचा.
एकदा त्याच्या गुरूंनी विचार केला की, याची 'आज्ञे'ची व्याख्या तरी काय आहे ते पाहावे. म्हणून त्यांनी त्या शिष्याला एका गावी जाऊन काही काम करून येण्यास सांगितले. ते एकताच तो ओकसाबोकशी रडू लागला व म्हणाला, "महाराज! आपले चरण कसे सोडू?" हे ऐकून गुरूंनी त्याची स्वार्थी मनोवृत्ती पक्की ओळखली व हा निरुपयोगी आहे, याची खूणगाठही त्यांनी बांधली. असले शिष्यपण परमार्थासाठी अयोग्य आहे, हे आपण नीट समजून घ्यायला हवे व चुकूनही त्या वाटेला जाता कामा नये.
म्हणूनच, माउली म्हणतात की, *"साधूंच्या संगतीत स्वार्थाने राहून काहीच फायदा होत नाही. त्यांना अनन्य शरण जाऊन, त्यांची कृपा संपादन करून, ते सांगतील तसे तप करून जन्माचे सार्थक करून घेणे, हीच खरी भक्ती आहे !"*
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
4 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७८ ॥*
*'साधूंचे संगती तरणोपाय ।'* या श्री माउलींच्या वचनासंदर्भात, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी श्रीगुरुचरित्रातील दीपक शिष्याचे उदाहरण नेहमी देत असत.
वेदधर्म नावाचे एक थोर मुनी होते. त्यांचा एक दीपक नावाचा निष्ठावंत शिष्यही होता. एकदा त्या गुरूंनी आपल्या शिष्यांना विचारले की, "मला माझे काही कर्मभोग भोगून संपवायचे आहेत. तेव्हा त्याप्रसंगी सेवा करण्यास कोणी तयार आहे का?" त्यावर त्यांचा तो दीपक शिष्य सेवेसाठी तयार झाला.
दोघे काशीला गेले. तेथे गुरूंना दुर्धर कुष्ठरोग झाला. दीपक प्रेमाने सर्व प्रकारची सेवा करीत होता. परंतु जे त्याने करावे, ते उलटे लेखून गुरूंनी त्याला छळावे असे सुरू झाले. तरीही दीपकाने नेटाने सेवा चालूच ठेवली.
त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले व वर माग म्हणाले. दीपकाने स्वत:करिता काही न मागता, "माझ्या गुरूंचा रोग बरा होऊ दे! " असे मागितले. हे ऐकताच गुरु रागावून म्हणाले, "तुला सेवेचा कंटाळा आला; म्हणूनच तू असे मागितलेस!" तेव्हा तो शिष्य ओशाळला व देवांकडे जाऊन माफी मागून आला. त्यानंतर भगवान विष्णू प्रकट झाले; तरीही त्याने काहीही मागितले नाही. हे पाहून त्याचे गुरु वेदधर्ममुनी प्रसन्न झाले व त्यांनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली.
सद्गुरु श्री माउली 'साधूंची संगत' जी करायला सांगतात, ती अशी करायला सांगतात. नुसती संगत नाही तर पक्की निष्ठा, निरलस, निरपेक्ष सेवा व अनन्य शरणागतीही त्यात त्यांना अभिप्रेत आहे ! साधकाच्या दृष्टीने ही अनन्यताच त्याच्या भक्तीतले 'गूज' आहे; आणि ते पूर्णपणे प्रकट झाल्याशिवाय श्रीगुरूंची पूर्णकृपाही होत नसते. म्हणून माउली म्हणतात की, अशी संगती साधली तरच खरा तरणोपाय लाभतो.
पू.पार्वतीदेवी ही दीपकाची कथा पू.मामांना वारंवार वाचायला सांगत असत. कारण, साधक म्हणून आधी हीच गुरुभक्ती, गुरुशरणागती आपल्या मनावर पक्की ठसायला हवी. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे देखील म्हणतात की, "श्रीगुरुचरित्रातील दीपक शिष्याचे आख्यान हे सर्व साधकांनी निरंतर चिंतनात ठेवावे इतके महत्त्वपूर्ण आहे!"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
3 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७७ ॥*
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, *"ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूंचे संगतीं तरणोपाय ॥५.४॥"* श्री माउलींना अभिप्रेत असणारे या चरणाचे मर्म सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "मुखाने हरि हरि म्हणत गेलो की त्या पुण्याईच्या बळावर कोणीतरी मार्गदर्शक भेटेल; व त्यांनी पुढील मार्ग दाखवल्यावर, त्या मार्गाने जाताना साधूंच्या संगतीत तरणोपाय होईल. सत्संग लाभला, पण तसे वागलेच नाही, तर मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही. संतांच्या नुसत्या संगतीत राहून फायदा नाही; तर ते सांगतील तसे तप करणे व तेही प्रेमाने करणे हीच खरी सत्संगती व तीच खरी 'भक्ती' होय !
यासाठीच माउली मुद्दाम शब्द वापरतात 'दृष्टांताची मात'. ते म्हणतात की, मी माझ्या सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवल्यामुळे, मला ख-या दृष्टांताची भाषा कळली व त्याद्वारे भवरोगावर मात करता आली. साधूंच्या संगतीचे मर्म नीट समजले व तसे वागल्याने, तप केल्याने मी या संसारबंधनातून सुटलो."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
2 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७६ ॥*
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगाच्या शेवटी, *"साधूंचे संगतीं तरणोपाय ॥"* असा फार महत्त्वाचा सिद्धांत मांडतात. परमार्थात या साधूसंगतीला अतिशय महत्त्व दिलेले आहे.
यावर भाष्य करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "या अभंगाचा सारांश म्हणजे, आपण सोबत आणलेली कर्मे भोगत असताना, त्याबद्दल कोणालाही दोष न देता, श्रीगुरूंनी दाखविलेल्या वाटेने निष्ठेने जावे. जो असे वागतो, त्यालाच साधूंच्या संगतीने होणारा तरणोपाय अनुभवास येतो. तरणोपाय म्हणजे तरून जाण्याचा उपाय.
श्रीगुरूंनी दाखविलेल्या मार्गाने निष्ठाप्रेमाने गेले की विवेकरूपी तीर्थाच्या तीरावर आपण सुखरूप पोचतो व तेथेच आपल्या बुद्धीने जन्मजन्मांतरी साठवलेला मळ धुतला जाऊन ती बुद्धी शुद्ध होते. अशा शुद्ध बुद्धीतच परमात्मा प्रकट होत असतो. पण त्यासाठी श्रीगुरूंनी दिलेले साधन भक्तीने, प्रेमाने करणे अगत्याचे आहे. कारण भाव प्रेमाशिवाय निर्माण होत नाही. प्रेमामुळे वृद्धिंगत झालेला भाव म्हणजेच भक्ती होय !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
*॥ अमृतबोध ॥* *१ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७५ ॥*
सद्गुरु भगवान श्री माउली म्हणतात की, गूज असेल तर हिताचे मार्गदर्शन होते. यावर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज स्वत:चा एक सुंदर अनुभव सांगतात.
एकदा पू.मामा व त्यांचे देशपांडे आडनावाचेच एक गुरुबंधू मुंबईहून पुण्यास आले व लगेच प.पू.श्री.गुळवणी महाराजांच्या दर्शनास गेले. दर्शन झाल्यावर प.पू.श्री.महाराजांनी त्या दुस-यांची भोजनाची व्यवस्था करण्यास सांगितली व पू.मामांना म्हणाले, "खाली टांगा उभा आहे ना? मग लगेच जा व संध्या वगैरे करून घे !"
हे ऐकून पू.मामांच्या मनात आले की, "महाराजांनी आपल्याला एक सांगितले व त्याला दुसरे कसे काय सांगितले?" दुस-या दिवशी ते गुरुबंधू पुढील गावास निघून गेले. पू.मामा आश्रमात गेले तेव्हा याबद्दल श्रीगुरुमहाराजांना विचारावे, असे त्यांच्या मनात होतेच. त्याचवेळी श्री.महाराज स्वत:हूनच त्यांना म्हणाले, "अरे, काल त्याची भोजनाची व्यवस्था करून तुला मात्र स्नानसंध्या करायला पाठवले, याचा तुझ्या मनात विकल्प येणे शक्य आहे. परंतु तुझा संध्येचा नियम मोडू नये, म्हणूनच मी तसे सांगितले. कारण माउलीच म्हणतात ना, *"आता नियमचि हा एकला । जीवें करावा आपुला ।(ज्ञाने.६.२५.३८०)"* तो नियम मोडला तर तू पोहोचलेल्या ठिकाणावरून घसरू नयेस, ह्याची काळजी घेतली मी. तो कधीच काही करत नाही व तो पोटार्थी; म्हणून त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली!"
याला म्हणतात 'गूज' ! श्रीगुरुमहाराजांनी आपल्या शिष्याच्या परमार्थाची अशी न सांगताच पूर्ण काळजी वाहिली; कारण या गुरुशिष्यांच्या मध्ये खरे गूज होते.
प.पू.श्री.मामा हा अनुभव सांगून पुढे म्हणतात, "श्रीगुरु महाराजांचे शब्द ऐकून माझ्या मनातला किंतू तर गेलाच, पण माझा चालू असलेला नियम आणखी प्रेमाने पुढे सुरू राहिला. यालाच म्हणतात, *"साधूंचे संगती तरणोपाय ॥हरि.५.४॥"*
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...