Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

28 July 2022

श्रीपादवचनसुधा - १

संतवचनांच्या शांतस्निग्ध प्रकाशाने आपल्या चित्तातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो आणि त्या अमृतमय बोधप्रकाशाने आपले अंत:करण उजळून निघते. उत्तरोत्तर त्या ज्ञानप्रकाशाचे प्रेमादरपूर्वक अनुसरण केल्यास आपले संपूर्ण आयुष्यच उजळून निघते.

आज गुरुपुष्य-अमृतसिद्धियोग आणि दीप अमावास्या. त्यानिमित्त विलक्षण ऋतंभरा-प्रज्ञेचे महान आचार्य आणि संतवाङ्मयाचे रसज्ञ जाणकार प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वाङ्मयातील अमृतोपम बोध-दीपांचा 'श्रीपादवचनसुधा' हा नवीन उपक्रम आजपासून सुरू करीत आहोत. प्रत्येक गुरुवारी ही बोधमय 'श्रीपादवचनसुधा' आपल्याला प्राप्त होईल. आपण सर्वांनी ह्या मार्मिक बोधवचनांचे मनन-चिंतन करून स्वहित साधावे ही प्रार्थना !

'ह्या करुणापूर्ण शब्ददीपांच्या तेजस्वी प्रकाशाने तुम्हां-आम्हां सर्वांचा साधनापथ उजळून निघो, अमृतमय होवो' याच मन:पूर्वक शुभेच्छा !!


श्रीपादवचनसुधा - १


साधनेने उणेपणा जातो : 


नियमित केलेल्या साधनेने जसे शरीरातील उणेपण निघून जाते, तसाच मनातील उणेपणाही कमी होत जातो.

आम्ही काय करतो ? तर पुण्य जमवितो आणि पाप भोगतो. संतांना सुद्धा दुःखे वाट्याला येतात. आम्हांला काहीजण विचारतात की, “जे लोक खून-बिन करतात, त्यांचे काय होते ?” तर त्यांचा पुण्यक्षय होतो. तेच पुढे महारोगी होतात. संत-महात्मेही पाप व पुण्य घेऊनच जन्माला येतात; पण ते आनंदाने दुःख सोसतात व समाधानाने नवीन पुण्यसंचय करतात. त्यामुळे त्यांचे या जन्मीचे पुण्यकर्म व मागील जन्मीचे पुण्यकर्म असे एकवटून येते व ते मोठे होतात.

पण अशा मिळालेल्या मोठेपणाचा जर कोणी दुरुपयोग केला आणि तशी दुर्बुद्धी झाली, तर मग मात्र खेटे बसतात. साधना मिळालेल्या माणसाला, नियमाने आणि प्रेमाने साधना करणाऱ्या माणसाला मात्र सहसा तशी बुद्धी होतच नाही. कारण 'सदा संतांपाशीं जावें । (स्तो.सं.२५८.१)', या उक्तीप्रमाणे, खऱ्या संत-सद्गुरूंपाशी गेल्याने काय होते ? तर परब्रह्म साक्षात्काराला तो साधक योग्य होतो व देव त्याला दर्शन देतात !


- प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज.


(प.पू.श्री.मामांच्या 'अवीट गे माये विटेना' ग्रंथामधून संकलित.)

Read More

15 July 2020

॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥

॥ अमृतबोध ॥

॥ हरिपाठ मंजिरी - २००  ॥

श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झालेले सोने दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याचे काही सोने करू शकत नाही. म्हणून सर्वांनाच स्वत:च्या मुक्तीनंतर इतरांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ते ज्ञान मिळणे ही फार महत्त्वाची स्थिती आहे. म्हणूनच श्री तुकोबाराय महाराज म्हणतात, "सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्यारें होऊं नका रानभरी ॥"
असा जाणत्या व दावित्या सद्गुरूंकडून ज्याला श्रीगुरुकृपेचा लाभ झाला नाही ; म्हणजेच श्रीगुरूंच्या कृपेने जीवात्म्यास 'सुषुम्ना मार्ग' (म्हणजेच 'वाट') ; ज्या वाटेने जायचे व परमात्मरूप व्हायचे ; ती वाट सापडवून दिली जात नाही, तोपर्यंत अद्वैत सिद्धांताचे ज्ञान होणार नाही व ते ज्ञान ज्याला नाही, 'त्यां कैचे कीर्तन घडे नामी ?' त्याला खऱ्या अर्थाने कीर्तन घडणार नाही, असे श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील तिसऱ्या चरणात सांगतात.
आता 'खरे कीर्तन किंवा संकीर्तन' म्हणजे काय ? हे प.पू.श्री.मामा सविस्तर सांगतात, ते आपण उद्यापासून पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

14 July 2020

॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - १९९ ॥

॥ अमृतबोध ॥

॥ हरिपाठ मंजिरी - १९९  ॥

सद्गुरु श्री माउलींनी हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात "गुरुविणें ज्ञान" असे जे म्हटले आहे, त्याच संदर्भाने श्रीसंत तुकाराम महाराजही म्हणतात की, "सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । ( स.सं.तु.३५४३.२)" म्हणजे सापडवून दिलेल्या वाटेने गंगास्नानास जाताना ते अनुभविता येईल. 
परंतु लोक हा अभंग म्हणताना, 'सापडली वाट' असे म्हणतात. तर ते तसे नाही. कारण श्रीसंत तुकोबारायांना वाट 'सापडली' नाही, तर त्यांच्या श्रीसद्गुरुरायांनी ती त्यांना 'सापडवून दिली'. ही वाट आपली आपल्याला कधीच सापडत नसते, ती श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दाखवून द्यायची, सापडवून द्यायची असते.
म्हणून त्याच अभंगात पुढे श्रीतुकोबाराय म्हणतात की, "मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।" त्यांच्या मस्तकावर त्यांचे सद्गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांनी "जाणता कर" ठेवला. म्हणजे त्यांच्या श्रीगुरूंकडून त्यांना अद्वैताची अनुभूती मिळाली असून, ती अनुभूती पुन्हा इतरांना देण्याची कला देखील सांगितली गेली आहे. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

13 July 2020

॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - १९८ ॥

॥ अमृतबोध ॥

॥ हरिपाठ मंजिरी - १९८ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" श्रीगुरूंच्या कृपेशिवाय द्वैताची झाडणी होणार नाही. पण त्यासाठी ते श्रीगुरु आधी पूर्ण अनुभवी असावे लागतात.
गुरु अनुभवी नसतील तर काय गंमत होते ? ह्यासाठी प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री प.पू.पार्वतीदेवी एक मजेदार गोष्ट सांगत असत. 
एकदा एका मनुष्याला काही दोषाने एका वस्तूच्या जागी दोन दोन वस्तू दिसू लागल्या. तेव्हा तो एका नेत्रतज्ज्ञाकडे गेला व आपल्याला काय होते आहे ते सांगू लागला. तेव्हा तो नेत्रतज्ज्ञ त्याला म्हणाला, "एवढ्या साध्या गोष्टीसाठी तुम्हा तिघे कशाला आलात ?" कारण त्या वैद्यालाच एका वस्तूच्या तीन वस्तू दिसत असत !
आता विचार करा, अशा तीन वस्तू दिसणाऱ्या वैद्याकडून ज्याला इलाज करून घ्यायचा आहे, त्याची योग्य चिकित्सा होईल का कधी ? म्हणूनच श्री माउली म्हणतात की, "गुरुविणें ज्ञान ।" श्रीगुरु असे हवेत की ज्यांची नुसती दृष्टीच अद्वैती नसून, अनुभूतीही तीच आहे. त्यांना शरण गेल्यास साधकालाही तीच दृष्टी लाभेल. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

4 July 2020

अमृतबोध ॥ ४ जुलै ॥ हरिपाठ मंजिरी - १९७ ॥



सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" यातील 'द्वैताची झाडणी'चा मार्मिक अर्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागेल. जसे सोनाराची भट्टी झाडली की तेथे सोन्याचांदीचे कण दिसू लागतात किंवा आरशावरची धूळ झाडली की आपलाच चेहरा उत्तम दिसू लागतो. त्याप्रमाणे द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागते.
भ्रमामुळे एकाचे दोन दिसते. तो डोळ्यांतील दोष वैद्याकडून काढून घेतला म्हणजे, जरी डोळे दोन असले तरी दिसते एकच. दोन टिपऱ्या असल्या तरी नाद एकच निघतो त्यांतून. किंवा पाय दोन असले तरी चाल एकच असते. तसेच द्वैत झाडल्यावर हे अद्वैत स्पष्ट दिसू लागते.
जसा डोळ्यांचा दोष अनुभवी वैद्य दूर करतो, तसाच हा द्वैताचा दोष केवळ अनुभवी श्रीसद्गुरूच दूर करतात. त्या सद्गुरूंची दृष्टीच नुसती अद्वैती नसते तर त्यांना तसाच अनुभवही असतो. अशा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने गेल्यास साधकालाही तीच दृष्टी प्राप्त होते. म्हणूनच श्री माउली पुढे "गुरुविणें ज्ञान" असे म्हणतात.
गुरु अनुभवी नसतील तर काय गंमत होते ? ह्यासाठी प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री प.पू.पार्वतीदेवी एक मजेदार गोष्ट सांगत असत. ती आपण पुढच्या भागात पाहू या.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

2 July 2020

॥ अमृतबोध ॥ २ जुलै ॥ हरिपाठ मंजिरी - १९६ ॥

॥ अमृतबोध ॥

२ जुलै

॥ हरिपाठ मंजिरी - १९६ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, "रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥" या चरणाची सुरेख संगती लावताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "राम किंवा कृष्ण हे दोनही विष्णू या सर्वव्यापी तत्त्वातून आलेले असल्यामुळे त्यांच्यात अभेद आहे. पण ते न जाणता एकाने म्हणावे कृष्ण हाच मोठा व तोही बाळकृष्णच ; तर दुसऱ्याने म्हणावे रवी हातात घेतलेला कृष्णच मोठा. तिसऱ्याने अजून तिसरेच म्हणावे. हे काही खरे नाही. 
भगवद् पूज्यपाद श्रीमद् आद्य शंकराचार्य महाराज श्रीशंकरांच्या मंदिरात गेले तर तदाकार होतील यात शंका नाही. कारण त्यांचा अवतारच त्यासाठी. परंतु तेच श्रीअन्नपूर्णेच्या मंदिरात गेले तरी लगेच तदाकार होऊन, "अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।" असे म्हणतात. पंढरीला गेले की विष्णूंच्या पंढरीनाथ या अवताराला पाहून "महायोगपीठे तटे भीमरथ्या ।" म्हणून तितक्याच प्रेमाने वंदन करतात. कारण त्यांना तेथे ब्रह्मस्वरूपाचाच अनुभव येतो, वेगळेपणा जाणवतच नाही. म्हणजे असा एकत्वाचा अनुभव ज्याला येईल तोच धन्य, तोच खरा ज्ञानी होय ! 
हे सोडून ज्याला एकदेशीय ज्ञान होते, त्याला ते अद्वैत तत्त्व, (राम व कृष्ण किंवा सर्व देवदेवता हे मुळात एकाच परब्रह्माची रूपे आहेत हे, ) "कैसेनि पैठें होय ?" म्हणजे कसे आत्मसात् होईल ? असे श्री माउली या चरणात विचारतात. 
आता हे 'अद्वैत' समजण्यासाठी, म्हणजेच 'द्वैताची झाडणी' होण्यासाठी काय करायला हवे ? हे श्री माउली अभंगांच्या तिसऱ्या चरणात सांगतात, ते आपण उद्या जाणून घेऊ या.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
Read More

13 September 2018

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती !
भगवान श्रीदत्तप्रभू अपळराजांच्या घरी दर्शश्राद्धाच्या दिवशी, क्षण दिलेले ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा मागायला आले व अखंडसौभाग्यवती सुमतीमातेकडून भिक्षा घेऊन संतुष्ट झाले. तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन, "जननी, काय हवे ते माग !" असे प्रसन्नतापूर्वक म्हणाले. सुमतीमातेचे पुण्य फळाला आलेले असल्याने तिने, "स्वामी, हेच बोल सत्य करा !" असेच मागितले. भगवान श्रीदत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच आजच्या पावनदिनी, सूर्योदय समयी पीठापूरमध्ये, श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी अवतरित झाले. भविष्यपुराणात, "कलियुगात अवधूत होतील", असा जो उल्लेख येतो तो भगवान श्री श्रीपादांचाच अाहे. म्हणूनच श्रीदत्त संप्रदायातील नमनात "कलौ श्रीपादवल्लभ: ।" असे मोठ्या प्रेमाने म्हटले जाते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे नित्य अवतार असून त्यांचे वय कायमच सोळा वर्षांच्या किशोराएवढे असते. भगवान श्रीदत्तात्रेयांची कलियुगातील श्रीगुरुपरंपरा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते. भगवान श्री श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्यांची प्रचिती अखंड येत असते.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते, त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. अनेक भाग्यवान भक्तांना त्यांचे एकमुखी षड्भुज अशा मूळरूपात दर्शन झालेले आहे. आपल्या श्रीगुरूंच्या, प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या हृदयात झालेल्या त्याच दर्शनानुसार योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे सुंदर चित्र काढलेले आहे. तसेच एक भव्य तैलचित्र प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पुण्यातील 'माउली' आश्रमात आहे. त्याचाच फोटो या लेखासोबत शेयर केलेला आहे.
त्यांनी सोळाव्या वर्षी पीठापूरहून प्रयाण करून बदरिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले. तिथून भ्रमण करीत ते श्रीनृसिंहवाडी, गोकर्ण महाबळेश्वर, तिरुपती करून कृष्णा काठावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री आले. तेथे त्यांनी चौदा वर्षे राहून अनेक दिव्य लीला केल्या.
भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरवपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथील आपल्या दरबारात एके दिवशी, भक्तांवर परमकृपा करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम *"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।"* हा श्रीदत्त संप्रदायाचा महामंत्र स्वमुखाने उपदेशिला. हा संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत प्रभावी आहे. पुढे प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी ब्रह्मावर्तच्या चातुर्मास्यात, प्लेगपासून संरक्षण व्हावे म्हणून सात नाम सप्ताह करवून घेतले होते. त्यांपैकी एका सप्ताहात पुन्हा याच महामंत्राचा सर्वांना उपदेश करून " दिगंबरा..." महामंत्र सर्वत्र प्रचलित केला.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी श्रीगुरुद्वादशी तिथीला आपला देह कुरवपूर येथे कृष्णामाईत अदृश्य केला, पण त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे लक्षात घ्यावे. कारण हा श्रीदत्तप्रभूंचा "नित्य अवतार" आहे. अजूनही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य त्याच रूपातून चालू असून अनंत कालपर्यंत चालूच राहणार आहे.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लीला श्रीगुरुचरित्रात वर्णिलेल्या असून "श्रीपादचरित्रामृतम्" ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केलेले आहे. श्रीनृसिंहवाडी स्थानावर त्यांचेही वास्तव्य झालेले आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव(जामोद) येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य झाले होते. आज त्याजागी श्रीपाद सेवा मंडळाने त्यांचे भव्य मंदिर उभारलेले आहे. त्या जागृत स्थानी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची बालरूपातील श्रीमूर्ती असून, तेथूनही त्यांच्या अद्भुत लीला आजही सतत चालू असतात.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना कुरवपूर क्षेत्री, १९५४ सालच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन दिनी स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी बिल्वदलासह दिव्य पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या. त्या सोन्यासारख्या दिसत असत, पण प्रत्यक्षात कशापासून बनलेल्या होत्या हे ज्ञात नाही. कारण ते श्रीभगवंतांच्या संकल्पानेच निर्माण झालेले साक्षात् आत्मलिंगच होते. त्या पादुका सदैव पू.मामांच्या सोबत असत. पू.मामांच्या देहत्यागानंतर त्या पादुका त्यांच्या मुखात ठेवल्या गेल्या. त्याबरोबर त्या जशा प्रकटल्या होत्या तशाच पुन्हा अदृश्य झाल्या. त्या दिव्य पादुकांच्या तीर्थाला अद्भुत सुगंध येत असे आणि त्या तीर्थाने असंख्य भक्तांचे रोग, पिशाचबाधा व अडचणी दूर होत असत. आजच्या पावन दिनी त्या पादुकांचे सर्वांना दर्शन व्हावे म्हणून या लेखासोबत त्यांचाही फोटो शेयर करीत आहे.
साजुक तुपातला शिरा, माठाची/राजगि-याची पालेभाजी व वांग्याची भाजी या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत. मनापासून आणि विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते. वस्तुत: आवड - नावड यांचा या श्रीपादरूप परमशुद्ध ब्रह्मचैतन्याशी काहीही संबंधच नसतो. भक्ताचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांच्या प्राप्तीचे एकमात्र साधन आहे !
आजच्या परम पावन दिनी, भगवान भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
विमला: कीर्तयो यस्य श्रीदत्तात्रेय एव स: ।
कलौ श्रीपादरूपेण जयति स्वेष्टकामधुक् ॥
"ज्यांची यश-कीर्ती अत्यंत उज्ज्वल आहे असे साक्षात् श्रीदत्तप्रभूच कलियुगामध्ये भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे अद्भुत असे श्रीपादरूप धारण करून निरंतर कार्य करीत आहेत !"
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates