Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 July 2016

॥ अमृतबोध ॥ ३१ जुलै २०१६


३१ जुलै २०१६
शरीराच्या प्रत्येक अवयवाचे एकेक भूषण सांगितलेले आहे. त्यात हातांचे भूषण ' दान ' मानले जाते. दान म्हणजे त्याग. आपली मालकी त्यागून गरजवंताला एखादी वस्तू निरपेक्षपणे व त्या देण्याविषयी अहंकाराची कसलीही भावना मनात न आणता देणे म्हणजे दान करणे होय. या दानाचे अपार महत्त्व प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, या दानामुळे आपल्या वृत्तीत फरक पडतो. अहंकाराची भावना कमी होऊन; सेवाबुद्धी, प्रेम अशा भावना वाढीस लागतात. दान हा दैवी सद्गुणसंपत्तीतील हि-यासारखा तेजस्वी सद्गुण आहे; म्हणूनच संत सांगतात की, आपल्या हातांना नेहमी देण्याचीच सवय असावी.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

30 July 2016

॥ अमृतबोध ॥ ३० जुलै २०१६


३० जुलै २०१६
आत्मपरीक्षण करणे, हा आपल्यात सुधारणा करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. पण ते कसे करायचे? हेच माहीत नसल्याने गोंधळ होतो. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आत्मपरीक्षणाची सुयोग्य पद्धत सांगताना म्हणतात की, पहिल्यांदा आपल्या मनातील सद्विचारांचा पाठपुरावा करायला शिकावे. ते विचार तातडीने अंमलात आणावेत. आपली चूक कोणी लक्षात आणून दिली तर ती लगेच कबूल करावी व त्या चुकांची दुरुस्ती करण्यात आपला अहंकार अजिबात आड येऊ देऊ नये. या तीन गोष्टी साधल्या तरच खरे आत्मपरीक्षण होऊन आपल्या स्वभावात, वागण्यात व विचारांमधे सकारात्मक बदल घडून आपले जीवन अधिक सुखकर होते. सर्वसामान्यांबरोबरच साधकांसाठी तर आत्मपरीक्षण  ही विशेष आवश्यक गोष्ट आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

29 July 2016

॥ अमृतबोध ॥ २९ जुलै २०१६


२९ जुलै २०१६
शिष्याने आपल्या श्रीगुरूंच्या संपर्कात राहावे, त्यांच्या संगतीत राहावे म्हणजे त्याचा परमार्थ निर्विघ्नपणे पूर्णत्वास जातो, असे संत सांगतात. पण प्रत्येकालाच तसे जमेल असे नाही. यासाठी कोणालाही सहज जमेल असा सद्गुरुसंगतीचा राजमार्ग प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, आपल्या श्रीसद्गुरु परंपरेच्या वाङ्मयाचे वाचन, चिंतन व मनन करणे ही त्यांची उत्तम संगतीच आहे. श्रीसद्गुरूंच्या वाङ्मयाद्वारे त्यांची कृपाशक्तीच शिष्यांच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष प्रकट झालेली असल्याने, त्याचे चिंतन मनन साधनेच्या उत्कर्षात फार मोलाची भूमिका बजावते. म्हणून प्रत्येक साधकाने दररोज आपल्या परंपरेच्या पुस्तकांची निदान दोन पाने तरी वाचल्याशिवाय झोपायचेच नाही, असा पक्का निर्धारच करायला हवा.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

28 July 2016

॥ अमृतबोध ॥ २८ जुलै २०१६


२८ जुलै २०१६
परमार्थात ' सेवा ' फार महत्त्वाची मानलेली आहे. श्रीतुकाराम महाराज स्वानुभव सांगतात, " सेवेचिये सत्ते धनीच सेवक । " निरपेक्ष सेवेने मालकच सेवकाचा सेवक होऊन राहातो. सर्व संतांच्या चरित्रात हे पाहायला मिळते. भगवंतांनी संतांची पडेल ती सेवा केलेली आहे. म्हणूनच या अपार महत्त्वपूर्ण साधनांगाची महती सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, प्रत्येक साधकाने आपल्या श्रीसद्गुरूंच्या सेवाकार्यात प्रेमाने मानसिक, शारीरिक, वाचिक, बौद्धिक इत्यादी सर्वप्रकारची जमेल तेवढी निरपेक्ष सेवा केली पाहिजे, त्यातून आपले शरीर, मन, बुद्धी सगळे पवित्र होते व ईश्वराची कृपाही लाभते. कल्पनेतही न बसणारी अलौकिक फले देणारे निरपेक्ष सेवेसारखे दुसरे उत्तम साधनच नाही या जगात.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

27 July 2016

॥ अमृतबोध ॥ २७ जुलै २०१६


२७ जुलै २०१६
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार गोष्टींना मिळून अंत:करण म्हणतात. या चारही गोष्टी आपल्या चांगल्या वाईट वृत्तींमुळे कमी अधिक प्रमाणात शुद्ध-अशुद्ध असतात. यांच्यातील वाईट, पापी विचार नष्ट झाले की ते शुद्ध होतात व आनंदाची अनुभूती येऊ लागते. यासाठी श्रीभगवंतांचे दर्शन घेणे, हा मोलाचा उपाय सहज, सोपा व कष्टरहित आहे, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगत आहेत. श्रीभगवंतांच्या मूर्तीमध्ये, मंदिरामध्ये प्रसन्न व पवित्र शक्ती असते, दर्शन घेतल्यावर त्या शक्तीच्या प्रभावाने आपले अंत:करण शुद्ध होत असते. म्हणून एखाद्या मंदिरात श्रद्धेने न चुकता दर्शनास जावे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

26 July 2016

॥ अमृतबोध ॥ २६ जुलै २०१६


२६ जुलै २०१६
परमार्थामध्ये शहाणा कोणाला म्हणतात? याचे अतिशय समर्पक व अचूक उत्तर प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. जो आपल्या श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन त्यांनी जशी सांगितली आहे, अगदी तशीच साधना प्रेमाने करतो, तोच खरा शहाणा होय. श्रीगुरूंवर व त्यांनी दिलेल्या साधनेवर जो दृढ विश्वासून वागतो, तोच परमार्थात व प्रपंचातही येणा-या सर्व परीक्षांमध्ये फारसे कष्ट न करता उत्तीर्ण होत असतो.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

25 July 2016

॥ अमृतबोध ॥ २५ जुलै २०१६


२५ जुलै २०१६
संत परमार्थाबरोबर आपल्याला व्यवहाराचेही नेमके मार्गदर्शन करत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतवचनात म्हणूनच म्हणतात की, रोजच्या जीवनात, व्यवहारात आपल्या मानसिक, बौद्धिक व शारीरिक  कुवतीचा विचार करूनच वागावे, नाहीतर फजिती होते व त्यातून आलेल्या नैराश्याने पुढे फार तोटा होतो. प्रामाणिकपणे व स्वार्थरहित मनाने केलेला व्यवहार उशीरा का होईना पण हमखास उत्तम फळे देतोच. म्हणून हे नीतिनियम पाळून व्यवहार करावा म्हणजे समाधान टिकून राहते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

24 July 2016

॥ अमृतबोध ॥ २४ जुलै २०१६


२४ जुलै २०१६
आपले मन हे महासामर्थ्यशाली, ताकदवान असते. जणू एखादा मत्त हत्तीच. पण हत्ती जसा माहूताच्या हातातील छोट्या अंकुशाला घाबरून सांगू तसा वागतो, तसेच हे मनही केवळ एकाच अंकुशाला घाबरते. तो अंकुश म्हणजेच श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेले सिद्धनाम होय. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला सांगतात की, ज्याला स्वत:चे कल्याण साधून घ्यायचे आहे, त्याने श्रीसद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून नामरूपी अंकुश प्राप्त करावा म्हणजे हे मोठे कार्यक्षम मनही सहजपणे ताब्यात ठेवता येते व त्यामुळे आपले कल्याण होते.
मनाला प. पू. मामा हत्तीची चपखल उपमा देत आहेत. कारण हत्ती अतिशय बुद्धिमान,  ताकदवान तर असतोच; पण तो नीट शिकवले तर आपल्या प्रचंड उपयोगी पडतो. त्याला प्रेमाने शिकवणे कठीणही नसते. तेच जर तो पिसाळला तर होत्याचे नव्हतेही करतो. ही सर्व लक्षणे मनाच्याही ठिकाणी देखील अगदी अशीच दिसून येतात. म्हणून ही उपमा देण्यात पू. मामांचे उत्तम निरीक्षण व सूचकता नेमकी जाणवते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

23 July 2016

॥ अमृतबोध ॥ २३ जुलै २०१६


२३ जुलै २०१६
प्रारब्ध आजवर कोणालाही टळलेले नाही. त्यामुळे त्यात जी सुख-दु:खे लिहिलेली आहेत ती आज ना उद्या भोगाला येणारच. शिवाय ती आपणच पूर्वी शुभाशुभ कर्मे करून निर्माण केलेली आहेत. म्हणून त्यांची भीती न बाळगता समाधानात आयुष्य जगावे. आपल्या प्रारब्धातील सुखदु:खांची तीव्रता श्रीभगवंतांच्या भक्तीने, भजनाने, नामस्मरणाने नक्कीच कमी होते, म्हणून ते मात्र आपण यथाशक्य करीत जावे, असा मौलिक उपदेश प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे करीत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

22 July 2016

॥ अमृतबोध ॥ २२ जुलै २०१६


२२ जुलै २०१६
देवाला नमस्कार करणे, जमेल तशी पूजा करणे इत्यादी गोष्टी या भक्तीतच मोडत असल्या तरी त्या गौण आहेत. खरा भक्त काही वेगळाच असतो. त्याचे यथार्थ लक्षण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, मासा जसा पाण्याविना तडफडतो, तसे जो भगवंतांसाठी तडफडतो, तोच खरा भक्त होय. ही स्थिती येईपर्यंत आपण जे जमतील ते भक्तीचे प्रयत्न नेटाने केले पाहिजेत. अशी अनन्य भक्ती जर असेल तर त्याच्यासाठी परमात्मा अजिबात दूर नाही.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

21 July 2016

॥ अमृतबोध ॥ २१ जुलै २०१६


२१ जुलै २०१६
अध्यात्म ही एक संपन्न जीवनशैली आहे. त्याची तत्त्वे आत्मसात होऊन रोजच्या वागण्यात उतरली तरच खरे अध्यात्म जमले. नुसत्या अध्यात्माच्या लंब्याचौड्या गप्पा मारणे हे काही अध्यात्म नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात की, गीतेत सांगितलेली दैवी गुणसंपदा, संतांच्या वागण्यातून प्रकट होणारे शांती, दया, क्षमा, तितिक्षा, समाधान, औदार्य इत्यादी सद्गुण जर आपल्याही वागण्यात दिसू लागले तरच खरे अध्यात्म जमले. नुसत्या त्याच्या गप्पा मारण्यात काहीच अर्थ नाही. श्रीसद्गुरूंनी दिलेली साधनाच आपले एकमात्र ' साध्य ' ठरून तीच आपले ' सर्वस्व ' झाल्याशिवाय अध्यात्म असे जीवनात उतरत नाही.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

20 July 2016

॥ अमृतबोध ॥ २० जुलै २०१६


२० जुलै २०१६
साधना करतो म्हणूनच साधक या नावाने ओळख होते. म्हणजे साधना करणे हेच त्याचे कर्तव्य आहे. ग्रंथांत जगातील सर्व ज्ञान आहेच, पण नुसता त्याचा उपयोग काय? पाककृतीच्या पुस्तकात शेकडो कृती दिलेल्या असतात, त्या नुसत्या वाचून किंवा सांगून पोट भरेल का? ते स्वत: करूनच पाहायला पाहिजे. म्हणूनच साधनेचे महत्त्व सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, ग्रंथांत जे दिले आहे ते स्वत: अनुभवण्यासाठीच साधना करायला हवी. जोवर तो अनुभव आपण स्वत: घेत नाही तोवर नुसत्या त्या माहितीला काहीही किंमत नाही.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

19 July 2016

॥ अमृतबोध ॥ १९ जुलै २०१६


१९ जुलै २०१६
श्रीगुरुपौर्णिमा
श्रीसद्गुरुचरणांना सादर वंदन ! आज श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, श्रीगुरु भगवंतांचे अलौकिक माहात्म्य गायन करणे हे आपले सर्वांचे प्रधान कर्तव्य आहे. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे श्रीगुरूंच्या अवताराचे मुख्य मर्म सांगतात की, अज्ञानामुळे जीव स्वत:ला  शिवांपासून वेगळा समजतो. ते मायाजनित अज्ञान नष्ट करण्याचे शस्त्र केवळ आणि केवळ श्रीसद्गुरूच देऊ शकतात, तो भगवंतांचाही अधिकार नाही. त्यांना जीवावर अनुग्रह करायचा झाला तरी त्यासाठी त्यांना गुरुरूपानेच प्रकट व्हावे लागते. म्हणून श्रीगुरु हे भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांच्याशिवाय मनुष्यांना भवसागर तरणोपाय नाही. श्रीगुरुचरणीं अनन्यभावाने शरण जाऊन, त्यांनी कृपावंत होऊन दिलेली साधना प्रेमाने व नेमाने करण्यातच आपले सर्वांगीण हित असते, असे प. पू. श्री. मामा नेहमी सांगत असत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

18 July 2016

॥ अमृतबोध ॥ १८ जुलै २०१६


१८ जुलै २०१६
आजचा काळ हा फारच वेगळा आहे. त्यात सगळीकडेच भेसळ आहे. त्यातून परमार्थ क्षेत्रही सुटलेले नाही. त्यामुळे लोक परमार्थात ख-या संतांची, सद्गुरूंची वानवा आहे असे नेहमी ओरडतात. पण यातला पुढचा भाग प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, खरे शिष्य होण्याच्या पात्रतेचे तरी किती जण सापडतील? दोन्हीकडे ही वानवा आहेच. म्हणून आपण खरे शिष्य होण्याचा प्रयत्न मनापासून केला पाहिजे, मग ख-या सद्गुरूंशी भगवंतच आपली नक्की गाठ घालतील.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

17 July 2016

॥ अमृतबोध ॥ १७ जुलै २०१६


१७ जुलै २०१६
परमार्थ आणि प्रपंच या बाह्यत: ओळखू येणा-या गोष्टी नाहीत. त्या तर आपल्या अंत:करणातील वृत्तींचे प्रतीक आहेत. टिळे माळा घालणे म्हणजे परमार्थ नाही आणि सतत पोरांबाळांच्यात रमणे म्हणजेच प्रपंच असेही नाही. शरीराने काहीही असो मनाने कशात किती गुंतलेपण आहे त्यावरून एखाद्याच्या प्रपंच परमार्थाची ओळख होते.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यातला नेमका फरक एका सुंदर उदाहरणाने स्पष्ट करतात की, तेलात तळायला टाकलेली पुरी हळूहळू फुगून त्याच तेलावर तरंगू लागते, तसे जो पूर्वी प्रपंचात रमलेला होता तोच मनुष्य श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना करता करता हळूहळू त्याच प्रपंचातून पूर्ण बाहेर येऊन परमार्थातील शाश्वत आनंदाचा अनुभव घेऊ लागतो. तो प्रपंचात दिसला तरी त्याच्या आत प्रपंच आता राहिलेला नसतो.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

16 July 2016

॥ अमृतबोध ॥ १६ जुलै २०१६

१६ जुलै २०१६
अहंकार हा कायम घातकच असतो, मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना. संतांपाशी जगातल्या सर्व सिद्धी पाणी भरत असतात, पण त्यातही त्यांची सर्वात मोठी सिद्धी ही निरहंकार साधेपणा हीच असते. जो नम्र असतो, कृतज्ञ असतो, तोच सर्वश्रेष्ठ ठरतो, हे वेगळ्या शब्दांत पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत. निरहंकारता अंगी बाणवण्याचा सहजसोपा उपाय सांगताना पू. मामा म्हणतात की, आपल्यापाशी जे जे मानसिक, बौद्धिक, शारीरिक, वाचिक सामर्थ्य आहे ते सर्व भगवंतांचा प्रसाद समजावा, त्यात आपले कर्तृत्व मानू नये. म्हणून तो प्रसाद त्याच ईश्वराच्या संतोषासाठी व्यवहारात मनापासून वापरावा, म्हणजे त्याचा अहंकार मुळीच होत नाही व त्या विशेष शक्ती जगाच्या व स्वत:च्या भल्यासाठीच उपयुक्त ठरतात.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

15 July 2016

॥ अमृतबोध ॥ १५ जुलै २०१६


१५ जुलै २०१६
जात, धर्म, पंथ, उच्चनीच असला कोणताही भेदभाव न करता, सर्व प्राणिमात्रांना भगवंतांचेच अंश मानून विशुद्ध प्रेमभक्तीचा मार्ग आचरणा-या भागवत-वारकरी संप्रदायाचा आज सर्वात मोठा दिवस...आषाढी एकादशी !
या संप्रदायाचे अध्वर्यू प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज संप्रदायाच्या तात्त्विक भूमिकेतून " जात " संकल्पनेचे मर्म सांगत आहेत की, जगात जाती तीनच, देव मानणारे, देव न मानणारे व देव अनुभवून देवच होणारे. देव न मानणा-यांशी आपल्याला घेणेदेणे नाही. देव मानणारे तुम्ही आम्ही सर्वसामान्य भक्तजन व देवच होऊन ठाकलेले ते संत महात्मे होत. या वचनानुसार, देवच होऊन राहिलेल्या व सलग ५३ वर्षे प्रेमाने पंढरीची वारी केलेल्या पू. श्री. मामांचा हा बोध जणू त्यांच्या संप्रदाय चिंतनाचे सारच आहे. आज आषाढी एकादशीच्या महापर्वणीवर अशा सर्व देव-भक्तांच्या चरणीं " ज्ञानोबा-तुकाराम " च्या गजरात सादर दंडवत !!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

14 July 2016

॥ अमृतबोध ॥ १४ जुलै २०१६


१४ जुलै २०१६
विशुद्ध धार्मिकता व ईश्वरभक्ती या अतिशय सात्त्विक गोष्टी आहेत. त्या उगीच कोणालाही लाभत नाहीत. पूर्वीचे काही उत्तम संस्कार असतील व पुण्याचा संचय असेल तरच या जन्मी मनुष्याला काही प्रमाणात का होईना ईश्वरभक्ती लाभते, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात. म्हणजे ज्यांच्या गाठीशी फक्त पाप आहे, त्यांना कधीच सुख लाभत नसते, हा त्यातला मथितार्थ विसरता कामा नये. आजचे  जगातले थोतांडी धर्मनिरपेक्षतावाद, धार्मिक लांगूलचालन वगैरे दाहक वास्तव पाहिले की, प. पू. श्री. मामांच्या या अमृतवचनातील सत्यता प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहात नाही.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

13 July 2016

॥ अमृतबोध ॥ १३ जुलै २०१६


१३ जुलै २०१६
संतांचा उपदेश हा अतिशय नेमका व पटणाराच असतो. ते आपल्या पोटात शिरून बरोबर सांगतात. त्या बाबतीत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचा हातखंडा होता. आजचा अमृतबोध हे त्याचे देखणे उदाहरण होय. अध्यात्माची अशी चपखल मांडणी क्वचितच अन्य कोणी केली असेल.
आपले जीवन ही एक गाडी असून आपले मनच ती चालवत असते. पण मनाला काहीतरी धरबंध असलाच पाहिजे नाहीतर ती गाडी कुठेतरी अचानक अपघात नक्की करणार. गाडीला जसे त्यासाठी स्टियरिंग व ब्रेक असतात, तसेच आपल्या जीवनात अध्यात्माचे स्थान आहे. मनावर ताबा ठेवण्याचे गरजेचे काम केवळ अध्यात्मच करते, असे या अध्यात्माचे अनन्यसाधारण महत्त्व प. पू. श्री. मामा यातून आपल्याला जाणवून देत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

12 July 2016

॥ अमृतबोध ॥ १२ जुलै २०१६


१२ जुलै २०१६
संत कोणाला म्हणावे? याच्या अनेक व्याख्या संतांनीच करून ठेवलेल्या आहेत. त्यांपैकी ख-या संतांचे एक सुंदर लक्षण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत. संतांचा हात हा कायम काहीतरी देण्यासाठीच पुढे येत असतो, काही मागण्यासाठी नाही. जे सतत काहीतरी मागतात किंवा ज्यांना इतरांकडून काहीतरी हवे असते, ते संत नव्हेत, ते तर भिकारी.
भगवान श्रीमाउली देखील म्हणतात की, संतांचा हात हा समोरच्याला अभय देण्यासाठी नाहीतर आशीर्वाद देण्यासाठीच उचलला जातो. किंवा पडलेल्याला उठवण्यासाठी पुढे येतो. त्यांच्या निर्व्यापार हातांना  याशिवाय अन्य प्रकार माहीतच नसतात. हीच गोष्ट प. पू. श्री. मामा संतांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

11 July 2016

॥ अमृतबोध ॥ ११ जुलै २०१६


११ जुलै २०१६
जन्म आणि मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. पृथ्वीवर जन्म झाला की मृत्यू होणारच कधीतरी. त्यामुळे पूर्णपणे प्रारब्धावर, पूर्वजन्मांतील कर्मांवर अवलंबून असणा-या या अटळ गोष्टीचा संतांना कधीच विचार करावासा वाटत नाही. ते आपल्यालाही त्याचा विचार न करता, हाती असलेला प्रत्येक क्षण निरपेक्ष भावनेने आणि प्रेमाने श्रीभगवंतांच्या व त्यांचेच स्वरूप असणा-या सर्व जीवांच्या सेवेत घालवण्याचा उपदेश करतात. अशाच सात्त्विक व उत्तम जीवनाला प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज " खरे आध्यात्मिक जीवन " म्हणतात. त्यांनी स्वत: जे जन्मभर मनापासून केले त्याचाच ते इतरांनाही बोध यातून करीत आहेत.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

10 July 2016

॥ अमृतबोध ॥ १० जुलै २०१६


१० जुलै २०१६
प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसते तेव्हा मानसपूजा केलेली देखील चालते. उलट आपल्या आराध्याची, श्रीसद्गुरूंची मानसपूजा करणेच जास्त सोपे व सहज शक्य असते. मानसपूजेने मनाची शुद्धी होऊन परमार्थात अनेक लाभ होतात, म्हणून या उपासनेचा संत कायमच पुरस्कार करतात. प्रत्यक्ष शरीराने केलेल्या सेवेने मनाबरोबरच शरीरही शुद्ध होते. भगवंत दयाळू असल्याने त्यांना मनोभावे आपण जे जे अर्पण करू, त्याच्या अनंतपटींनी ते आपल्याला ती गोष्ट परत करतात, असे स्वानुभूत मत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत. म्हणूनच मानसपूजा व निरपेक्ष शारीरिक सेवा अशी दोन्ही प्रकाराने साधकाने प्रयत्नपूर्वक उपासना करायलाच हवी.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

9 July 2016

॥ अमृतबोध ॥ ९ जुलै २०१६


९ जुलै २०१६
आपले मन हा अजब कारखाना आहे. त्यात सतत संकल्पविकल्प चालूच असतात. जोवर त्या मनाला आपण सतत चिंतत असलेल्या संसारातील विषयांच्या विचारांचे पाठबळ आहे तोवर ते सतत उड्या मारतेच. पण दिव्यातील तेल संपले की तो दिवा आपोआप शांत होतो, तसे हे मनही त्याचे खाद्य संपले की शांत होते. हे एकदम घडत नाही, पण हळूहळू, प्रयत्नपूर्वक घडवावे लागते. मनाची शांती ही फक्त श्रीभगवंतांच्या नामस्मरणाने व त्यांच्या चिंतनानेच मिळू शकते. म्हणून हळूहळू आपण त्याची सवय लावून घ्यावी, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगत आहेत. शांत झालेल्या मनाची ताकद हजारो पटीने वाढलेली असते, हे विसरता कामा नये. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, " मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण । सुख समाधान । जे इच्छा ते ॥ " मनाची अशी प्रसन्नता केवळ प्रभूच्या सप्रेम नामस्मरणानेच लाभते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

8 July 2016

॥ अमृतबोध ॥ ८ जुलै २०१६


८ जुलै २०१६
योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन परमार्थमार्ग आचरणा-या सर्वांसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. परमार्थ करावा असे अनेकांना मनापासून वाटते. पण कुठून सुरुवात करावी, हेच समजत नाही. अशा सर्वांसाठी व ज्यांनी जमेल तशी सुरुवात केलेली आहे, अशांसाठीही प. पू. श्री. मामा सांगत आहेत तो क्रम अत्यंत उपयुक्त आहे. याचा अवलंब केल्यास साधक परमार्थामध्ये निश्चितच यशस्वी होईल, यात तिळमात्र शंका नाही !!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती.
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

7 July 2016

॥ अमृतबोध ॥ ७ जुलै २०१६


७ जुलै २०१६
सोन्यातील हीणकस नष्ट करण्यासाठी ते मुशीत घालून जाळतात. हीण जळून गेले की सोने शुद्ध होते. तसे प्रत्येक जीव मुळात विशुद्ध परब्रह्माचाच अंश असला तरी, तो देह धारण करतो तेव्हा त्यात संकल्पजनित वासनांचे हीण मिसळलेले असते. ते हीण तप/साधना रूपी अग्नीने जळून जाते व पुन्हा मूळचा विशुद्ध ब्रह्मस्वरूप जीव उरतो. म्हणूनच तपाची, साधनेची नितांत आवश्यकता असते, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात.
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

6 July 2016

करुणाब्रह्म

हृदयातील अखंड भगवद् अधिष्ठानामुळे संतांना आप-पर भावनाच नसते. ज्याने लावले त्याला आणि ज्याने तोडण्यासाठी घाव घातला त्यालाही वृक्ष समानच सावली देतो; त्याप्रमाणे संत देखील सर्वांशी समान प्रेमानेच वागतात. आपल्याला कारण नसताना त्रास देणा-याला आपण सहसा सोडणार नाही, पण संत त्यालाही क्षमाच करतात. कारण संतांपाशी अखंड प्रेमाचा अनवरत झराच असतो !
संत हे प्रेम-करुणेची साक्षात् मूर्ती असतात. दयाकरुणेचा अलौकिक आविष्कार त्यांच्या ठायी प्रसन्न प्राजक्तासारखा बहराला आलेला असतो. प्राजक्ताच्या सर्वांगसुंदर फुलो-या प्रमाणे, आपल्या या अकारण-करुणेचा अखंड वर्षाव संपर्कात आलेल्या प्रत्येकावर संत   निरपेक्षपणे करीत असतात.
अशा संतत्वाचे श्रेष्ठ आदर्श असणारे, नाथ-दत्त-भागवत संप्रदायांचे अध्वर्यू आणि थोर स्वातंत्र्यसेनानी प. पू. सद्गुरु योगिराज श्री. श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०२ वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरित्रातील एक करुणाप्रेमाचा अलौकिक प्रसंग आपण पाहूया. प. पू. श्री. मामांचे उत्तराधिकारी प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी स्वत: अनुभवलेली ही अद्भुत हकीकत आपल्या ' अभंग निरूपण - द्वितीय खंड ' ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे.
प.  पू. मामांचा छत्तीसगढ राज्यातील भिलाई येथे मोठा शिष्यपरिवार होता. तेथील एका अत्यंत गरीब सायकल रीक्षा चालविणा-या भक्तावर त्यांची कृपा झालेली होती. तो नियमाने साधनाही करत असे.
सगळेजण प. पू. मामांना घरी बोलवतात व तेही प्रेमाने जातात, हे पाहून त्यालाही वाटत असे. पण आपले घर तर झोपडपट्टीत, तिथे कसे बोलवावे? याची त्याला खूप खंत वाटे. त्याची ती तळमळ जाणून एके दिवशी स्वत: प. पू. मामांनीच त्याला विचारले, " काय रे, आज दुपारी मोकळा आहेस का?" तो म्हणाला, " हो, मी केव्हाही मोकळा आहे." त्यावर पू. मामा शांतपणे म्हणाले, " मग असे कर, आज दुपारी आपण तुझ्या घरी जाऊ! " हे ऐकून त्याचा आनंद गगनात मावेना.
दुपारी ठरलेल्या वेळी तो आपली सायकलरीक्षा घेऊन आला. पू. मामा व पू. दादांना त्याने बळेच त्या रीक्षात बसवले. पण पुढे चढाचे निमित्त करून पू. मामा उतरले व सगळे चालतच निघाले. त्याचे घर एका बकाल झोपडपट्टीत होते. सर्वत्र उघडी गटारे वाहत होती. त्यांची दुर्गंधी सुटलेली होती. तशातच चालत प. पू. मामा त्याच्या झोपडीजवळ पोचले. त्याने कुठूनतरी एक फाटका सतरंजीचा तुकडा आणलेला होता. त्यावर प. पू. मामा प्रेमाने बसले.
त्याने खूण केल्यावर त्याची बायको एक केळे व अकरा रुपये घेऊन पुढे आली. मोठ्या आदराने त्याने ते प. पू. मामांच्या हातावर ठेवले व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्या दोघांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहत होते. कारण जे अनेक वर्षे त्यांच्या मनात होते, ते प्रेममूर्ती श्रीसद्गुरूंनी न मागताच पूर्ण केले होते. त्याचवेळी त्या दोघांचा तो कोमल भाव पाहून अचानकच प. पू. श्री. मामांच्याही डोळ्यांतून प्रेमाश्रू पाझरू लागले. त्यांनी आपल्या कोटाच्या खिशातून एक शंभर रुपयांची नोट काढली. ते अकरा रुपये त्यात घालून त्याच्या बायकोच्या हातावर ते एकशे अकरा रुपये ठेवले. मग त्या साधकाचा हात अतीव प्रेमाने घट्ट धरून त्या दोघांना प. पू. मामा म्हणाले, " तुम्ही दोघे इतके शहाणे आहात की, केवळ आम्हांला अकरा रुपये व केळे देता यावे म्हणून तुम्ही तीन दिवस उपास काढलेले आहेत ! आम्हांला हे माहीत नाही काय? आताच जा, सगळे सामान घेऊन या, इथे माझ्यासमोर स्वयंपाक करा आणि जेवा; तरच मी येथून जाईन !" आपल्या दयाकरुणार्णव  श्रीसद्गुरूंच्या अंतर्यामित्व, सर्वसाक्षित्व आणि अपरंपार स्नेहमय अंत:करणाच्या त्या तेजस्वी व भावपूर्ण दर्शनाने ते दोघे भारावूनच गेले. त्यांना काही बोलायलाच सुचेना.
ताबडतोब त्या बाई बाजारात गेल्या, त्यांनी डाळ-तांदूळ आणून खिचडी बनवली. प. पू. श्री. मामांनी त्या दोघांना आपल्यासमोर बसवले आणि स्वत:च्या हाताने त्यांना भरवले. प. पू. श्री. मामांचा तो आनंद अवर्णनीय होता. चौघांच्याही डोळ्यांतून अविरत अश्रूधार लागलेली होती.
श्रीसद्गुरुतत्त्वाच्या " अहेतुकदयानिधी व  अकारणकृपाळू " अशा जगावेगळ्या गुणवैशिष्ट्यांची ही संपन्न अनुभूती नित्यस्मरणीयच म्हणायला हवी. खरोखरीच त्यांच्या दयाकरुणेला सीमाच नसते !!
श्रीसद्गुरूंच्या प्रेमाला, करुणेला ना अंत ना पार. त्यांच्या त्या लोकविलक्षण अपेक्षारहित प्रेमामध्ये जात, धर्म, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा असले काही कधीच आडवे येत नाही. त्यांना भक्ताचा एक अनन्यभावच पुरेसा होतो प्रेमाचा घनघोर वर्षाव करायला. म्हणूनच भगवान श्रीज्ञानेश्वर माउली श्रीसद्गुरूंना ' निरंतर दयार्द्र ' म्हणतात.
अशा सद्गुरुतत्त्वाचे साकार रूप, श्रीदत्तसंप्रदायातील अवतारी विभूतिमत्व व राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे जिवलग सवंगडी असणा-या, श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०२ वी जयंती. ' मामा ' या नावातच दोनदा आईचा उल्लेख होतो, तो उगीच नाही. मातृत्वाचेही दुहेरी अस्तित्व त्यांच्या ठायी स्वाभाविकपणे नांदत होते. आजही ते शरण आलेल्या भक्तांवर त्याच प्रेमभावाने कृपेचा अमृतवर्षाव करीत आहेत व पुढेही करीत राहतीलच. अपरंपार ' करुणाब्रह्म ' सद्गुरु श्री. मामा महाराजांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त अनंतानंत दंडवत प्रणाम !!!!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील पेज लाईक करावे ही विनंती.
http://sadgurubodh.blogspot.in)
Read More

॥ अमृतबोध ॥ ६ जुलै २०१६

६ जुलै २०१६
श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेले साधन हेच शिष्यासाठी सर्वस्व असायला हवे. मनापासून ते साधन करणे हीच शिष्यासाठी तीर्थयात्रा, तीर्थस्नान असते. साधना हे श्रेष्ठ आंतरिक तीर्थ आहे. तीर्थस्नानाने जसे दोष नष्ट होतात, तसे साधनेनेही आपली अंतर्बाह्य शुद्धी होते. साधनेने अशी आपल्या वासनांची कायमची शुद्धी होणे हाच शिष्यांसाठी खरा श्रीसद्गुरुप्रसाद असतो, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून सांगत आहेत.
शरण आलेल्या सुयोग्य अधिकारी जीवांना असा कृपामय सद्गुरुप्रसाद भरभरून वाटण्यासाठी ज्यांचे अवतरण झाले होते, त्या श्रीदत्तावतार योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचा आज १०२ वा जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त श्रीचरणीं सर्वांच्या वतीने सादर दंडवत  !!
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

5 July 2016

श्रीदत्तभक्तिपरं वन्दे श्रीवासुदेवसरस्वतीं गुरुम्


आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, पंचम श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांची १०२ वी पुण्यतिथी !
प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज म्हणजे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले व त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली व चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा व अधिष्ठान प्राप्त करून दिले. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचे जन्मस्थान- पीठापूर व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान-कारंजा, ही दोन्ही शोधून काढून तेथेही उपासना सुरू करून दिली.
त्यांची " करुणात्रिपदी " ही अजरामर रचना जवळपास सर्व दत्तभक्त रोजच म्हणतात. त्यांच्या प्रकांड विद्वत्ता आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे लोभस दर्शन त्यांच्या विविध ग्रंथांमधून आपल्याला होते. ते अतिशय उत्तम ज्योतिषी आणि आयुर्वेदिक औषधांचे जाणकार म्हणूनही प्रसिद्ध होते. संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून अत्यंत सहज, ऐटबाज संचार करणारी त्यांची अद्भुत प्रतिभा भल्या-भल्या पंडितांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. त्यांनी रचलेले " श्रीदत्तमाहात्म्य,  सप्तशती गुरुचरित्रसार, दत्तलीलामृताब्धिसार, त्रिशती गुरुचरित्र, द्विसाहस्री गुरुचरित्र, श्रीदत्तपुराण ", यांसारखे ग्रंथ तसेच अत्यंत भावपूर्ण अशी शेकडो स्तोत्रे ही श्रीदत्तसंप्रदायाचे अलौकिक वैभवच आहे ! त्यांनी रचलेली पदे, अभंग त्यांच्या परम रसिक अंत:करणाचा प्रत्यय देतात. ते अतुलनीय भाषाप्रभू तर होतेच शिवाय त्यांची स्मरणशक्ती देखील अफलातून होती. पण मनाने अत्यंत भावूक आणि अनन्यशरणागत असे ते एक थोर भक्तश्रेष्ठही होते ; हेच त्यांच्या अतिशय विलोभनीय, भावपूर्ण रचनांचे खरे रहस्य आहे. त्यांचे अभंग वाचताना डोळे पाणावतात.
प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या वाङ्मयाचे फार मोठे वेगळेपण म्हणजे त्यांची मंत्रगर्भ रचना. ते एकाच स्तोत्रात खुबीने अनेक मंत्र गुंफत असत. श्रीदत्तात्रेय अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये त्यांनी केवळ चोवीस श्लोकांमध्ये चौदा वेगवेगळे मंत्र गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च श्रीदत्तप्रभूंची नवीन नावे तयार केलेली दिसून येतात, इतकी त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. त्यांनी श्रीदत्तमाहात्म्याच्या शेवटच्या तीन अध्यायांतील ओव्यांमधून मांडुक्य व ईशावास्य ही दोन उपनिषदे देखील गुंफलेली आहेत. अशाप्रकारची अलौकिक व अपूर्व रचना हे श्री.टेंब्येस्वामींच्या वाङ्मयसागराचे वैशिष्ट्यच आहे !
प. प. श्री. टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांचे कार्य इतके अद्भुत आहे की, त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी उपस्थितांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांची ओळख " गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य " अशीच करून दिली होती व हीच वस्तुस्थिती आहे. ते साक्षात् भगवान श्रीशंकराचार्यच होते.
श्री. टेंब्येस्वामींचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी, दि. १३ ऑगस्ट १८५४ रोजी सावंतवाडी संस्थानातील माणगांव या छोट्याशा खेड्यात श्री. गणेशपंत व सौ. रमाबाई या अत्यंत सत्त्वशील व दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. बालपणीच त्यांच्यातील अवतारित्वाची चुणूक दिसू लागली होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा संपूर्ण वेदाभ्यास करून झालेला होता व ते दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध ही झालेले होते. सोळाव्या वर्षापासून ते इतरांना वेद, ज्योतिष, आयुर्वेद, मंत्रशास्त्र इ. शास्त्रे शिकवीत असत. नृसिंहवाडी येथे त्यांना भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वप्नात मंत्रदीक्षा दिली. पुढे श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने त्यांच्या घरी माणगांव येथे त्यांनी दत्तमंदिर बांधून सात वर्षे उपासना चालविली व देवांच्याच आज्ञेने क्षणात ते सगळे वैभव सोडून बाहेरही पडले. पुढे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी संन्यास घेतला व नंतरची २३ वर्षे श्रीदत्त संप्रदायाच्या संवर्धनाचे अद्भुत कार्य केले.
श्रीदत्तसंप्रदायाला उपासना आणि तत्त्वज्ञान अशा दोन्ही अंगांनी सबळ आधार आणि दैवी अधिष्ठान देण्याचे कार्य प. प. श्री. टेंब्ये स्वामींच्या ग्रंथांनीच केलेले आहे ! भगवान श्रीदत्तात्रेय प्रभू त्यांच्याशी बोलत असत व देवांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीच गोष्ट करीत नसत.
श्रीटेंब्येस्वामींचे चरित्र विलक्षण असून नैष्ठिक संन्यासधर्माचा परमादर्श आहे. अत्यंत कडक धर्माचरण हा त्यांचा विशेष सद्गुण, पण त्याचवेळी परम प्रेमळ, कनवाळू अंत:करण हाही त्यांचा स्थायीभाव होता. या दोन गोष्टी सहसा एकत्र सापडत नाहीत. धर्माचरणातील कर्मठपणा आणि अपार करुणा यांचा देवदुर्लभ संगम प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या ठायी झालेला होता व हे त्यांच्या चरित्रातील प्रसंगांवरून लगेच ध्यानात येते. त्यांच्या लीला फार फार सुंदर आणि साधकांसाठी मार्गदर्शक आहेत.
पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने " प. प. सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला " या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, प. प. श्री. टेंब्ये स्वामींचे जवळपास सर्व वाङ्मय सुलभ मराठी अर्थासह पुन्हा प्रकाशित केलेले आहे. साधक भक्तांसाठी हे सर्व शब्दवैभव सेवा म्हणून ना नफा तत्त्वावर केवळ निर्मितीमूल्यात उपलब्ध करून दिले जाते.
श्रीमत् टेंब्येस्वामींचे पावन चरित्र म्हणजे आजच्या काळातला जिवंत चमत्कारच म्हणायला हवा. त्यांचे अत्यंत कर्मठ शास्त्राचरण, विलक्षण दत्तभक्ती, अतीव प्रेमळ स्वभाव, लोकांविषयीची जगावेगळी करुणा, तेजस्वी बुद्धिमत्ता, कोणताही विषय सहज आत्मसात करण्याची हातोटी, अंगी वसणारे अनेक कलागुण, सारे सारे अतिशय अलौकिक व अद्भुतच आहे. त्यांचे चरित्र वाचताना आपण वारंवार आश्चर्यचकित होऊन त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तकच होतो.
प. प. टेंब्ये स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी, गुजराथ राज्यातील नर्मदा काठावरील पवित्र गरुडेश्वर स्थानी, आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे पावन समाधी मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे.
श्री.गणेशपंत सातवळेकर यांनी प. प. श्री. टेंब्येस्वामींना एकदा विचारले होते की, आपल्यालाही पुनर्जन्म आहे का? त्यावर प. प. श्री. स्वामी उत्तरले, " हो आहे तर. हा तर केवळ अरुणोदय आहे." त्यानुसार प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांनी प. पू. सौ. पार्वतीदेवी देशपांडे यांना दिलेल्या आशीर्वादानुसार, समाधी घेतल्यावर लगेच दुस-या दिवशी पुन्हा त्यांच्या पोटी जन्म घेतला. तेच पुन्हा " श्रीपाद " रूपाने अवतरले. मुलाचे हे नावही स्वामींनीच आधी सांगून ठेवलेले होते. हेच श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे म्हणजे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज होत. त्यांचेही संप्रदाय सेवाकार्य प. प. श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आहे. उद्या त्याची जयंती आहे.
श्रीदत्तसंप्रदायातील अत्यंत तेजस्वी, झळाळते अद्भुत अवतारी विभूतिमत्व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांच्या अम्लान श्रीचरणीं १०२ व्या पुण्यतिथीनिमित्त ही श्रद्धापूर्वक भाव-सुमनांजली समर्पण !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
Read More

॥ अमृतबोध ॥ ५ जुलै २०१६

५ जुलै २०१६
कोणी भगवे कपडे घातले की लोक त्याला संन्यासी म्हणतात. संन्यासामध्ये सर्वस्वाचा त्याग करून भगवंतांची सेवा करणे अभिप्रेत असते. नुसते भगवे कपडे घालणे हा संन्यास नव्हेच. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधात संन्यासधर्माचे मार्मिक रहस्यच प्रकट करीत आहेत. संन्यास म्हणजे षड्न्यास. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा रिपू ज्याचे पूर्णपणे गेले तोच खरा संन्यासी. आपले-परके हा भेद नष्ट होऊन, मी-माझेपणाची भावनाही ज्याची संपूर्ण लयाला गेल्यामुळे, जो अखंड स्वस्वरूपी निमग्न होऊन राहिलेला आहे, तोच खरा संन्यासी होय. थोर संन्यासी महात्म्यांचेही परमादर्श ठरावेत अशा परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांची आज १०२ वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

4 July 2016

॥ अमृतबोध ॥ ४ जुलै २०१६

४ जुलै २०१६
प्रपंचात पैसा असल्याशिवाय काहीही खरे नाही, म्हणून प्रपंचरूपी धंद्याचे पैसा हेच भांडवल आहे. ते जसजसे वाढेल तसे त्या माणसाची प्रगती झाली असे म्हणतात. परमार्थात बरोबर उलटी गती असते. आपल्या जन्माचे मूळ हे आपल्या पूर्वजन्मींच्या वासनांमधे, कर्मांमधे असते. म्हणून ती प्रारब्धकर्मे हे आपले भांडवल ठरते. प्रपंचात भांडवल वाढलेले चांगले मानतात तर परमार्थात तेच आपण सोबत आणलेले कर्मांचे भांडवल भोगून संपलेले चांगले मानले जाते. हाच महत्त्वाचा सिद्धांत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोध मधून स्पष्ट करीत आहेत.
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

3 July 2016

॥ अमृतबोध ॥ ३ जुलै २०१६

३ जुलै २०१६
' योगक्षेम ' हा शब्द आपल्याला सवयीचा असला तरी त्याचा खरा अर्थ फारसा कोणाला माहीत नाही. " योगक्षेमं वहाम्यहम् " हे साक्षात् भगवान श्रीकृष्णांचे भक्तांना दिलेले प्रतिज्ञावचन आहे गीतेमधले. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी या शब्दाचा सुरेख आणि अभिनव अर्थ आजच्या अमृतबोधात सांगितलेला आहे. योगक्षेमातील प्रेमाचे अनन्यसाधारण महत्त्वही ते त्यातून आवर्जून अधोरेखित करतात. 
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

2 July 2016

॥ अमृतबोध ॥ २ जुलै २०१६


२ जुलै २०१६

सकाळी ७.२८ची लोकल पकडायची असेल तर आपल्याला वारंवार त्याची आठवण करून द्यावी लागते का हो स्वत:ला? पहाटेपासूनची सगळी कामे त्यानुसार बरोबर होतात ना? पण तेच पूजा करायची असेल, पारायण करायचे असेल किंवा मंदिरात जाऊन दर्शन, सेवा करायची असेल तर किती कारणे सहज निर्माण होतात मनात? या सर्वसामान्यांच्या नेहमीच्या गोष्टीचा संदर्भ घेऊन प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, प्रपंच आपोआप होतो, परमार्थ मात्र ठरवून करावा लागतो. प्रपंचात युक्ती व पैसे असावे लागतात तरच तो सुखाचा होतो आणि परमार्थात युक्ती व योग लागतो. योग म्हणजे श्रीभगवंतांच्या कृपेने सद्गुरूंशी जोडले जाणे व साधन प्राप्त होणे. तो योग जुळला की परमार्थ आनंददायक ठरतो. योग्य कौशल्याने अर्थात् युक्तीने वागणे दोन्हीकडे आवश्यकच असते.
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

1 July 2016

॥ अमृतबोध ॥ १ जुलै २०१६


१ जुलै २०१६
संत नेहमीच आपल्या हिताचे सांगत असतात. बाबापुता करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आपल्या हातून परमार्थ करवून घेत असतात. त्यांचा उपदेश कायमच अतिशय सोपा, सहज पालन करता येईल असाच असतो. त्यात काहीही क्लिष्ट नसते की कठीण नसते. उगीच घरदार सोडून, अंगाला राख फासून जंगलात जायला कधीही कोणाही संतांनी सांगितलेले नाही. माउली म्हणतात की, आई जशी एकाच मोठ्या घासाचे छोटे छोटे दहा पंधरा भाग करून लहान बाळाला भरवते, तसेच हे संत करीत असतात. या माउलींच्या वचनाचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजचा पू. श्री. मामांचा अमृतबोध होय. या सहज करता येतील अशा तीन गोष्टी जर आपण मनापासून पाळल्या तर नि:संशय आपले जीवन सुखी होईलच. यातली तिसरी गोष्ट मात्र सर्वात महत्त्वाची आहे.
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates