5 July 2016

श्रीदत्तभक्तिपरं वन्दे श्रीवासुदेवसरस्वतीं गुरुम्


आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, पंचम श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांची १०२ वी पुण्यतिथी !
प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज म्हणजे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले व त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली व चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा व अधिष्ठान प्राप्त करून दिले. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचे जन्मस्थान- पीठापूर व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान-कारंजा, ही दोन्ही शोधून काढून तेथेही उपासना सुरू करून दिली.
त्यांची " करुणात्रिपदी " ही अजरामर रचना जवळपास सर्व दत्तभक्त रोजच म्हणतात. त्यांच्या प्रकांड विद्वत्ता आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे लोभस दर्शन त्यांच्या विविध ग्रंथांमधून आपल्याला होते. ते अतिशय उत्तम ज्योतिषी आणि आयुर्वेदिक औषधांचे जाणकार म्हणूनही प्रसिद्ध होते. संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून अत्यंत सहज, ऐटबाज संचार करणारी त्यांची अद्भुत प्रतिभा भल्या-भल्या पंडितांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. त्यांनी रचलेले " श्रीदत्तमाहात्म्य,  सप्तशती गुरुचरित्रसार, दत्तलीलामृताब्धिसार, त्रिशती गुरुचरित्र, द्विसाहस्री गुरुचरित्र, श्रीदत्तपुराण ", यांसारखे ग्रंथ तसेच अत्यंत भावपूर्ण अशी शेकडो स्तोत्रे ही श्रीदत्तसंप्रदायाचे अलौकिक वैभवच आहे ! त्यांनी रचलेली पदे, अभंग त्यांच्या परम रसिक अंत:करणाचा प्रत्यय देतात. ते अतुलनीय भाषाप्रभू तर होतेच शिवाय त्यांची स्मरणशक्ती देखील अफलातून होती. पण मनाने अत्यंत भावूक आणि अनन्यशरणागत असे ते एक थोर भक्तश्रेष्ठही होते ; हेच त्यांच्या अतिशय विलोभनीय, भावपूर्ण रचनांचे खरे रहस्य आहे. त्यांचे अभंग वाचताना डोळे पाणावतात.
प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या वाङ्मयाचे फार मोठे वेगळेपण म्हणजे त्यांची मंत्रगर्भ रचना. ते एकाच स्तोत्रात खुबीने अनेक मंत्र गुंफत असत. श्रीदत्तात्रेय अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये त्यांनी केवळ चोवीस श्लोकांमध्ये चौदा वेगवेगळे मंत्र गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च श्रीदत्तप्रभूंची नवीन नावे तयार केलेली दिसून येतात, इतकी त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. त्यांनी श्रीदत्तमाहात्म्याच्या शेवटच्या तीन अध्यायांतील ओव्यांमधून मांडुक्य व ईशावास्य ही दोन उपनिषदे देखील गुंफलेली आहेत. अशाप्रकारची अलौकिक व अपूर्व रचना हे श्री.टेंब्येस्वामींच्या वाङ्मयसागराचे वैशिष्ट्यच आहे !
प. प. श्री. टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांचे कार्य इतके अद्भुत आहे की, त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी उपस्थितांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांची ओळख " गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य " अशीच करून दिली होती व हीच वस्तुस्थिती आहे. ते साक्षात् भगवान श्रीशंकराचार्यच होते.
श्री. टेंब्येस्वामींचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी, दि. १३ ऑगस्ट १८५४ रोजी सावंतवाडी संस्थानातील माणगांव या छोट्याशा खेड्यात श्री. गणेशपंत व सौ. रमाबाई या अत्यंत सत्त्वशील व दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. बालपणीच त्यांच्यातील अवतारित्वाची चुणूक दिसू लागली होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा संपूर्ण वेदाभ्यास करून झालेला होता व ते दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध ही झालेले होते. सोळाव्या वर्षापासून ते इतरांना वेद, ज्योतिष, आयुर्वेद, मंत्रशास्त्र इ. शास्त्रे शिकवीत असत. नृसिंहवाडी येथे त्यांना भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वप्नात मंत्रदीक्षा दिली. पुढे श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने त्यांच्या घरी माणगांव येथे त्यांनी दत्तमंदिर बांधून सात वर्षे उपासना चालविली व देवांच्याच आज्ञेने क्षणात ते सगळे वैभव सोडून बाहेरही पडले. पुढे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी संन्यास घेतला व नंतरची २३ वर्षे श्रीदत्त संप्रदायाच्या संवर्धनाचे अद्भुत कार्य केले.
श्रीदत्तसंप्रदायाला उपासना आणि तत्त्वज्ञान अशा दोन्ही अंगांनी सबळ आधार आणि दैवी अधिष्ठान देण्याचे कार्य प. प. श्री. टेंब्ये स्वामींच्या ग्रंथांनीच केलेले आहे ! भगवान श्रीदत्तात्रेय प्रभू त्यांच्याशी बोलत असत व देवांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीच गोष्ट करीत नसत.
श्रीटेंब्येस्वामींचे चरित्र विलक्षण असून नैष्ठिक संन्यासधर्माचा परमादर्श आहे. अत्यंत कडक धर्माचरण हा त्यांचा विशेष सद्गुण, पण त्याचवेळी परम प्रेमळ, कनवाळू अंत:करण हाही त्यांचा स्थायीभाव होता. या दोन गोष्टी सहसा एकत्र सापडत नाहीत. धर्माचरणातील कर्मठपणा आणि अपार करुणा यांचा देवदुर्लभ संगम प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या ठायी झालेला होता व हे त्यांच्या चरित्रातील प्रसंगांवरून लगेच ध्यानात येते. त्यांच्या लीला फार फार सुंदर आणि साधकांसाठी मार्गदर्शक आहेत.
पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने " प. प. सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला " या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, प. प. श्री. टेंब्ये स्वामींचे जवळपास सर्व वाङ्मय सुलभ मराठी अर्थासह पुन्हा प्रकाशित केलेले आहे. साधक भक्तांसाठी हे सर्व शब्दवैभव सेवा म्हणून ना नफा तत्त्वावर केवळ निर्मितीमूल्यात उपलब्ध करून दिले जाते.
श्रीमत् टेंब्येस्वामींचे पावन चरित्र म्हणजे आजच्या काळातला जिवंत चमत्कारच म्हणायला हवा. त्यांचे अत्यंत कर्मठ शास्त्राचरण, विलक्षण दत्तभक्ती, अतीव प्रेमळ स्वभाव, लोकांविषयीची जगावेगळी करुणा, तेजस्वी बुद्धिमत्ता, कोणताही विषय सहज आत्मसात करण्याची हातोटी, अंगी वसणारे अनेक कलागुण, सारे सारे अतिशय अलौकिक व अद्भुतच आहे. त्यांचे चरित्र वाचताना आपण वारंवार आश्चर्यचकित होऊन त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तकच होतो.
प. प. टेंब्ये स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी, गुजराथ राज्यातील नर्मदा काठावरील पवित्र गरुडेश्वर स्थानी, आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे पावन समाधी मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे.
श्री.गणेशपंत सातवळेकर यांनी प. प. श्री. टेंब्येस्वामींना एकदा विचारले होते की, आपल्यालाही पुनर्जन्म आहे का? त्यावर प. प. श्री. स्वामी उत्तरले, " हो आहे तर. हा तर केवळ अरुणोदय आहे." त्यानुसार प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांनी प. पू. सौ. पार्वतीदेवी देशपांडे यांना दिलेल्या आशीर्वादानुसार, समाधी घेतल्यावर लगेच दुस-या दिवशी पुन्हा त्यांच्या पोटी जन्म घेतला. तेच पुन्हा " श्रीपाद " रूपाने अवतरले. मुलाचे हे नावही स्वामींनीच आधी सांगून ठेवलेले होते. हेच श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे म्हणजे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज होत. त्यांचेही संप्रदाय सेवाकार्य प. प. श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आहे. उद्या त्याची जयंती आहे.
श्रीदत्तसंप्रदायातील अत्यंत तेजस्वी, झळाळते अद्भुत अवतारी विभूतिमत्व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांच्या अम्लान श्रीचरणीं १०२ व्या पुण्यतिथीनिमित्त ही श्रद्धापूर्वक भाव-सुमनांजली समर्पण !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates