21 June 2017

*॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्ती ॥*

प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या असीम दयाकृपेने, गेल्यावर्षी २१ जून रोजी *॥ अमृतबोध ॥* पोस्ट करायला सुरुवात झाली. सद्गुरुकृपेने आज या सेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात केवळ दोन दिवस सोडता सातत्याने अमृतबोध पोस्ट झाले, ही देखील सद्गुरूंची कृपाच होय.
आजवर अनेकानेक वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया दिल्या, आवडल्याचे आवर्जून सांगितले. अमृतबोधातून प्रकट होणारे बोधामृत हे पूर्णपणे सद्गुरु श्री मामांचेच कृपापसाय असल्याने, त्याचा लाभ सर्वांना आजवर झाला आणि पुढेही यावच्चंद्रदिवाकरौ होतच राहील. कारण, संतांच्या वचनांना त्यांच्या तपसामर्थ्याचे अधिष्ठान असल्याने, परिणाम शाश्वत असतो, अक्षय असतो. म्हणूनच ती खरी 'अमृत-वचने' होत. ही विलक्षण बोधवचने वाचकांना, चिंतकांना सर्वांगाने अमृतमय करण्याचे अपूर्व सामर्थ्यही त्यामुळेच सहजतेने अंगी वागवीत असतात. सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या कृपेने *॥ अमृतबोध ॥* चा प्रवास सतत चालूच राहील, याची आम्हांला खात्री आहे व तो चालू राहावा अशीच त्यांच्या चरणीं सर्वांच्या वतीने प्रार्थनाही आहे !
गेल्यावर्षी फेसबुक व व्हॉटसअप वर आपण ह्या पोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हापासून फेसबुकवरील "सद्गुरुबोध" या आपल्या पेजच्या २५०० पेक्षा जास्त लाईक्स झालेल्या असून, "सद्गुरुबोध" ब्लॉगला जगभरातून २५ हजार हिटस् आहेत. ही सर्व सद्गुरूंचीच कृपा आहे. हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतोच आहे.
एका पत्रात सद्गुरु श्री.मामा आपल्या एका साधकाला उपदेश करताना फार मार्मिक सांगतात की, *"तुझे सतत संकटांमधून रक्षण व्हावे यासाठी मी देवांना वारंवार साकडे घालावे, अशी तुझी इच्छा दिसते. एक तर देवांवर जडभार घालू नये, या मताचा मी आहे. दुसरे म्हणजे, सुखदु:ख हे आपल्याच प्रारब्धयोगाने येत असते. त्यासाठी देव कशाला मध्ये घालावेत? देवांनी एकदा आपला स्वीकार केला की, ते आपली सद्बुद्धी शाबूत ठेवतात; हीच त्यांची कृपा समजायला हवी. महाभारत ग्रंथातही असेच म्हटले आहे की; "देव, देवता काही गुराख्याप्रमाणे हातात दंड घेऊन कोणाचे रक्षण करीत नाहीत, तर ज्याचे रक्षण करण्याची ते इच्छा करतात त्याला ते उत्तम प्रकारची बुद्धी देतात !" म्हणून देव आणि सद्गुरु यांच्याबद्दल नेहमी हेच सत्य मानून, तशी भावना ठेवणे हिताचे आहे. अन्यथा आपणाकडून विपरीत भावनेने घोर अपराध घडू लागण्यास वेळ लागायचा नाही."*
सद्गुरु श्री.मामांचा हा अलौकिक बोध हृदयावर कोरून ठेवावा इतका महत्त्वाचा आहे. अशीच श्रीकृपेने लाभलेली सद्बुद्धी सदैव जागृत राहून तिने आपले सर्वबाजूंनी संरक्षण करावे; हाच आपल्या या *॥ अमृतबोध ॥* उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. श्रीभगवंतांच्या दयेने आपल्याला लाभलेल्या दुर्लभ सद्बुद्धीचा स्फुल्लिंग सतत तेजाळता राहावा, यासाठीच हा बोध-उपक्रम आहे. 
आपणां सर्व वाचकांचे सहकार्य असेच चढत्या-वाढत्या प्रमाणात मिळत राहो याच सदिच्छेसह; अमृतबोध परिवार व तुम्हां वाचकांच्या वतीने, वर्षभरात झालेली ही सर्व सेवा श्रीगुरुचरणीं समर्पित करतो !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

1 comment:

  1. For completed of 1 year, many many happy returns of the day.
    Shubhechhaa.
    Jai Shree Sadgurudev

    ReplyDelete

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates