श्रीज्ञानेश्वरी जयंती !!
आज भाद्रपद कृष्ण षष्ठी, श्रीसंत एकनाथ महराजांनी केलेल्या श्रीज्ञानेश्वरीच्या प्रतिशुद्धीची जयंती. भगवान श्रीमाउलींनी ज्ञानेश्वरी केव्हा सांगीतली, याची नोंद उपलब्ध नाही. म्हणून हीच श्रीज्ञानेश्वरी जयंती मानतात.
श्रीज्ञानेश्वरी हा प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचा जीव की प्राण होता. श्रीमाउलींच्या कृपेने त्यांच्या हृदयी ती यथार्थपणे प्रकटलेली होती, म्हणूनच आजवर कधीच कुणीही न सांगीतलेले विलक्षण अर्थ पू. मामा सांगत असत. तुमचा लाडका शिष्य कोण? या प्रश्नाचे उत्तर पू. मामा देतात की, " गुरूंचा कोणी लाडका-दोडका नसतो, सगळ्यांवरच त्यांचे समान प्रेम असते आणि त्यांचे श्रीगुरूच त्यांचे लाडके असतात. पण विचारलेच आहे म्हणून सांगतो, मी श्रीज्ञानेश्वरी वर निष्ठा ठेवून ती जगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून जो ज्ञानेश्वरीवर प्रेम करतो, ती रोज न चुकता वाचतो, तोच माझा लाडका शिष्य होय ! " इतके विलक्षण प्रेम होते त्यांचे ज्ञानेश्वरीवर.
श्रीमाउलींच्या या पावन वाङ्मयीमूर्तीची खरी गरज कोणाला आहे? याचा खुलासा पू. मामा करतात की, जे पूर्ण ज्ञानी नाहीत व पूर्ण अज्ञानीही नाहीत, पण ज्यांची वेद व ईश्वरावर श्रद्धा असून तो परमात्मा जाणून घ्यायची सदिच्छा ज्यांच्या मनात आहे, अशा तुम्हां-आम्हां लोकांसाठीच श्रीज्ञानेश्वरी सांगीतलेली आहे श्रीमाउलींनी. म्हणून तोच आपला सर्वांचा आदर्श जीवनग्रंथ व्हायला हवा, त्याचेच आपण निरंतर सेवन करायला हवे. श्रीमाउलींच्या या बोधदीपाच्या शांतस्निग्ध प्रकाशात आपला प्रपंच व परमार्थ उजळून निघेल यात शंकाच नाही !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment