1 November 2016

॥ अमृतबोध ॥ १ नोव्हेंबर २०१६

जमिनीत ओल आहे हे त्यावरील कोंभाच्या लवलवीवरून लगेच ध्यानी येते. तसे एखाद्याची साधना नीट चालू आहे का? हे त्याच्या चित्ताच्या झालेल्या शुद्धीवरून सहज कळून येते.
या सिद्धांताचे सुरेख स्पष्टीकरण देऊन त्यातील रहस्य सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " *न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः |* ही चित्तशुद्धीची लक्षणे आहेत. त्याच्याकरता साधन हे मुख्य असून, त्यास पोषक म्हणून भगवन्नाम घेत जावे. हेच योगरहस्य आहे. "
चित्ताची शुद्धी होणे म्हणजेच त्यातील विकार, दोष नष्ट होणे. ही चित्तशुद्धी झाल्याशिवाय वेदान्त श्रवणाचा म्हणजेच ज्ञानलाभाचा अधिकारच प्राप्त होत नसतो.
चित्त शुद्ध झाले हे कसे ओळखायचे? तर, कोणाही जिवाचा द्वेष, मत्सर त्या साधकाला कधीच वाटत नाही. कोणावरही अकारण क्रोधाची भावना येत नाही, कसल्याही प्रकारचा लोभ शिल्लक राहात नाही व बुद्धीतील सर्व अशुभ वृत्ती पूर्णपणे संपून जातात. साधकाने प्रेमाने साधनेला सुरुवात केली की ह्याची टप्प्या टप्प्याने अनुभूती यायलाच लागते. पण आपापल्या वेळेनुसार व प्रयत्नांनुसार हे होते असल्याने, प्रत्येकाला कमी अधिक कालावधी लागतो. 
ही संपूर्ण अनुभूती प्रकट होण्यासाठी श्रीगुरूंनी दिलेली साधना हाच एकमात्र उपाय असतो. त्याच्या जोडीला सर्व काळ जसे जमेल तसे नाम घेतले पाहिजे. चित्ताच्या शुद्धीसाठी याशिवाय अन्य मार्ग अस्तित्वात नाही !
दीपावलीचा शेवट भाऊबीजेने होतो. भाऊबीज म्हणजेच विश्वभ्रातृत्वाची भावना. सर्व जग बंधुवत् वाटणे हे विश्वभ्रातृत्व. साधक जसजसा साधना करीत जातो तसतसा त्याला या बंधुत्वाची आतूनच प्रेरणा होऊ लागते, त्याला आपला परका असा भेद फारसा उरत नाही. अशी वृत्ती दृढ होणे, हीच साधकासाठी दीपावलीतील भाऊबीज होय!
गेले चार दिवस आपण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या सारगर्भ चिंतनातून प्रकटलेली ' बोध-दीपावली ' जाणून घेत आहोत. हे समग्र योगरहस्य समजून घेऊन जर त्या शांत-स्निग्ध बोध-प्रकाशात साधना घडली, तर नक्कीच आपल्याही अंत:करणात श्रीगुरुकृपेची दीपावली लवकरच साजरी होईल यात शंका नाही !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates