प्रबोधिनी कार्तिकी एकादशी !!
धर्माची गती गहन आहे असे म्हणतात. विशुद्ध धर्माची तत्त्वे समजून घेणे व त्यानुसार आचरण करणे हेही त्यामुळे खूप कठीण मानले जाते. धर्मपालनाच्या बाबतीत नेहमीच संतांनी सांगितलेल्यानुसार आचरण करणे, हे आपल्यासाठी सोयीचे व सुलभ असते.
संतांना अभिप्रेत असणा-या परमविशुद्ध व मुख्य धर्माचे नेमके लक्षण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " ज्याच्या पालनाने श्रीभगवंतांची निष्काम व अव्यभिचारिणी भक्ती उत्पन्न होईल, तोच मानवमात्रांचा उत्तम धर्म होय ! "
धारण करतो तो धर्म ! म्हणजे ज्या नियमांच्या पालनाने मनुष्याचे संधारण होते, प्रगती होऊन, आपल्या मूळ ब्रह्मानंद-स्वरूपाची हरवलेली अनुभूती पुन्हा प्राप्त होते, तोच खरा धर्म होय. धर्म ही एक प्रगल्भ जीनवपद्धती आहे, तो काही एकमेकांशी भांडण्यापुरता मर्यादित नाही.
श्रीभगवंतच शाश्वत आनंदमय आहेत. त्यांच्याप्रति आपल्या हृदयातील निष्काम, निरपेक्ष व शुद्ध प्रेमाची तीव्रता ज्या ज्या उपायांनी सतत वाढेल व त्याद्वारे त्यांचीच अव्यभिचारिणी, निष्कलंक, निर्मळ व अनन्य भक्ती प्राप्त होईल, असेच सर्व उपाय अखंड अवलंबिणे, हेच आपल्यासाठी खरे धर्मपालन आहे !
आज प्रबोधिनी कार्तिकी एकादशी. श्रीभगवंतांच्या विषयीची ही अनन्य प्रेमभावना श्रीगुरुकृपेने आपल्या हृदयात जागली, तरच खरे ' प्रबोधन ' झाले असे म्हणता येईल. प. पू. श्री. मामा आजच्या अमृतबोधातून भक्तिधर्माची हीच प्रगल्भ जाणीव आपल्याला कृपापूर्वक प्रदान करीत आहेत. त्या बोध-जाणिवेचे अनुसंधान करणे हे साधक म्हणून आपले प्रमुख कर्तव्य असून तीच आजच्या या कार्तिकी एकादशीची आपली सुयोग्य उपासनाही आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment