प्रपंच आणि परमार्थ हे आपल्या खूप सवयीचे शब्द आहेत. प्रपंच म्हणजे मायेची सृष्टी, जे जे दिसते ते सर्व. भगवान श्री माउली स्पष्ट सांगतात की, " मनोमार्गे गेला तो येथेचि मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ " मनाचा मार्ग म्हणजे प्रपंच तर हरीचा मार्ग म्हणजे परमार्थ. हे परस्परविरोधी मार्ग आहेत. प्रपंचात स्वार्थ आहे तर परमार्थ आपल्याला नि:स्वार्थ करणारा आहे. आजवरच्या संतांनी जे जे सांगितले ते सर्व परमार्थाचेच विवरण आहे. आणि मनाचे ऐकून आपण जे वागतो ते सारे प्रपंचात मोडणारे असल्याने आपल्याला नेहमी अडचणीत आणणारेच असते. म्हणून प्रपंच कायम संकटांनी भरलेला असतो.
प्रपंचात जे सुख लाभते ते स्वार्थीच असते, आपल्यापुरते मर्यादित असते. पण परमार्थात मात्र श्रीभगवंतांचे स्वरूप असणारा आनंदच आत बाहेर भरून राहिलेला असतो. त्या निर्भेळ, व्यापक आनंदाची या लौकिक सुखाशी कधीच तुलना होऊ शकत नाही. प्रपंचासारखेच त्यातले सुखही नाशिवंत असते, तर परमार्थातला आनंद श्रीभगवंतांसारखा अविनाशी असतो. म्हणून त्या आनंदालाच आपण सर्वांनी सतत धरून राहावे, यासाठी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून आपल्याला दोन्हीची यथार्थ जाणीव करून देत आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment