25 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५८ ॥*

सद्गुरु श्री माउली महात्म्यांची लक्षणे सांगताना यम-नियमांचा उल्लेख करतात; म्हणून आपण त्यांची थोडक्यात माहिती घेत आहोत.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत.
काया, वाचा व मनाने कोणालाही शारीरिक व मानसिक पीडा न देणे ही *'अहिंसा'* होय. सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात यावर अलौकिक भाष्य केलेले आहे.
आपल्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवलेले ज्ञान जसेच्या तसे सांगणे हे *'सत्य'* होय. परब्रह्मच सत्य असून बाकी सर्व मिथ्या आहे, ही दृढ भावना ठेवणे हेच सत्य होय. नेहमी सत्य वर्तन ठेवणे, सत्याची कास न सोडणे हे साधकांसाठी आवश्यक मानलेले आहे.
दुस-याच्या गवतासारख्या तुच्छ गोष्टीवरही अापले मन न जाणे, कोणाचीही कसलीही वस्तू त्याच्या नकळत न घेणे किंवा न चोरणे हे *'अस्तेय'* होय.
स्वपत्नी/स्वपती व्यतिरिक्त इतर सर्वांच्या विषयी उदासीनता ठेवणे, मनात कसलीही कामभावना येऊ न देणे हे *'ब्रह्मचर्य'* होय. आपले मन सतत ब्रह्मभावात ठेवणे म्हणजेच श्रीभगवंतांच्या स्मरणात ठेवणे, हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मचर्य होय.
कोणत्याही वस्तूंचा आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह न करणे म्हणजेच *'अपरिग्रह'* होय. अति परिग्रहाने नसत्या उचापती वाढतात, त्यामुळे त्यांची उस्तवारी करण्यात साधकाचा प्रचंड वेळ वाया जातो, चित्त सतत व्यग्र राहते व परमार्थसाधना मागे पडते. म्हणून अपरिग्रहाला खूप महत्त्व दिलेले आहे.
सद्गुरुकृपा झाली व मनापासून नेमाने साधना होऊ लागली की, अतिशय कठीण असणारे हे पाचही यम त्या साधकाला आपोआप जमायला लागतात. एरवी स्वत:च्या बळावर कितीही प्रयत्न केले तरी या पाच गोष्टी साधणे केवळ अशक्य आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates