संतांचा प्रत्येक उपदेश अलौकिकच असतो, पण त्यातही काही बोध हे नित्यस्मरणीय, वारंवार ज्यांचे मनन करावे, असेच असतात. त्या श्रेयनामावली मध्ये आजचे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे बोधवचन फारच वरच्या क्रमांकावर आहे. आपले जीवन निरामय, सुखी व समाधानी होण्यात मोलाची भूमिका निश्चित बजावेल असा, अक्षरश: रोज सकाळी उठल्यावर एकदातरी वाचावा, असाच हा उत्तम विचार आहे.
आपले आयुष्य भूत, भविष्य आणि वर्तमान या तीन काळात विभागलेले आहे. खरेतर त्यातला वर्तमानच मुख्य असूनही, आपण संपून गेलेल्या भूतकाळात किंवा अजून यायच्या असलेल्या भविष्यातच जास्त रममाण झालेलो असतो. तेच इतके अंगवळणी पडलेले असते की, चालू क्षण आपण पुरेपूर उपभोगतच नाही; आणि म्हणूनच आपले वर्तमान सुखावह ठरत नाही.
आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जावा असे वाटत असेल, तर भूतकाळातील गोष्टींचे उगीचच स्मरण करू नये, कारण आता त्या घडून गेलेल्या आहेत, कोणालाच बदलता येणार नाहीत. भविष्य तर अजून घडायचे असल्याने, अजूनही ते आपल्या हातातच आहे, आपल्या आजच्या वर्तनात त्याचे बीज आहे; म्हणून भावी गोष्टींची उगीचच आज चिंता करत बसू नये. हे जमले तरच समोरचा प्रत्येक क्षण अधिक आपलेपणाने, सळसळत्या उत्साहाने व आनंदाने उपभोगला जातो. हीच समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )