2 January 2017

॥ अमृतबोध ॥ २ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या दुस-या अभंगात म्हणतात,
चहूं वेदी जाण षट्शास्त्री कारण ।
अठराही पुराणें हरिसी गाती॥
चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे ही श्रीहरींचेच गुणवर्णन करतात. यात माउली 'जाण' असा शब्द वापरतात. सामान्यपणे याचा अर्थ 'समज' असा केला जातो. पण प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्या शब्दाचा सूक्ष्म अर्थ सांगत असत की, जाण म्हणजे 'ज्ञान'. यासाठी ते श्री तुकाराम महाराजांचे प्रमाण देतात. " सापडविले वाटे जातां गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥" येथे श्री तुकोबाराय 'जाणा कर' म्हणजेच 'ज्ञाता कर' असेच म्हणतात. 
याचे आणखी स्पष्टीकरण पू.मामा करतात की, " जेव्हा श्रीसद्गुरुपरंपरेने आलेले ज्ञान स्वत: अनुभवून ते दुस-यास देण्यास, श्रीगुरूंच्या आदेशानुसार जो पात्र असतो, तोच 'ज्ञाता कर' ठेवून इतरांना कृतार्थ करू शकतो. केवळ तो स्वत: 'ज्ञाता' असून उपयोगाचे नाही; तर त्याला 'ज्ञाता कर' ठेवून दुस-यास कृतार्थही करता आले पाहिजे. असे महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. "
यावरून लक्षात येईल की, माउलींना, 'जाण' म्हणजे ज्ञान,  तेही परंपरेने आलेले व अनुभवजन्य; असेच अभिप्रेत आहे. श्रीगुरूंकडून हे शक्तियुक्त ज्ञान मिळाल्याशिवाय; चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणांचे खरे मर्म, कितीही अभ्यास केला तरी हाती लागत नाही. त्यातील भिन्न भिन्न मतांमुळे उलट गोंधळच उडतो. वरकरणी परस्पर विरोधी वाटणा-या वेदवचनांचा सुयोग्य समन्वय केवळ श्रीगुरुकृपेनेच होतो, नुसत्या अभ्यासाने नाही. यच्चयावत सर्व वेदवचने हरिगुणगान करतात, हे श्रीगुरूंची कृपा झाल्यानंतरच प्रचितीस येत असते. यासाठीच माउली मुद्दाम 'जाण' हा अन्वर्थक शब्द तेथे घालतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates