श्री माउलींनी त्यांच्या सर्व वाङ्मयाचे सार म्हणून 'हरिपाठ' या लघु प्रकरण-ग्रंथाची रचना केलेली आहे. हे माउलींच्या अभंगांचे नुसते संकलन नाही, हा अठ्ठावीस अभंगांचा त्यांचा स्वतंत्र ग्रंथच आहे. श्रीगुरुकृपेसह लाभलेल्या दिव्यनामाच्या साधनेचे सर्वांगीण चिंतन माउलींनी यात प्रकट केलेले आहे. म्हणूनच वरवर वाटतो तेवढा हा ग्रंथ सोपा मुळीच नाही. हे अत्यंत प्रभावी असे पूर्णपणे गुरुगम्य रहस्यच आहे.
वासनामय संसाराच्या जंजाळातून सुटण्याची ज्याला खरोखरीच तळमळ आहे, त्याने आधी प्रेमाने 'हरि हरि' म्हणावे. हाच नामस्मरणाचा उपाय वेदव्यासांनीही सांगून ठेवलेला आहे. या नामस्मरणाने पुण्याई वाढते, वेदशास्त्रांचा अभ्यास करण्याची, परमार्थ करण्याची सद्बुद्धी निर्माण होते व त्यायोगाने परंपरेने आलेल्या आत्मज्ञानी महात्म्यांशी गाठ पडून त्यांची कृपा लाभते. श्रीगुरूंच्या त्या पावन कृपानुग्रहाने साधना सुरू होऊन, सुयोग्य प्रयत्न घडू लागतात व जीव मुक्तीच्या दिशेने अग्रेसर होतो. सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे अनुसंधान करता करता आतूनच प्राणांचे स्थिरीकरण होऊ लागते. प्राण स्थिर व्हायला लागले की मनही स्थिर होते व तेथेच द्वारिकेचे राणेही पांडवाघरी येतात. तेव्हाच योगाचेही सार भेटते, केवलकुंभकाचा अनुभव लाभून जीव धन्य होतो. हे सर्व केवळ श्रीगुरुकृपेनेच घडते, म्हणून त्या कृपेला परमार्थात फार महत्त्व आहे !
यासाठी आपण फक्त ' हरि मुखे म्हणा ...।' हेच सूत्र पक्के लक्षात ठेवायचे आहे. "विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ।" हेच आपले परमकर्तव्य व्हायला हवे. म्हणून श्री माउली या सर्वाचे सार सांगतात की, प्रेमाने व भक्तीने श्रीगुरूपदिष्ट नाम घ्यावे, म्हणजे पुढचे सगळे काही आपोआप घडून येईल.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )