Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 January 2017

॥ अमृतबोध ॥ ३१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४६ ॥

सद्गुरु श्री माउली एका अभंगात म्हणतात की, *"हरिवांचूनि न दिसे रितें रे ॥"* सद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या अभ्यासाने सर्वत्र श्रीहरींचीच प्रचिती येते. हा अनुभव आला की निर्गुणाशिवाय काहीही नाही, हे समजून येते.
म्हणूनच ते हरिपाठाच्या तिस-या अभंगाच्या तिस-या चरणात म्हणतात,
*अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार ।*
*जेथूनि चराचर हरिसी भजे ॥हरि.३.३ ॥*
जो अव्यक्त आहे, इतकेच नाही तर निराकारही आहे, म्हणजे ज्यास कोणताही आकार नाही; तेथूनच चराचराची निर्मिती होते.
प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "आता परमात्मा जर अव्यक्त, निर्गुण, निराकार आहे, तो तर काहीच करीत नाही; मग हे विश्व निर्माण कसे होते? निर्गुण परमात्म्यावर कर्तृत्वाचा आरोप केला की अद्वैत सिद्धांतास बाधा येईल. म्हणूनच श्रुती सांगते की, परमात्म्याने 'ईक्षण' केले. ही ईक्षणाची प्रक्रिया नीट समजून घ्यायला हवी, म्हणजे मग सगळे कोडे उलगडते. पू.मामांनी विस्ताराने कथन केलेले परमात्म्याचे हे ईक्षण आपण उद्या सविस्तर जाणून घेऊया.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

30 January 2017

॥ अमृतबोध ॥ ३० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४५ ॥

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या तिस-या अभंगात पुढे म्हणतात,
*'हरिवीण मन व्यर्थ जाय ॥'*
त्यावर भाष्य करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, हरिशिवाय मन कोठेही जाणार नाही. याचा अर्थच मनात येणा-या शुभाशुभ विचारांशी जोपर्यंत इंद्रियतादात्म्य नाही, तोपर्यंत भीती नाही. मन आपले संकल्प-विकल्पांचे कार्य करीत असताना, आपण आपले कार्य करावे.
मनाला सोडून वागायची आपल्याला नेहमीची सवय आहे. पाहा, झोपेत आपल्याला निरतिशय आनंद होत असतो. त्यावेळी मन नसते का? असते, पण आपण त्याला सोडून वागत असतो. असे जर इतरवेळीही आपण मनास सोडून वागू शकलो तर ते फार उपयुक्त ठरते.
यासाठीच प.पू.मामा आपल्याला उपदेश करतात की, "श्रीभगवंतांच्या ज्या शक्तीने सर्व विश्व निर्माण केले, त्याच शक्तीला शरण जाऊन साधना करायला हवी. तरच 'हरिवीण काही नाही' हा अनुभव येईल."
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥

सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठाच्या तिस-या अभंगातील सगुण-निर्गुण विचाराचा समारोप, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अत्यंत सुंदर व महत्त्वपूर्ण शब्दांमध्ये करतात. ही सर्व वाक्ये नेहमी चिंतनात ठेवावीत इतकी वैशिष्ट्यपूर्ण  आहेत.
पू.मामा सांगतात, "एकदम निर्गुणाचा अनुभव येणे अशक्य असल्यामुळे, सगुण आणि निर्गुण एकच आहे अशी शुद्ध भावना ठेवूनच त्याप्रमाणे भक्ताने वर्तन करावे. परमात्म्यापासून उत्पन्न होणा-या सगुण रूपासच 'भगवती शक्ती' असे म्हणतात व तिच्या आधारानेच जीवाला मुक्ती मिळते; म्हणून तिलाच 'भक्ती' असेही म्हणतात.
प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती(टेंब्ये) स्वामी महाराजांनीही याविषयी सुंदर सांगितले आहे. ते म्हणतात, "सगुणाची उपासना करून मनुष्याने कृतार्थ व्हावे; कारण त्याशिवाय निर्गुणाची अनुभूती येणार नाही. राजाला जसा आपल्या शिक्कामोर्तबाचा व कायद्याचा अभिमान असतो, तसा देवाला आपल्या सगुण रूपाचा व वेदशास्त्रांचा अभिमान असतो. शिक्कामोर्तब किंवा कायदा म्हणजे राजा नाही हे खरे; पण त्याशिवाय त्याचा व्यवहार होत नाही; हेही तितकेच खरे !"
म्हणून सगुण-निर्गुणाच्या नुसत्या चर्चेपेक्षा, सगुणाची भक्ती करून त्यातून प्रकट होणा-या निर्गुणाची प्रचिती घेण्यातच आपले खरे हित आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

28 January 2017

॥ अमृतबोध ॥ २८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४३ ॥

भक्तीने सगुणाची अनुभूती येते. पण ही भक्ती श्रीगुरुकृपेनेच उत्पन्न होत असते. तिलाच 'शक्ती' किंवा 'ज्ञान' असेही म्हणतात. "जे अनुभूती-ज्ञानात तल्लीन आहेत, ते यास 'ज्ञान' म्हणतात, शंकरभक्त यासच शक्ती म्हणतात. आम्ही यासच 'परमभक्ती' असे म्हणतो", असे श्री माउली सांगतात. ही भक्ती प्राप्त झाल्याशिवाय खरे भजन घडत नाही!
सद्गुरु श्री माउली या भजनाला 'गहन-भजन' म्हणतात. हे अत्यंत कठीण असे भजन म्हणजेच, सगुणाचे माध्यम होऊन, त्याद्वारे अंती निर्गुणाची अनुभूती घेणे होय.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सगुणध्यानाची प्रक्रिया उत्तम समजावून सांगताना म्हणतात की, "श्रीसंत एकनाथ महाराजांनी याबद्दल फारच सुंदर सांगून ठेवलेले आहे. सगुणाचे ध्यान त्याच्या चरणांपासून सुरू करावे व शेवटी मुखाचे ध्यान करावे. आणि त्यानंतर जे विमल स्मित हास्य, म्हणजे निरतिशय आनंद, त्यात विलीन व्हावे; म्हणजेच सगुण आपोआपच निर्गुणात विलीन होईल."
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

27 January 2017

॥ अमृतबोध ॥२७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ४२ ॥

सगुण व निर्गुणाचा श्रीसंत एकनाथ महाराज आपल्या भागवतात सुरेख समन्वय करतात. श्रीभगवंतांच्या तोंडी त्यांनी ओवी घातलेली आहे की, माझे निर्गुण निजस्वरूप किंवा वैकुंठातील शेषशायी सगुणरूप दोन्हीही एकरूपच होत."  देवांच्या ठायी सगुण-निर्गुण असा खरोखरी भेदच नाही. म्हणून माउली देखील सांगतात, विटेवर उभे असलेले हे सनातन परब्रह्मच 'सगुणनिर्गुण-विलक्षण' आहे !
प.पू.मामांनी एकदा या संबंधी मातु:श्री पू.पार्वतीदेवींना विचारले. त्यावर त्यांनी श्रीगुरुचरित्रातील शबराच्या आख्यानाची कथा सांगितली. या दोन्हींचा संबंध काय? हे पटकन् कळणार नाही, पण नीट विचार केला म्हणजे पू.मातु:श्रींची भूमिका लक्षात येते.  शबराच्या मनात शिवपूजा करण्याचा विचार येतो. तो भग्न झालेले एक लिंग उचलून घेऊन येतो. त्याची पूर्वपुण्याई चांगली असल्याने त्याच्यावर गुरुकृपा होते. गुरु त्याला योग्य ज्ञान देतात, ते भग्नलिंग सोडून दुसरे लिंग घेण्याचा उपदेश करतात. तो गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, दररोज ताज्या चिताभस्माने मनोभावे शिवपूजा सुरू करतो. एकेदिवशी चिताभस्म न मिळाल्याने त्याला आपल्या पत्नीस जाळून तिच्या भस्माने पूजा पूर्ण करावी लागते. प्रसाद घ्यायला तो सवयीने हाक मारतो, तर त्याची बायको धावत येते. त्याला कळतच नाही हे कसे घडले. तेवढ्यात त्या दोघांच्या या अनन्यभक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात् भगवान शिव देखील प्रकट होऊन त्यांना दर्शन देतात. म्हणजेच त्यांना सगुणाची अनुभूती येते. पू.मातु:श्री या कथेचे तात्पर्य सांगतात की, निर्गुणातून सगुण प्रकट होण्यासाठी ख-या भक्तीची आवश्यकता असते; आणि ही भक्ती केवळ श्रीगुरुकृपेनेच प्रकट होत असते !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

26 January 2017

॥ अमृतबोध ॥ २६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४१ ॥

सगुण व निर्गुण या संज्ञांच्या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेल्या व्याख्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. पण समजायला कठीण आहेत, असे अनेकांनी काल कळवले. म्हणून आज त्यावर थोडा विचार करूया. हा विषय नीट समजावा म्हणून, प.पू.मामांनी व प.पू.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या वाङ्मयातून सांगितलेले संदर्भ उपयोगात आणलेले आहेत.
श्रीभगवंतांची मायाशक्ती ही तीन प्रकारची आहे; मूळमाया, योगमाया व त्रिगुणात्मिका माया. प्रत्यक्ष श्रीभगवंत ज्या मायेच्या आधाराने साकार होतात, अवतरतात तिला मूळमाया म्हणतात. ही त्यांच्याच सारखी नित्यशुद्ध आहे. श्रीसंत जनाबाई श्रीविठोबांना उद्देशून, "अरे विठ्या अरे विठ्या । मूळमायेच्या कारट्या ॥" असे जे म्हणतात ते याच अर्थाने.
श्रीभगवंतांचेच स्वरूप असणा-या अवतारी संतविभूती, श्रीसद्गुरु ज्या मायेच्या आधाराने साकार होतात तिला 'योगमाया' म्हणतात. ही माया देखील भगवंतांची एक विभूतीच आहे. सर्वसामान्य जीव व यच्चयावत् सर्व विश्व ज्या मायेतून आकाराला येते, तिला 'त्रिगुणात्मिका माया' म्हणतात. हीच सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या माध्यमातून सर्व चराचर प्रपंचाची निर्मिती करीत असते. त्रिगुणात्मिका मायेचा विस्तार हा केव्हाही नाशिवंत व भासमानच असतो.
श्रीभगवंतांचे मूळ परब्रह्मस्वरूप हे तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. त्याला ना आकार ना विकार. यासाठीच पू.मामा त्या निर्गुणाची व्याख्या करताना म्हणतात की, सत्त्व, रज व तम या तीन गुणांविरहित जे निराकार तत्त्व तेच 'निर्गुण' होय.
श्रीभगवंत सगुण साकार होताना मूळमायेच्याच आश्रयाने, या निर्गुण स्वरूपातूनच अवतरित होत असतात. म्हणून त्याही ठिकाणी हे तीन गुण केव्हाही अस्तित्वात नसतात. त्यामुळे सगुणाची व्याख्या करताना पू.मामा म्हणतात की, सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांशिवायच जे साकार झालेले असते, तेच 'सगुण' होय. निर्गुणातून सगुणत्वाला आले म्हणून श्रीभगवंतांचे रूप काही त्रिगुणात्मक बनत नसल्याने, त्या रूपालाही कधीच नाश नसतो. ते नित्यसिद्धच राहते. ही दोन्ही रूपे परमविशुद्ध व नित्यपवित्र असल्याने, सद्गुरु श्री माउली, 'सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।' असेच म्हणतात. 'कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।' या अभंगात अतिशय सुंदर शब्दांमध्ये श्री माउलींनी याविषयी आणखी स्पष्टीकरण दिलेले आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

25 January 2017

॥ अमृतबोध ॥ २५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४० ॥

परमार्थामध्ये सद्गुरुकृपेने स्वत:ला आलेल्या अनुभूतीला सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे. सर्व संत या एका गोष्टीचा कायम पुरस्कार करतात. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अनुभूतीचे श्रेष्ठत्व सांगताना, श्रीसंत तुकाराम महाराजांचे फारच मार्मिक प्रमाण देतात की, "कागदीं लिहितां नामाची साखर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥तु.गा.२८६२.४॥" कागदावर 'साखर' शब्द लिहून चाटला तर जिभेला गोडी येते का त्याची? तसेच, स्वत: घेतलेल्या अनुभवाशिवाय नुसत्या पढिक शब्दज्ञानाला परमार्थात काडीचीही किंमत नाही.
प्रपंच असार असून हरिपाठ हा सार आहे, असे सांगून श्री माउली पुढे म्हणतात, "सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।(हरि.३.२)" येथे प.पू.श्री.मामा सगुण व निर्गुण या संज्ञा स्पष्ट करून सांगतात. त्यांनी केलेल्या या शब्दांच्या विशेष व्याख्या कायम स्मरणात ठेवाव्यात इतक्या महत्त्वाच्या आहेत.
पू.मामा सांगतात, "सत्त्व, रज व तम विरहित साकार आहे ते 'सगुण';  व जे त्या गुणांविरहित निराकार आहे ते 'निर्गुण' होय. निर्गुणातूनच सगुण साकार झालेले आहे. श्रीभगवंतांची साकार मूर्ती ही म्हणूनच सगुण असूनही निर्गुणच आहे!"
पू.मामांच्या या अतिशय सुरेख व्याख्यांवर आपण उद्या आणखी विचार करू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

24 January 2017

॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥

हरिपाठ हा जरी सार विचार असला, तरी तो पूर्वपुण्याईच्या जोरावर भेटलेल्या श्रीगुरूंच्या कृपेनेच केवळ प्राप्त होत असतो. जोवर ती कृपा होत नाही, तोवर आपण विचारांतून सुटून त्याचे आचरण करूच शकत नाही. हे आपले सोडवणे श्रीगुरूंनाच करावे लागते, तेच श्रीहरींकडे जाण्याचा मार्ग आपल्याला प्रदान करीत असतात, असे प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात.
सुरुवातीला जरी ते शब्दज्ञान एका मर्यादेपर्यंत अावश्यक असले, तरी त्याचा पुढे उपयोग नसतो. जे ज्ञान शब्दांनी झालेले आहे, त्याचा साधनेने अनुभव घ्यावा लागतो. पू.मामांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी यावर सुंदर कथा सांगत असत. एकदा एका सिंहाला गोळी लागून तो मेला. फिरता फिरता एका ग्रामसिंहाला म्हणजे कुत्र्याला ते शव दिसले. त्याने संधीचा फायदा घ्यायचे ठरवून, पोटाकडून त्याचा सर्व भाग मोकळा केला व तो त्या कातडीच्या आवरणात शिरून बसला. तो कुत्रा मग सिंहाच्या ऐटीत गावात आला. त्याच्या इतर भाऊबंधांनी 'या वनराज' म्हणून त्याचा जयजयकार केला. तेवढ्यात एक उन्मत्त हत्ती ची ची करीत तेथे आला. त्याबरोबर हा सिंहाचे कातडे पांघरलेला ग्रामसिंह दोन पायात शेपूट घालून पळून गेला. त्याचा आपण सिंह असल्याचा उसना आणलेला आव एका क्षणात नष्ट झाला.
पोकळ शब्दज्ञानाचेही असेच होते. ते नुसते शब्दज्ञान हे अनुभूतीशिवाय टिकूच शकत नाही. परमार्थात अनुभूतीशिवाय असणारे इतर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणूनच, हरिपाठाचा खरा अर्थही साधनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवाने समजल्याशिवाय व्यर्थ आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

23 January 2017

॥ अमृतबोध ॥ २३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३८ ॥

सद्गुरु श्री माउली म्हणतात, त्रिगुण असार आहेत, निर्गुण तेवढे सार आहे; पण या सारासार-विचाराचे नुसता शब्दज्ञान होऊन भागते का? या वांझोट्या पोपटपंचीचा उपयोग काय, जर त्याचा अनुभवच घेतला नाही तर? म्हणून खरा सारासार-विचार हा प्रेमाने हरिपाठ करण्यातच आहे ! माउलींचे गर्भित सांगणे प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज स्पष्ट करतात की, "सारासार अनुभवण्यासाठी विचार करा व आचारास लागा!"
पू.मामांच्या मातु:श्री या चरणाचा अर्थ करताना एक उदाहरण देत. एखाद्याला जिलबी खायची असेल तर नुसता विचार करून भागेल का? आवश्यक सामान आणून, जिलबी कशी करायची त्याचे ज्ञान मिळवून, करून खाल्ली तरच समाधान लाभेल ना? 'जिलबी हवी' चा नुसता जप करून काय होणार? तसे, सारासार-विचार करून भागत नाही, त्याचा अनुभव येण्यासाठी त्या विचारानुसार प्रेमाने व नेमाने साधनाही करावी लागते.
शब्दज्ञान हे केवळ रस्ता दाखविण्याचे काम करते. पण रस्ता दाखवला जाऊनही आपण जर त्यावरून चाललोच नाही; तर मुक्कामाला कसे पोचणार? म्हणून नुसते 'मला असे वाटते' म्हणून भागत नाही, तर त्या वाटण्याचे प्रात्यक्षिकही अनुभवता यायला हवे. हेच माउली 'सारासार विचार हरिपाठ ।' मधून सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

22 January 2017

॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥

निर्गुण परब्रह्माचे श्रुती म्हणजेच वेदोपनिषदे वर्णन करतात, 'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ।' प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज या वचनाचा अर्थ फार मार्मिक सांगतात की, "सर्व त्रिगुण वस्तूंत व्यापून असूनही, जे स्वत: आपल्या निर्गुण स्वरूपाचा त्याग करीत नाही; तेच सत्य व नित्य होय !" विश्वरूपाने नटूनही त्याचवेळी ते परब्रह्म निर्गुणरूप देखील असतेच. याचे सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायात फार सुंदर विवेचन केलेले आहे.
माउली म्हणतात, अक्षरे जशी लिहिली किंवा पुसली तरी त्यांचा अर्थ जसा कायमच राहतो; लाटा उत्पन्न झाल्या किंवा मोडल्या तरी पाणी जसे कायमच असते; त्याप्रमाणे अविनाशी परब्रह्म सर्व भूतांच्या अस्तित्वात अखंडपणे असते. सोन्याचे वेगवेगळे दागिने केले व नंतर ते पुन्हा आटवले. या दोन्ही प्रसंगी सोने कायमच असते, ते काही तिथून जात नाही की नष्ट होत नाही; तसेच पुन्हा पुन्हा जन्मणा-या व नाश पावणा-या या जगतात, त्या जगाचा आधार असणारे निर्गुण परब्रह्म अमरत्वाने कायमच राहते. जग निर्माण झाले काय किंवा नष्ट झाले काय; परब्रह्म जसेच्या तसेच असते. या दोन्ही स्थितीत त्याचे निर्गुणत्व भंगत नाही. म्हणूनच माउली त्या सर्वश्रेष्ठ परब्रह्मालाच केवळ 'सार' म्हणतात !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

21 January 2017

॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥

भगवान सद्गुरु श्री माउली म्हणतात की, त्रिगुण व त्यांचाच विस्तार असणारे जग असार आहे व निर्गुण तेवढे सार आहे. त्यातील त्रिगुणांचे प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले विवरण आपण पाहिले. आता त्यांनी केलेला निर्गुणाचा विचार पाहूया.
निर्गुण म्हणजे गुणरहित. गुणरहित म्हणजेच सत्त्व, रज व तम हे तीन गुण ज्यात नाहीत ते. त्या निर्गुण परमात्म्याव्यतिरिक्त या जगात काहीही अस्तित्वातच नाही. माउली सांगतात की हे परमतत्त्व गुण व इंद्रियांहून वेगळे आहे. त्याचा गुणांशी कसलाही संबंध देखील नाही; पण हे असार गुण त्याच सारभूत तत्त्वाच्या, चैतन्यमय परब्रह्माच्या अधिष्ठानावर अाभासित होतात.
श्रीभगवंतांची मायाच त्रिगुणरूप होऊन हा प्रचंड प्रपंच निर्माण करते. त्रिगुणात्मक असल्यामुळे तो केवळ भ्रमाने भासतो. म्हणूनच माउली त्याला असार म्हणतात. तो सतत बदलणारा व कधी ना कधी नष्ट होणारा आहे. पण निर्गुण परब्रह्म जसेच्या तसेच राहणारे, कधीही न बदलणारे, विकाररहित व अविनाशी आहे.
माउलींचे हे सर्व सांगणे नेमकेपणाने उद्धृत करताना पू.मामा म्हणतात, "नीट विचार करून पाहिले असता, केवळ भ्रांतीमुळे भासमान होणारा हा प्रपंच अनित्य आहे आणि ज्या चैतन्यसत्तेवर तो भासतो, ते निर्गुण परब्रह्म नित्य किंवा शाश्वत आहे."
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

20 January 2017

॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज पुण्यतिथी !! ॥ हरिपाठ मंजिरी - ३५ ॥

सद्गुरु श्री माउलींप्रमाणेच श्रीसंत एकनाथ महाराजही त्रिगुणांचे उत्तम विवरण करतात. पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी नाथभागवतातील ते त्रिगुण विवेचन, विशेष असल्याने मुद्दामच येथे घेतलेले आहे.
नाथ महाराज म्हणतात की, मोजता येणार नाही इतके आयुष्य असणारे ब्रह्मदेव जिथे त्रिगुणांची विभागणी करू शकत नाहीत, तेथे इतरांच्या सामर्थ्याबद्दल काय बोलणार? हे तिन्ही गुण; शुद्ध असोत किंवा मिश्रित असोत, ते प्रत्येक जीवाला गुणकर्मांनी बांधतातच. घड्यातील पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते. ते पाहून सूर्य त्या घड्यात अडकल्या सारखेच वाटते. हा जसा भास असूनही खरा वाटतो, तसेच हे गुणही आत्म्याला बंधनात पाडतात.
गुणांशी एकरूपता झाली की, आपण त्या बंधनात अडकलो आहोत, असा जीवाला भास होतो. गुण म्हणजे दोरा. अर्धवट उजेड व अर्धवट अंधारात पडलेल्या दोरीवर सापाचा भ्रम होऊन आपण घाबरतो. तसेच हे त्रिगुणही भासमान बंधनात पाडून जीवाला भरपूर कष्ट सहन करायला लावतात.
(आज प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांचे व पू.मामांचे छायाचित्र सोबत दिलेले आहे.)
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

19 January 2017

॥ अमृतबोध ॥ १९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३४ ॥

सद्गुरु श्री माउली ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातही या त्रिगुणांविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतात. त्याचे विवरण प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांनी उत्तमप्रकारे केलेले आहे.
श्रीभगवंतांची मायाशक्ती त्रिगुणात्मक आहे. तिचा विस्तार या तीन गुणांच्या साह्यानेच होतो. म्हणून तिच्याच स्वरूपाचा विस्तार असणारे यच्चयावत् सर्व विश्व हे सत्त्व, रज व तमोगुणांच्याच विविध मिश्रणांतून बनलेले आहे. मायेच्या प्रांतात, स्वर्गात किंवा मृत्युलोकात निर्माण होणा-या सर्व वस्तू या तीन गुणांच्याच बनलेल्या आहेत. पाण्यावाचून लाट नाही, मातीवाचून ढेकूळ नाही; त्याप्रमाणे त्रिगुणांवाचून विश्व नाही. म्हणूनच हे त्रिगुण मोठे बलवान झालेले आहेत. यांनी देवतांना त्रिविध केले, जगाचे तीन प्रकार केले आणि चारही वर्णांना गुणांप्रमाणे वेगवेगळी कामे वाटून दिलेली आहेत.
त्रिगुणांची व्याप्ती इतकी प्रचंड आहे, म्हणूनच त्यांचा निरास होणे  अतिशय कठीण व जिकिरीचे होऊन बसते. ज्याच्यावर सद्गुरुकृपा झालेली आहे व जो रोज प्रेमाने साधना करतो, तोच फक्त या त्रिगुणांच्या कचाट्यातून कायमचा मुक्त होऊ शकतो !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

18 January 2017

॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥

त्रिगुण बंधन कसे निर्माण करतात, याचे विवरण सद्गुरु श्री माउली करीत आहेत. त्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज करतात. परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा. तो आत्मा पांचभौतिक देहात आला की, त्याच्या मूळच्या व्यापक परमात्मस्वरूपाचा संकोच होऊन तो जीवदशेला येतो. त्याक्षणी त्याच्या ठिकाणी 'हा देहच मी' ही भावना प्रथम निर्माण होते. त्या जन्म-मरण असणा-या देहाचे सर्व धर्म तो निरवयव आत्मा फुकटच आपल्यावर घेतो व स्वत:हूनच बंधनात पडतो. वाढ होणे, कमी होणे, नाश पावणे, तहान-भूक, सुख-दु:ख इत्यादी सर्व त्या देहाचेच विकार आहेत, आत्मा तर यांच्याहून पूर्ण वेगळा आहे. पण तो आनंदमय आत्मा त्या देहाच्या संगतीने हे सर्व स्वत:चेच धर्म मानून त्यांचा सतत अनुभव घेऊ लागतो. एकदा का हा देहाशी तादात्म्य पावला की, मग तिन्ही गुण आपापल्या परीने त्याला आणखी बद्ध करतात. ज्याप्रमाणे माशाने आमिष गिळले की हिसडा देऊन कोळी तो गळ ओढू लागतो, तसेच हे सत्त्व, रज व तमरूपी पारधी जीवात्म्याला आपल्या पाशांनी बांधून हैराण करतात. म्हणूनच श्री माउली त्यांना 'असार' म्हणतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates